यंदा कर्तव्य आहे भाग ४

©️®️ मिथुन संकपाळ
एके दिवशी दुपारी ऑफिस मध्ये असताना समीरने ते visiting card हातात घेतलं, काहीवेळ त्याकडं पाहत राहिला आणि मग तो नंबर डायल केला..
“हॅलो”
“हॅलो… कोण बोलतंय?”
“मानसी देशमुख ना?”
“हो मानसी देशमुख बोलतीय.. आपण?”
“मी समीर”
“कोण समीर..?”
“समीर पटवर्धन, ते आपण…..”
“ओ अच्छा.. समीर. बोला ना”
“थोडं बोलायचं होतं म्हणून फोन केला होता, if you don’t mind” – समीर
“मी ऑफिस मध्ये आहे, नंतर बोलुयात का निवांत?” – मानसी.
“संध्याकाळी भेटुयात का ऑफिस नंतर?” – समीर.
“ओके, पण कुठे?” – मानसी.
“वाडेश्वर..?” – समीर
“चालेल, पोहचते मी ६:३० पर्यंत” – मानसी.
“Done, see you then.. bye” – समीर.
“Bye” – मानसी.
दोघेही आपल्या कामात लागले. समीरला कळत नव्हतं असं अचानक कसं त्याच्या मनात आलं फोन करण्याचं. पण तिच्याशी फोनवर बोलून त्याला एक वेगळाच अनुभव आला होता. पहिल्या भेटीत लाजाळू, घाबरट आणि काकूबाई वाटलेली ती आज फोनवर खूप confident वाटत होती.
मानसीने फोन करून घरी कळवले उशीर होणार असल्याचं.. कारण मात्र गुलदस्त्यात होतं. काम संपताच ती निघाली वाडेश्वर कडे, तिथे पोचताच समीर वाट पाहत उभा होताच.. मानसीने गाडी पार्क केली आणि समीर कडे येवू लागली.. समीर तिच्याकडे पाहतच राहिला, कुठे त्या दिवशीची काकूबाई आणि कुठे आजची मानसी.. अगदी जमीन आस्मान चा फरक होता.
निळ्या रंगाची जीन्स, लाल टीशर्ट, काळ्या रंगाचं लेदर जॅकेट, केस सोडलेले आणि त्याहून कहर म्हणजे तिने दिलेली स्माईल.. समीर एकदम शॉक झाला होता. जसजशी ती जवळ येत होती, समीर च्या हृदयाची धडधड वाढत होती… ती अगदी त्याच्या समोर येवून उभी,
“Hi, फार उशीर नाही ना झाला मला?” – मानसी.
“नाही नाही, अगदी वेळेत आहेस.. बसू या का आपण आतमध्ये?” – समीर.
“हो हो..”
दोघेही आत गेले आणि रिकामं टेबल पाहून बसून गेले.
“बघ तुला काय हवंय” मेन्यू कार्ड तिच्या हातात देत समीर म्हणाला.
फार विचार न करता ती म्हणाली, “मी तर फक्त इडली घेईन”
समीरने मग तिच्यासाठी ‘इडली’ आणि स्वतः साठी ‘सेट डोसा’ अशी ऑर्डर दिली. वेटर ऑर्डर घेवून निघून गेला..
“काय बोलायचं होतं?” – मानसी
“Actually त्या दिवशी आपण नीट भेटलो नव्हतो, शिवाय बोलणं ही झालं नव्हतं, आणि घरी जेव्हा मला माझा निर्णय विचारू लागले तेव्हा असं वाटलं की एकदा आपण एकमेकांशी बोललं पाहिजे, म्हणून विचार केला की..” – समीर
“मलाही तेच वाटत होतं म्हणून मग मी ही अजून माझा निर्णय काही सांगितला नाही घरी” – मानसी
“खूप विचार करून मग ठरवलं तुला फोन करण्याचं” – समीर
“अच्छा, पण मग माझा नंबर..?? बाबांकडून घेतला का?” – मानसी.
“नाही, त्यांनाच काय.. मी माझ्या घरी सुध्दा अजून नाही सांगितलंय आपण आज भेटतोय म्हणून. नंबर तर मला गौरीकडून मिळाला..” असं म्हणत त्याने visiting card चा किस्सा सांगितला.
त्यावर मानसी हसू लागली..
“ओहह.. तरीच मी विचार करत होते की नंबर कसा मिळाला, कारण बाबा मला तसं बोलले असते त्यांनी नंबर दिला असता तर”
“आमची गौरी ना खूप आगाऊ आहे”
“गोड आहे ती, अशी व्यक्ती घरात असेल तर घर हसतं खेळतं राहते, मी तर याला आगाऊ पेक्षा ॲक्टीव म्हणेन” – मानसी.
“बरं, आणि मी याला गौरीची स्तुती समजू की मला टोमणा?”
त्यावर दोघेही हसायला लागले
इतक्यात वेटर ऑर्डर घेवून आला..
गप्पा आता अशा काही रंगल्या होत्या की, इडली आणि सेट डोसा कधी संपले ते कळलेही नाही.
“आणखी काय घेशील?” – समीर.
“खरंच काही नको, जेवण करायचं आहे ना घरी, तू घे ना तुझ्यासाठी” – मानसी
“अप्पे शेअर करशील का, मलाही पूर्ण खाल्ले नाही जाणार” – समीर
“ठीक आहे”
समीरने अप्पे ची ऑर्डर दिली..
“तू आज काही वेगळीच दिसतेस” – समीर.
“वेगळी म्हणजे?” – मानसी.
“त्या दिवशी साडीमध्ये पाहिलं ना तुला, आणि आज एकदम हटके लूक..”
“मग ऑफिस ला साडीमध्ये यायला हवं होतं का?”
पुन्हा दोघेही हसायला लागले..
“नाही.. तसं नाही पण वेस्टर्न कपड्यात तू छान दिसतेस”
“Ohh.. Thank you”
वेटर ने अप्पे आणून ठेवले टेबलवर. दोघेही मग गप्पांसोबत अप्पे ही शेअर करू लागले. दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. हसत खेळत त्यांनी मग बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या, आता ते दोघे पहिल्यांदा भेटतायत असं मुळीच वाटत नव्हतं. एक मेकांची मस्करी करत गप्पा सुरू होत्या, वेळ अपुरा वाटत होता. दोघांनाही अजून काही वेळ सोबत घालवायचा होता त्यामुळे आणखी काही ऑर्डर करणं भाग होतं..
“मी चहा घेईन, तू..??” – समीर
“मी चहा नाही घेत” – मानसी.
“मग कॉफी?”
“कॉफी घेते पण आता नकोय”
“कोल्ड कॉफी तरी घे, मी एकटाच कसा चहा पिऊ?”
“बरं ठीक आहे, चालेल”
“वेटर sss.. एक चहा आणि एक कोल्ड कॉफी” पुन्हा नवी ऑर्डर देण्यात आली.
थोड्याच वेळात चहा आणि कोल्ड कॉफी हजर झाली..
“बाप रे, इतका मोठा चहाचा ग्लास” – समीर.
खरंच तो इतका मोठा होता की मानसीलाही हसू आलं..
“पी पी.. संपव आता” – मानसी.
“असू दे, तेवढंच आपल्याला जास्त वेळ बसता येईल” – समीर.
त्याचा या वाक्यावर मात्र मानसीने फक्त एक स्मितहास्य दिलं.. आणि कोल्ड कॉफी पिऊ लागली. काही वेळाने त्यांनी निघायचं ठरवलं. दोघेही बाहेर आले, आता ते खूप जुने मित्र मैत्रीण वाटत होते.
एकमेकांचा निरोप घेवून मग दोघेही आपापल्या घरी निघाले.
“आई.. दादा आला बघ” – गौरी.
“अरे समीर किती उशीर? कधीचा फोन करतोय आम्ही उचलला नाहीस?” अलकाताई.
“आई मी ड्राईव्ह करत होतो ना” – समीर.
“बरं, जा पटकन फ्रेश होवून ये जेवायला” – श्रीकांतराव.
“हो येतो, पण मला जास्त भूक नाहीये. फक्त थोडा भात खाईन” – समीर.
तो फ्रेश होवून आला आणि सर्वजण जेवायला बसले.
“आई, फक्त डाळ भात दे” – समीर
“का रे, काही खावून आलास का बाहेरून?” – गौरी
“हो”
सर्वजण जेवणात मग्न झाले आणि मग शेवटी बाबांनी समीर ला विचारलं,
“देशमुखांना बोलवूया का आपण या रविवारी?”
समीरने हात धुतला, तोंडावरून हात फिरवला आणि उभा राहिला,
“बाबा, काही गरज नाही त्यांना बोलावण्याची”
आणि तडक तो आपल्या रूममध्ये निघून गेला..
*क्रमशः*
*- मिथून संकपाळ*
=====================
यंदा कर्तव्य आहे – भाग ३
https://ritbhatmarathi.com/yanda-kartavya-ahe-part-3/
यंदा कर्तव्य आहे – भाग ५
https://ritbhatmarathi.com/yanda-kartavya-ahe-part-5/
=====================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============