सुंदर बायको

- गीता गरुड

२७ मे, २०२२

कंटाळला होता तो,साहेबाच्या बोलण्याला,नेहमीच्या  प्रवासाला. त्यालाही  वाटत होतं, जरा कुठे तरी जावं, लोकं कसं जातात  थंड हवेच्या ठिकाणी तसं. 

त्यालाही वाटायचं एकाच  रंगाचे कपडे घालून  बायकोसोबत फोटो काढावा  न् तो डिपीवर मिरवावा  पण छे!  घरात दोन तरणीताठी मुलं

एक पोरगा,एक पोरगी.  दोघंही कॉलेजला जाणारी.  बायको आताशी त्याला  मिळतच नव्हती. मुलांसोबत झोपायची.  तिची चिडचिड असायची  नेहमीचीच.

पैसा पुरत नव्हता. कमावणारा  एक नि खाणारी पाच तोंडं.  पाचवं तोंड आईचं. आईची  सत्तरी होऊन गेली होती  पण खाण्यापिण्याबाबत अगदी उत्साही.

नातवंडं पाणीपुरी खायला  गेले की हिला पार्सल  लागायचंच. लेक मोटरसायकलसाठी  मागे लागलेला केव्हाचा.

बायकोने बजावून ठेवलय, या दिवाळीत तरी त्याला  बाईक घेऊया म्हणून. आईला तिरुपतीला जायचंय म्हणे, तिच्या ज्येष्ठांच्या ग्रुपसोबत.  लेकीला महागडा क्लास  लावायचाय. 

कसे आणि कुठे कुठे मेनेज  करु पैसे..त्याचं डोकं विचाराने भंडावून जायचं. ती मात्र त्याच्या मनातले सारे विचार न सांगता ओळखते. घरातल्या प्रत्येकाला सबुरीने घ्यायला सांगते.

लेक जवळ येऊन म्हणालाच, "पप्पा ,नकोच ती गाडी.. डिझेलची झंझट.  मी पक्याच्या गाडीवरुन  जात जाईन. 

मुलगी म्हणाली,"पप्पा,मी ठरवलंय,स्वअभ्यास  करायचा. क्लासला  जाण्यायेण्याचा वेळही वाचेल."

आई पुढे आली,म्हणाली, "बाळा,सुनेने युट्युबवरुन  तासभर देवाचं दर्शन  घडवून आणलं मला. आताशी प्रवासाची दगदग सहन  होत नाही रे.  जे जाताहेत त्यांना जाऊदे.  मी इथुनच नमस्कार करते."

तो चिंतामुक्त होऊन नुकतच  भांडी घासून आल्यामुळे  पोटावर चिंब झालेल्या  विटक्या गाऊनमधल्या  त्याच्या बायकोकडे बघतो.  या विटक्या गाऊनमधे  ती त्याला कैक पटीने  सुंदर दिसते.

उत्तम लेखकांच्या  कथा आणि कथामालिका वाचण्यासाठी इथे क्लिक करा.