जागतिक महिला दिनानिमित्त अलक

womens day quotes in marathi
१.रोज ओटीमधे बाळांना जन्म देतेसमयी बायांना मरणाच्या दाढेतून परत येताना पहाणारे,बाळ जन्माला आलं कि त्या प्रसववेदना विसरुन बाळाला कुशीत घेण्यासाठी आसुसलेले माऊलींचे डोळे पहाणारे डॉ. अनामिक महिला दिनाच्या शुभेच्छा वाचून मनात म्हणाले,”या माऊलींचे स्मरण तर दर क्षणाला झाले पाहिजे.”
२.तिच्या लेकीवर एकतर्फी प्रेमातून एसिड हल्ला झाला होता,प्राजक्तासारखा नाजूक चेहरा..जळून विद्रुप दिसत होता ..आणि कॉलेजात शिकणाऱ्या काही मुलांनी त्या इस्पितळाला भेट दिली. महिलादिनानिमित्त ते फुलं वाटत होते..त्या माऊलीच्या जवळचं फुल मात्र कुणा नराधमाने उमलायच्या आधीच करपवलं होतं.
३. आई,मला आज उशीर होईल गं फोनवर सांगणारी ती परत आलीच नव्हती. काही वासनांध नरपशूंच्या वासनेची शिकार बनली होती..कोणाताही पुरावा मिळू नये म्हणून तिच्या म्रुतदेहाचे बारीक तुकडे करुन पोत्यात भरुन निर्जन ठिकाणी ठेवलेले..पोलिसांना नेमका महिलादिनी तिच्या लेकीच्या शवाचा ट्रेस लावला होता.
४. काल रात्री बारानंतर त्याने महिला दिनानिमित्त भली मोठी पोस्ट टंकली. पहाटे उठून त्यावर पडलेले लाइक्स,कमेंट्स पाहून तो मनापासून खूष झाला. बायकोला उठ गं डबा कर म्हणाला असता बायको म्हणाली,”कंबर खूपच दुखतेय हो. पाळी जवळ आली वाटतं.” “तुझी नेहमीचीच रड. घरात बसून तर असतेस. मी गेल्यावर काम काय असतं तुला? चार चपात्या करायलाही जीवावर येतं! चल उठ चल लवकर चहा कर,डबा कर..आज लवकर जायचंय. महिलादिनाची तयारी करायचीय.” तो डाफरला. ठुसठुसत्या कंबरेवर बोटांनी दाब देत ती नित्यकार्यांना सज्ज झाली.
५. तिची सुकन्या आजकाल मित्रमंडळींत आधुनिकतेच्या,बरोबरीच्या नावाखाली सिगारेट फुंकायची, मद्य प्यायची. ती बोलू गेली तर “मम्मा,आता स्त्रीपुरुष दोघं समान आहेत. असं कोणतंच काम नाही जे बाई करु शकत नाही. तुमचा जमाना गेला. असं काहीबाही बरळायची..आणि आज महिला दिन म्हणून सुकन्येने तिच्याकडून टोपपदराचं लुगडं नेसवून घेतलं. दोन भुवयांमधे किंचीत वर ठसठशीत चंद्रकोर लावली. कुठल्याशा नाटकात जीजाऊची भूमिका करणार होती म्हणे तिची सुकन्या.सुकन्येची माय विषण्ण हसली.
६. महिला दिनानिमित्त ऑफिसातल्या साऱ्या मैत्रिणींसोबत पार्टी करणारी ती घरी आल्यावर सासूशी दोन आपुलकीचे शब्द बोलण्या महाग झाली.
७. आज लेकीसोबत महिलादिन मनवणारी ती.. कधीकाळी पहिल्या मुलीनंतर दुसरा मुलगाच हवा म्हणून उदरात रुजलेला स्त्रीगर्भ तिने व तिच्या कुटुंबियांनी काही पैसे देऊन काढून टाकवला होता आणि नंतर मुलगा झाला म्हणून ‘हम दो,हमारे दो’ चं बिरुज मिरवत होती.
९. आयाबहिणींशिवाय शिव्याच नाहीत म्हणून दररोज शिव्या घालताना आयाबहिणींचा mc,bc या संक्षिप्त स्वरुपात उद्धार करणाऱ्या त्या चमुतला प्रत्येकजण महिला दिनानिमित्त फक्कड कविता करण्यासाठी रमाई,सावित्रीबाई, लक्ष्मीबाई,..यांच्या चरित्रातल्या दोनचार ओळी कवितेत,स्टेटसला घुसडता येतील का यावर डोसकं खाजवत होता/होती.
१०. फेसबुकावर महिलादिनाच्या पोस्टी पहाणारी ती आपला भाऊ कधीही फोन केला..अडचण सांगितली कि हाकेला धावून येतो,आपला नवरा आपल्यासोबत रोजच घरकाम करतो. सिंकमधे भांडी दिसलीच तर घासून,धुवून ठेवतो. बाजारातनं भाजी आणतो,आमटीला फोडणी देतो, भाजीही छान करतो या विचारात म्हणाली,”अय्या याचं काय ते अप्रूप! मी खरंच नशीबवान. माझा तर रोजचाच महिला दिन!”
——-सौ.गीता गजानन गरुड.(रिपोस्ट)
फोटो––फेसबुक साभार
====================