
आज एक वर्ष झालं तसं घरून काम चालू होतं मनूचं. गेल्यावर्षी मार्चमध्ये जशी सरकारने लॉकडाऊन होणार असल्याची अनाउन्स्मेन्ट केली तसे मनू आणि मानस आपलं सामान बांधुन पुण्यातून गावी निघून गेले. मनूचं सासर आणि माहेर जवळ जवळच होतं. पण गावी गेल्या गेल्या लगेच माहेरी जाणं शक्य नाही म्हणून मनूने काही महिने सासरीच थांबायचं ठरवलं.
लॉकडाऊन असल्याने सासरी धुणी भांडी करायला येणारी बाईदेखील बंद झाली होती. मनूच्या लग्नाला झालेच किती वर्ष होते. लग्नाला २ वर्षे झाली होती पण लग्नानंतर एकदा आणि कधीमधी असे फारच कमी प्रसंग आले होते जेव्हा मनू सासरी आली असेन. नोकरीच्या निमित्ताने मानस आणि मनू दोघे पुण्यातच सेटल झाले होते. लॉकडाऊन झाल्यावर सुरुवातीला तर खूप छान वाटलं आणि त्याही पेक्षा आनंद झाला जेव्हा “वर्क फ्रॉम होम” चा कन्सेप्ट सगळीकडेच रुजू झाला होता. मनूच्या सासरीदेखील मानसचे आई बाबा खुश होते कि पोरं खूप दिवसांनी आपल्याकडे आली आणि आता आपल्या सोबतच राहणार.
पण नव्याचे नऊ दिवस असतात ना तसंच काही मनूसोबत झालं होतं. सुरुवातीला मस्त वाटत होतं सगळं आणि सासूबाईंनीही सुनेसोबत एवढ्या दिवसांचा सहवास पहिल्यांदाच अनुभवला होता. त्यामुळे सासूबाईंनीही समजून घेतलं होतं कि पोरं ऑफिस च्या कामात बिझी असतात. त्यामुळे सुरुवातीला त्या दोघांनाही सगळं पुरवायच्या. खायची प्यायची छान चंगळ होती आधी. पण जसजसे दिवस उलटायला लागले तश्या त्या चिडचिड्या होऊ लागल्या. त्यांना आता मनू दिवसभर लॅपटॉप समोर घेऊन बसलेली पटायचं नाही. त्यामुळे मनू आणि सासूबाईंमध्ये खटके उडायला लागले होते. पण मनू समजूतदार होती आणि तिने लागलीच सासूबाईंना समजून घेऊन तीही आता त्यांना कामात मदत करायला लागली होती. तिच्या मदतीमुळे सासूबाईंनाही हातभार लागला होता आणि घरातलंही वातावरण निवळलं होतं. हि तर झाली मनुची कथा.
कथा फार सिम्पल आणि साधी वाटते पण वर्षभरात मनूने किंवा नोकरी करणाऱ्या अशा कित्येक माझ्या भगिनींनी ज्या गोष्टी फेस केल्या आहेत त्या ह्या कथेतून व्यक्त करायचा प्रयत्न आहे.
आपण किती सहज बोलून जातो ना की ,”तू काय बाई जॉब करतेस त्यामुळे तू स्वयंपाकाला मेड आणि घरात इतर कामासाठी बाई अफोर्ड करू शकतेस”
किंवा आपण सहज कमावत्या स्त्रीचं उदाहरण कुनासमोरही ठेवतो आणि मोठ्या ताट मानेने सांगतो कि ,” ती बघ कशी आपल्या पायावर उभी आहे आणि स्वाभिमानी आहे .”
लांबून सगळं छानच वाटतं सगळं…परंतु कितीही झालं तरी नोकरी करणारी स्त्रीदेखील एक मुलगी, सून, पत्नी आणि आई असते. त्यामुळे तिने कितीजरी बाया ठेवल्या तरी घरात कामं करणाऱ्या बाया तिची जागा नाही घेऊ शकत. तीदेखील सकाळी लवकरच उठते. सकाळी सकाळी आल्याचा तो चहा तिलादेखील आवडतो. मुलांची शाळा जरी कोरोना मुळे घरूनच होत असतील तरी वेळेवर मुलांना तयार करून त्यांना लॅपटॉप समोर बसवायचीही जबाबदारी तीच घेते. ऑफिसमधलं काम जरी घरूनच करावं लागत असलं तरी तिथे देखील तिला तिची जबाबदारी चोख पार पाडायची असते.
घरी स्वयंपाकाला बाई जरी लावली तरी ती सगळं तिच्यावर सोपवून टाकत नाही कारण काही झालं तरी पतीच्या आणि मुलाबाळांच्या आरोग्याशी खेळ खेळून चालत नाही. स्वयंपाकीण बाई सोबत पूर्णवेळ उभी राहून भाजीत तेल, मीठ किती टाकायचं हेही तीच सांगते आणि तिथेही ती तिची जबाबदारी चोखच पार पाडते.
लॉकडाऊन मध्ये तर तिचे फार हाल झालेत. कुठलीही बाई नाही म्हटल्यावर तिची जबाबदारी अजूनच वाढली. पण तिला हार मानून चालणार नव्हतं. घरात पत्नी, आई सोबतच तिला तिचा ऑफिसमधला रोलही चोख पार पडायचा होता. तिला सगळीकडे कसं परफेक्ट पाहिजे होतं.
सकाळी सकाळी चालू होणारा तो तिचा दिवस कधी कधी ऑफिसच्या कामामुळे रात्री १-२ वाजता देखील संपतो. आणि कुणी सांगितलं कि नोकरी करणाऱ्या स्त्रीचं राहणीमान “हाय फाय” असतं म्हणून. सकाळी सकाळी उठल्यावर तिला सगळ्यांना चहा पाणी देऊन आणि दुपारचं जेवण बनवून ऑफिसच्या लॅपटॉप वर वेळेवर लॉगिन करायचं असतं. त्यासाठी किती ताणाताण होते तिची. एवढं सगळं करून कधी ऑफिसमधल्या मिटींग्स, ते कॉल्स किंवा मुलांचे शाळेतले लॉगिन इशू ह्या मध्ये बनवलेलं जेवणदेखील निवांतपणे तिला खाता येत नाही. कसेतरी केस वर बांधून जो ती आपला दिवस चालू करते तो दिवस संपेपर्यंत ना तिला स्वतःचे विस्कटलेले केस विंचरायची सवड मिळते ना कधी स्वतःला आरशात पाहायला तिच्याकडे वेळ आहे. आलेला दिवस कसा संपतो हेच कळत नाही आणि रात्री झोपतानाही ती शांत नसते ….झोपतानाच दुसऱ्या दिवशीचं नियोजन तिला करावं लागत. कारण तिच्याकडे असलेल्या वेळेअभावी दुसऱ्यादिवशी आयत्यावेळेस काय बनवायचं हा प्रश्न तिला पडून चालणार नसतो.
मनात सतत टेन्शन आणि कसलेतरी विचार असतात….कधी घरात नवऱ्यासोबत खटके तर कधी ऑफिसमध्ये बॉसचे टोमणे…पण तरीही ह्या सगळ्यांना सामोरे जाऊन तिचं आयुष्य ती सुंदर बनवते. सोमवार ते शुक्रवार भलेही तिला सर्वांच्या आवडी निवडी जपत्या नाही आल्या तरी वीकेंडला ती नक्कीच काहीतरी स्पेशल करायचा प्रयत्न करते. सणावाराला पुरणपोळीचा बेत जरी तिच्याच्याने नाही शक्य झाला तरी आपली संस्कृती जोपासायची ती पुरेपूर प्रयत्न करते.
थोडक्यात सांगायला गेलं तर नोकरी करणारी स्त्रीच्या खूप साऱ्या व्यथा असतील पण ती घरात पत्नी, आई, मुलगी आणि सून निभावून ऑफिसमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर चा रोल चोखपणे पार पाडते आणि नोकरी करून घरची जबाबदारी घेऊन सोबतच दोन्हीकडचे टेन्शन स्वतःच्या मनातच कॅरी करून ती आपलं आयुष्य सुंदर बनवते.
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा