अपराध

पहाटे पहाटे रियाजाला सुहानीचे सूर लागत नव्हते. तिच्या मनातली अस्वस्थता खोलीत भरून राहिल्या सारखी वाटत होती तिला. तिने पुन्हा एकदा प्रयत्न केला. सूर लागत नव्हते. तिने मनातल्या मनात विचार केला, “आज बहुतेक सुरांनी रजा घेतली वाटत”… आणि ती किंचितशी हसली.
सहजच तिचे लक्ष कॅलेंडरकडे गेले. “आज लग्नाचा पहिला वाढदिवस. त्याच्याही लक्षात असेल का?” तिने फोन हातात घेऊन चाळला. आजही त्याचा फोन नाही आला. “आपणच फोन करावा का त्याला? नाही.. नकोच. पहाटे तो साखर झोपेत असतो.” त्याच्या आठवणीने ती चलबिचल झाली. उणापुरा सहा-सात महिन्यांचा संसार.. किती स्वप्न पाहिली आपण सुखी संसाराची. जणू ती पहाटेच्या धुक्यात विरून गेली.
सुहानी आणि अनुरागचा प्रेमविवाह. तब्बल सहा वर्षांच्या सहवासानंतर दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. अवखळ, अल्लड आणि सुरिल्या सुहानीच्या प्रेमात अनुराग अगदी वेडापिसा झाला होता. उंचपुरा, दाट कुरळे केस, बाकदार नाक.. त्यांच्या गहिऱ्या डोळ्यात सुहानी हरवून जायची. आधी मैत्री मग दोघेही एकमेकांत गुंतत गेले. मग अनुरागने तिला अगदी पारंपारिक पद्धतीने लग्नासाठी मागणी घातली.
अचानक एक दिवस आपल्या आई -वडिलांना घेऊन तो सुहानीच्या घरी आला. अगदी सकाळी सकाळी. तिचा नुकताच रियाज करून संपला होता. आपले लांबसडक केस हाताने सावरत तिने दरवाजा उघडला. समोर अनुराग आणि त्याच्या आई-वडिलांना पाहून ती भांबावून गेली. त्यांना “आत या” म्हणायलाही तिला शब्द सापडत नव्हते.
“सरप्राइज”
अनुरागच्या अवखळ हास्याने ती लाजली.
भल्या सकाळीच कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाला. अनुरागच्या आईने आपल्या लेकासाठी तिला मागणी घातली. “सुरांची साथ आयुष्यभर सोबत असावी.” सुहानीचे हे एकच स्वप्न होते. ते अनुरागने कधीच मान्य केलेले. बसल्या बैठकीत लग्नाची तारीखही पक्की झाली.
साखरपुडा दणक्यात पार पडला. आता लग्नघाई उडाली. तिची साड्यांची, एरवीच्या कपड्यांची, सारी खरेदी अनुरागच्या पसंतीची..आणि त्याची अर्थातच सुहानीच्या पसंतीची.
भरजरी पैठणी, हातात हिरवा चुडा, कपाळावर नाजूक टिकली, डोळ्यात काजळ, नाकात नथ आणि चेहेर्यावर छानसा लाईट वेट मेकअप. काय गोड दिसत होती सुहानी! अनुराग पाहतच राहिला तिच्याकडे.
लग्नही अगदी दणक्यात पार पडले.
सुहानी आणि अनुराग खूप खुश होते. भरीत भर म्हणून अनुरागला प्रमोशनही मिळाले. आता काय साराच आनंदी आनंद!
अनुराग एकुलता एक. पोटी मुलगी नाही म्हणून अनुरागच्या आई नाराज होत्या. पण लेकीची जागा घेत सुहानी आपल्या सासुची लाडकी झाली.
“मुलांच्या संसारात लुडबुड नको” म्हणून आई – बाबांनी दोघांना एक छोटेसे घर घेऊन दिले, आपल्या घराजवळच आणि संसार मनाजोगा मांडण्याचे स्वतंत्र दिले.
सुहानी जणू स्वप्नातच वावरत होती. प्रेमळ नवरा, मनमिळावू सासू -सासरे, छोटेसे घरकुल आणि राजा- राणीचा संसार.
“आणि हवं तरी काय!”
थोडयाच दिवसांत नव्या घरी सुहानी आणि अनुरागचे रूटीन अगदी छान जमले. पहाटेचा रियाज, नंतर स्वयंपाक -पाणी, अनुरागच्या ऑफिसची गडबड अन् संध्याकाळी सुहानीचे गाण्याचे क्लासेस आणि सुट्टीच्या दिवशी मनसोक्त बागडणे. असं सारं काही रूटीनमध्ये.
प्रमोशन नंतर हळूहळू अनुरागचे काम खूप वाढले. घरी येण्यास त्याला उशीर होऊ लागला. पर्यायाने ताण वाढला. स्वभाव चिडचिडा बनला त्याचा. आता ऑफिसच्या कामाचे ‘फस्ट्रेशन’ अनवधानाने सुहानीवर निघू लागले.
अशातच सुहानीला दिवस गेले. कित्ती कित्ती आनंद झाला तिला! सासुबाईंनी दृष्टच काढली तिची. तिला कुठे आणि कुठे नको, असे झाले होते त्यांना. अनुराग मात्र नाराज होता. त्याला इतक्या लवकर बाळ नको होते.
“आता मोकळे होऊ. मग दोन वर्षांनी पाहू बाळाचे.” म्हणून तो सुहानीला समजावू लागला. पण “गर्भात वाढणाऱ्या आपल्याच सावलीला अंतर द्यायचे? मला जमणार नाही” म्हणून सुहानीने अनुरागला स्पष्टपणे नकार दिला. सासुबाईही तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. अनुराग मात्र मनातल्या मनात धुसफूसत राहिला.
आता सुहानीच्या पहाटेचा रियाज ऐकून त्याची झोपमोड होऊ लागली. तिचे गाण्याचे क्लासेसही त्याने बंद करायला लावले. त्यातच याच्या ऑफिसच्या कामाची भर पडली. हळूहळू अनुरागचा स्वभाव अधिकच चिडचिडा बनला. तो आता सुहानीपासून दूर राहू लागला. आई -बाबांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण स्वारी काही सुधारायचे नाव घेईना.
“आपल्या आयुष्यातले किती गोड क्षण! मी आई होणार आणि तू बाबा! नाही म्हणू नको रे! इवलेसे बाळ हातात येईल ना, तेव्हा तू सारे काही विसरून जाशील बघ.” असे म्हणत सुहानी त्याला बिलगली. मात्र अनुरागने तिला रागाने ढकलून देत तिच्यावर हात उचलला. इतक्यात सासुबाई मध्ये पडल्या. सुहानीची बाजू घेऊन अनुरागशी खूप भांडल्या.
झाल्या प्रकाराने सुहानी खूप नाराज झाली, दुःखी झाली. अनुरागकडून अशी अपेक्षाच नव्हती तिला. काहीच न बोलता तिने आपली बॅग भरली आणि सासूबाईंच्या विरोधाला न जुमानता घराबाहेर पडली. तिला कळेना, “असा कुठला मोठा गुन्हा केला आपण, की आपल्या नवऱ्याने आपल्यावर हात उचलावा? हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण.. या अशावेळी नवऱ्याने साथ द्यायची की रागापायी दूर लोटायचे?”
विचार करत करत ती आपल्या माहेरी पोहोचली. आईच्या कुशीत शिरून तिने आपले दुःख हलके केले. पोटातल्या बाळाची शपथ घालून आईने तिला झाले गेले विसरून जाण्याची अट घातली.
इकडे सुहानीच्या सासुबाईंचा जीव रमेना. सुहानी च्या माहेरी जावे तर त्यांना अगदीच कानकोंडे झाले होते. “त्यास सामोरे जावे तर कसे?” कारण त्यांच्या मुलाने लाडक्या सुनेवर हात उचलला होता. अपराधीपणाची भावना त्यांचे मन खात होती. थोड्या दिवसांनी त्यांनी सुहानीच्या आईची फोन करून माफी मागितली आणि पुन्हा अनुराग कडून असा ‘अपराध’ होणार नाही व सुहानीच्या बाळंतपणानंतर तिला सन्मानाने पुन्हा घरी घेऊन येऊ म्हणून शब्द दिला. पुढे कोणीच हा विषय फारसा वाढवला नाही. कारण सुहानीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाची सर्वांनाच काळजी होती.
“असा कसा वागू शकतो अनुराग? लग्नाआधी सतत आपल्या मागे पुढे करणारा अनुराग.. असा नव्हताच मुळी. स्वतः च्या हट्टापायी, रागापायी आज त्याने आपल्यावर हात उचलला! कदाचित लग्नानंतर त्याने आपल्याला साऱ्या गोष्टीत गृहीतच धरले असावे. आजपर्यंत मी त्याच्या इच्छेला मान दिला, त्याच्या मनाप्रमाणे वागत आले. पण आता नाही.. त्याला आपल्या बाळाची काळजी नसावी? आपला प्रेमळ नवरा इतका कसा काय बदलला?” सुहानी दिवसेंदिवस याचा विचार करत होती.
“त्यापायी आपले स्वप्नही मागे पडत चालले आणि वेळ ही सत्कारणी लावावा म्हणून तिने पुन्हा गाण्याचे क्लासेस सुरू केले.
मध्येच तिला वाटायचे, “असेच अनुरागकडे धावत जावे. त्याच्या मिठीत शिरून मनात साचलेले दुःख हलके करावे. त्याचबरोबर त्याच्या अपराधीपणाची शिक्षाही त्याला द्यावी.”
तिचे मन माहेरी लागत नव्हते. अनुरागचा विरह तिला सहन होत नव्हता. त्याच्या आठवणीत तिच्या मनाची घालमेल होत होती.”गेल्या दोन महिन्यात अनुरागचा एकही फोन न यावा!” याचे तिला खूप आश्चर्य वाटत होते. इतक्या दिवसांत तिने हजारो वेळा अनुरागला फोन केला असेल, पण त्याने एकाही फोनला उत्तर दिले नव्हते. जणू काही अपराध सुहानीचाच होता.
या अशा अवस्थेत त्याची किती गरज होती तिला. अनुरागच्या आठवणीत ती आपल्या बाळाशी छान गप्पा मारू लागली. बाळही तिला आता छान प्रतिसाद देऊ लागले होते. जणू त्याला या जगात यायची फारच घाई झाली होती. सुहानीची आई आणि तिची फार काळजी घेत होती. तिला जीवापाड जपत होती. सासुबाईही आईला रोज फोन करून तिची विचारपूस करत होत्या. काय हवं नको ते पाठवत होत्या.
मध्येच तिच्या मनात भीती दाटून येई. “अनुराग आपल्यापासून कायमचा दूर गेला तर? कशी जगेन मी त्याच्याविना?” सुहानीचे अनुरागवर निरतिशय प्रेम होते.
अचानक बेलच्या आवाजाने सुहानी भूतकाळातून जागी झाली. इतक्या सकाळी कोण आले असेल? अनुराग तर नाही….! अधीरतेने तिने दरवाजा उघडला. समोर अनुराग आणि तिचे सासू-सासरे उभे होते. तिला समोर पाहताच अनुरागने तिला आपल्या मिठीत घेतले. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे वाहणारे अश्रू तिच्या पाठीवर ओघळलेले तिला जाणवत होते. तिनेही आपली पकड घट्ट केली.
“सॉरी हा शब्दही फार लहान आहे ना, मी केलेल्या अपराधासाठी?” अनुराग सुहानीच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला.
मला हवी ती शिक्षा दे सुहा..मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. गेल्या दोन महिन्यात मी तुला साधा फोनही केला नाही. कारण माझं मन मला खात होत, कुठल्या तोंडाने सामोरा जाणार होतो मी तुला? माझ्या सर्वात प्रिय व्यक्तीवर, बायकोवर मी हात उचलला..ज्यावेळी तुला माझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा तुझी साथ सोडली.
लाज वाटते मला माझ्या वागण्याची. खरं सांगायचं तर मला भीतीही वाटली. तुझ्या आई -वडिलांची..त्यांच्या रागाची. आपल्या मुलीला मानाने सासरी घेऊन जाणारा हाच का आपला जावई?”
अनुरागने सुहानीच्या आई -वडिलांची हात जोडून माफी मागितली.
तसे सासुबाई सुहानीला आपल्या जवळ घेत म्हणाल्या, “माफ कर पोरी. माझीही अवस्था अनुराग सारखीच झाली होती. तुझ्या आई -बाबांची मी माफी मागितली खरी. पण अपराधीपणाची भावना पाठ सोडत नव्हती. तुला पाहायला, तुझे लाड पुरवायला मन आसुसले होते. पण प्रत्यक्ष समोर येऊन माफी मागायला मन धजावतही नव्हते.”
“आई तुम्ही का माफी मागताय? चूक तर तुमच्या मुलाची आहे. त्यादिवशी तुम्ही माझी बाजू घेऊन त्याच्याशी भांडलात. यातच आले सगळे.” असे म्हणत सुहानीने प्रेमाने आपल्या सासुबाईंचे हात आपल्या हातात घेतले.
“माफी मागू दे. मगच आमच्या मनावरचे ओझे हलके होईल. इतका वेळ शांत असलेले अनुरागचे बाबा मधेच म्हणाले. “आमच्या मुलांवर संस्कार करण्यात, आपल्या ताणतणावाचे, रागाचे नियोजन कसे करायचे हे त्याला शिकवण्यात कुठेतरी नक्कीच आम्ही कमी पडलो.
“लहानपणापासूनच आपण मुलांना झुकतं माप देतो, “त्याचा स्वभावच तसा आहे असे म्हणून.” पण आपण तो स्वभाव बदलण्यासाठी त्यांना मदत नाही करत. सगळंच आपल्या मनासारखं व्हायला लागलं की त्याचीच सवय होऊन जाते. मग जरा मनाविरुद्ध घडले की सहन नाही होत. चिडचिड होते मग आणि अशा चुका होतात. काय बरोबर ना?” बाबा अनुरागकडे पाहत म्हणाले.
तो मान खाली घालून बाबांचे बोलणे ऐकत होता.
“आता पुन्हा त्याच्या हातून अशी चूक होणार नाही असे वचन दिले तरच आम्ही जावईबापूंना माफ करू.” सुहानीचे वडील वातावरणातला ताण हलका करत म्हणाले.
“बाबा हा विचारही कधी माझ्या मनात येऊ देणार नाही मी.” सुहानीचा आणि बाळाचा कायम मान ठेवेन. असे म्हणत अनुरागने सुहानीच्या बाबांना वचन दिले, इकडे सुहानीच्या चेहेऱ्यावर समाधान दिसत होते.
=====================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
=====================