सुनेच्या हातात आणून दिलं तर काय झालं?

अस्मिता आणि सुजितचा नुकताच प्रेम विवाह झाला होता. अस्मिता सॉफ्टवेअर इंजिनिअर होती आणि एका पुण्यातील एका नामांकित कंपनी मध्ये कामाला होती. तिथेच २ वर्षांपूर्वी तिची सुजित सोबत ओळख झाली आणि हळू हळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांच्या लग्नाला दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता. पण ६ महिन्यांपूर्वी सुजितच्या वडिलांना एक दुर्धर आजार झाल्याचे निदर्शन झालं. त्यामुळे सुजित वडिलांच्या इलाजासाठी आई वडिलांना गावातून पुण्यात घेऊन आला.
डॉक्टरने काही चाचण्या केल्यावर स्पष्ट शब्दात सांगितलं कि सुजितचे वडील काही महिन्यांचेच सोबती आहेत.
त्यामुळे वडील आहेत तोपर्यंत सुजीतचं लग्न लावून द्यायचं असं सुजितच्या आईने आणि नातेवाईकांनी ठरवलं. पण सुजितने सगळ्यांना ठाम सांगितलं होतं कि लग्न करेल तर अस्मिताशीच नाहीतर लग्न करणार नाही. सुजितच्या ह्या निर्णयापुढे सगळ्यांनी हाथ टेकले होते. त्यामुळे त्याच्या मामांनी मध्यस्थी घेऊन अस्मिताच्या घरच्यांची भेट घेतली आणि लग्न जमवून आणलं. ह्या सगळ्या गोष्टी अगदी एक महिन्यामध्ये मध्ये झाल्या आणि घाई घाईनेच अस्मिता आणि सुजितचं लग्न झालं. त्यांचं लग्न झालं आणि एक महिन्यातच सुजितचे वडीलही वारले. एवढ्या अकस्मात सगळ्या गोष्टी घडत होत्या कि अस्मिताला काय होतंय हे कळेनासं झालं होत. वडील गेल्याने आई एकटीच म्हणून सुजितने आईलाही पुण्यात आणलं ते कायमचंच. थोड्या दिवसात परिस्थिती थोडी नॉर्मल झाल्यावर दोघेही ऑफिसमध्ये रुजू झाले होते.
लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच सासू सोबत म्हटल्यावर अस्मिताला थोडं वाईट वाटलं होतं. कारण लग्न झाल्यापासून तिला आणि सुजितला निवांतपणा असा मिळालाच नव्हता. तेवढं फक्त दोघेही एकाच ऑफिसमध्ये असल्याने सोबतच अप डाउन करायचे आणि काय तो तेवढाच एकाकीपणा मिळायचा. ऑफिस नंतर फ्रायडे नाईट ला वगैरे अस्मिता सुजित डिनर आणि मूवी साठी म्हणायची पण आई घरात एकटी त्यामुळे सुजीतचं फक्त घोड्यासारखं ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस असंच रुटीन चालू होतं. अस्मितालाहि आता ह्या गोष्टीची सवय झाली होती.
तीही आता चांगलीच रुळली होती. सासूबाईही दुःखातून हळू हळू सावरू लागल्या होत्या. पण अस्मिताला सकाळचा स्वयंपाक आणि रात्रीचा स्वयंपाक एकटीलाच करावा लागायचा. त्यात तिची चांगलीच धांदल उडायची. तिला लग्नाआधी स्वयंपाकाची सवयही नव्हती. सासूबाईंची तर काडीचीही मदत नसायची तिला. सकाळी देवघरात पूजा आटोपली कि दिवाणखान्यात येऊन मस्त न्यूज पेपर वाचत बसायच्या त्या. आणि इकडे स्वयंपाकघरात अस्मिता घडाळ्याचे काटे बघत काम करायची कारण पटापट काम उरकून तिलाही ऑफिसला जायचं असायचं. ह्या गोष्टीला ती आता पुरतीच कंटाळली होती. ऑफिसला जाऊन आपल्या मैत्रिणींसोबत मन हलकं करायची.
एक दिवस संध्याकाळी सुजित आणि अस्मिता सोबतच ऑफिस करून घरी आले. सासूबाईंनी सुजितला आल्या आल्या पाण्याचा ग्लास दिला आणि अस्मिताला पाणी घेणार का म्हणून विचारलं सुद्धा नाही. थोड्या वेळाने सुजित फ्रेश झाल्यावर दिवाणखान्यात येऊन टीव्ही बघत बसला..सोबत अस्मिताही गॅसवर चहाच उधाण ठेऊन दिवाणखान्यात येऊन बसली. सासूबाईंनी गरमागरम उपमा बनवला होता.
सासूबाई उपम्याची एक प्लेट घेऊन येतात – “सुजित बाळा….आज तुझ्या आवडीचा उपमा बनवला आहे..घे गरमागरम खाऊन घे..आणि सांग कसा झाला आहे. “
असं म्हणून सासूबाईंनी सुजितच्या हातात उपम्याची प्लेट दिली आणि सुजीतनेही मस्त ताव मारायला सुरुवात केली.
सासूबाई अस्मिताला म्हणाल्या, “अस्मिता कढईमधे तुझ्यासाठी पण थोडा उपमा ठेवला आहे….जाऊन घे तेवढा..आणि हो चहा झाला असेल….घेऊन येशील तेवढा”
अस्मिताला सासूबाईंचं वागणं विचित्रच वाटलं….पण हे आता रोजचंच झालं होतं….सासूबाई एवढ्या दिवसांनी किचन मध्ये जायला तर लागल्या होत्या पण ते फक्त सुजित साठी….त्या रोज सुजितच्या आवडीचे पदार्थ बनवायच्या आणि सुजितच्या हातात आणून द्यायच्या पण असं एकदाही झालं नाही कि अस्मिताला प्रेमाने त्यांनी काही आणून दिलं. ह्या गोष्टींच अस्मिताला फार वाईट वाटायचं. ती सारखी विचार करायची कि मी सकाळी सासूबाईंचा नाष्टा, जेवण सगळं करून ऑफिसला जाते…एवढंच काय तर संध्याकाळी त्यांना चहा सुद्धा करून देते…जेवायची पान वाढून त्यांना हातात देते…पण त्या का अशा तुसड्यासारख्या वागतात माझ्याशी….मी मुलगी नाही का त्यांची….घरात घडणाऱ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे अस्मिताचं कशातच लक्ष लागत नव्हतं.
एक दिवस ऑफिस मध्ये लंच ब्रेक मध्ये अस्मिता तिच्या मैत्रिणीसोबत बसली होती. तिच्या मैत्रिणीच्या म्हणजे स्नेहाच्या डब्यात मासवडी होती. सगळ्या मैत्रिणींना फार आवडली.
अस्मिता – “वाह्ह! आजची मासवडीची भाजी खूप छान झालीये गं…तुला छान भाज्या जमतात गं..माझ्या हाताला अजून अशी चवंच येत नाही गं..कितीही मीठ मसाले टाका”
स्नेहा – “अगं मला कसली जमते भाजी…आणि तीही एवढी अवघड भाजी….अगं माझ्या सासूबाईंनी केली आहे भाजी..त्या उत्तम सुगरण आहेत गं…खूप छान भाज्या करतात”
अस्मिता – “काय सांगते!!!! त्या तुला मदतीला येतात?”
स्नेहा – “हो म्हणजे काय….अगं सकाळी ऑफिसला यायची घाई असते..मग सगळं एकटीने केल्यावर मला रोज १२ वाजतील ऑफिसला पोहोचायला..सकाळी मी उठायच्या आधीच देवपूजा आवरून आई पीठ मळून ठेवतात आणि भाजी फोडणीला टाकून ठेवतात..मी फक्त सकाळी चपात्या करते. मी चपात्या करून अंघोळीला जाते तेवढ्यात त्यांचा नाश्ता तयार असतो…मग मी आणि सुहास दोघेही तयार होऊन आलो कि त्या नाष्टा आणून देतात आणि आमचे डब्बेही पॅक करून देतात”
अस्मिता – “ह्म्म्म….म्हणूनच तुझा डब्बा एवढा व्यवस्थित असतो…भाजी, पोळी, कोशिंबीर,सलाड चटणी….नशीबवान आहेस गं अशी सासू मिळाली तुला”
स्नेहा – “हो त्या बाबतीत आहेच मी नशीबवान….अगदी मुलीसारखं वागवतात त्या मला….माझ्यात आणि सुहास मध्ये कसलाही भेदभाव नसतो..उलट सुहास मला काही बोलायला गेला कि त्या लगेच त्याच्यावर खेकसतात कि माझ्या मुलीला काही बोलायचं नाही”
अस्मिता – “बर आहे बाई तुझं अशी आई सारखी काळजी करणारी सासू कुणाला नकोनकोशी वाटेनं..आता माझ्याच घरी बघ ना….माझ्या सासूबाईंना चांगलं माहित आहे कि सकाळी माझी किती धांदल उडते ते ….दिवाणखान्यात बसून नजर फक्त माझ्यावर आणि किचनमध्ये ठेवतात पण मदतीला एक मिनिट म्हणून येत नाही….उलट मीच त्यांना चहा नाष्टा हातात नेऊन देते. आणि त्यात भर म्हणजे कधी किचन मध्ये काही बनवलच तर सगळं सुजितच्या आवडीचं असत आणि त्याच्या हातात आणून देतात पण मात्र दुसड्यासारखी वागणूक देतात…सासूचा हेकेपणा मिरवायचा फक्त कि मी सुनेच्या हातात का देऊ?…सुजीतलाही बऱ्याचदा म्हटलं मी कि आई माझ्यासोबत असा दुजाभाव का करतात तर त्यालाही मी सांगितलेलं पटलं नाही…तो सरळ इग्नोर करतो…त्याला ह्या गोष्टी फालतू वाटतात पण मग आईने हातात गरम गरम काही आणून दिलं कि बिनलाज्यासारखं ताव मारायचा…असं नाही कि बायकोला पण विचारावं थोडं….”
“आई अस्मिताला पण दे ना..खूप छान झालंय… ” असं म्हणणं त्याच्यासाठी किती सहज आणि सोपं आहे ना…पण तो ह्या फंदात पडत नाही…आणि हीच गोष्ट जर मी सासूबाईंना म्हणाले कि त्यांना वाईट वाटेनं..उगाच कशाला वाद म्हणून मी पण इग्नोर करते पण ह्या सगळ्या गोष्टींचा मलाच खूप मानसिक त्रास होतो गं….मी किती दिवस इग्नोर करू ह्या गोष्टी..दुसर्यांना खूप लहान वाटत असतील ह्या गोष्टी…पण ह्याच गोष्टी हळू हळू माझ्या मनावर आघात करत आहेत “
अस्मिताला अश्रू अनावर झाले होते. सगळ्यांना मैत्रिणींनी तिला धीर दिला.
स्नेहा – “बाई गं विचित्रच आहेत तुझ्या सासूबाई…म्हणूनच तू आज काल टेन्शन मध्ये असतेस….एक काम कर अस्मिता तू….तू पण आता त्यांच्या हातात द्यायचं बंद कर”
अस्मिता – “अगं मला नाही जमणार गं असा दुजाभाव करायला…नाही माझ्याकडून ते शक्य नाही होणार”
स्नेहा – “अस्मिता तू तुझा विचार करतेस ह्याचा अर्थ असा नाही कि तू तुझा सासूचा अनादर करत आहेस….कधी कधी नकळत आपल्या कृतीतून त्यांना त्यांनी केलेली चूक निदर्शनास आणून देणं गरजेचं असतं…तू त्यांना डायरेक्ट नको काही बोलू आणि सुजित जवळही रडगाणं रडायचं बंद कर. तुझे भाव आता मनातून आणि भावनांतून नाही तर कृतीतून व्यक्त कर….”
अस्मिता – “म्हणजे काय करू?”
स्नेहा – “सोपं आहे….कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही..मस्त राहायचं…हे काय म्हणेल…ते काय म्हणतील ह्याचा विचार करायचा नाही..कोण काय म्हणेल ह्यचा विचार दोष देणाऱ्या लोकांनाच करू देत….सकाळी तुला ऑफिसला जायची घाई असते ना…तुला आणि सुजीतला नाश्ता आणि जेवण कॅन्टीन मधेही मिळून जाईल…२-३ दिवस काही करू नको…आणि त्यांना प्रेमाने सांगायचं” असं स्नेहाने अस्मिताला सगळं समजावून सांगितलं….
तेव्हा कुठे अस्मिताला हायसं वाटलं….
अस्मिता घरी गेली..घरी गेल्यावर सासूबाईंनी सुजितच्या आवडीचा रगडा पॅटीस बनवला होता….नेहमीप्रमाणे त्यांनी सुजितला आणून दिला आणि अस्मिताला म्हणाल्या….
“अस्मिता तुझ्या साठी किचन मध्ये पातेल्यात ठेवला आहे…टिक्की,चटणी सगळं तिथेच आहे..बनवून घे स्वतःसाठी आणि चहा ठेव गं तेवढा”
अस्मिता – “आई नको मला रगडा पॅटीस….मला असले आंबट पदार्थ आवडत नाही त्यामुळे इथून पुढे माझ्या साठी ठेवत नका जाऊ..आणि हो संध्याकाळचा चहा नाश्ता माझा आजकाल ऑफिस मधेच होतो त्यामुळे माझ्या साठी संध्याकाळी काही बनवत नका हं जाऊ…आणि आई चहासाठी उगाच माझी वाट नका बसत बघू तुम्ही..सुजित तर चहा घेत नाही..उगाच तुम्ही माझी वाट बघत बसता आणि तुम्हालाही उशीर होतो माझ्यामुळे..तुम्ही तुमचा करून घेत जा.”
एक दिवस एवढंच पुरेसं आहे म्हणून अस्मिताने रात्रीचा स्वयंपाक सगळा एकटीने केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी अस्मिताने सकाळी नाष्टा आणि स्वयंपाक बनवला…आणि ती तयार होऊन ऑफिसला जायला निघाली…सासूबाई नेहमीप्रमाणे न्यूज पेपर वाचत बसल्या होत्या आणि सुजीतही नाष्टासाठी वाट बघत बसला होता. अस्मिता ऑफिसची बॅग घेऊन बाहेर आली….
“मी निघते हा ऑफिसला..मला उशीर होतोय आज खूप काम आहे”
सुजित – “अगं थांब सोबतच जाऊ या..रोज तर सोबतच जातो ना..आणि कालच सांगायचं होत ना मला कि आज तुला लवकर जायचं आहे म्हणून मीही लवकर आवरलं असतं”
अस्मिता – “अरे नको रे कशाला उगाच तुला त्रास….आजपासून मी राधिका सोबतच येणार जाणार..तिला महिन्याचे पेट्रोलचे पैसे देत जाईल..तसाही तुझा आणि माझा टाईम मॅच नाही होतेय आज काल…कधी तुला माझ्यामुळे ऑफिसमध्ये वाट बघत बसावं लागतं तर कधी तुझ्यामुळे मला…मी निघते….आणि हो आई नाश्ता मी बनवला आहे….पोहे बनवले आहेत…मी माझ्या साठी पॅक करून घेऊन जातेय..तुमचे कढई मध्ये ठेवले आहेत..तुम्ही घेतान हं किचन मधून आणि सुजीतलाही देतान ”
सासूबाई अस्मिताच्या तोंडाकडे बघतच राहिल्या…अस्मिताला आज खूप दिवसांनी बरं वाटत होतं….
पुढले काही दिवस अस्मिताचं असंच चाललं होतं….कधी ऑफिसमध्ये पार्टीचं निम्मित सांगायची तर कधी कामाचं….अशी कारणं देऊन अस्मिता घरात कमी आणि ऑफिसमध्ये जास्त राहायला लागली…त्यामुळे आपसूकच सासूबाईंवर जबाबदारी येऊन पडली आणि त्यांनीही हळू हळू तिला किचन मध्ये मदत करायला सुरुवात केली….अस्मिता जाणून बुजून सुजित सोबतही कमी वेळ घालवू लागली त्यामुळे सुजितलाही तिची किंमत कळाली आणि अस्मिताच्या अशा वागण्याचं खरं मूळ त्याला समजलं…. त्यानेही अस्मिताला वेळ द्यायला चालू केलं…हळू हळू मूवी..डिनर..शॉपिंग सुरु झालं..कधी कधीअस्मिता स्वतःच सासूबाईंनाही फिरायला घेऊन जायची.
एक दिवस सुजित अस्मिताला फोर्स करून ऑफिस मधून सोबतच घेऊन आला… सासूबाईंनी मेदू वडे बनवले होते… मेदू वडा तर अस्मिताच्या खूप आवडीचा…मेदू वड्याचा खमंग सुवास घरभर येत होता…पण सासूबाईंना तिने तर आधीच सांगितलं होतं कि तिच्यासाठी काही बनवत नका जाऊ म्हणून..अस्मिता आणि सुजित फ्रेश होऊन दिवाणखान्यात येऊन बसले…तेवढ्यात सासूबाईंनी मेदू वड्याच्या २ प्लेटा आणल्या….आणि आधी अस्मिताला प्लेट दिली….हे पाहून अस्मिताला शॉकच बसला होता…कारण ६ महिन्यात असं पहिल्यांदा झालं होतं….
सुजित – “घे अस्मिता….आज आईने खास तुझ्यासाठी बनवले आहेत…मी आईला आधीच सांगितलं होतं कि तुला फार आवडतात म्हणून”
अस्मिताला कळलं होतं कि सुजित आणि साऊबाईंचं बोलणं आधीच झालं आहे…आणि सुजितने आईसमोर माझी बाजू मांडली होती आणि आईंनाही त्यांची चुकी कळून चुकली होती.
सासूबाई – “हो अस्मिता घे खाऊन…गरम गरम….चहा झाला कि नाही बघते आज सोबतच पिऊ या..खूप दिवस झाले तुझ्यासोबत संध्याकाळचा चहा झाला नाही”
सासूबाईंना जाणीव झाली होती कि लेकासोबतच सून पण तेवढाच वेळ ऑफिसमध्ये जाते….वरून घरातली कामं तिला एक्सट्रा करावी लागतात आणि त्यात भर म्हणजे आपण सुनेऐवजी लेकाला सगळं हातात देतो. ही २ पोरं हीच माझी संपत्ती आहे. गुण्या गोविंदाने राहण्यातच जगण्याचा आनंद आहे.
अस्मिताही सासूबाईमध्ये झालेल्या बदलाने पुरती सुखावली होती. किचन मध्ये भाजी चिरून देणं, पोळ्या भाजणं, भाजी आणणं, दळण अशा छोट्या छोट्या कामामधूनही सासूबाईंची तिला खूप मदत होयची.
अस्मिताने स्नेहाला मनःपूर्वक धन्यवाद दिले…तिने कुणाचा अनादर न करता, कुणाला न दुखवता स्वतःसाठी सुखाने जगण्याचा मार्ग नसता दाखवला तर अस्मिताची अजूनही आतल्या आत घुसमट झाली असती आणि ती घुसमट हळू हळू तिच्या मनावर आघात करत राहिली असती ज्याचा परिणाम पुढे जाऊन काय झाला असता कुणास ठाऊक.
समाप्त