Skip to content Skip to sidebar Skip to footer

व्रताच्या भोजनात कांदा,लसूण का वापरत नाहीत??

why to avoid onion garlic in naivedya लसूण ठेचून फोडणी केली की अहाहा! काय दरवळ सुटतो घरभर. कधी भाजी नसली तरी लसूणचटणी तोंडी लावणे म्हणून जमून जाते. पोळीवर लसूणचटणी पसरवून तिची वळकटी करून चवीने खाल्ली जाते. तेच कांद्याचं. कांदाभजी नि पावसाचं नातं काही वेगळं सांगायला नको. रिमझिम रिमझिम पाऊस पडू लागताच अहोंची कांदाभजीची फर्माईश येतेच आणि ग्रुहिणीही ती आनंदाने पुरी करते.

शाकाहारी, मांसाहारी कोणत्याही पद्धतीचा स्वैंपाक असो, कांदा हवाच असतो.  भाजीत बारीक चिरलेला कांदा हवा असतो तर  हाच कांदा किसणीवर खिस करून थालिपीठात मिसळला की थालिपीठाला खमंग चव येते, वेगवेगळ्या वाटणांत मुलभूत घटक म्हणून कांदा पेस्ट वापरतात.

●कांदालसणाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात रहातो, ●रक्तातील शर्करा नियंत्रणात रहाते.
●केसांची गळती कमी होते.
●ताप असल्यास कांद्याचा खिस पायांना चोळतात.
●उन्हाळ्यात कांदा डोक्यावर ठेवल्याने गरमी बाधत नाही.
●कांदा,लसणाच्या सेवनाने पोटाच्या समस्या दूर होतात.

मग प्रश्न हा निर्माण होतो की देवाच्या नैवेद्याच्या भोजनात कांदा, लसूणला स्थान का नाही!!

शाकाहारी भोजनामधेही कांदालसणचा समावेश असतो. जैन आणि वैष्णव पंथीय मात्र कांदा, लसूण अजिबात खात नाहीत. बरेच लोक.. एकादशी, नवरात्रीचे नऊ दिवस, व इतर व्रताच्या दिवशी देवासाठी जो नैवेद्य बनवतात त्यात कांदा , लसूण घालत नाहीत.

यासंबंधी पौराणिक कथा आहे ती अशी की समुद्रमंथनातून अम्रुतकुंभ बाहेर आला तेंव्हा देव व दानव दोघांत अम्रुतकुंभावरनं वाद सुरू झाले. राक्षस तो उचलून घेऊन जाण्याच्या तयारीत होते इतक्यात भगवान विष्णुंनी मोहिनी रुप धारण केले. सुरेख,देखणी, कमनीय बांध्याची अशी ती मोहिनी पहाताक्षणी राक्षस तिच्या रुपावर मोहित झाले. मोहिनी म्हणाली,”भांडू नका. मी स्वतः अम्रुत वाटते. तुम्ही पंगतीत बसा पाहू.”

झालं,दोन पंगती बसल्या, एक देवांची तर दुसरी राक्षसांची. मोहिनी चतुर. तिने आपल्या रुपाने राक्षसांना घायाळ करून सोडले होते. त्यांना कुठली अम्रुतपानाची शुद्ध! ती देवांनाच अम्रुत प्यायला देत होती.

एका राक्षसाच्या लक्षात ही गोष्ट आली. त्याने काय केले! देवाचे रुप धारण केले व देवांच्या पंगतीत जाऊन बसला. मोहिनीने त्यालाही अम्रुत दिले परंतु ते अम्रुत त्याच्या कंठापर्यंतच गेले होते नि विष्णुला त्याचे ढोंग कळले.

विष्णुने सुदर्शन चक्र त्या दैत्याच्या कंठाच्या दिशेने फेकले . दैत्याचे शीर धडापासून वेगळे झाले. वरचा भाग म्हणजे राहू तर खालचं धड महणजे केतू. त्यांचं जे रक्त भूमीवर सांडलं त्यातून या कांदालसणाची उत्पत्ती झाली म्हणतात पण त्या रक्तात अम्रुतही होतं या कारणात्सव कांदा, लसूण यात काही औषधी गुण आहेत असं म्हंटलं जातं.

