हळवी आहे पोर!

©️®️गीता गरुड.
दुर्गाबाई पोस्टात एजंटचं(अभिकर्ता) काम करीत. संध्याकाळी कलेक्शनसाठी फिरत. त्यांच्या लाघवी, बोलघेवड्या स्वभावामुळे व प्रामाणिकपणामुळे खात्रीशीर गुंतवणुकीसाठी लोकं त्यांचा सल्ला मागत, त्यांना आपल्या अडीअडचणी, मिळकत सारं काही सांगत. दुर्गाबाई त्यांना अचूक असा बचतीचा सल्ला देत.
दुर्गाबाईंचा मुलगा, विराजस बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागला तेंव्हा त्यांनी पोस्टात पेढे वाटून साऱ्यांच तोंड गोड केलं होतं. घरचं, बाहेरचं आवरत, तारेवरची कसरत पार पाडत त्यांनी विराजस नि लहानी मुलगी छाया हिला लहानाचं मोठं केलं होतं. छायाचं शिक्षण पुरं व्हायचं होतं. दुर्गाबाईंचे यजमान, विपुलराव एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते. दोघा मुलांचा शैक्षणिक खर्च भागवताना होणारी ओढाताण सुसह्य होण्यासाठीच दुर्गाबाई घरातलं सांभाळून एजंटचं काम करायच्या.
विराजस कंपनीच्या जवळच पेईंग गेस्ट म्हणून राहू लागला. ‘एका फ्लेटमधे पाचजणं रहातात. महिन्याचं माणसी पंचवीस हजार भाडं’, दुर्गाबाई मैत्रिणींना कौतुकाने सांगीत. दोनेक वर्षांत विराजसचं लग्न करून द्यायचा त्यांचा विचार होता. विराजसने मुंबईत टुबीएचकेचा फ्लेट घेतला हे ऐकून दुर्गाबाई नि विपुलराव दोघेही खूष झाले. “आता हे डोंबिवलीतलं घर भाड्याने द्यायचं नि विरुकडे जाऊन रहायचं, उगीच का त्याने टुबीएचके घेतलाय. आपला विचार करूनच घेतला असेल ना!”दुर्गाबाई विपुलरावांना बोलल्या.
विपुलराव म्हणाले,”चिरंजीवाने स्वतः बोलावलं तर जायचं नाहीतर आपली डोंबीवली काय वाईट आहे! जुने मित्र आहेत. देवस्थानं आहेत जवळपास, फिरायला नानानानी पार्क आहेत आणि बऱ्यापैकी आपल्या आचारविचारांचे लोक सभोवती आहेत.”
“तरी लेकाकडेही बघावं लागतं ना. बारावीपासनं पोरगं हॉस्टेलला. धड म्हणून घरचं जेवण नाही लेकराला. वाढीचं वय त्याचं. पौष्टिक अन्न पोटात गेलं पाहिजे या वयात.” दुर्गाबाईंनी विपुलरावांच्या विचारांवर कुरघोडी केली.
त्यांनी एकदोघा विवाहमंडळात विराजसचं नाव नोंदवून ठेवलं होतं. विपुलराव मात्र मित्रांच्या घरातली वादावादी ऐकून सचिंत झाले होते. विराजसचं लग्न झालं की घर युद्धभूमी तर होणार नाही? कशी असेल भावी सूनबाई? आपल्याशी जाऊदे, निदान सासूशी तरी जुळवून घेईल का असे बरेच विचार त्यांच्या मनात येत.
विपुलरावांच्या एका जीवश्चकंठश्च मित्रावर आता दिवसभर नातवांचं नेणंआणं करण्याची, त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आली होती. नातवंड म्हणजे दुधावरची साय हे कितीही खरं असलं तरी वयोमानापरत्वे नातवंडांची सगळी उस्तवार करणं त्यांच्या दुखऱ्या शरीरांना झेपत नव्हतं त्यामुळे घरात होणारी चिडचिड, मुलाचं, सुनेचं ग्रुहित धरणं.. याचा होणारा संताप, हे सारं ऐकून विपुलरावांना वाटायचं, ‘शेवटपर्यंत या ताणतणावांतून सुटका नाही. नोकरीतनं निव्रुत्त होणं म्हणजे आयुष्यातल्या जबाबदाऱ्यातनं निव्रुत्त होणं नाही.
माझी दुर्गा तशी संयमी पण सुनेसोबत जमेल का तिचं? का जवळच्या नात्यातली बघायची एखादी म्हणजे दोघी एकमेकींना सांभाळून घेतील!’
आणि एके दिवशी ध्यानीमनी नसताना विराजसने आयुषीचा फोटो दाखवला. फोटोत इतकी सुरेख दिसत होती आयुषी! पाणीदार डोळे, पिंगट केस, गालावर खोल खळी. दुर्गाबाईंनी तिच्या आईवडिलांबद्दल चौकशी केली? आपल्यासारख्याच नीटस कुटुंबातली आहे म्हंटल्यावर नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. लग्नाची खरेदी, बस्ता, तिच्या घरच्या मंडळींशी बातचीत..सगळं हौसेने, एकमेकांची आवड जपत करायचं दुर्गाबाईंनी ठरवलं खरं पण साड्यांच्या दुकानात जाताक्षणी दुर्गाबाईंच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसतय. आयुषी दुर्गाबाईंचं म्हणणं विचारात घेत नव्हती. काही विचारायचं, बोलायचं असेल, दाखवायचं असाल तर विरु नि तिची आई. दुर्गाबाईंना तिथे आगंतुक पाहुण्यासारखं वाटत होतं. मग पुढच्या खरेदीला जायचं त्यांनी स्वत:हून टाळलं. नवरानवरीने दाखवलेल्या खरेदीचं कौतुक केलं. छायाचीही शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू होती. तिच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवण्यात त्यांनी आपलं मन गुंतवलं.
लग्न यथासांग पार पडलं. वधुवरांचा नवीन घरात ग्रुहप्रवेश झाला. दोनेक दिवस दुर्गाबाई व यजमान लेकाच्या बड्या घरात राहिले खरे पण विराजस..’ तिकडचं सारं सामान इथं घेऊन येऊ, आता आईबाबा तुम्हीही इथेच रहायचं,’ असं बोलला नाही. शेवटी न रहावून दुर्गाबाईंनीच विषय काढला,”विरू, टुबीएचके घेतलास ते एक बरं केलस. आता आपणास प्रत्येकाला आपापली स्पेस मिळेल. छाया नाहीतरी बँगलोरला जायचीय. आम्ही दोघंच कुठे रहाणार डोंबिवलीत! ढोलेकाकांनी एक विश्वासू भाडेकरू आणून दिलाय. घर मोकळं केलं की रहायला यायला एका पायावर तयार आहे. तेवढं सामान शीफ्ट करण्याचं बघ.”
आईच्या या उत्साहावर विराजस काहीच प्रतिक्रिया दर्शवेना पण आयुषी मात्र पुढे आली. म्हणाली,” मावशी, आपण एकत्र राहिलो तर भांड्याला भांड लागणार. मला स्वैंपाकाची फारशी आवड नाही, त्यातून तुम्ही पडलात सुगरण. तुम्ही तुमच्या तेंव्हाच्या छबीसी माझी तुलना करणार , मग धुसफूस, तोंडं वाकडी होणं, माझ्याकडून कदाचित तुमचा उपमर्द होऊ शकतो कारण मी स्ट्रेट फॉर्वर्ड आहे. माझं बोलणं, रहाणं तुम्हा दोघांना मानवणार नाही. त्यापेक्षा तुम्ही आहात तिथेच रहा, आम्ही येऊ की सणासुदीला. तसंही डोंबिवली अंधेरीहून फार लांब नाही.”
सुनेच्या या बोलण्यापुढे दुर्गाबाईंच्या मुखातनं शब्दच फुटेनात. विपुलरावही म्हणाले,”तुमच्या मनाप्रमाणे होऊदेत. आम्हाला कधी वाटलंच यावसं तर येऊ दोन दिवस, तुमची परवानगी घेऊन.”
यावर विराजस म्हणाला,”हेही तुमचंच घर आहे, पप्पा. हक्काने या कधीही.”
“आधी कळवून या एवढंच,” आयुषी मधे बोललीच.
त्यानंतर विपुलरावांनी दुर्गाबाईंना कधी त्या अंधेरीच्या महालात न्हेलं नाही की दुर्गाबाईंनीही कधी जाऊया लेकाकडे, लेकाची आठव येतेय असा हट्ट केला नाही.
सुंठीवाचून खोकला गेला म्हणत विपुलरावांनी आपली दैनंदिनी नेहमीप्रमाणे सुरू ठेवली.
दुर्गाबाई आपलं एजंटचं काम करत होत्या. रिकरिंगचे पैसे गोळा करायला गेलं की नेहमीचे कस्टमर विचारत,”काय म्हणतेय सुनबाई! स्वभाव कसा आहे? इकडे येतात की नाही? तुम्ही जाणार का आता अंधेरीला रहायला? या आणि अशा कितीक प्रश्नांना वरवरची उत्तरं देताना दुर्गाताईंची हबेलहंडी उडे. हळूहळू आजूबाजूच्यांनाही कळू लागलं की दुर्गाबाईंचं लेकापुढे, सुनेपुढे फारसं चालत नाही. सुनेचं पहिलंच हळदीकुंकू म्हणून दुर्गाबाईंनी तीळाचे लाडू केले. रंगीत काटेरी हलवा केला. काही रोष मनात न ठेवता तिच्यासाठी काळी चंद्रकळा घेतली. संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने घेणारच होत्या पण हातानेच बनवू का अशा विचारात असताना विपुलराव म्हणाले,”सगळं करतेस खरं पण तिला यायचंय का? नाहीतर सगळं मुसळ केरात.”
“आधीच नाट लावू नका. नक्की येईल ती. हां आता आहे थोडी स्ट्रेट फॉर्वर्ड पण आपणच आपल्या मुलांना सांभाळून घ्यायचं नाहीतर कुणी!”
“तरी फोन लाव एकदा.”
“बरं बरं” म्हणत दुर्गाबाईंनी फोन लावला.
“हेलो, आयुषी कशीऐस बेटा.”
“मावशी मी बरीय. तुम्ही कशा आहात?”
“आम्ही मजेत आहोत. तुमचीच काय ती सय येते. बरं बाळा एक काम होतं तुझ्याकडे?”बिचकतबाचकत दुर्गाबाई म्हणाल्या.
“कसलं काम मावशी?”
“अगं तुझं पहिलं हळदीकुंकू ना. मी तीळगुळ, हलवा सारं केलय. अगदी साडीही घेतलीय तुझ्यासाठी. तू येशील ना! आणि तुझ्या आईलाही घेऊन ये. मी फोन करेनच त्यांना.”
आयुषी खरंच आली, आईलाही सोबत घेऊन आली. काळी चंद्रकळा नं हलव्याचा साज हौसेने नेसली.
हळदीकुंकवासाठी आलेल्या शेजारणीपाजारणींनी आयुषीच्या हातून हळदीकुंकू, वाण घेतलं. आयुषीने प्रत्येकीला खाली वाकून नमस्कार केला. लवकरच गोड बातमी येऊदेत हो काहीजणी जाताजाता म्हणाल्या तशी आयुषी म्हणालीच,”इतक्यात कुठे. आधी आर्थिक जम बसला की बघू पुढे.”
दुर्गाबाईंना एका बाजूला घेऊन तिची आई बोलली,”विहिणबाई, किती उपकार मानू तुमचे! माझी पोरगी ही जशी तडतड फुलबाजा. अगदी वडलांवर गेलेय. त्यांनाही घरात अधिक माणसं पसंत नसायची. तुम्हाला तिने वेगळं रहा म्हणून सुचवलं ते तिच्या एकलकोंड्या स्वभावामुळेच. दोघांच तरी आपपसात पटतं कुठे! सारखी माझ्याकडे विराजसच्या तक्रारी घेऊन येते. बरं, विराजसला विचारावं तर चार दिवसांनी दोघं येतात गळ्यात गळे घालून. काही समजत नाही या पोरांच.”
“चालायचच. पिढीतलं अंतर कितीही वाढलं तरी नवरा बायको एकाच पिढीतले असुनही त्यांच एकमेकांशी तरी कुठे पटतं. शेवटी तडजोड महत्वाची,नाही का!” दुर्गाबाई समजावणीच्या सुरात म्हणाल्या.
जाताना आयुषीने दुर्गाबाईंना गच्च मिठी मारली व हळूच म्हणाली,”मावशी, तू आज माझ्या आईला कुंकू लावलंस, वाण दिलस,गजरा दिलास. सगळीच नाही गं देत तिला. अव्हेरतात तिला पण तू..तू ग्रेट आहेस मावशी. लव्ह यू!”
दुर्गाबाईंनी सुनेच्या गालांवरनं हलकेच हात फिरवला. गालावर ओघळलेली आसवं आपल्या पदराच्या शेवाने पुसली.
रात्री विपुलराव दुर्गाबाईंकडे वळत म्हणाले,”खरंच कमालय तुझी. आज सुनबाईचं मन जिंकलस तू.”
दुर्गाबाई म्हणाल्या जिंकण्याहरण्याचं कारणच नव्हतं. ती स्पर्धा थोडीच होती आणि आम्ही दोघी वैरी थोड्याच आहोत एकमेकीच्या. हां, आता तिची मतं, तिचा स्वभाव थोडा एककल्ली आहे पण हळवी आहे हो पोर!
विपुलराव मात्र मनात म्हणत होते,”दुर्गे, या नव्या पिढीशी जुळवून घेतलस खुबीने. तुझ्याकडे आपल्या घराचा पर्याय होता पण त्यांच काय ज्यांच्यापाशी स्वत:चं घर नाही किंवा ते जे मोजक्या जागेतच लेका, सुनेसोबत रहातात. लेकाच्या, सुनेच्या प्रायव्हसीसाठी कुठे जायचं त्यांनी आणि त्यांच्या प्रायव्हसीचं काय! त्यांनाही वाटत असेल की एकांतात चार गोष्टी बोलाव्या, दुखणीखुपणी लेकाला, सुनेला सांगावी, डॉकटरांकडे जाताना सगळी उस्तवार मुलांनी करावी..का मुग गिळून गप्प रहायचं..शेवटी आयुष्य म्हणजे तडजोड आपल्याच मनाला आपण समजावीत पावलं उचलायची..
समाप्त
================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.