प्रॉमिस

- गीता गरुड

२७ मे, २०२२

"ए स्वानंदा,"  "ऐक ना रे.. असा कसा रे तू आखडू.."

""काल किती कॉल केले तुला..का नाही उचलत तू फोन?"

"बिझी असतो मी."

"संध्याकाळचा बिझी? कोणी भेटलीय का मनासारखी?"

"कितीक भेटून गेल्यात.."

"अरे मग चाळीशी झाली तरी..आय मिन..तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा 

पण लग्न का नाही  केलंस रे? का ब्रह्मचारी वगैरे.."

"तुला कशाला  चौकशा.."

"तेरी इसी अदा पे तो मर मिटती हूँ मैं।" "बाय द वे, मेरे बारे में क्या खयाल है? कैसी लगती हूँ मैं?"

"तू हिब्रुत विचारलंस तरी उत्तर नाहीय माझं."

"मिन्स..यंदा कर्तव्य नाही की डिरेक्टली माझ्यावर काट."

"तुला काय समजायचं ते समज."

"ए तुला, तुझं काय..एकदा नावं घे नं माझं..म्हण श्रावणी. 

स्वानंदा, मी तुझ्या आयुष्यात आले नं तर  तुझा हा चिंतांनी वेढलेला चेहरा आधी  खसखसून पुसेन

स्नेहाचं लिंपण करेन त्यावर..मिश्कील हसू फुलवेन बघ तुझ्या गालावर.."

"नकोच ते."

"नकोच ते." "अरे..पण का?" "नाही सांगू शकत." "प्रेमभंग वगैरे.."

"छे गं.." "वाटलेलंच..मग  घरच्यांची आडकाठी.." तो नुसताच हसला.

"घरी कोण कोण असतं तुझ्या?" "ज्या गावाला जायचंच  नाही त्याची चोकशी कशाला?"

"ते जायचं की नाही ते  माझं मी बघेन. चल चहा घेऊ." (दोघे चहाचे घोट घेतात.)

"श्रावणी..घरी फक्त मी न् माझी आई असतो. अल्झायमर झालाय तिला. काहीच होत नाही तिच्याने

अगदी स्वत:चंही करणं जमत नाही. शेजारच्या काकू येतात दुपारच्या बसायला तिच्यासोबत.

बाकी सकाळी मी तिचं आंघोळीपासून,वेणी घालणं,अगदी सगळंच समजून जाना. 

"अरे पण तू पुरुष ना..एखादी बाई ठेवायची..स्वच्छतेपुरती."

"स्त्रीपुरुष ही सगळी  लेबलं गळून पडतात  श्रावणी अशावेळी.  एक हाडामासाचा देह  समोर असतो.

माझ्या..माझ्या माऊलीचा देह..हीच माऊली मी हट्ट केला की कनवटीचा  रुपया काढून द्यायची  मला.

एकाला शिवी दिली  म्हणून हिनेच काठीने  बदडलेलं मला नि रात्री  वळांना तेल लावून डोळे  पुसत बसलेली स्वत:चे.

चंदनासारखं तिनं तिचं आयुष्य झिजवलंय माझ्यासाठी.

हे अल्झायमरचं दुखणं पाठी लागल्यापासनंआई एवढी चिडचिड करते की बाई टिकत नाही.  शिव्याही घालते. एकीवर तर पचकन थुंकली.."

"मग त्या काकू.."

"त्यांचं कसं कोण जाणे ऐकते सगळं..त्या एकही पैसा घेत नाहीत. त्यांची आई अशीच खंगून गेली म्हणे..यानिमित्ताने आईच्या सेवेचं भाग्य मिळतय म्हणे.

श्रावू, एक सांगू..माझा विचार करणं सोडून दे.  अगं लग्नानंतरची  किती मोरपिसी स्वप्नं  असतील तुझी. .

कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी मधुचंद्राला  जावंस वाटत असेल, नीटनेटकं साजिरं घर,देखणा संसार..

"माझ्यासोबत आलीस  तर तुझी स्वप्न.."

"श्रावणीने स्वानंदच्या ओठांवर हात ठेवला व म्हणाली,"नक्की साकार होतील माझी स्वप्न.

कोराकरीत संसार  नकोच मला..जरासं चुरगळलेलं घर नक्कीच आवडेल.

तुझ्या आईचे सगळे ट्यांट्रम्स..आजारपणामुळे आहेत. तुझ्याजोडीने मीही समजून घेईन त्यांना."

प्रॉमिस म्हणत श्रावणीने तिचा हात स्वानंदच्या हातात गुंफला. अनिमिष नेत्रांनी स्वानंद तिच्या आश्वासक चेहऱ्याकडे  बघत राहिला.

उत्तम लेखकांच्या  कथा आणि कथामालिका वाचण्यासाठी इथे क्लिक करा.