यंदा कर्तव्य आहे – भाग ३

“मानसी, ए मानसी.. उठ चहा बनवलाय, आणि अजुन किती झोपशील..” सविता ताईंनी मानसीला हाक दिली.
“हम्म्म.. आले फ्रेश होवून, तोवर चहा ओत आलेच मी पटकन” – मानसी.
फ्रेश होवून मानसी हॉल मध्ये पोचली, आई आणि बाबा दोघेही मानसीसाठी थांबलेच होते..
“हे काय बाबा, तुम्ही घ्यायचं ना चहा.. आई तू पण ना..”
मानसीला मध्येच थांबवत बाबा म्हणाले,
“अग हो.., म्हटलं सोबत घेवू सगळे. नाहीतरी संध्याकाळच्या चहाला तू कुठे असतेस रोज घरी..” – सुरेशराव.
“अच्छा, बरं बरं.. द्या मग आता चहा, पिऊ सगळेच” असं म्हणत मानसी त्यांच्या सोबत बसली.
सविता ताईंनी सर्वांसाठी चहा ओतला.. दालचिनी आणि आलं घालून केलेला गरमा गरम चहा.. एक घोट घेताच मानसीची दिवस भराची मरगळ जणू झटकन दूर झाली,
“वाह आई, खरंच.. रोज संध्याकाळी तुझ्या हातचा चहा प्यायला मिळाला तर दिवसभराचा कामाचा थकवा निघून जाईल बघ..”
“खरंय मानसी.. अगदी बरोबर बोललीस, इतकी वर्षे आम्ही संसार करतोय आणि बायको सुगरण मिळाल्यामुळे माझ्या जिभेचे चोचले घरीच पुरवले जातात बघ..” बाबांनी नेहमी प्रमाणे कौतुक करत मानसीच्या वक्तव्याला दुजोरा दिला.
चहा संपला.. आणि मग बाबांनी मूळ विषयाला हात घातला,
“मानसी बेटा, समीर ला पाहिलंस ना नीट, कसा वाटला तुला?”
“बाबा, खरं तर मी नीट पाहिलं नाही, मला काही सुचत नव्हतं. पहिल्यांदाच असं तयार झाले होते मी आणि त्यात ती साडी, मेकअप हे सांभाळू की त्या सर्वांकडे लक्ष देऊ हेच कळत नव्हतं.. तसेही हा पाहण्याचा कार्यक्रम पण पहिलाच होता ना..” मानसीने मन मोकळं केलं.
तिला समजवत आई म्हणाली,
“काहीच प्रोब्लेम नाही, होतं असं.. तरी बरं होतं की आपल्या ओळखीतले लोक होते त्यामुळे फारसं दडपण नव्हतं, अगदी सगळेच हसतमुख होते आणि घरच्या सारखं वावरत होते”
“अरे, म्हणजे काय.. मित्र आहेच माझा तसा” – सुरेशराव.
“बरं मानसी, काय म्हणतेस मग समीर विषयी?” आई ने पुन्हा एकदा विचारलं.
“आई, असं कसं सांगता येईल लगेच, मला वाटतं नीट चर्चा झाल्याशिवाय काही नाही सांगता येणार मला” – मानसी
“अग.. मग आता चर्चाच करतोय ना आपण” – सुरेशराव.
“बाबा, तुमच्याशी नाही ओ.. समीर सोबत”
“अच्छा, असं म्हणतेस होय, मग सांगू का श्रीकांतला तसं.. पुन्हा एकदा भेटूया म्हणून” – सुरेशराव.
“बाबा, इतकी काय घाई करताय. आधी त्यांचा काही निरोप येतो का बघू तरी. त्यांनाच पसंत नसेल तर आपण कशाला लगेच पुढच्या भेटीचं बोलायचं?” मानसीने तिचा विचार मांडला.
“बरोबर आहे मानसीचे, समीरचा काय निर्णय आहे ते पण कळू दे आधी. त्यांचा काही निरोप, मेसेज येतो का बघू.. नाहीतर तुम्हाला श्रीकांतराव सांगतीलच ना जे काही असेल ते” – सविताताई.
“बरं, बघू मग काय होतंय” – सुरेशराव.
“आई, बाबा.. चला मी जरा पाय मोकळे करून येते” असं म्हणत मानसी बाहेर पडली.
*इकडे पटवर्धनांच्या घरी..*
“दादा, WhatsApp ला आहे का रे मानसी?” गौरी आपल्या नेहमीच्या शैलीत समीरची थट्टा करण्याच्या मूडमध्ये
“असेल ना, आजकाल FB, WhatsApp, Insta हे असतच सर्वांकडे, त्यामुळे WhatsApp ला तर असेलच ती” – समीर.
“अच्छा, म्हणजे अजून नंबर save करून बघितला नाही वाटतं”
“गौरे, खूप आगावपणा करतेस ह तू” – समीर थोडे डोळे मोठे करून
“आई तू सांग हिला जरा नीट, तिथे त्यांच्या घरी पण असच काहीतरी बडबडत होती उगाच”
यावर समीरची बाजू घेत आई गौरीला म्हणाली,
“गौरी, प्रत्येकवेळी थट्टा मस्करी बरी नाही बाळ.. आपलं ठीक आहे पण त्या लोकांना काय वाटलं असेल”
“काही नाही वाटत सुरेशला.. आणि वहिनींना, मानसीला पण काही वावगं वाटलं असेल असं मला वाटत नाही, चांगली आणि मोकळ्या मनाची आहेत माणसं” – श्रीकांतराव. हे ऐकून गौरी ने बाबांना एक टाळी देत जणू आभार मानले तिची बाजू घेतल्याबद्दल. हे पाहून समीर मात्र अजूनच नाराज झाला,
“बाबा, तुम्हीच तिला दरवेळी पाठीशी घालताय.. म्हणून ती अजुनच जास्त मस्ती करतेय.”
“असू दे रे, लहान आहे ती. बरं.. ते जाऊ दे, तू सांग मला.. कशी वाटली मानसी?” – श्रीकांतराव.
“काकूबाई..!!
सॉरी.. म्हणजे या नोकरी करणाऱ्या मुली इतरवेळी वेगळ्या कपड्यात असतात आणि जेव्हा उगाच साडी नेसून येतात ना मग त्या काकूबाई च वाटतात”
त्याचं बोलणं ऐकून अलकाताई त्याला म्हणाल्या,
“समीर, हे बरोबर नाही. अरे, ही तिची एक तर पहिलीच वेळ होती अशा कार्यक्रमाची.. शिवाय ती छान दिसत होती, कुठेच नाव ठेवायला जागा नाही तिला, त्यामुळे तू असं काहीतरी बोलू नको उगाच”
“बरोब्बर..!! किती छान दिसते ती, मी फोटो पाहिले ना तिचे रूम मध्ये लावलेले.. मोबाईल चार्जिंग साठी आत गेलो होतो ना तेव्हा” गौरीने नाक खुपसलं.
“snapchat वर काढले असतील ” – समीर.
“तुझं काय म्हणणं आहे ते तरी सांग नीट” शेवटी बाबांनी त्याला विचारलं..
“मी खरं तर नीट पाहिलं नाही तिला आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे नीट बोलायला हवे तिच्याशी तरच कळतील तिचे विचार, तिची मतं.. त्यामुळे असं एका भेटीत लगेच निर्णय घेणं जमणार नाही मला” – समीर असं बोलताच आई आणि बाबा एक मेकाकडे बघत राहिले. त्यांना काय बोलावं यावर ते कळत नव्हतं. गौरीच्या लक्षात आलं आणि म्हणून ती म्हणाली,
“आपण एक काम करू, आता त्या लोकांना आपल्या घरी बोलवू एकदा पाहुणचारा साठी.. कशी वाटली आयडिया..“
बाबांनी तिला टाळी दिली आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.. गौरीने त्यांचा प्रश्न सोडवला होता. ते पाहून आई समीरला म्हणाली,
“चालेल ना समीर?”
“ठीक आहे.. बघूया. पण आता लगेच पुढच्याच रविवारी बोलवू नका, आधीच माझा हा रविवार गेला.. सगळे प्लॅन कॅन्सल झालेत” – समीर.
“बरं, ठीक आहे. काही दिवस जावू देत मग बोलतो मी सुरेश सोबत” – श्रीकांतराव.
*काही दिवस उलटले..*
एके दिवशी दुपारी ऑफिस मध्ये असताना समीरने ते visiting card हातात घेतलं, काहीवेळ त्याकडं पाहत राहिला आणि मग तो नंबर डायल केला..
“हॅलो”
“हॅलो… कोण बोलतंय?”
“मानसी देशमुख ना?”
“हो मानसी देशमुख बोलतीय.. आपण?”
“मी समीर”
“कोण समीर..?”
*क्रमशः*
*- मिथून संकपाळ.*
======================
यंदा कर्तव्य आहे – भाग २
https://www.ritbhatmarathi.com/yanda-kartavya-ahe-part2/
यंदा कर्तव्य आहे – भाग ४
https://www.ritbhatmarathi.com/yanda-kartavya-ahe-part-4/
======================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============