Skip to content Skip to sidebar Skip to footer

होशील का गं माझी आई!

©गीता गजानन गरुड

मंजुश्री इमारतीच्या तळमजल्यावरल्या आर्ट स्टुडिओत बरीच वर्दळ चालू होती. चित्रकार आनंदच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. चित्रकार आनंदच्या बोटांत जादू होती. एखाद्या व्यक्तीचं चित्र त्याच्या मनातल्या भावभावनांसह प्रकट करायचं सामर्थ्य होतं त्याच्या बोटांत. दैवी देणगीच जणू.

बरेच परदेशी पर्यटकही प्रदर्शन पहायला आले होते. त्यांचे प्रश्न विचारत होते व आनंद अतिशय सोप्प्या रितीने त्यांना ती चित्रं वाचून दाखवत होता. इतक्यात त्याचं लक्ष एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या स्त्रीकडे गेलं.

हो त्यानं ओळखलं तिला. तीच ती ,कधी काळची त्याची प्रेयसी.. मधुमालती. प्रेमानं तो तिला मधु म्हणायचा..गव्हाळ रंगाची,घाऱ्या डोळ्यांची,दाट केसांची त्याची मधु.

तो तिला सामोरा गेला.तिनेही त्याला पाहिलं,तिने मान खाली घातली,त्याने हसतहसत तिला विचारलं,
“ओळखलंस?”

“हो,” ती म्हणाली.

“कोण?”

“तोच,ज्याला मी लग्नासाठी नकार दिला होता…..
…..आणि मग पश्चात्ताप होऊन गेली तीस वर्षे रडतेय.”

तो म्हणाला,”हे माझं विजिटिंग कार्ड.उद्या सकाळी नऊ वाजता घरी ये भेटायला.”

“तुझी बायको?”तो विषिण्ण हसला.

“मी एकटाच रहातो.”तो म्हणाला.

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेप्रमाणे सकाळी ती आनंदच्या घरी गेली. विविध पेंटींग्सने दिवाणखान्याच्या भिंती सजल्या होत्या.

“येना,बैस”,तो म्हणाला.

ती थोडीशी कानकोंडीशी..अंग चोरुन बसली.

त्याने तिच्या आवडीची नेसकॉफी आणून दिली,जायफळ घातलेली.

ती मनातच म्हणाली,अजून याने माझी आवड लक्षात ठेवलेय तर.

तो हसला..त्याने ओळखलं मनातलं तिच्या.

दुध गरम करायचं. एका कपात चमचाभर कॉफी पावडर घालायची. दूध उकळत असताना त्यात माफक प्रमाणात साखर,जरासं जायफळ किसून टाकायचं अन् मग ते दूध कपात वरतून ओतायचं..झाली वाफाळलेली कॉफी तयार..मधुनेच तर शिकवलेली त्याला.

कॉफीचे दोन घोट घेतल्यावर ती जरा सैलसर झाली.
म्हणाली,”मी घरीच बालवाडी चालवते. त्या उत्पन्नात भागतं माझं. मला आगापिछा कोणी नाही. आपणच करायचं नी आपणचं खायचं. आत्ता त्याचा चेहरा प्रश्नार्थक झाला.” म्हणजे,तू लग्न नाही केलंस?”आनंदने विचारलं.

मधुमालती नुसतीच हसली.
ती म्हणाली,”आठवतंय आनंद तुला. तू आमच्या घरी भाडोत्री म्हणून रहायला आलेला तो पहिला दिवस.
मला व माझ्या लहान बहिणीला,माधुरीला मुळी भाडोत्री नकोच होता कारण आमच्यातल्या एकीला आपली खोली द्यावी लागणार होती. केवढी हमरीतुमरी झालेली आमची.

शेवटी नेहमीप्रमाणे माधुरी जिंकली व मी आत आजीच्या खोलीत माझं अंथरुण हलवलं. तुझा तो पांढराशुभ्र सदरा,पट्ट्यांचा लेंगा..तो ड्रॉईंग बोर्ड,ते विविध नंबरचे कुंचले,रंगपेट्या..सगळ्या वस्तू माझ्या खोलीत विखुरलेल्या असायच्या व एकदा तंद्री लागली की तुला दिवसरात्रीचं भान रहात नसे. झरझर चित्र उमटायचं तुझ्या कुंचल्यांतून. मी जेवणाचं ताट द्यायला म्हणून यायचे.. अन् काय तिथेच,त्या बोलक्या चित्रांत हरवून जायचे.
माझी चित्रांविषयीची आत्मियता पाहून तुही खूश व्हायचास. तुझ्या चित्रांमुळे आपली मैत्री होत गेली.

अधनामधना असे वाफाळलेल्या कॉफीचे दोन मग आणून मी तासनतास तुझी चित्रकला पहात बसायचे.

प्रत्येक चित्राची वेगळी कहाणी. मी जेवढी जाणून घ्यायला उत्सुक तितकाच तू ती कथन करायला आतुर असायचास.

प्रत्येक चित्रांची कहाणी सांगतानाचा तुझा तो आवेश विस्मयकारक असायचा.

माझी बहीण,माधुरी हिंदी सिनेमे पहाण्यात मग्न असायची. तिला चित्रकलेची आवड नव्हती व माझा भाऊ हेमंत,सदानकदा अभ्यासात गुंतलेलात्यामुळे तो तर माडीवरच असायचा अभ्यास करत.

आई जास्त तर दम्याने आजारी..ती झोपलेली असायची आणि आमचे भाऊ(वडील) तेंव्हा बदलीच्या गावी राहायचे. ते महिन्यातून एक दोनदा यायचे त्यामुळे आपल्या मैत्रीला अडवणारं असं कुणीच नव्हतं.

नदीच्या संथ प्रवाहासारखी वहात होती आपली मैत्री. एकदा तुला घरंदाज स्त्रीचं पोट्रेट काढायचं होतं. त्याकरता तू मला आग्रह केलास . मग काय आधी आढेवेढे घेतले पण मलाही उत्सुकता होतीच. आईच्या कपाटातून आईचं धारीकाठाचं लुगडं काढलं.

तू सांगितलंस त्याप्रमाणे छान खोपा घातला. डोळ्यांत काजळ,ओठांना लाली असा हलकासा मेकअप केला,लुगडं नेसले .आईचे दागिने घातले. मलाच थोडं अवघडल्यासारं होत होतं.

तो पातळाचा बोंगा घेऊन तुझ्या खोलीत आले. माधुरी क्लासला व हेमंत शाळेत,आई खाटीवर.

तू मला खुर्चीवर बसवलंस. जरासं निरीक्षण केलंस.

मग कुंचल्यात लाल रंग घेऊन माझ्या कपाळावर चंद्रकोर रेखाटलीस.

माझे ऊर धपापत होते.

तुझा उष्ण श्वास जाणवत होता व हवाहवासा वाटत होता. तू फार संयमी होतास.

तु माझ्या खांद्यावर पदर ओढलास,माझी मान तुला हवी त्या दिशेत केलीस.

मला न हलण्याची तंबी दिलीस व शांतपणे आपल्या कार्याला लागलास. कितीतरी तास तू चित्रकलेची आराधना करीत होतास..

तुझं ते पोट्रेट पूर्ण होईपर्यंत दर दुपारी मी ते लुगडं नेसून तुझ्या खोलीत यायचे.

तू तुला हवी तशी चंद्रकोर माझ्या भाळावर रेखायचास.

पुन्हा ते माझ्या उरांचं धपापणं,तुझे उष्ण श्वास..पण तू तुझं काम भान हरपून करत होतास . ते चित्र एकदाचं तयार झालं..त्या चित्रात तू मला अतिशय जीवंत साकारलं होतंस.

क्षणभर तुला नमस्कार करावासा वाटला म्हणून वाकले तर तू मला तुझ्या दोन्ही हातांनी अलगद उभं केलंस.

हळूहळू आपण दोघं प्रेमपाखरं झालो.

एक कला साकारणारा व एक कलेची आवड असणारी. किती सुंदर मिलाफ विधात्याने घडवून आणला होता..पण एका दुपारी भाऊ अचानक आले. त्यांनी मला तुझ्या खोलीत पाहिलं.

भाऊ तुला काहीच बोलले नाहीत.

रात्री त्यांनी मला बोलावून घेतलं. भाऊंनी मला स्पष्टच तुझ्याबद्दल विचारलं. मी खरं बोलले.

लपवण्यात काहीच अर्थ नव्हता. इथूनतिथून कळण्यापेक्षा मी आपल्या प्रेमाची कबुली दिली..भाऊंना दरदरुन घाम सुटला.

मी त्यांना सावरायला गेले तर माझा हात झिडकारला त्यांनी.

खरंतर मी भाऊंच्या पहिल्या बायकोची मुलगी..मी जन्मले तेंव्हाच आईला पोरकी झाले होते.

माझ्यामुळे त्यांची पत्नी गेली हा राग त्यांच्या मनात होताच. त्यामुळे कधी वडिलांच्या मायेने त्यांनी मला जवळ घेतलेलं आठवत नाही.

सात वर्ष मला आजीने सांभाळलं मग एके दिवशी भाऊ ही नवी आई घेऊन आले..सावत्र खरी..पण कधी सावत्रपणा दाखवलाच नाही तिने.

भाऊंनी मला जेवढं दूर लोटलं तेवढंच तिनं मला आपलं मानलं.माझ्या वेण्या घालणं,माझ्यासोबत भातुकली खेळणं,मला चिऊकाऊचा घास भरवणं सारं करायची ती.पुढे मधु आणि हेमंत जन्मली तरी तिने माझ्यावरची माया तसुभरही कमी केली नव्हती. तिच्या बाळंतपणातही ती मला तिच्या माहेरी घेऊन गेली होती.

तिच्या आईबाबांनीही मला नातीची माया दिली..पण आत्ता माझी प्रेमळ आई माझी बाजू घेऊ शकत नव्हती. ती बिचारी अंथरुणाला चिकटली होती.

भाऊंनी त्या अवस्थेत माझ्याकडून वचन मागितलं की मी परत तुझ्याशी संपर्क ठेवणार नाही व नाईलाजाने मला त्यांना ते वचन द्यावं लागलं. भाऊंना हॉस्पिटलमध्ये नेलं पण ते नाही वाचले.

‘थोरली’ म्हणून घराची जवाबदारी नकळत माझ्यावर आली. आनंद, तू सर्व पहात होतास. मदतही करत होतास पण..पण मीच तुला टाळत होते.

शेवटी पंधरा दिवसांनी एका दुपारी मी अंगणात बसले असताना तू तिथे आलास अचानक..जवळच बसलास निरागस मुलासारखा..पण माझंच मन खट्याळ.

मला तुझ्या उष्ण श्वासांची चाहूल लागली.

तू मला लग्नाचं विचारलंस. तुला मला साताजन्माची सोबतीण करायचं होतं..पण मला ते या जन्मीसुद्धा शक्य नव्हतं. मी वचन देऊन बसले होते..भाऊंना. अखेर छातीवर दगड ठेवून मी तुला नाही म्हंटलं.

तू कारण विचारलंस..तरी मी तुला कारण न सांगता नकार देत राहिले. तू दुसरीकडे जागा बघ,आम्हांला जागा कमी पडतेय असंही सांगितलं तुला. किती वेदना होत होत्या मला ते शब्द उच्चारताना!

त्या रात्रीच तू तुझं सामान घेऊन निघून गेलास..त्या रात्री मी धो धो रडले.

अशा कितीतरी रात्री जागवल्या मग तुझ्या आठवणींत,उशांचे अभ्रे भिजवत.हळूहळू सावरले. मनातलं दु:ख गच्च बांधून ठेवलं. आईचं सगळं पथ्यपाणी करत होते.

मी मग अंगणवाडी सेविकेचा कोर्स केला व घरीच बालवाडी सुरु केली. अर्थार्जन निकडीचं होतं.

माधुरीने नर्सिंगला प्रवेश घेतलेला. तिची फी,तिच्या हॉस्टेलचा खर्च,पुढे हेमंतचे दहावी,बारावीचे क्लासेस,त्याची मेडीकलची फी. 

भाऊंची पेंशन व माझी मिळकत,वाडीतलं उत्पन्न..जमेल तशी ठिगळं जोडून भाऊंचा संसार सांभाळत होते. माझी अंगणवाडीही जोमात चालू होती.

भाऊंच्या ओळखीचा फायदा होत होता. मुलांची संख्या वाढत होती. हाताशी दोन मुली ठेवल्या होत्या.

मग माधुरीचं लग्न करुन दिलं..तिच्या लग्नात पत्रिका वाटण्यापासून पाचपरतावनापर्यंत सारं काही एकटीने पार पाडलं..

आईची स्मरणशक्ती कमी झाली होती. मोजक्या लोकांनाच ओळखायची. माधुरीचं डोहाळजेवण,बाळंतपण सारं काही हौसेने केलं मी.

हेमंतने एमडी केलं.तो सर्जन झाला.. त्याचं लग्न. यावेळी मात्र पैशाची चिंता नव्हती. ती व्यवस्था हेमंतने पाहिली. हेमंतची बायको स्त्रीरोगतज्ज्ञ.. दोघंही आपापल्या व्यवसायात व्यग्र.

पुन्हा घर सांभाळणं माझ्या गळ्यात आलं..हेमंतची दोन जुळी मुलं..त्यांचं सारं करीत राहिले. या एवढ्या प्रवासात माधुरी किंवा हेमंतने एकदाही चुकून विचारलं नव्हतं की ताई तुझ्या लग्नाचं काय.

आईच्या डोळ्यांत मात्र माझ्याविषयीची काळजी,हुरहुर जाणवायची. तिच्या डोळ्यांतून सतत पाणी झरायचं. एक वर्षाआधी तीही मला सोडून गेली.

हेमंतची मुलं मोठी झाली तशी माझी त्या कुटुंबातली गरज संपली. हेमंतने आत्ता शहरात ड्युप्लेक्स बंगला बांधलाय.

गेले होते मी ग्रुहप्रवेशाच्या वेळी पण तिथे त्याच्या सासरच्या मंडळींचा दबदबा जाणवला. हेमंतला सासऱ्याने हॉस्पिटल व घर बांधण्यास आर्थिक पाठबळ दिल्याकारणाने तो सासरवाडीचा मिंधा झाला आहे, हे मला प्रकर्षाने जाणवलं तिथे.

बायका मला बारसं,लग्न,बोरन्हाण,ओटीभरणं,मुंज अशा कार्यांना बोलावणं टाळतात.

माधुरीला एक मुलगी आहे. ती कधीतरी येऊ पहाते माझ्याकडे पण माधुरी पाठवत नाही. सर्वांनी मला हवं तसं गरजेनुसार वापरुन घेतलं. गरज सरो वैद्य मरो म्हणतात नं ते अगदी खरंय बघ.

आताशा मला तो वाडा खाली करायला सांगत आहेत. ती जागा त्यांना बिल्डरला विकायची आहे. मी भाऊंच वचन पाळण्यासाठी तुला दिलेला तो नकार..त्याने माझी सगळी स्वप्नं धुळीला मिळाली आनंद.

आताशा मी बालवाडी बंद केली आहे.

उद्या दसऱ्याला पन्नाशीची होईन. माझे वाढदिवस यांच्या खिजगणतीतही नसतात. असो,मी माझंच पुराण बोलत बसले. तुझ्याबद्ल सांग ना.”

“हो सांगतो”,आनंद म्हणाला.” तुमच्या घरुन गेल्यावर मी तुला बरीच पत्रही लिहिली पण तू एकाचंही उत्तर दिलं नाहीस.

माझी चित्रकला जवळजवळ संपत आली होती. काही सुचत नव्हतं .पण पोटासाठी कायतरी करणं आवश्यक होतं.

इथे रत्नागिरीत एक खोली भाड्याने घेऊन रहात होतो.. असंच एकदा फिरताफिरता माझी वर्गमैत्रीण रिना भेटली.

तीही तुझ्यासारखीच प्रेमळ. तिने सावरलं मला यातून. पुन्हा कुंचला हाती घ्यायची उभारी दिली.

रिना अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली होती अगदी माझ्यासारखीच.

थोड्याच दिवसांत आम्ही वैदिक पद्धतीनं लग्न केलं. रिना माझ्या कलेला उत्तेजन देत होती.

आर्थिक कमाईही बऱ्यापैकी होत होती. त्यातूनच मग नवीन बंगला बांधायला घेतला.

केवढी खूश होती रिना. आम्हांला गोंडस मुलगी झाली. सारा नाव तीचं,पण नियतीला हे सुखही माझ्याकडून ओरबाडून घ्यायचं होतं .

रिनाला स्तनाचा कर्करोग झाला. तेंव्हा सारा दहावीत होती. तरी पोर धीराची. सगळं करुन शाळेत जायची. आईची हेळसांड होऊ नये म्हणून तिने क्लासही लावला नाही.

रिनाला किमोथेरपी दिली जात होती. हळूहळू सगळे केस झडून गेले. लहान बाळासारखी दिसत होती. डॉकटरांनी घरी पाठवलं..सारा शेवटचा पेपर देऊन आली..त्या रात्रीच रिना आम्हाला सोडून गेली.

मी व रिना दोघेही अनाथ,त्यामुळे नातेवाईक नव्हतेच.

साराच माझी आई बनली.

