आईला तिचा निर्णय ऐकून लाज वाटली होती पण आज रिचा कर चालवते ७०० कोटींची कंपनी | zivame founder Richa Kar biography in marathi

zivame founder Richa Kar biography in marathi : आपला भारतदेश कितीही प्रगत असला किंवा नवीन तंत्रज्ञानाचा आणि विचारांचा स्वीकार करत असला तरीही काही बाबतीत होता तितकाच मागासलेला आहे असे म्हणावे लागेल. ही खरंच खूप दुर्दैवाची आणि दुःखाची गोष्ट आहे. आजची स्त्री कितीही प्रगत असली तरीही काही गोष्टी आहेत ज्या बोलल्याने किंवा त्या बाबतीत प्रश्न विचारल्यानंतर अनेक नजरा झेलाव्या लागतात. काय बोलतेस? कसं कुठे बोलतेस याच भान ठेव हे ऐकावे लागते.
महिलांचे मासिक पाळीतील प्रश्न, शारिरीक संबंध, मुली वयात आल्यानंतर त्यांना पाडणारे प्रश्न असे बरेच नाजूक विषय आहेत ज्याचा उल्लेख केला तरी लाज निघते, नाहीतर बोलणी खावी लागतात. हे विषय नाजूक असले तरीही संपूर्ण आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आणि यांची माहिती असणे आवश्यक असेच आहेत. ज्या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत आणि चालूच राहणार आहेत त्या गोष्टी बोलण्यात लाज कसली ?? असो असाच एक नाजूक विषय आहे जो बोलताना किंवा विकत घेताना स्त्रियांना शरम वाटते आणि ती म्हणजे “स्त्रियांचे आतील कपडे”.
१. झिवामे ने स्त्रियांचा प्रश्न कसा सोडवला
या गोष्टीबद्दल बोलताना किंवा विकत घेताना लाजिरवाणे वाटते. एखद्या दुकानात जाऊन ते खरेदी करणे त्यातल्या त्यात दुकानात पुरुष असतील तर मग विचारायलाच नको. कसे विचारू काय बोलू असे अनेक प्रश्न आजही महिलांना पडतात. मग त्या कोणत्याही वयोगटातल्या असल्या तरीही. सर्वानाच भेडसावणारा हा प्रश्न आहे. आपण काहीतरी चूक करत असल्याची भावना त्यावेळी प्रत्येकाच्या मनात असते.
विचार करायला गेले तर त्यात चुकीचे काय आहे ? कपडे आहेत ना ते ?? मग ते घेण्यासाठी लाज का बाळगावी. इतकेच काय पण एखादी महिला तिच्या घरातील पुरुष मंडळींचे आतील कपडे दुकानात मागत असेल तरीही तिच्याकडे बघण्याचा रोख बदलतो. असे का ?? का तर स्त्री पुरुषांचे कपडे मागते म्हणून ???
खूप कमी पुरुष असे असतात ज्यांना स्त्रियांना काय हवे आहे ते समजते आणि त्यांची अडचण दूर करण्याचा ते प्रयत्न करतात.
सर्रास सगळ्याच स्त्रियांना येणारी ही अडचण समजून घेऊन त्यावर खूप मेहनत आणि योगदान देऊन आपल्या देशातील गंभीर आणि महत्वाची समस्या सोडवण्याचा उत्तम पर्याय ज्यांनी शोधून काढला, प्रसंगी सगळ्यांचे बोलणे,विनाकारण त्यांच्या कामावर हसणे सहन करून आपले धैर्य न सोडता स्त्रियांचे आतील कपडे विकण्याचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म निर्माण करून तब्बल ७०० करोडची कंपनी उभी केली त्या “रीचा कर (Richa Kar)” यांच्या यशाबद्दल जाणून घेऊया.
२. रिचा कर ह्यांचे शिक्षण आणि फॅमिली
रिचा कर यांचा जन्म १७ जुलै १९८० मध्ये झारखंड मधील जमशेदपूर शहरात झाला आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत त्या. त्यांच्या आई गृहिणी तर वडील टाटा स्टील कंपनीत काम करतात. लहापणापासूनच त्यांच्या घरातील वातावरण हे शैक्षणिक होते. त्यामुळे योग्य शिक्षण आणि त्याची गरज याची जाण रिचा कर यांना आधीपासूनच होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर बिरला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी मधून त्यांनी पदवी मिळवली. पदवी पूर्ण झाल्यावर त्यांनी अभियांत्रिकी विभाग कंपनीत सोफ्टवेअर अनालीसिस म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
पण रिचा कर यांना अगदी लहनपणापासूनच वेगळेच काहीतरी करायचे होते. त्यांना इतरांसारखे नोकरी करून समाधान मिळत नव्हते. त्यांचे स्वप्न, धेय काहीतरी वेगळं करण्यास भाग पाडत होते. त्यामुळे नोकरी करत करत एमबीए करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि तो पूर्ण केला. मास्टर पूर्ण केल्यावर स्पेन्सर्स कंपनीत ब्रँड कम्युनिकेशन एरिया मॅनेजर या पदावर त्यांनी काम केले. हे काम करत असतानाच पुढे त्यांना २०१० मध्ये sap सोबत व्यवसाय सल्लागार ( कन्सल्टंट ) म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या कामामुळे त्यांना खूप काही शिकता आले. बिझनेस म्हणजे काय, तो कसा करायचा, व्यवसाय कशा प्रकारे काम करतो, त्यात येणारे धोके कोणते या सगळ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी त्यांना समजल्या. याच लीडर शिपच्या अनुभवाने त्यांना झिवामे बनवण्याची प्रेरणा मिळाली.
नक्की वाचा
करोडो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. आज नवऱ्यासोबत चालवतेय स्वतःची कंपनी
३. रिचा कर ह्यांना झिवामे सुरु करताना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले
व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना खरतर खूप अडचणींना समोर जावे लागले. पैसा, बऱ्याच जणांचा विरोध, त्यांचा व्यवसाय ऐकुन त्यांच्यावर हसणे,आर्थिक अडचण अशा सगळ्याच गोष्टींचा त्यांना सामना करावा लागला. पहिला विरोध झाला तो त्यांच्या आईकडूनच. रिचा कर यांनी जेंव्हा त्यांच्या व्यवसायाची कल्पना घरच्यांना सांगितली तेंव्हा त्यांच्या आईने प्रखर विरोध केला. त्या म्हणाल्या माझ्या मैत्रीणीना,ओळखीच्या लोकांना,नातेवाईकांना मी काय सांगू ?? माझी मुलगी पँट, ब्रा विकते. लोक काय म्हणतील ?? किती नावं ठेवतील ?? तर त्यांना काय करायचं आहे हे त्यांच्या वडिलांना समजलेच नाही.
तर ओळखीचे लोक त्यांच्यावर हसत होते. पण रिचा यांचा निर्णय मात्र ठाम होता. काहीही झालं तरी त्यांना ठरवलेला व्यवसाय करायचाच होता. त्यांना इतका त्रास झाला की व्यवसायामुळे नोकरी सोडावी लागली. व्यवसायासाठी जागेची गरज तर पडणारच होती. रिचा जेंव्हा जागा बघण्यासाठी जात असत आणि लोक व्यवसायाबद्दल विचारत असत तेंव्हा रिचा बोलता बोलता थांबत असत आणि मी ऑनलाईन कपडे विकणार आहे असे सांगत असत. बऱ्याच अडचणींना सामोरे जाऊन जागा मिळाली तर पेमेंट गेटवे साठी परत बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही रिचा डगमगल्या नाहीत . कोणताही व्यवसाय हा उत्तम प्लॅन आणि स्त्रेटर्जी शिवाय वाढू शकत नाही. पण रिचा यांचे झालेले शिक्षण आणि कामाचा मिळालेला उत्तम अनुभव यामुळे “झिवामे” ची स्थापना केली.
झीवामेचा मुख्य उद्देश महिलांची मदत करणे हा होता. जेंव्हा झीवमे भारतात आले त्यावेळी भारतातील अनेक शहरात महिलांच्या अतरवस्त्राचे चांगले ब्रँड उपलब्ध नव्हते. असेही कोणते ऑनलाईन पोर्टल असेल याचा लोकांनी विचारही केला नव्हता आणि हीच खरी अडचण होती. महिलांचे आतील कपडे खरेदी करणे ही अडचण त्यामुळे तशीच रहात होती. महिलांना ही खरेदी करणे सोपे जावे यासाठीच तर त्यांनी हे प्लॅटफॉर्म उभे केले होते पण अशा कोणत्याही कॉन्सेप्टचा लोकांनी विचार केला नव्हता आणि हाच गॅप भरून काढण्यासाठी रिचा यांनी झिवामे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वर २५ ऑगस्ट २०११ रोजी सुरू केले.
झिवामेचा अर्थ
आपल्याला प्रश्न पडला असेल ना हे झिवामे काय आहे ?? याचा अर्थ काय ?? हे असे कसे नाव ठेवले ?? खरतर रिचा यांना झिवा असे नाव ठेवायचे होते पण वेबसाईटवर हे नाव उपलब्ध नसल्याने झिवामे ठेवण्यात आले. ” माझ्यात चमक आहे ” असा या शब्दाचा अर्थ होतो. रिचा कर यांचे काम आणि कामात मिळालेले यश पाहून हे नाव अगदीच अर्थपूर्ण आहे हे लक्षात येईल. आज झिवामेची किंमत २७० करोड रू आहे. दरवर्षी हा व्यवसाय ३०० पटीने वाढतो आहे. आज झिवामे लोंजरी स्टोअर मध्ये ५००० लोंजारी स्टाईल, ५० ब्रँड आणि १००० साइज उपलब्ध आहेत. आज ही कंपनी भारतातील सगळ्याच पिन कोड नंबरवर डिलिवरी देत असून त्यांच्या वेबसाईटवर रोज नवीन तब्बल २.५ मिलियन भेट देणारे ग्राहक आहेत आणि प्रत्येक मिनिटाला त्यांचे प्रॉडक्ट विकले जात आहेत. ही खूप यशाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
रिचा कर यांचे यश पाहून अनेक मोठ्या गुंतवणूक दारानी त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. त्यांच्या या यशासाठी २०१४ मध्ये फॉर्चून इंडियाने “अंडर ४०” लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे.
झिवामे ग्राहकांना कुठल्या सुविधा देते
- या कंपनीत ऑनलाईन प्रॉडक्ट एक्स्पर्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे महिला ग्राहक या एक्स्पर्ट शी बोलू शकतील,प्रश्न विचारू शकतील आणि त्यांना हवे ते प्रॉडक्ट योग्य प्रकारे ग्राहकांना मिळू शकेल.
- या झिवामे ची व्यवसाय रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की इथे महिलांच्या सगळ्या प्रकारच्या मागण्या पूर्ण होतील. तसेच पाहिजे ते प्रॉडक्ट ग्राहकांना सहज मिळेल आणि साईज,आणि फिटींग बरोबर निवडता येईल अशा पद्धतीने प्रोजेक्ट बनवले आहे.
- ही कंपनी ट्राय अट होम, फिट कन्सल्टंट,विशेष पॅकिंग आणि फिटिंग लाइंज सारखी सुविधाही ग्राहकांना देण्यात येते.
- बेस्ट प्रॉडक्ट सोबतच अनेक सुवधी ही ही कंपनी देते, जसे की : एक्सचेंज ऑफर, मनी बॅक गॅरंटी आणि डिस्काउंट ऑफर सुद्धा.
इतक्या योग्य सुविधांसह झिवामे अशी कंपनी बनली आहे जी लाखो करोडो स्त्रियांना बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट सोबत आवश्यक त्या सर्व सुविधा देत आहे.
रिचा कर ह्यांचे वैयक्तिक जीवन
झिवामे यशाच्या शिखरावर होते, त्यावेळी रिचा कर यांचा विवाह झाला नव्हता. म्हणजे खूप कमी वयात त्यांनी इतके मोठे यश मिळवले होते. त्या कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांच्या वर्गातील केदार गोविंद यांच्या प्रेमात पडल्या होत्या. रिचा यांच्या आईला जशी व्यवसायाची आयडिया आवडली नव्हती तशीच ती केदार सरांच्या घरच्यांनाही आवडली नव्हती. केदार सरांच्या आई म्हणाल्या होत्या लोक काय म्हणतील? ओळखीच्या लोकांना काय उत्तर देऊ ??
पण केदार सर मात्र अगदी सुरुवातीपासून रिचा कर यांच्या सोबत होते. प्रत्येक वेळी केदार सरांनी रिचा यांना पाठिंबा दिला होता,मदत केली होती. त्यामुळे केदार सरांनी त्यांच्या घरच्यांना समजावून सांगितले आणि रिचा खूप शिकलेल्या असल्याने व्यवसायात जरी यश मिळाले नाही तरी त्या नोकरी करतील असा केदार सरांच्या घरच्यांनी विचार केला होता. पुढे जाऊन रिचा यांनी केदार सरांशी लग्न केले आणि नात्याला बंधनात अडकवले.
जे काम करण्याची रीचाच्या संपूर्ण कुटुंबाला लाज वाटत होती, तेच काम स्वतःच्या बळावर आणि जिद्दिवर असे करून दाखवले ज्याचा कोणी कधी विचारही केला नव्हता. हे काम करण्यासाठी रिचा कर यांनी समाज, लोक काय म्हणतील याची कधीही पर्वा केली नाही. काम करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते तर प्रसंगी त्यांनी स्वतःची काही बचत आणि जवळच्या मित्र परिवारातील लोकांकडून पैसे गोळा करून ३५ लाख रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय उभा केला होता. या व्यवसायात २०१५-१६ साली त्यांना तब्बल ५४ करोडचे नुकसान सहन करावे लागले होते. तरीही त्यांनी हिम्मत सोडली नाही,खचून गेल्या नाहीत.
नक्की वाचा
बँकेची नोकरी सोडून ५० वर्षे वयामध्ये सुरु केली कंपनी…आता आहे तब्बल ८०० कोटी कंपनीची मालक
आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यावर रिचा विश्वास ठेवतात. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास टिकून रहातो आणि व्यवसायात स्थिरता रहाते असे त्यांचे म्हणणे आहे. जे अगदीच योग्य आहे.
“जर आपण बरोबर असाल तर काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, प्रयत्न करा आणि योग्य बनून रहा, तुमच्या योग्यतेची साक्ष स्वतः देव देईल”.
अशी मोलाची शिकवण रिचा यांनी आपल्याला दिली आहे.
जर प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही, आपले निर्णय ठाम ठेवा आणि त्या मार्गाने पाऊले टाकत रहा. ज्या गोष्टींची सगळ्या समाजाला लाज वाटते ती गोष्ट बाजारात विकण्याचा विचार करणाऱ्या रिचा कर यांच्या विचाराला सलाम ठोकण्याची गरज आहे. त्यांनी केवळ विचार केला नाही तर प्रत्यक्षात आमलात आणला आणि हसणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर दिले. त्यांच्या जिद्दीला आणि हिमतीला खरंच सलाम.
रिचा कर यांची संघर्षाची आणि यशाची कहाणी सगळ्याच लोकांसाठी खूप प्रेरणादायी आहे, यात शंकाच नाही.
===================