Ritbhatmarathi

Search
Close this search box.

प्रिय वाचकहो..शीर्षक वाचलेत ना…हि कथा आहे आजूबाजूच्या परिस्थितीने फटकळ झालेल्या अरुणाची…खरं तर अरुणा ही काही फटकळ नसते…आपल्याकडे म्हण आहे इंग्लिशमधून टीट फॉर टॅटअगदी असच काही अरुणा वागत असते…लग्न करून दिग्विजय च्या घरी आल्यापासून अरुणा बिचारी आपल्या सासूचा जाच सहन करते…आणि एक दिवस चार-चौघात आपल्या सासूबाईंना बोलते…तिच्यावर लगेच फटकळ सुनेचं लेबल लावलं जात…आता वाचकहो तुम्ही विचार करत असाल…आपली कथानायिका फटकळ कशी काय झाली…काही तर असंही म्हणत असतील तिच्यात वीरश्री संचारली कि काय…पाहुयात तर नेमकं काय झालं…सुनबाई फटकळ झालीच कशी ? 

हातात हिरवा चुडा…गळ्यात मंगळसूत्र, हाता-पायांवर मेहंदी, कपाळी चंद्रकोर, भांगी सिंदूर…रंगाने गोरी अशी अरुणा आपल्या नववधूच्या रूपात खूपच खुलून दिसत होती…रूपातली सुंदरता वाखाणण्यासारखी होती. तसेच गुणही पारखण्यासारखेच होते…सगळ्यांशी अदबीनं बोलणं, वाकून नमस्कार करणं, रितीभातींना धरून सगळं कसं अदबशीर राहणं होतं अरुणाचं…डबल ग्रॅज्युएट असूनही गर्व म्हणून कुठल्याच गोष्टीचा नव्हता…मात्र अनिताबाई अगदी लग्न झाल्यापासूनच अरुणाच्या माहेरच्या लोकांवर खार खाऊनच होत्या…आपल्या पोरीला कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये म्हणून अरुणाच्या वडिलांनी खूप कष्ट करून स्वबळावर लग्न लावून दिल…

लेकीला अगदी कचरा भरण्याच्या सुपलीपासून ते गॅस शेगडीपर्यंत असा सगळा संसार दिलेला होता. अंगावर १२ तोळे सोनं देऊन, लग्नही अरुणाच्या वडिलांनी लावलेलं. तिथेही अक्षतांपासून ते पाहुण्यांच्या जेवणापर्यंतचा पंगतीचा खर्च अरुणाच्या वडिलांनी केला होता…तरीही अनिताबाई नाराजच होत्या…नव्या नवरीचे नऊ दिवसही काही चांगले जात नाहीत…लग्नात काय-काय कमी पडलं याचा पाढा अनिताबाई राज-रोज अगदी न चुकता वाचून दाखवत असे…नव्या नवरीला बोलून काही फायदा होणार नाही ही गोष्ट अनिताबाईंना कळूनही त्या काही संधी सोडतच नव्हत्या… …तरीही आपल्या नवऱ्यासाठी अरुणा तोंडातून एक ब्र ही काढत नसे…

एक दिवस घरात चैत्रगौरीचं हळदी-कुंकू करण्याचा घाट अनिताबाईंनी घातला….चुलत सासूबाई गिरिजाकाकू आल्याने घरात अनिताताईंची बड बड जरा कमी झालेली होती…म्हणून अरुणाला खूप बरे वाटत होते मूड चांगला असल्याने अरुणाही गिरिजाताईंशी अगदी मनमोकळेपणाने बोलत होती….आपल्या सुनेशी कुणी मनमोकळेपणाने बोलणं हेही अनिताबाईंना खपत नसे म्हणून मोठ्या आवाजातच अनिताबाईंनी फर्मान सोडलं…. 