हे कारण आताच्या युगात साहजिकच पटणार नाही परंतु, पुर्वजांनी सर्वसामान्यांमधे दैत्य, भूत अशा काही भीती घालून ठेवल्या होत्या जेणेकरुन घाबरून, भिऊन ते काही निषिध्द पदार्थांच सेवन करणार नाहीत.

पुर्वी बराच समाज अशिक्षित होता. आता तसंं नाही. आताची पिढी सद्सदववेकबुद्धीला जे पटेल तेच करते मग ती खाणंपिणं असो की आहारविहार.

लशुनं गृञ्जनं चैव पलाण्डुं कवकानि च ।अभक्ष्याणि द्विजातीनाम् अमेध्यप्रभवाणि च ॥

अर्थ : द्विजांनी लसूण, गाजर, कांदा, छत्र्या (मशरूम) आणि अशुद्ध ठिकाणातून उत्पन्न झालेले अन्न खाऊ नये. ‘अमेध्य प्रभव’ म्हणजे अपवित्र पदार्थांपासून अथवा प्रदेशापासून ज्यांची उत्पत्ती आहे, ते पदार्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना अभक्ष्य म्हणून सांगितले आहेत.

आहाराचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे.

यात पचायला हलका असा आहार मोडतो. उदा. फळे, फळांचा रस, कांदा, लसूण विरहित डाळ,भाज्या, आमटी, दूध, दुधाचे पदार्थ, सुका मेवा, इत्यादी. सात्विक आहाराने शुद्ध विचारांची व्युत्पत्ती होते. मनोविकारांवर संयम राखला जातो.

यात मसालेदार, तळलेले पदार्थ मोडतात. या आहाराच्या सेवनाने मनाची उत्तेजना वाढते. मन शांत रहात नाही, चंचल.होते.

यात कांदा, लसूण, चिकन,मटण,मासे,शीळे अन्न, ब्रेड, पिझ्झा हे अंतर्भूत होतात.

◆राजसिक,तामसिक आहाराचे सेवन केले तर आपल्यामनात रजोगुण,तमोगुण वाढतात.

◆वाईट विचार, क्रोध,लोभ वाढीस लागतात आणि अशा अवस्थेत परमेश्वराचं मनन,चिंतन, आराधना करण्यात व्यत्यय येतो. परमेश्वराची आराधना मनोभावे होत नाही. असे होऊ नये, आपण उपवासाच्या दिवशी देवाच्या अधिकाधिक निकट जावे,मनापासून त्याची भक्ती आपल्या हातून व्हावी याकरता रजो,तमोगुणयुक्त पदार्थ व्रताच्या भोजनात निषिद्ध मानले आहेत.

◆दिलेवाच्या नैवेद्यात का आहे कांदा, लसूण निषिद्ध!

कांदा, लसूण हा राजसिक व तामसिक आहारात मोडतो. कांद्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम रक्तात असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात थैमान घालतात.

कांदा खाल्यावर काही वेळाने वीर्याची घनता कमी होते व गतीमानता वाढते. परिणामी विषयवासना वाढते. शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन, अजीर्णसारखे उदरविकार संभवतात. याच कारणात्सव चातुर्मासातही कांदा, लसूण यांच सेवन निषिध्द मानले आहे.

कांदा, लसूण खाल्ल्यानंतर तोंडाला एक उग्र गंध येतो. तो गंध येत असताना परमेश्वराजवळ जाणे, त्याचे मनन,चिंतन करणे उचित मानले जात नाही.

आपण कांदा,लसूण यांच्या इतक्या आहारी गेलो आहोत की त्याशिवाय स्वैंपाक करणं, ही कल्पनाच पचायला अवघड आहेत तरी कांदा, लसूणच्या अतिवापराने स्वभावात वाढणारे रजोतमोगुण लक्षात घेता, त्यांचा वापर प्रमाणात केलेला हितावह आहे तसेच नैवेद्याच्या भोजनामधेही कांदालसूण न वापरणे श्रेयस्कर ठरते.

========================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error: