यंदा कर्तव्य आहे – भाग १

©️®️ मिथुन संकपाळ
(शनिवारची सकाळ…)
“समीर, नाश्ता तयार झालाय बरं काsss”
“हो आई, आलोच २ मिनिटात” ऑफिस साठी तयार होत असताना त्याने आईला उत्तर दिलं.
“अहो, तो आला की सांगा त्याला उद्याचं, उगाच काही कारण देवू नको म्हणावं त्याला” इकडे आई बाहेरच्या खोलीत बाबांचे कान भरत होती.
इतक्यात गौरी सुध्दा तयार होऊन बाहेर आली”आई, मला दे ना नाश्ता. खूप भूक लागले”
“अग थांब, दादाला पण येवू दे, दोघांना एकदम देते”
समीर तयार होवून बाहेर आला, तसे आई पटकन नाश्ता आणण्यासाठी किचन मध्ये गेली आणि जाताना पुन्हा एकदा बाबांना खुणवून गेली.
“दादा, आज लवकर तयार झालास, काय विशेष?”
“आज थोडं लवकर पोचायचं आहे, त्यामुळे तू पण पटकन आवर कारण तुला कॉलेज ला सोडून मग पुढे ऑफिस ला जायचंय”
“मी तयारच आहे रे, आधी नाश्ता तरी मिळू दे मातोश्री कडून”
आई किचन मधून नाश्ता घेऊन आली,”तुला तर सारखीच भूक लागलेली असते, हे घे संपव पटकन”
समीर आणि गौरी नाश्ता करायला लागले, एक घास खाताच समीर, “आहाहा.. तुझ्या हातचे पोहे म्हणजे लाजवाब”
त्यावर गौरी उत्तरली, “खरंय दादा”.
समीरने दुसरा घास तोंडात टाकला तसे बाबा त्याला म्हणाले,”समीर, उद्या काय प्लॅन तुझा?”
“बाबा, रविवार आहे तर एका मित्राकडे जावं म्हणतो”
“अच्छा अच्छा” असं म्हणत त्यांनी पेपर मध्ये डोकं घातलं.
“अहो, अच्छा काय अच्छा, पेपर बाजूला ठेवा आणि बोला आधी त्याच्याशी” आई जरा मोठ्या आवाजातच म्हणाली.
तसा बाबांनी पेपर बाजूला ठेवला आणि म्हणाले,”अहमम, अरे उद्या आपल्याला जरा देशमुखांच्या घरी जायचंय”
“बाबा, मग मी कशाला यायचं, तुमचे ऑफिस मधले मित्र ते, मी काय करू तुमच्यात?” समीरने टाळण्याच्या स्वरात उत्तर दिलं.
आता आईने सूत्रे आपल्या हातात घेतली,”अरे तुम्ही दोघेच नाही काही, आपण सगळेच जायचंय. त्यांच्या मुलीला पहायला तुझ्यासाठी”.
“अरे वाह, दादाचं लग्न..” गौरी एकदम खुश होवून ओरडलीच
“अग थांब थांब, लग्न काय लगेच. अजून ते फक्त मुलगी बघायचं म्हणत आहेत. पण बाबा, हे असं अचानक.. आणि त्यांना बोललात का तुम्ही याविषयी?”
“मग काय एकटाच ठरवतो का मी, देशमुख सोबत बोलणं झालं माझं, आणि त्याने तुला पाहिलंय. तो म्हणत होता जोडा एकदम शोभून दिसेल”.
गौरी मध्येच गायला लागली “गोरी गोरी पान, फुलासारखी छान.. दादा मला एक वहिनी आण…”
तिला मध्येच थांबवत समीर म्हणाला,”ए तू जरा थांबते का, नाश्ता संपव आधी.. आणि बाबा, मी तिला पाहिलं नाही, ना तुम्ही कोणी मग कसं काय तुम्ही लगेच त्यांना येतो असं सांगितलं? निदान आधी फोटो तरी घ्यायचा मुलीचा”
परत गौरी मध्येच, “ओ हो.. असं सांग ना फोटो पाहिजे म्हणून..”
“ए गौरी, तू थांब ह जरा. अरे समीर, असेच जाऊन येवू सगळे.. अगदी काही पसंत केलंच पाहिजे असं नाही, सहज भेटायला जातो तसे जाऊ आणि बघू काय होतंय. देशमुख ला मी बोललोय रे येतो म्हणून”
“बाबा तुम्ही पण ना.. माझं प्लॅनिंग उद्याच…”
“बास तुझं प्लॅनिंग, एक दिवस काढ आमच्यासाठी पण” असं म्हणून आई ने चर्चेला पूर्णविराम लावला.
समीर पुढे काही न बोलता नाश्ता करू लागला, गौरी मात्र खुश झाली होती.. दादाचं लग्न हा विषयच तिच्यासाठी आनंदी होता.
दोघे ही मग घराबाहेर पडले, तसे बाबांनी फोन केला,”अरे, मी बोललोय बरं समीर सोबत.. येतोय आम्ही उद्या सगळेच. जेवणाचे तेवढे बघ बाबा, वहिनीच्या हातचं खायचं आहे.. आजवर फक्त ऑफिस मधल्या टिफीन मध्ये त्यांच्या हातची चव पहिली. उद्या काय तरी मस्त बेत करा म्हणावं…”
त्यांना थांबवत आई मध्येच..”अहो, तुम्ही काय जेवणाचे सांगत बसलात, आपण कशासाठी जातोय आणि तुमचं काय मध्येच.. काय म्हणतील ते..”
तिकडून आवाज आला..”या रे सगळे, करू मस्त बेत. समीर ला काय आवडतं सांग म्हणजे तसे काही बनवायला”
“त्याला चालतं रे काहीही.. मला मात्र मस्त शिरा करायला सांग, परवा तू आणला होतास ना ऑफिस मध्ये अगदी तसा”
“बरं बरं” म्हणत दोघेही हसू लागले…
(शनिवारी रात्री, स्थळ : देशमुखांचे घर)
“अहो, येताय ना जेवायला..”
“हो आलोच, थोड्या बातम्या बघत होतो. आज लवकर उरकलास स्वयंपाक?” – सुरेश देशमुख.
“अहो पटकन आवरून झोपायला पाहिजे, उद्या लवकर उठायच आहे ना, ती मंडळी येण्याआधी सगळं आवरले पाहिजे” – सविता देशमुख.
“अग् पण मानसी कुठे आहे? तिला पण बोलव ना मग लागलीच”
“येईल हो ती, आज ऑफिस मधून जरा उशिरा आली ना.. हे पहा आलीच. मानसी बेटा, बस पाहू तू पण जेवायला”
“हो आई, आलेच हात धुवून”
तिघे एकत्र जेवायला बसले, आणि मग नेहमी प्रमाणे जेवता जेवता गप्पा सुरू झाल्या..”बाबा, आज ना खूप काम होते ऑफिस मध्ये, इतकं की उद्या ही करायला लागलं असतं, पण थोडं जास्त वेळ थांबून उरकून टाकलं”
“हे बरं केलंस बाई, नाहीतर रविवारी पण मांडीवर लॅपटॉप घेवून असतेस हल्ली” – सविता देशमुख.
“हो ग, काम असेल तर करावच लागतं.. पण उद्या आता निवांत. भरपूर झोपणार आहे मी आणि मला लवकर उठवू पण नका”
“अरे बेटा, उद्या ना आपल्याकडे माझ्या ऑफिस मधला मित्र आणि त्याची फॅमिली येणार आहेत, म्हणजे तो, त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी, तेव्हा त्यांचं जेवणाचे बघायचे होते”
“काय हो बाबा.. आत्ताच म्हणाले ना मी, मला उद्या निवांत उठायचं आहे” – मानसी.
“अहो, मुद्द्याच सांगा की तिला” तिची आई मध्येच पुटपुटली
“हो हो.. मानसी बेटा, तो जो माझा मित्र आहे ना.. श्रीकांत पटवर्धन, त्याचा मुलगा समीर साठी तुझं स्थळ सुचवलंय म्हणून ते भेटायला आणि तुला बघायला येणार आहेत”
“काय..?” मानसी ताडकन उभी राहिली “हे तुम्ही मला आता सांगताय, अहो असं कसं करू शकता तुम्ही? माझी अजिबात तयारी नाहीये, शिवाय अवतार तर बघा माझा..”
तिला मध्येच थांबवत बाबा, “बेटा आधी तू बस पाहू, आणि इतकं काही टेन्शन घेण्या सारखं नाहीये, ते सहज घरी येताहेत असं समजून वाग.. काही वेगळी तयारी करण्याची गरज नाही”
“कठीण आहात तुम्ही, मला बघायला येतात हेच मुळी मला आत्ता समजतंय, त्यातून माझी सुट्टी खराब, उठून त्यांच्या साठी जेवण बनवायचं, आणि त्या काकूबाई च्या अवतारात मी त्यांच्या समोर उभे राहायचे.. कसं होणार आहे काय माहीत..”
आई तिला शांत करत म्हणाली, “बाळा, नको त्रागा करू, होईल सगळं नीट आणि तो मुलगाही येतोच आहे ना त्याची सुट्टी असून सुद्धा, तेवढं थोडा वेळ संयम ठेव.. आणि आम्ही आहोतच ना”
उद्याच्या विचारातच मानसीने कसेबसे जेवण संपवले, आणि खोलीत जाताना आईला सांगितलं,”झोपते मी आता पटकन, उद्या तू उठलीस की मलाही उठव”
तिचे आई बाबा एक मेकाकडे बघत राहिले, तिचा राग चांगलाच लक्षात आला होता. मानसीचा राग पाहून त्यांनाही आता जरा काळजी वाटू लागली उद्याच्या दिवसाची…
क्रमशः
=================
यंदा कर्तव्य आहे – भाग २
https://www.ritbhatmarathi.com/yanda-kartavya-ahe-part2/
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============