तिने फार सांभाळलं मला. या दु:खातून बाहेर काढलं. बारावीला चांगले गुण मिळवले. पुढेही शिकत राहिली. आत्ता प्राध्यापिका आहे इंग्लिशची. तिच्या सहशिक्षकाबरोबरच सूत जमलं तिचं. तुला माहितीच आहे मी फक्त माणुसकी ही एकच जात मानतो. नशिबाने जावईही तसाच मिळाला. काल रात्री मी व्हिडीओ कॉल केलेला साराला व विनितला. तुझ्याबद्दल तिला तिच्या आईने आधीच सारं सांगितलं होतं.

तू माझ्या चित्रांचं प्रदर्शन पहायला शहरात आली आहेस व उद्या घरी येणार म्हणून सांगितलंय तिला.

ती दोघंही येतील दुपारपर्यंत.”

मधुमालती म्हणाली,”बरं तर निघते मी आत्ता आनंद.तब्येतीची काळजी घे.”

आनंद म्हणाला,”साराने तुला थांबून ठेवायला सांगितलंय.तिच्यासाठी तरी थांब.तिला आवडते तशी छोलेपुरी व गुलाबजाम करायचा बेत आहे.सगळं साहित्य आणलंय.बाई येईलच इतक्यात.”

थोड्याच वेळात बाई आली. मधुमालतीने बाईला हाताशी धरुन सगळा स्वैंपाक आईच्या मायेने केला. कितीतरी दिवसांनी आज आनंदच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

थोड्याच वेळात सारा आली. मधुमालतीला पाहून साराने तिला मिठीच मारली. बऱ्याच दिवसांनी सारा आईच्या मायेचं जेवण जेवली. जावईबापूही खूश होते.

शेवटी साराने मधुमालतीला विचारलंच,” होशील का गं माझी आई?” व तिच्या गळ्यात पडून रडू लागली.

मधुमालतीच्या एका निर्णयाने वादळात भरकटलेली तीन जहाजं सावरणार होती.

मधुने देव्हाऱ्यातल्या देवीकडे पाहिलं.

आई तुळजाभवानीही तिला या लेकराची माय बन,आनंदची पत्नी हो व या घराला सुखी कर म्हणून सांगत होती.

मधुमालतीने साराच्या म्हणण्याला होकार दिला.

आनंदचं घर आनंदाने हसू लागलं.जावईबापू आईसक्रिम घेऊन आले. सकाळ उजाडली ती सोनपावलांनीच.

आनंद व जावईबापू बागेतली झेंडूची फुलं काढून मोठमोठे हार बनवत होते.

सारा नवीन आईला घरकामात मदत करत होती.

सर्वांनी मधुमालतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. साराने आईचं औक्षण केलं.

तिला जिलेबी भरवली.

जावईबापूंचा पहिला दसरा थाटात साजरा होणार म्हणून जावईबापूही खूश होते.

साराने पाटीवर सरस्वतीचं चिन्ह रेखाटलं.बाजूला पुस्तकं व अस्त्र ठेवली.सरस्वती पूजन केलं.श्रीखंडपुरी,मसालेभात,मठ्ठा..जेवण झक्कास झालं होतं.

भिंतीवरच्या फोटोतून रिना हे गोकुळ पाहून समाधानाने हसत होती.

जेवणं झाल्यावर संध्याकाळी
सारे मिळून देवीच्या दर्शनाला गेले.

तिथे देवीला सोनं वाहिलं. मग एकमेकांना सोनं दिलं. तिथून पुढे खरेदीसाठी गेले. साराने आईसाठी तिच्या आवडीचे ड्रेस व काही साड्या घेतल्या. आनंदने मधुमालतीसाठी मंगळसुत्र बुक केलं व तिला वाढदिवसाची भेट म्हणून बकुळहार घेतला.

संध्याकाळी बाहेरच जेवणं झाली..जेवताना डिसेंबरमध्ये लग्न करायचं असं सर्वानुमते ठरलं.

घरी आले तोच मधुमालतीला हेमंतचा फोन आला,”ताई,आम्ही दहा दिवस बाहेर जाणार आहोत.तेंव्हा आमच्या टॉमीची व मुलांची देखभाल करण्यासाठी तुला यावं लागेल.”

मधुमालतीने स्पष्ट शब्दांत सांगितलं,”डॉ.हेमंत,मी आता थोड्याच दिवसांत लग्न करणार आहे व मिसेस.आनंद होणार आहे.

तेंव्हा तुमची सोय आत्ता तुम्ही पहा. शुभरात्री.”

समाप्त

–गीता गजानन गरुड.

 

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.