Skip to content Skip to sidebar Skip to footer

तू चीज बडी है मस्त मस्त

रविवारचा दिवस होता आणि रिमासाठी तर तो अजूनच खास होता कारण तिच्या आणि अतुलच्या लग्नाचा वाढदिवस होता. पण रविवार असल्याने सगळे कसे निवांत झोपले होते. बच्चा पार्टी तर अजून बिछान्यातच होती. रिमा पाठोपाठच अतुलही उठला होता.  उठल्या उठल्या रिमा कामाला लागली होती. पण अतुल परत झोपायचं नाटक करू लागला. पण रिमापासून काही लपतंय का? रिमाने ओळखलं कि अतुल झोपायचं नाटक करत आहे म्हणून.

रिमाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती आपल्या कामाला लागली. आज काहीतरी गोडधोड करायचा प्लॅन होता तिचा…आणि तिने ठरवलं कि अतुल जसा उठून तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन तसा ती त्याला तिच्या हातच्या गुलाबजामुनने भरवेन. अतुलला रिमाच्या हातचे गुलाबजामून एवढे आवडतात कि मग त्याच्या समोर त्याला दुसरं काही नको. पण बराच वेळ झाला तरी अतुल बिछान्यावरच लोळत पडला होता आणि मोबाईल चाळत बसला होता. थोड्यावेळाने त्याने तिला “गुड मॉर्निंग” विश केलं…रिमाला वाटलं कि करेन थोड्यावेळात अतुल तिला विश….

अतुल अंघोळ करून आला..”अरे वाह्ह! आज सकाळी सकाळीच गुलाबजामूनचा बेत..आज काही स्पेशल आहे का?”

झालं आता थोड्याच वेळात कडाकडीच्या वीजा चमकणार होत्या. सकाळपासून अतुलचा जो टाईमपास चालू होता तो कसतरी रिमा दुर्लक्षित करत होती….त्याला काहीही न बोलता त्याच्या चुका पचवत होती….पण आता काही अतुलचं खरं नाही ..”

रिमाने अतुलच्या प्रश्नाला टाळून लागलीच आपली बडबड चालू केली….”किती वाजलेत बघितलं का? माहित आहे कि शांताबाईंनीही आज कामाला सुट्टी घेतली आहे तरी मला किचन मध्ये थोडीफार मदत करायला यायचं नाही…सुट्टी आहे मग बस्स दिवसभर तो बिछाना पकडून बसायचा.”

अतुलला रिमाचा अचानक फोडलेला बॉम्ब काही पचला नाही…त्याला कळेनाच कि रिमा इतकं का रिऍक्ट करतीये….”

त्याला वाटलं आज पार्टी फार चिडलेली दिसतीये..मोठ्ठ वादळ यायच्या आधी इथून पळ काढलेला बरं..”

थोड्या वेळात त्याला एक कॉल आला आणि त्याला घरातून बाहेर पडायला निम्मितचं मिळालं….”अगं रिमा मला ऑफिस मध्ये खूप कामं आलं अचानक त्यामुळे मला जावं लागेल…”

आता कितीही झालं तरी रिमाचा नवराच होता तो…मग नवऱ्याला बिना खाण्यापिण्यावाचून घरातून पाठवलेलं कसं चालेल म्हणून तिने पटकन नाष्ट्या साठी इडली सांबर आणि गुलाबजामून अतुलला दिले.  पण रिमाचं मौनव्रत चालूच होतं आणि ती अजूनही अतुलवर चिडलेलीच होती आणि साहजिकच आहे असं कसं नवरा आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरू शकतो…

सकाळ्ची  कामं आवरता आवरताच तिलाआठवलं कि काल तिच्या मैत्रिणीचा मुग्धाचा फोन आला होता किट्टी पार्टी साठी. पण आज लग्नाचा वाढदिवस असल्याने रिमाने नकार दिला होता. तिने विचार केला कि नवरा काही आपल्याला स्पेशल फील नाही करवणार…दिवसभर घरात बसूनच आजचा दिवस घालवणं योग्य नाही. म्हणून तिने किट्टी पार्टीमध्ये सहभागी होयचं ठरवलं…तसेच आज अतुल ऑफिस मध्ये गेल्याने मुलांना कुठे ठेवायचं असा प्रश्न म्हणून तिने सर्वांना संध्याकाळी घरीच बोलावलं. बायकांना काय कुठेही चुघलखोरी करायला मिळाली म्हणजे झालं.

रिमाने मैत्रिणींच्या सरबराईसाठी वेगवेगळ्या पदार्थांचा बेत आखला. एकीकडे वडे तळून ठेवले…दुसरीकडे जेवणासाठी पुलाव आणि पाव भाजीची पटापट तयारी तिने सुरु केली. सोबतच २-३ प्रकारची शीतपेये बनवून आधीच फ्रिज मध्ये ठेऊन दिली. रिमाने मस्तपैकी घर आवरून ठेवलं आणि लग्नात भेट मिळालेला एक महागडा फ्लॉवर पॉट डाईनिंग टेबल वर ठेवून दिला आणि विरंगुळा म्हणून गाण्यांची सीडी लावून ठेवली. थोड्याच वेळात एक एक करून किट्टी पार्टीतल्या रिमाच्या मैत्रिणी यायला लागल्या. जोशीकाकू, नेनेकाकू, मुग्धा, पाटील वहिनी, देशपांडे काकू, मळेकर वहिनी अशा ५-६ जणी आल्या. सगळ्या दिवाणखान्यात सोफ्यावर बसल्या. रिमाने सगळ्यांसाठी कडक आल्याचा चहा बनवून आणला. चहाचा एक घोट पिताच, नेने काकू …रिमा तू चहात मसाला नाही का टाकत ? ….लक्ष्मी चौकात बघ एक दुकान आहे….  स्पेशल वेगवेगळ्या प्रकारच्या चहाच्या मसाल्यासाठी प्रसिद्ध आहे.. “

ह्यावर रिमाने होकारार्थी मान हलवत वड्यांसाठी सगळ्यांना आग्रह धरला, “चव घेऊन पहा..आज कधी नव्हे तर आई सारखे जमलेत मला…”

सगळ्यांनी वडे फस्त केले..थोड्याच वेळात..जोशी काकू खोचकपणे  , ” अतुल भाऊजी नाही दिसतेय..?”

रिमा – “अहो काकू आज ते ऑफिसमध्ये गेले आहेत.. त्यांना अचानक काम आलं त्यामुळे जावं लागलं.”

रिमाचं बोलणं मधेच काटून मुग्धा रिमाला चिढवूनचं म्हणाली , “अगं रिमा आज रविवारचं कसलं गं काम? जरा नजर ठेव हा अतुल भाऊजींवर..अफेयर तर नाही ना त्यांचं कुठे…”    

आणि मुग्धाच्या बोलण्यावर सगळ्याजणी खी खी करायला लागल्या… पण रिमाचा चेहराच उतरला होता…आणि खरंच तिच्या मनात सतत एक प्रश्न काहूर करत होता कि आज अतुल का गेला ऑफिसला….इतक्या वर्षांत असं कधीच तो रविवारीच काय तर शनिवारी देखील ऑफिसमध्ये गेला नाही.

रिमाचं आता कशातच लक्ष लागेना पण सगळ्यांसमोर तिला तिची चिंता दाखवायची नव्हती म्हणून फॉर्मलिटी म्हणून ती सगळ्यांना बघत होती.

रिमा मनातल्या मनात , “येऊ देत अतुलला आज, चांगलाच जाभ विचारते…तरीच म्हटलं लग्नाच्या वाढदिवसापेक्षा असं काय महत्वाचं काम पडलं.” इतक्यात नेने काकूंच्या आवडीचं गाणं ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ लागलं आणि त्या गाण्याच्या तालावर त्यांचे पायही ठुमकायला लागले. नेने काकूंना साथ म्हणून हळू हळू सगळ्याच त्यांना जॉईन झाल्या आणि मग रिमाचं घर डीजे बनून गेलं. सगळ्यांच्या आग्रहाखातर रिमाही नाचू लागली. सगळ्याजणी मस्त मंत्र मुग्ध होऊन नाचत होत्या. तेवढ्यात मळेकर वहिनींचा हात नाचत नाचत डायनिंग टेबल वर ठेवलेल्या फ्लॉवर पॉटला लागला आणि खाडकन असा आवाज आला. एका क्षणी अफाट शांतात पसरली. मळेकर वहिनींना अगदी ओशाळ्यासारखं झालं होतं. त्यानी रिमाला सॉरी म्हणून काहीतरी कारण सांगून तिथून पळ काढला. अगदी तो तुटलेला फ्लॉवर पॉट केरणी मध्ये गोळा करून ठेवायचीही तसदी त्यांनी घेतली नाही. मळेकर वहिणींपाठोपाठ सगळ्यांनी रिमाचं खोटं सांत्वन करून निरोप घेतला.

सगळ्या गेल्यावर रिमा डोक्याला हातचं लावून बसली होती. त्या फ्लॉवर पॉट प्रमाणेच तिच्या हृदयात साठवलेल्या आठवणीदेखील विखुरल्या होत्या. तिने फार जपून ठेवला होता तो. मुलांचे हात लागून तुटू नये म्हणून सणावाराला किंवा कुणी पाहुणे आल्यावर क्वचितच बाहेर काढायची. तेवढ्यात अतुल घरी शांताबाईंना घेऊन आला.

“मला माहीतच होतं काहीतरी वादळ येणार म्हणून… आणि मी आलो तर खालपर्यंत गाण्यांचा आवाज येत होता. म्हटलं तुला आता खूप काम पडेन आणि शांताबाईंची गरज नक्की भासणार म्हणून बघ मी त्यांनाच घेऊन आलो…”

अतुलला बघताच रिमाने सगळं विसरून त्याला घट्ट मिठी मारली. शांताबाईंनाही ओशाळलं.

“शांताबाई – अशा कशा मेल्या बायका ह्या..दुसऱ्याच्या घरी यायचं….ती तशी हि अशी नुसती पंचायत करायची आणि खाऊन पिऊन पळता पाय काढायचा….मी भांडे घासायला घेते रिमा ताई .”

शांताबाईंचा आवाज ऐकून रिमाने सावरलं आणि ती अतुलच्या मिठीतून बाहेर पडली. शांताबाई कामं आवरून कधीच गेल्या होत्या. तेवढ्यात अतुलने रिमाचे डोळे बंद करून तिला आरशासमोर नेलं आणि तिला म्हणाला… ,”डोळे बंदच ठेव…मी सांगतो तोपर्यंत उघडायचे नाही…”

रिमाला काही कळेनाच..अतुल जसं सांगतोय तसं ती करत होती.

रिमाने डोळे मिटल्यावर अतुलने तिच्या खांद्यावर गडद जांभळ्या रंगाची पेशवाई पैठणी ठेवली होती आणि गळ्यात एक सोन्याची ठुशी माळली.

“आता उगढ डोळे….किती उठून दिसतो हा रंग तुझ्यावर…तुला आठवतं का १० वर्षांपूर्वी ह्याच दिवशी तू अशाच रंगाचा शालू घालून मंडपात आली होतीस…आणि मी फक्त तुझ्याकडेच बघत होतो…”

“म्हणजे? आपल्या लग्नाचा वाढदिवस तुमच्या लक्षात होता? ” रिमा लाजूनच म्हणाली.

अतुलने दिलेलं सरप्राईझ तिच्या डोळ्यात चमकत होतं….ती आता झालं गेलं सगळं विसरली होती.

“अहो थँक यु ह्या सरप्राईझ बद्दल …पण ह्याची काय गरज होती…तुम्ही नुसतं सकाळी उठल्यावर मला विश जरी केलं असतं तर मला आनंद झाला असता.”

अतुल – “अगं सकाळीच विश केलं असतं तर सरप्राईझची काय मज्जा राहिली असती. …”

रिमा – “अगं बाई…ह्या सगळ्या गोंधळात स्वयंपाकाला अजून सुरुवात नाही केली.. 7 वाजले बघा….”

अतुल – त्याची काही गरज नाही..टेबल ऑलरेडी बुक झाला आहे…तू फक्त तयार हो..”

रिमा – “म्हणजे??अहो काय चालू आहे तुमचं? आता हे टेबल वगैरे काय आहे…”

अतुल – “अगं त्यासाठीच तर मी बाहेर गेलो होतो आज…रविवारी कसलं गं ऑफिस..बरं…तू लवकर तयार हो…आणि हो मुलांना तयार करत नको बसू आता..थोड्याच वेळात आई येतेय…ती बघेन पोरांना…मी पोरांसाठी त्यांच्या आवडीचा पिझ्झा ऑर्डर केला आहे.”

रिमा – “अहो पण मुलांना सोडून असं कसं जायचं आपण .?”

अतुल – “पण बिन काही नाही…कधी कधी चालतं गं…आजचा दिवस फक्त तुझा आणि माझा…बस तुम और मैं…..”

अतुल रिमाला ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ म्हणत हाताभोवती गोल गोल फिरवायला लागला आणि आतल्या खोलीतून मुलं आई बाबांना बघून खिदी खिदी हसायला लागली.  

=================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.