Skip to content Skip to sidebar Skip to footer

यशोदा

©® सौ मधुर कुलकर्णी

सत्यनारायणाची पूजा झाली आणि विक्रांत,सुखदा प्रसादाचा शिरा आणि तीर्थ द्यायला उठले.विक्रांत यामिनीकडे वळला.
  “वहिनीआई,प्रसाद घे.”

“अरे विक्रांत, घरात इतकी ज्येष्ठ मंडळी आहे,त्यांना आधी दे.” यामिनी म्हणाली.

“तुझा मान पहिला वहिनीआई.
माझ्यासाठी तूच सगळं काही आहेस.”विक्रांतने तिच्या हातावर तीर्थ दिलं आणि तिला वाकून नमस्कार केला.यामिनीच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिने प्रसाद घेतला आणि विक्रांत,सुखदाला भरभरून आशीर्वाद दिला.तिच्या डोळ्यापुढे एवढासा विक्रांत आला.ती माप ओलांडून कर्णिकांच्या घरी आली त्या क्षणापासुन सतत तिच्या मागे मागे असणारा…..

     
    अजेय बँकेत काम करत होता.अशोक; विक्रांतचे वडील, शाळेत शिक्षक होते.आणि धाकटा भाऊ विक्रांत फारच लहान होता.अजेयची आई; अलका संधीवातामुळे अंथरुणाला खिळून होती. विक्रांत आणि अजेयमधे बरंच अंतर होतं.   विक्रांत पाच वर्षांचा झाला आणि अलका अंथरुणाला खिळली.विक्रांतची जबाबदारी आता अशोकवर आणि अजेयवर आली.स्वयंपाकाला बाई असली तर आई जे मुलासाठी करते,ते अशोक आणि अजेय करू लागले.नोकरी सांभाळून सगळं करताना दोघांची तारेवरची कसरत होत होती.

   यामिनीला आत्याच्या मुलीच्या लग्नात अजेयने बघितलं आणि त्याला ती आवडली.आते बहिणीची मैत्रीण.साधी,सात्विक सौंदर्य.त्याने घरी आल्यावर आत्याला देखील बोलून दाखवले. “आत्या,मला ती मुलगी आवडली आहे.साधी सरळ वाटली.तुला तर माहितीच आहे,मला नोकरी करणारी नको.मला अशी पत्नी हवी जी आमच्या घरची परिस्थिती समजून घेईल.आईचं आजारपण,विक्रांतचं लहान वय,त्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारेल.आमच्याकडे गडगंज नाही पण तिला कशाची कमी पडणार नाही.”

   “अजेय,यामिनी लाखात एक आहे.तिचं वागणं,समंजसपणा मी अनेक वर्षे बघतेय.फार गुणाची आहे.ती नोकरी पण करत नाहीय.पण ती एकुलती एक आहे.तिच्या आईवडिलांच्या काही अपेक्षा असतीलच रे.मी बोलते त्यांच्याशी.”आत्याने अजेयला दिलासा दिला.

  एक दिवस आत्याचाच फोन आला.
  “अजेय, मी यामिनीच्या वडिलांशी बोलले आहे पण त्यांची इच्छा दिसली नाही.लग्न झाल्या झाल्या मुलीवर इतकी मोठी जबाबदारी त्यांना नको वाटली.तुझा फोटो त्यांनी परत पाठवला आहे.”

  “इट्स ओके आत्या.त्याचंही बरोबरच आहे ग.फरगेट इट.”अजेय म्हणाला.

  अजयने तो विषयच डोक्यातून काढून टाकला.अजेयला मुली सांगून येत होत्या पण घरची परिस्थिती बघितली की नकारच यायचा.

   अजेय बँकेत कॅश कोऊंटरला होता.आज सोमवारची प्रचंड गर्दी होती. डोकं वर करायला फुरसत नव्हती.कामात अगदी दंग होता.हातात एक स्लिप आली त्यावर सही नव्हती.” मॅडम,स्लिपवर सही करायला विसरलात तुम्ही. तुमचं नाव?…”

“यामिनी जोशी.”

  अजेयने दचकून वर बघितलं. समोर यामिनी हसत उभी होती.”मी लंच टाईम होईपर्यंत थांबतेय.तुमच्याशी बोलायचं होतं.”असं म्हणून झटक्यात बाजूला झाली.

  यामिनीला बघितलं आणि अजेयचं कामातून लक्ष उडालं. तो सतत घड्याळाकडे बघू लागला.लंच टाईम झाल्याबरोबर त्याने यामिनी कुठेय ते बघितलं. यामिनी बेंचवर मासिक चाळत होती. अजेय तिच्याजवळ आला.”हॅलो”

   यामिनीने वर बघितलं.”हॅलो,बाहेर कुठेतरी जाऊ या चहा घ्यायला?”

“ओके,मी जरा स्टाफमधे कुणाला तरी सांगून येतो.अर्धा तास वेळ आहे.”अजेय म्हणाला.

   बँकेच्या जवळच एका हॉटेलमध्ये अजेय आणि यामिनी आले.

  “अजेय,मला बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.माझ्या वडिलांचं अकाऊंट आहे तुमच्या बँकेत.मी आज मुद्दामच आलेय.माझ्या वडिलांनी नकार देऊन सुद्धा मी तुम्हाला भेटायला आले.पण मला करायचं आहे तुमच्याशी लग्न.जो मुलगा एकदाच मुलीला बघून,कुठलीही चौकशी न करता लग्नाची मागणी घालतो,तो जेन्यूईन वाटतो मला.मला तुमच्या आत्याकडून घरची सगळी परिस्थिती माहिती झालीय.पण मला आवडेल एका छोट्या दिराची आई व्हायला.मला माहितीय हे सगळं सोपं नाहीय,कधीतरी मलाही कंटाळा येऊ शकतो पण मी तक्रार करणार नाही.मला माझा लाईफ पार्टनर साधा,प्रामाणिक हवा आहे, जो मी तुमच्यात बघितला. लग्न हे परस्पर सम्मतीनेच होत असतं पण ज्याला मी खूप आवडली आहे,त्याच्याशी एकरूप व्हायला मला आवडेल.मी लग्नात तुम्हाला बघितलं होतं. पण असं काही होईल हे अनपेक्षित होतं .बाबांना मी माझा निर्णय सांगितला आहे.त्यांनी हेच सांगितलं,तुझा निर्णय आहे,परत माघारी यायचं नाही.जे स्वीकारणार आहेस ते मनापासून कर.माझी तयारी आहे.तुमच्या निर्णयाची वाट बघतेय कारण बाबांनी तुम्हाला नकार देऊन तुमचा अपमान केल्यासारखच आहे.मी माफी मागते.”

  “इतकं स्पष्ट बोललात,आवडलं मला.माझा निर्णय तोच आहे.फक्त एक अट आहे,तुम्ही एकदा माझं घर बघावं.आई,बाबा आणि विक्रांत;माझा धाकटा भाऊ,ह्यांना भेटावं आणि मगच निर्णय पक्का करावा.”

   “मला मान्य आहे.”यामिनी हलकंस स्मित करत म्हणाली.

   यामिनीला अजेय घरी घेऊन आला तेव्हा विक्रांत बाहेर मुलांशी खेळत होता.अजेयने त्याला आत बोलावले.आत आल्याबरोबर कुणीतरी अनोळखी स्त्री आत बसलीय हे त्याला दिसलं आणि तो बावरला.

   “हाय चॅम्प,मी यामिनी.तुझ्या दादाची मैत्रीण.आणि आजपासून तुझी पण.चालेल न तुला?” यामिनीने हात पुढे केला.
   विक्रांत तिला बघून,तिचं बोलणं ऐकून इतका खुश झाला की नकळत त्याने तिच्या हातात त्याचा हात दिला.

   यामिनी अजेयच्या आईला;अलकाताईंना भेटायला खोलीत गेली.संधीवाताने त्यांना उठणं,चालणं देखील होत नव्हतं. यामिनी त्यांच्या पाया पडली.त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं,”सुखी हो.तु निर्णय घेतला आहेस खरा.पण ही वाट सोपी नाही ग.तुझ्यावर खूप भार पडणार आहे.आम्ही सामान्य,मध्यमवर्गीय माणसं. हे चार खोल्यांचं घर माझ्या सासऱ्यांनी वाटणी करताना ह्यांना दिलं.नाहीतर ह्या महागाईच्या काळात आम्हाला घर घेणं सुद्धा शक्य नव्हतं.तु एकुलती एक.तुझ्या बऱ्याचश्या इच्छांना इथे मुरड घालावी लागेल ह्याची जाणीव आहे न तुला?”

“हो,मी पूर्ण विचार करूनच निर्णय घेतलाय.”यामिनीने त्यांचा हात हातात घेत म्हटलं.

  “तुझं भरभरून स्वागत आहे पोरी ह्या घरात.”तिचे होणारे सासरे अशोक म्हणाले.

  यामिनीने सासऱ्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांच्यातलीच एक होऊन सुखदुःख वाटून घ्यायचं व्रत स्वीकारलं.

  पुढच्या गोष्टी सहज घडत गेल्या.अजेयच्या आईवडिलांना यामिनी मनापासून आवडली.लग्न रजिस्टर पद्धतीने करायचं हे अजेयने ठरवलेच होते.त्याला तो अनावश्यक, वायफळ खर्च मान्यच नव्हता.यामिनीने माप ओलांडलं, त्या क्षणापासून तिने जबाबदारी स्वीकारली.

    घरात लग्नाचे पाहुणे म्हणजे फक्त अजेयची आत्या आणि एक मावशी थांबली होती.बाकी सगळे परतले होते.

  रात्री अजेय रूममधे आला.हातात लालचुटुक गुलाबाचं फुल होतं. ते यामिनीला देत तो म्हणाला,
  “ही पहिल्या रात्रीची भेट माझ्याकडून.माझा संसार तु सुखाचा करशील ह्याची खात्री तेव्हाच पटली होती,ज्यादिवशी तु लग्नाला तयार झालीस.मी जर कुठे कमी पडलो,तुझी कुठली इच्छा पूर्ण नाही करू शकलो तर मला समजून घे आणि माफ कर.”

  यामिनीने त्याचे हात धरले, “अजेय,आता आपण एक झालोय.मी तुम्हाला पहिल्याच भेटीत सांगितलं होतं,मी तक्रार करणार नाही.मी मनापासून स्वीकारलं आहे.अजेयने यामिनीच्या कपाळावर ओठ टेकले.

    यामिनी आली आणि घराचं चित्रच पालटलं.एका स्त्रीचा हात घरात फ़िरल्यावर घराला घरपण येतं तसंच झालं.विक्रांत तर सतत वहिनी वहिनी करत तिच्या मागे असायचा.त्याचा अभ्यास घेणं सगळं निगुतीने करत होती.विक्रांतला टायफॉईड झाला तर दिवसरात्र त्याच्याजवळ होती.विक्रांत तर तिला कधी ‘वहिनीआई’ म्हणायला लागला,त्याचं त्यालाच कळलं नाही.

   अजेय बँकेच्या परीक्षेत पास झाला आणि त्याचं प्रमोशन झालं.मेन ब्रँचला त्याची बदली झाली,जबाबदारी वाढली पण तो निर्धास्त होता कारण यामिनी घरची धुरा सांभाळत होती.तिच्या पायगुणाने लक्ष्मी प्रसन्न होत होती.आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली होती.अशोक देखील शाळेतून निवृत्त झाले होते.विक्रांत अभ्यासात त्याच्या गुणांनी उत्तम यश मिळवत होता.

   संसाराला एक गोड फुल येण्याची चिन्हे दिसली आणि यामिनी मोहरून गेली.अजेय तिला फुलासारखा जपत होता.आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे त्याने घरकामाला बाई ठेवली.सगळं आनंदात चाललं होतं पण गालबोट लागावं तसं झालं.यामिनीचा गर्भपात झाला आणि ती उन्मळून पडली.अजेयने तिची समजूत काढली.
  “यामिनी,खचून जाऊ नकोस.आता ह्यापुढे चांगलंच होईल हाच विचार कर.”

  “प्रयत्न करतेय हो मी,पण वेळ लागेल.”यामिनीचे डोळे भरून आले.तिला त्यातून सावरायला,प्रकृती पूर्ववत व्हायला अवकाश लागला.तिने स्वतःला निग्रहाने सावरलं आणि आनंदी राहायचा प्रयत्न करू लागली.

  दरम्यान विक्रांतचं दहावीचे वर्ष आले.त्याला कुठलीही ट्युशन न लावता,यामिनीने त्याचा अभ्यास घेतला.आणि विक्रांत पंच्याणव टक्के मिळवून पास झाला.शाळेत सगळ्या विद्यार्थ्यांमधे दुसरा होता.बक्षीस स्वीकारताना त्याच्या यशाचे श्रेय त्याने  यामिनीला आणि शिक्षकांना दिलं.

   यामिनीला परत आई होण्याची चाहूल लागली आणि तिच्या मनात आनंद आणि भीती ह्या संमिश्र भावना दाटून आल्या. सर्वतोपरी काळजी घेऊनही परत गर्भपात झाला.डॉक्टरांनी जेव्हा सांगितले,प्रकृतीला धोका आहे,दत्तक घेण्याचा विचार करा त्यावेळी ती पूर्णपणे खचून गेली.कशातही उत्साह वाटेना.रोजची कामं कशीतरी पार पाडत होती.अजेयला तिची ही मनस्थिती बघवेना. “यामिनी,स्वतःच मुल आपल्या नशिबी नसेल पण एका अनाथ मुलाला तु आईची माया,जिव्हाळा देऊ शकतेस..”

   “माझ्या मनात आत्ता द्वंद्व चाललंय हो.एक मन सांगतंय दत्तक घ्यावं,दुसरं मन सांगतंय, विक्रांतलाच आता आपला मुलगा मानायचं. लग्न झाल्यापासून आम्हा दोघात आई-मुलाचंच नात निर्माण झालंय.”यामिनीचे डोळे भरून आले.

   “विक्रांत मुलासारखा असला तरी तो आपला मुलगा नाहीय यामिनी.उद्या त्याचं लग्न होईल,त्याच्या बायकोच्या काही अपेक्षा असतील. आपण त्याच्यावर सक्ती करू शकत नाही.”

  “मला थोडा वेळ द्या.मग निर्णय घेऊ.” यामिनीचे औदासिन्य दिवसेंदिवस वाढत होते.

    विक्रांतचे बारावीचे वर्ष होते.तो आता जाणता, समजूतदार झाला होता.वहिनीची ही अवस्था त्याला बघवत नव्हती.त्याने मनाशी काहीतरी ठरवलं.एक दिवस ती उदास बसली असताना तो तिच्या खोलीत आला.
  “वहिनीआई,काय करते आहेस?”

   “काही नाही रे.जरा आराम करतेय.तुझा अभ्यास नीट चाललाय न?महत्वाचे वर्ष आहे.पुढचं सगळं करिअर बारावीवर अवलंबून आहे.छान अभ्यास कर.”यामिनी थकल्या स्वरात म्हणाली.

  “त्याची तु काळजी नको करुस ग.मी करतोय व्यवस्थित. तुला एक ऑफर देऊ का ग?” विक्रांतने तिला विचारलं.

  “कसली ऑफर रे?” यामिनीने हसत विचारलं.

    “वहिनीआई, माझ्या मित्राची आई एका विशेष मुलांच्या शाळेत शिकवते.त्यांना शिक्षक हवे आहेत. तु तिथे शिकवावं असं मला वाटतं.मी लहान असताना तु किती पेशन्सने मला शिकवायची.तुझा स्वभाव खूप मृदू,मायाळू आहे.तु हे काम खूप छान करशील ह्याची मला खात्री आहे.त्या मुलांना प्रेम,माया हवी असते ग.”

   “विक्रांत,सध्या मनस्थिती ठीक नाहीय रे.अशा परिस्थितीत मी हे काम करू शकेन का,मला शंका वाटतेय.”यामिनी म्हणाली.

  “वहिनीआई,तु ह्या मनस्थितीतून बाहेर यावं ह्यासाठीच मी तुला सांगतोय.”

   यामिनीने विक्रांतकडे बघितलं.कालपरवा छोटंसं वाटणारं हे पिल्लू,इतकं मोठं,समजूतदार झालंय. त्याला माझ्या मानसिक वेदनांची जाणीव आहे.तिने विक्रांतच्या गालावरून हात फिरवला.”विक्रांत,मी विचार करून सांगते.चालेल?”

  “ओके वहिनीआई,काही घाई नाही.”

   विक्रांत खोलीच्या बाहेर गेला आणि यामिनी विचार करू लागली.अजेय म्हणतात ते खरंच आहे.विक्रांत मुलासारखा असला तर मुलगा म्हणून त्याच्यावर आपला हक्क नाही.उद्या त्याचं लग्न होईल.त्याच्या होणाऱ्या पत्नीला देखील हे आवडणार नाही.विक्रांतला गृहीत धरणं योग्य नाही.

तिने दोन दिवस विचार केला आणि विक्रांतला सांगितलं,
  “विक्रांत,मी तयार आहे त्या शाळेत शिकवायला.मला तुझ्या मित्राच्या आईचा फोन नंबर दे.मी त्यांच्याशी बोलते.”

   “थँक्स वहिनीआई,मी लगेच देतो नंबर.”विक्रांत म्हणाला.

   यामिनी शाळेत गेली.तिथली विशेष मुलं बघून तिच्या हृदयात कालवाकालव झाली.तिने निर्णय घेतला.इथेच ह्या मुलांवरआपली माया,प्रेम लुटायचं.तिने नोकरी पत्करली. त्या मुलांना शिकवताना ती कधी त्याच्यात इतकी गुंतली तिलाच कळलं नाही.दत्तक घ्यायचा विचारच तिने मनातून काढून टाकला.आपलं आयुष्य ह्या मुलांच्या सेवेसाठी वहायचं तिने ठरवलं.

   विक्रांत बारावीत उत्तम मार्क्स मिळवून पास झाला.त्याने सी ए करायचं ठरवलं.सासूबाईंची प्रकृती खालावत गेली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सासऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेऊन यामिनी नोकरी करत होती.अजेय आता बँकेत मॅनेजर होता.आर्थिक परिस्थिती उत्तम होती.

   दिवस पुढेपुढे सरत होते.सासरे वृद्ध झाले होते.आता यामिनीला घरचं सांभाळून नोकरी करून अशक्य झालं. तिने नोकरी सोडून सासऱ्यांच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांची मनोभावे सेवा केली.

विक्रांत सी ए होऊन एका मोठ्या फर्ममधे नोकरीला लागला.तिथेच त्याची सुखदाशी ओळख झाली आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.लग्न ठरल्यावर विक्रांतने सुखदाला घरी आणले, “वहिनीआई,दादा; मी आणि सुखदा लग्न करतोय.तुमचा आशीर्वाद हवा.”दोघेही पाया पडले.
 
   “सुखाने संसार करा.”यामिनीने दोघांच्याही डोक्यावर हात ठेवला.

   यामिनीने तिच्या मनात चाललेलं वादळ विक्रांतला सांगितलं, “विक्रांत,मी तुझी आई नाही.मी तुझ्यावर कुठलाही हक्क दाखवू शकत नाही.तुम्ही दोघे लग्नांनतर वेगळे होऊ इच्छित असाल तर अगदी आनंदाने व्हा.आता तुमचा संसार तुम्हाला फुलवायचा आहे.दोघेही एकमेकांची मनं जपा.”

  “वहिनीआई,अग काय बोलतेस हे?तु माझी आईच आहेस.आजपर्यंत तूच माझं सगळं करत आलीस.मी वेगळं राहण्याचा विचारही मनात आणू शकत नाही.
सुखदाला मी ह्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे.तिला देखील तुमच्याजवळ राहायचं आहे ” विक्रांत म्हणाला.

  यामिनीला ते ऐकून कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.अजेयच्या संसारात मिळालेलं स्थान बघून ती भरून पावली.

   आणि आज सुखदा ह्या घरची सून झाली होती.

  “ताई,फुलं आणि माळा आणल्या आहेत.”

   यामिनी एकदम भानावर आली.फुलांची ऑर्डर दिली होती,तो माणूस फुलं घेऊन आला होता.तिने विक्रांतची खोली सजवायला सांगितली.विक्रांत आणि सुखदाने ते बघितलं. “वहिनीआई,अग काय हे.”

  “विक्रांत,संसाराची सुरवात गोड आठवनींनी झाली की संसार देखील गोड होतो.थोडेफार काटे बोचले तरी ते जाणवत नाहीत कारण आठवणी सुखद असतात.आणि आता तर काय तुझ्या आयुष्यात सुखच सुख द्यायला सुखदा आलीय.हो न सुखदा?”

  सुखदा यामिनीकडे बघून गोड लाजली.

     अजेय खोलीत आला तेव्हा त्याला यामिनीच्या हातात पहिल्या रात्रीचं सुकलेलं गुलाबाचं फुल दिसलं.
  “यामिनी,तुझं कौतूक करावं तितकं कमी आहे.विक्रांतसाठी तु जे केलंस,करते आहेस,त्याला तोड नाही.खरं तर मी तुला खूप सुख देऊ शकलो नाही.”

  यामिनीने त्याच्या तोंडावर हात ठेवला,
“असं नका बोलु.प्रेमाचं प्रतिक असलेला हा गुलाब मी जपून ठेवला होता.मला सगळं मिळालं.आई होण्याचं सुख नशिबात नव्हतं.पण मी ती उणीव देखील भरून काढली.माझं वात्सल्य मी विक्रांत आणि शाळेतल्या मुलांवर पाझरलं. मी खूप आनंदात आहे.”

  अजेयने तिचे हात हातात घेतले आणि म्हणाला,
   “यशोदेची महती लोकं का गातात हे तुझ्यामुळे कळलं.तु विक्रांतची यशोदा आहेस.”

  यामिनीने अजेयच्या हाताची पकड घट्ट केली आणि समाधानाने त्याच्या खांद्यावर डोकं विसावलं……

                           -समाप्त-

==============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.