Ritbhatmarathi

Search
Close this search box.

तिला ‘पहिला पाऊस’ खूप आवडायचा. ती ओल्या मातीचा सुगंध मनात भरून घ्यायची आणि पावसात मनसोक्त भिजायची, बागडायची. पण त्याला मात्र पाऊस अजिबात आवडायचा नाही. मग भिजणं तर दूरच.

तसा तो अबोलच होता, कधी व्यक्त न होणारा. पण ती पावसासारखीच भरभरून बोलत राहायची त्याच्याशी. पण त्याचा न येणारा प्रतिसाद पाहून दुःखी व्हायची, चिडायची, भांडायची.

पण त्याला काहीच फरक पडायचा नाही. तिने त्याला कितीतरी वेळा बोलतं करण्याचा प्रयत्न केला. पण तो तसाच राहिला..अव्यक्त. तिची इतकीच अपेक्षा होती, ‘त्याने भरभरून प्रेम व्यक्त करावं, मनातलं बोलावं!’

त्याच शांत, अबोल राहणं तिला आता सहन होईना. अखेर रागारागाने तिने वेगळं व्हायचा निर्णय घेतला. ‘संसार एकटीच्या हाताने चालत नाही. दोघांच्या संमतीने चालायला हवा.’

या निर्णयातही तो स्थितप्रज्ञ राहिला. हे पाहून डोळ्यात पाणी आलं तिच्या.

“कुठल्या काळजाचा बनला आहे हा?” असे म्हणून तिने घर सोडलं. ती माहेरी निघून आली, तशी आई म्हणाली, “संसारात एक जण कमी पडला, तर दुसऱ्याने सावरून घ्यायचं असतं. असं नातं तोडायचं नसतं. एकमेकांना सांभाळून घेणं म्हणजेच नातं जपणं.”
तशी ती आईच्या कुशीत शिरत इतकेच म्हणाली, “तो येईपर्यंत वाट पाहीन मी.”

ती गेल्यावर तो मुसमुसत राहिला, मनातल्या मनातच. दोन दिवस कसेतरी गेले. पण आता त्याला तिची आठवण बेचैन करू लागली. तिची बडबड ऐकण्यासाठी तो आतुर झाला. तिच्या आठवणीनेही घर खायला उठलं त्याला. त्याच्या मनात तिच्या आठवणींचं आभाळ भरून आलं.

तिचा कॉफीचा मग खिडकीत तसाच पडून राहिला होता, ती गेल्यापासून.

त्याला आठवलं, लग्न ठरल्यानंतर ‘पहिल्या पावसात पहिली डेट कॉफीची.’ किती भरभरून बोलत होती ती..आणि तो उत्साहाने ऐकत होता. तो उत्साह हरवला कुठेतरी. कदाचित गृहीत धरले आपण तिला. त्याला कसेसेच वाटले.

आठवणीतून बाहेर येत त्याने तो खिडकीतला मग उचलला, तसा बाहेर पाऊस कोसळायला लागला.

वर्षातला ‘पहिला पाऊस’..कधी नव्हे ते, मनसोक्त भिजला तो तिच्या आठवणींच्या पावसात..आणि तिला परत आणायला भर पावसात गडबडीने घराबाहेर पडला. एरवी त्याला पाऊस अजिबात आवडायचा नाही. पण आज मात्र तो वेगळाच भासला..’विरहाचा पाऊस.’ त्याला खात्री होती, ‘ती आपली वाट पाहत असेल.’

इकडे तिच्या मनातही त्याच्या आठवणी दाटून आल्या. “निदान त्याची सोबत तरी होती, इतके दिवस. असा एकटेपणा जाणवत नव्हता. आपलं ही चुकलंच, असा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता. तो व्यक्त झाला नाही तरी काय झाले? मनातलं बोलता येत होत सारं त्याच्या जवळ.”

त्याच्या आठवणींचे ढग तिच्या मनात दाटले. बाहेर धो कोसळणारा पाऊस तिला खुणावू लागला. तिने दार उघडायला आणि तो दारात यायला एकच गाठ पडली. त्याला असा अचानक आलेला आणि चिंब भिजलेला पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला.

त्याच्या डोळ्यात खोलवर पाहात ती म्हणाली, “कधी नव्हे ते चिंब भिजलास आज?”

तसा तो म्हणाला, “तुझ्या विरहात पाऊस जवळचा वाटू लागला अचानक!” आणि त्याची हलकीशी स्माईल तिला आवेगाने त्याच्या मिठीत घेऊन गेली. दोघेही आसवांच्या पावसात चिंब भिजत राहिले कितीतरी वेळ आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज थोडा जास्तच वाढला.

=================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *