यंदा कर्तव्य आहे भाग ५

©️®️ मिथुन संकपाळ
सर्वजण जेवणात मग्न झाले आणि मग शेवटी बाबांनी समीर ला विचारलं,
“देशमुखांना बोलवूया का आपण या रविवारी?”
समीरने हात धुतला, तोंडावरून हात फिरवला आणि उभा राहिला,
“बाबा, काही गरज नाही त्यांना बोलावण्याची”
आणि तडक तो आपल्या रूममध्ये निघून गेला..
______________________________________
समीरची प्रतिक्रिया पाहून आई बाबांना काहीच कळत नव्हतं, गौरी पण अवाक् झाली होती. असं अचानक काय वागतोय समीर, कोणालाच काही कळत नव्हतं..
“काय हो, असं काय बोलला हा चिडून?” अलकाताईंनी चिंतेच्या स्वरात श्रीकांतरावांना विचारलं.. “परवा स्वतःच म्हणत होता ना आणखी एकदा भेटायला पाहिजे, त्यांना आपल्याकडे बोलावण्यासाठी सुद्धा तयार झाला होता”
“बहुतेक ऑफिस मध्ये काहीतरी झालं असावं” – श्रीकांतराव.
त्यावर गौरी म्हणाली..
“मलाही काही कळत नाहीये, आज उशिरा पण आलाय.. बहुतेक बाबा म्हणतात तसं ऑफिस मध्ये काही झालं असावं किंवा काम जास्त झालं असावं..”
“त्याला घेऊ द्या विश्रांती, आपण उद्या सकाळी बोलू त्याच्याशी” बाबांनी दोघींना समजावत सांगितलं.
तरीही सर्वजण त्याचा विचार करतच आपली कामं आवरायला लागले.
________________________________________
“काय ग मानसी, आज लवकर झोपायला जातेस?” आईने विचारलं.
“हो, आज लवकर झोप आलीय” असं म्हणत गौरी तिच्या रूम मध्ये निघून गेली. सुरेशराव आणि सविताताई त्यांच्या आवडत्या मालिका पाहत बसून राहीले.
“अहो, श्रीकांतराव काही बोलले का तुमच्याशी.. म्हणजे समीरने काही सांगितलं का त्याचा निर्णय..?”
“नाही ग, आणि मी पण तो विषय काही काढला नाही. तुम्हीच म्हणालात ना घाई नको विचारायची, त्यांच्याकडून काही निरोप येतो की पाहू..”
“हममम.. तुम्हाला काय वाटतं? काय होईल..?”
“आता आपण विचार करून काही उपयोग आहे का? मानसी आणि समीरचा निर्णय व्हायला हवा.. इकडे मानसी म्हणते अजुन एकदा भेटलं पाहिजे, आणि तिकडून त्यांचाही काही निरोप नाही, मग आपण डोकं खर्ची घालण्यात काय अर्थ आहे. बघू.. काय होतंय..”
“अहो पण आपण काहीतरी प्रयत्न करायला हवेत ना, त्यांना एकदा विचारलं पाहिजे, विषय काढला पाहिजे”
“मी तेव्हाच म्हणत होतो तुम्हाला, श्रीकांतला फोन करून विचारू का पुन्हा भेटण्यासाठी.. तर, तुम्हीच मला अडवलात आणि आता पुन्हा माझ्याच मागे लागलीस तू”
“तुम्हाला काही कळतच नाही.. चला, जाते मी झोपायला” असं म्हणत सविताताई आपल्या रूमकडे निघाल्या. जाता जाता मानसीच्या रूम मध्ये डोकावल्या तर मानसी मोबाईल मध्ये काहीतरी करत होती. त्यांनी दुर्लक्ष केलं आणि झोपायला निघून गेल्या.
________________________________________
*दुसऱ्या दिवशी सकाळी*
“मानसी जायचं नाहीये का आज ऑफिसला? उठ पटकन” आईने किचन मधूनच आवाज दिला, “अहो, बघा हो तिला जरा, उठ म्हणावं”
“हो हो, बघतो मी” – सुरेशराव.
मग ते मानसीच्या रूम जवळ गेले आणि दार वाजवलं.. तसं मानसी डोळे चोळत बाहेर आली,
“Good morning बाबा” – मानसी
“Good morning, आज इतका उशीर? जायचं नाही का ऑफिस ला?” बाबांनी विचारलं.
“उम्मम, बघू…” मानसी अजुन अर्धवट झोपेत होती.
आई पुन्हा किचन मधून म्हणाली,
“आम्हाला सांगायचं झोप आलीय आणि रूम मध्ये जाऊन मोबाईल मध्ये टाइमपास करत बसायचं, मग झोपायला उशीर.. उठायलाही उशीर”
“आई, मी काही टाइमपास करत नव्हते.. चॅटिंग करत होते”
“तो पण टाइमपासच झाला ना शेवटी”
“नाही ग आई, तुमच्या होणाऱ्या जावयाशी चॅटिंग करत होते मी”
“काय, बघा हो मानसी काय म्हणते आम्ही इकडे तुझी सोयरिक जुळवायची बघतोय आणि तू खुशाल सांगतेस की आमच्या होणाऱ्या जावयाशी चॅटिंग करत होतीस म्हणून?”
“मानसी, काय बोलतेस हे तू?” बाबा पण तिच्याकडे पाहतच राहिले त्यांना काय बोलावं काहीच कळेना. आपण स्वतःहून श्रीकांतला विचारलं होतं या स्थळाबद्दल आणि आता ही परिस्थिती..
__________________________________________
समीर नाश्ता करायला आला, सर्वजण त्याची वाटच बघत होते. सर्वांना जाणून घ्यायचं होतं की रात्री काय बिनसलं होतं. बाबांनी त्याला विचारलंच,
“समीर, काल काही झालं का ऑफिस मध्ये? थोडा वैतागलेला होतास..”
“नाही बाबा, मी ठीक आहे.. कुठं काय झालंय”
“अरे मग तुला विचारलं काल, देशमुखांना बोलवूया का आपल्याकडे? तर चिडून म्हणालास की त्यांना बोलावण्याची काही गरज नाही.. आणि तडक निघून गेलास, याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही”?
“अच्छा, ते होय.. मला सांगा कशासाठी बोलवायचं होतं त्यांना?”
“अरे, कशासाठी काय?? तूच म्हणाला होतास ना, आणखी एकदा भेटायला पाहिजे, बोलायला पाहिजे.. नीट पाहिलं नाही, नीट बोलणं नाही झालं वेगैरें वेगैरें..”
“हा, म्हणूनच तर म्हणालो की आता त्यांना बोलावण्याची काही गरज नाही..”
आई बाबा एक मेकाच्या तोंडाकडे बघायला लागले.. त्यांना काहीच कळत नव्हतं की समीर काय बोलतोय. गौरी पण त्याच्याकडे बघत राहिली..
आईने समीरला विचारलं,
“काय म्हणायचं आहे तुला?”
तोवर गौरीचा चेहरा खुलला, आणि झटकन ट्युब पेटावी तशी ती ओरडलीच,
“आई बाबा.. म्हणजे *यंदा कर्तव्य आहे*.. दादाला वहिनी पसंत पडली sss.. हो ना दादा..??”
त्यावर समीर हसला आणि गौरीला टाळी दिली
आता मात्र आई बाबांचा चेहराच बदलला.. दोघेही एकदम खुश..!!
“काय जीव टांगणीला लावलास रे आमचा, किती टेन्शन मध्ये होतो आम्ही” आई त्याला खोटं खोटं रागवत म्हणाली.
समीरने मग तिघांना सर्व काही सांगितलं, “मी आणि मानसी काल ऑफिस नंतर भेटलो होतो.. बराच वेळ आम्ही एकत्र होतो, गप्पा मारल्या, काल ती एकदम मस्त दिसत होती, खूप छान बोलते ती, तिला भेटून मलाही बरं वाटलं, खरं तर ती भेट संपूच नये असं वाटत होतं.. म्हणून मला काल यायला थोडा उशीर झाला होता आणि भूक पण कमी होती.. नंतर रात्री सुध्दा चॅटिंग मध्ये आम्ही बोलत होतो, बऱ्याचशा गोष्टीवर चर्चा केली आम्ही आणि शेवटी मग या निर्णयावर येवून पोचलो”
“wow, म्हणजे वहिनी पण तयार आहे तर.. I am so happy दादा”… गौरी उड्याच मारू लागली,
आई, बाबा दोघेही इतके आनंदी झाले की दोघांचे डोळे अलगद पाणावले.
“थांब थांब, मी पटकन सुरेशला सांगतो.. एव्हाना मानसीने सांगितलं पण असेल..” बाबा अलकाताईंना म्हणाले.
_________________________________________
सुरेशरावांचा मोबाईल वाजला, सुरेशराव आणि सविताताई चिंतेत होते, त्यांना जे काही सांगितले होते मानसीने..
“हॅलो sss”
“हॅलो सुरेश.. अभिनंदन मित्रा, आताच समीरने आम्हाला सांगितलं की तो तयार आहे लग्नाला”
सुरेशरावांना काय बोलावं कळेना, समीर तयार झाला पण मानसी..
“सुरेश, काय झालं.. शांत का आहेस?” – श्रीकांत राव.
“अरे, मानसी म्हणत होती की तिने कोणी मुलगा पसंत केलाय आमचा जावई म्हणून आणि काल त्याच्याशी चॅटिंग सुध्दा करत होती, तुला कोणत्या तोंडाने सांगू कळत नव्हतं.. माफ कर मित्रा”
“तिलाही चांगलीच ॲक्टींग जमते म्हणजे, मुलांनी आपल्याला आज एवढं मोठं सरप्राइज दिलं बघ”
“म्हणजे..??” सुरेशराव कपाळावर आठ्या आणत म्हणाले
“तो जावई समीरच आहे.. तेच दोघं चॅटिंग करत होते रात्री, आता सांगितलं ना समीरने, एवढंच नाही काल दोघं भेटलेत सुध्दा” हे सगळं सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता..
“काय सांगतोस काय.. अशी गंमत केलीय का दोघांनी” सुरेशराव हरकून पाणी झाले.
“वहिनींना पण सांग आता good news आणि शिरा बनवा म्हणावं, आम्ही सगळे येतोच लगेच.. मस्त celebrate करू”
” हो, या या.. नक्की या.. celebrate केलंच पाहिजे”
फोन कट केला आणि मानसी कडे पाहिलं, मानसी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निरखून पाहत होती जो आज तिच्यामुळे झाला होता..
सुरेशराव तिच्या जवळ गेले.. डोळ्यात पाणी आले होते, तिच्या डोक्यावर हात ठेवला अन् थोडीशी smile करत म्हणाले,
“लब्बाड, आमची गंमत करतेस..”
“बाबा ssss” म्हणत मानसीने त्यांना मिठी मारली, सुरेश रावांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले..
सविताताई प्रश्नार्थक चेहऱ्याने, “मला सांगेल का कोणी, काय झालंय?”
सुरेशरावांनी अश्रू पुसतच उत्तर दिलं,
“तू शिरा बनवायला घे, व्याही येताहेत आणि मानसीने निवडलेला आपला जावई सुध्दा.. समीर..!!”
आईच्याही डोळ्यात पाणी आलं, मानसीला मायेनं जवळ घेतलं आणि सुरेशरावांना म्हणाल्या,
“तुम्हीही लागा तयारीला.. *यंदा कर्तव्य आहे*”
– समाप्त
*- मिथून संकपाळ*
====================
यंदा कर्तव्य आहे – भाग ४
https://ritbhatmarathi.com/yanda-kartavya-ahe-part-4/
=====================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============