अनिताबाई  – अरुने….बाई अरुने…होतंय का नाही आजच्यादिवस आवरून पटकन…बायका हळदी-कुंकवाच्या येऊन गेल्या कि आवरणार आहे का तुझं…की गप्पाष्टक सुरु आहेत अजूनही….तुम्हा आजकालच्या मुलींना वेळेचं काही भानच नाहीय…उद्या एखाद मूल झालं की काय होईल देव जाणे…कैरीचं पन्ह करायचंय…हरभऱ्याच्या डाळीची चटणी झालीच आहे तशी… 

गिरिजाताई  – अगं…अनिता किती बोलतेस…तुला धाप लागत नाही का…? 

अनिताबाई  – बोलल्याशिवाय…हल्ली काम होतात कुठे ? 

इतक्यात अरुणा तयार होऊन येते, “आई…अहो कैरीचं पन्ह मी केव्हाच फ्रिज मध्ये करून ठेवलंय, मग आणखी कसलीही तयारी राहिलेली नाहीय…हा तेवढ्या रांगोळीच मी बघेन…” 

अनिताबाई  – बाई…बाई…गं….हद्द झाली आता तुझ्यापुढे….रांगोळी राहिलीच का ? मुहूर्त पाहायचाय की काय त्याला आणि…तुला बजावलं होत ना की सोवळ्यानेच रांगोळी काढायची म्हणून… 

अरुणा काहीही न बोलता रांगोळी काढायला जाते …रांगोळी काढून झाल्यावर आत येते…जस काही झालंच नाही असं वागते म्हणजे सासूबाई कितीही बोलल्या तरीही हसऱ्या चेहऱ्याने गिरिजाताईंना हळदी-कुंकू देते शिवाय सगळ्या आलेल्या बायकांचं आगत-स्वागत करते…हळदी-कुंकवाचा कार्यक्रम झाल्यावर सगळ्या बायका नव्या सुनेला अगदी डोक्यावर घेतात…सगळीकडे एकूणच अरुणाचाच बोल-बाला म्हणून अरुणा खूप खुश असते…पण आपल्या सुनेचं झालेलं कौतुक अनिताबाईंना पाहवत नाही म्हणून काहीही खुसपट काढून त्या अरुणाला नेहमी घालून-पाडून बोलत असे… 

अनिताबाई  – ती फुलदाणी का स्वछ केली नाही…पितळेची आहे ती…तांब्या-पितळेची भांडी लवकर खराब होतात हे माहिती आहे ना तुला…की माहेरी तांब-पितळ वापरत नव्हतं कुणी..? 

अरुणा     – आई…मला सांगायचं तरी एकदा…मी दुर्लक्ष केलं नसतं…मी इथे नवीन आहे…मग प्रत्येक गोष्टीची कल्पना मला तुम्ही द्यायला पाहिजे ना…? 

अनिताबाई  – हो…ग..बाई..माझंच चुकलं…आणि आता ६ महिने झालेत की इकडं येऊन तुला…तू परत आपल्या माहेरी जा आणि सगळं परत शिकून ये बरं…कदाचित तुझी आई कमी पडली असेल शिकवायला तुला… 

सासूबाईंचा तोंडाचा पट्टा आपला चाललेलाच असतो…अरुणा मात्र एकही शब्द बोलत नाही..जवळ-जवळ वर्ष होत आलं होत…तरीही सासूबाई काही सुनेशी नीट वागायला नि बोलायला तयार नव्हत्या…एक दिवस अचानक अनिताबाई आजारी पडल्या…निमित्त झालं ते दोन प्लेट पाणी-पुरी खाण्याचं…तेही आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर गेल्या होत्या तेव्हा खाल्लेली पाणीपुरी अनिताबाईंना चांगलीच जाचली…अरुणा मात्र आपलं कर्तव्य चोख बजावत होती…रोज औषधाच्या वेळा सांभाळणं, कमी तेल असलेला स्वयंपाक करणं, पाय चेपून देणं अशी काम अरुणा करत असे…पण तरीही अनिताबाईंनी अरुणाशी नीट बोलू नये का? 

अनिताबाई  – [खोकला येतो]….अरुणा ए…बाई….हे बेडशीट कोण धुणार…का माझी वाट पाहतेय आजारपणातून उठायची….

 अरुणा    – आई….अहो…मी का धुवायला सांगेल तुम्हला ?…मला काय ठाऊक नाही का तुमच्या आजारपणाबद्दल….आजारावरून आठवलं…आज पाचपांडे डॉक्टरांकडे जायचंय…माहिती आहे ना…औषध बदलून देणार आहेत ते… 

अनिताबाई – ते मी आणि दिग्विजय बघून घेऊ…उगाच काळजी असल्याचा आव आणू नकोस… 

दिग्विजयला आपल्या आईच्या स्वभावाविषयी कल्पना लहानपणापासूनच होती…म्हणून दिग्विजय दुर्लक्ष करत असे…अरुणालाही आईच्या स्वभावाविषयी आधीच कल्पना दिली असल्याने सुरुवातीला अरुणानेही दुर्लक्ष करायचे ठरवले…पण दुर्लक्ष करायचे ते तरी किती करायचे..ते म्हणतात ना…मारलेल्या खुणा काही दिवस दिसतात पण काही दिवसांनी दिसेनाशा होतात…पण एकदा बोललेले शब्द विसरता येत नाहीत…त्याची सल कुठेना कुठेतरी असतेच असते…असेच दिवसामागून दिवस जात होते…सुनबाईंच्या सुश्रुषेमुळे अनिताबाईंच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली…याच श्रेय पूर्णपणे अरुणालाच जात होतं…म्हणून आजूबाजूचे सगळे शेजारी-पाजारी, नातेवाईक अरुणाला नावाजत होते…याचं अनिताबाईंना काही कौतुकच नव्हतं…तीच कर्तव्यच होतंअसं म्हणून त्या वेळ मारून नेत… 

बघता-बघता दिग्विजय आणि अरुणाच्या लग्नाला वर्ष होत आलं…सालावार प्रमाणे चैत्रगौरीचा दिवस होता….कैरीचं पन्ह, हरभऱ्याची वाटली डाळ, सुगंधी अत्तर यान घरात नवं चैतन्यच भरलं होत…घराचं अंगण रांगोळीने सजलं होत…काही वेळातच बायकांचा राबता घरात सुरु होणार होता…पाहता-पाहता बायका येऊ लागल्या….जोशीकाकू, भोरेकाकू, गुळवे काकू, पेंडसे काकू घरात आल्या….मग काय बायका एके ठिकाणी जमल्या की नव्या-नव्या गोसिपिंगला उधाणच येत की… 

जोशीकाकू – काय हो अनिताबाई…वर्ष झालं की आता दिग्विजयच्या लग्नाला… 

अनिताबाई – हो…म्हणजे काय…सोबत राहीलं ना आपल्या मुलांबरोबर मग असे…प्रश्न पडत नाहीत… 

गुळवेकाकू – नाही म्हणजे…सुनबाई तर चटपटीतच आहे तुमची…दिग्विजयने नशीब काढलं अगदी…लाखात सून मिळाली बरं…तुम्हाला 

पेंडसेकाकू  – हा…मग काय…नवा पाहुणा कधी येणार मग…आहे का मग पेढे…की बर्फी… 

अनिताबाई – हम्म…असेल देवाची इच्छा तर होईल सगळं नीट… 

इतक्यात अरुणा सरबताचे ग्लास घेऊन येते अन सगळ्यांना पिण्याचा आग्रह करते…तशा अनिताबाई अरुणाला खोचकपणे म्हणतात… 

अनिताबाई  – काय गं अरुणा…तुझ्या आईला साधारण किती वर्षांनी झाली तू…नाही म्हणजे तुझ्या आईने काही गर्भपाताच्या गोळ्या-बिळया तर नाही ना घेतल्या… 

अनिताबाईंचा खाष्ट स्वभाव अरुणाला चांगलाच परिचित होता. पण तो खोचकपणा असा चार बायकांसमोर दाखवायचा हे काही अरुणाला पटलं नाही. 

त्यामुळे अरुणा आता जाम चिडली होती. एकंदर गेल्या वर्ष दीडवर्षभराचं फ्रस्ट्रेशनचं तिने आता सर्वांसमोर काढून टाकायचं ठरवलं…जे होईल ते होईल…. 

अरुणा जरा चिडूनच बोलते – आई….काहीही काय बोलता आहात तुम्ही…गर्भपाताच्या गोळया घेतल्या असत्या तिने…तर आम्ही भावंडं असतो का… 

अनिताबाई – अगं चिडतेस काय…? मी बाई सहजच विचारलं…किती दिवसांपासून नातवंड खेळवायचं स्वप्न होत गं बाई माझं…पण या जन्मात ते सुख आहे की नाही नशिबी काय माहिती… 

अरुणा  – आई…तुम्ही कमालच करता हा…आता तर तुम्ही म्हणत होतात ना…सगळं देवाच्या हातात असत म्हणून…की लगेच तुमचा विचार बदलला मी इकडे आले म्हणून… 

अनिताबाई – पाहिलत बायांनो…बोलायचीही चोरी झालीय…नातवंड हवीत हो मला…कुठून हि ब्याद पदरात पडली माझ्या दिग्विजयच्या…वांझोटी मेली…एवढं धुंडाळून काय पदरात पडलं माझ्या… 

आता मात्र अरुणाच्या सहनशक्तीचा अंत झाला होता…अरुणाने चांगलाच जाब विचारायचं असं ठरवलं चवताळून अरुणा म्हणाली….तेही सगळ्या बायकांसमोर… 

अरुणा –  आई…बस्स झालं हा…खूप ऐकून घेतलं…माझ्या आई-वडिलांना बोललात…ऐकून घेतलं…माझ्या माहेरचा उद्धार केलात….ऐकून घेतलं…आता माझ्या बाईपनावर आणि आईपणावर वांझोटेपणाचा शिक्का लावताय तुम्ही हे कसं सहन करू मी…तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, मानाने मोठ्या आहेत शिवाय अनुभवानेही तुम्ही उजव्या आहेत…. असं बोलणं शोभतं का तुम्हाला आणि तेही सगळ्या बायकांसमोर…मी गरोदर राहण्यासाठी जी मानसिकता हवी आहे ती कुठून आणू….प्रश्न फक्त माझ्या मानसिकतेचा नाही आहे…आम्हा दोघांच्याही मानसिकतेचा आहे…फक्त शरीर जुळून मुलं जन्माला घालता येत नाहीत…त्यासाठी स्त्री-पुरुषांची मानसिकता महत्वाची असते…. 

अनिताबाई – पहा….बायांनो…आपण मुलं जन्माला घातलीच नाहीत का…याना मानसिकता पाहिजे… 

अरुणा  – आई….तुम्ही येता-जाता वाट्टेल तशा बोलता…एक वेळ मारलेलं चालेल मला त्याचे वळ निघून तरी जातात…पण मनावर घातलेल्या घावाचं काय…ते जात नाही…याचा विचार मी अहोरात्र करत असते…विचार केल्यानं…एकदिवस मानसिक रुग्ण होऊन जाईल मी…मी आजवर सगळं सहन करत आले त्याबद्दल कधीतरी मी उलटून बोलले नाही …सगळ्यांसमोर झालेला अपमान मी सहन करत आले…पण या बदल्यात मला वांझोटेपणाचा शिक्का लावला जातोय याच काय ?

हे सगळं बाहेरून दिग्विजय ऐकतच होता…काही मिनिटांनी अनिताबाई आणि अरुणाच्या भांडणाचा येथेच्छ आनंद घेऊन सगळ्या बायका जायला निघाल्या…जाता-जाता प्रत्येक बाई म्हणत होती… 

जोशीकाकू  – काय गं  बाई….मोठी फटकळ आहे गं हिची सून… 

पेंडसेकाकू  – नाहीतर काय…वाटलं नव्हतं एवढी अगोचर आहे असं… 

भोरेकाकू    – अगं….ते म्हणतात ना…ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला…वान नाही पण गुण लागला 

बायकांचे कान कसे दुसऱ्यांच्या घरातलं नेहमी काहीना काही ऐकायला आसुसलेले असतात…तसेच सगळ्या बायका अरुणाला फटकळ असं लेबल लावून निघून गेल्या…पण अरुणा मात्र भर हळदी-कुंकवाच्या दिवशी ओक्सबोक्शी रडत होती.. रागाने चेहरा अगदी लालबुंद झाला होता तिचा…दिग्विजयला मात्र आपल्या बायकोची मनधरणी करायचीही भीती वाटू लागली…कारण तीचं हे रूप याआधी कधीही पाहिलं नव्हतं…तरीही धीर करून…दिग्विजय आपल्या बायकोला समजावत म्हणाला… 

दिग्विजय  – अरुणा…चल…पहिलं रडणं थांबव…तुला बरं नसेल वाटत तर थोडं खाली राऊंड मारायला जाऊ यात का? 

अरुणा   – [मुसमुसते] दिग्विजय….तू मला आत्ताच्या आता सांग मी आई कधीच नाही का होऊ शकणार… 

दिग्विजय  – अरुणा…तूला चांगलाच माहितीय…मानसिकता महत्वाची आहे… 

पण म्हणतात ना स्वभावाला काही औषध नाही….अनिताबाईं त्याला अपवाद थोडीच होत्या…चैत्र गौरीच्या प्रसंगानंतरही त्या सुधारायचं नाव घेत नव्हत्या. त्यामुळे दिग्विजय आणि अरुणने एक शक्कल लढवली….दिग्विजयने अनिताबाईंच्या हातात मोबाईल नावाचं खेळणं सोपवून दिलं….त्यात बरेच शॉपिंगचे आणि भजन सत्संगाचे ऍप्स इन्स्टॉल करून दिले. तसेच अनिताबाईंना अजून बिझी ठेवायचं म्हणून २-३ क्लब जॉईन करून दिले जिथे रोज काहींना काही प्रोग्रॅम व्हायचे. सणावाराला तर अनिताबाई फारच बिझी होऊन जायच्या क्लब मध्ये. एकंदर अनिताबाईंचा चांगलाच वेळ बसल्या-बसल्या जात असे म्हणून अरुणाशी भांडायला त्यांना नको-नको वाटायला लागलं…काही दिवसांनी घर शांत-शांत वाटायला लागलं…एकूण काय घातलं वातावरण प्रसन्न आणि आनंदी झालं… 

अनिताबाईंचे घरात पाय कमीच टिकायला लागले त्यामुळे इकडे अरुणालाही बराच फावला वेळ आणि निवांतपणा मिळायला लागला. काही दिवसांनी अरुणा गरोदर राहिली…सासूबाईंना तर आकाश-पातळ एक झाल्यासारखं वाटलं…दिवस भरत गेले…तस अरुणाने एका सुंदर आणि गोंडस मुलीला जन्म दिला…अनिताबाईंना तर मोबाईल पेक्षाही अनमोल असं खेळण्यासाठी, लाड-कोड पुरवण्यासाठी नातवंड मिळालं…एक दिवस अनिताबाई आपल्या नाती बरोबर लडिवाळपणे गप्पा मारत होत्या….. 

अनिताबाई  म्हणाल्या…काय रे द्वाडा…मला म्हतारीला विचारणार कि नाही मोठेपणी” ? इतक्यात बाळाने जोराने भोकाड पसरलं…. 

अनिताबाई हसून ….बाई…बाई…गं …एवढी एवढीशी पोर पण फटकळच दिसतेय….आजीच्या बोलण्यावर लगेच भोकाड पसरायला लागली कि…..  “ 

तिकडे अनिताबाई कितीका खाष्ट असेना पण नातीसोबत त्यांचा छान बॉण्ड तयार झाला होता आणि  खऱ्या अर्थाने अनिताबाई आता नातीमध्ये गुंतल्या होत्या. त्यामुळे अनितावर लक्ष देणं त्यांनी सोडून दिलं होतं. एकंदर अनिताबाईंच्या आणि नातीच्या बागडण्याने, हसण्याने सगळं घर परत ताज झालं होतं ….

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories