Ritbhatmarathi

Search
Close this search box.

 ॲड.अश्विनी सचिन जगताप

अशोकराव काळे वकील गावातील एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व .मालतीबाई,काळे वकिलांच्या सुविद्य पत्नी. काळे वकिलांचा सुरुवातीचा काळ फारसा बरा नव्हता.सुनीता, सुरेश आणि अनिता अशी काळे वकीलांची तीन मुलं. सुनिता दिसायला देखणी तसेच अभ्यासातही हुशार होती. त्यानंतर जन्माला आलेला सुरेश,मुलगा म्हणून थोडासा लाडवलेला तरीही अनुवंशिकतेने आलेली हुशारी त्याच्याकडेही होती. त्यानंतर जन्माला आली अनिता. रंग रूप अगदी साधारण ,जराशी जास्तच सावळी आणि दुर्दैवाने एका पायाने थोडीशी अपंग.सावळी असली तरी अनिता नाकीडोळी नीटसं होती. तिचा जन्म झाला आणि काळे वकिलांच्या प्रगतीला वेग आला. त्यामुळेच की काय वकिलांचा तिच्यावर विशेष जीव होता. तिन्ही भावंडे काळे वकिलांना अण्णा म्हणायची. आई आणि अण्णांची अनिता जरा जास्तच लाडकी होती.सगळी मुलं स्वतः चालत ,धावत शाळेत जायची, त्यावेळी अनिताला अपंग असल्याकारणाने त्यांच्यांंसोबत जाता यायचं नाही. तिला फार वाईट वाटायचं .मग ती शाळेत जायचं नाही म्हणायची. यावर आण्णांनी एक मस्त तोडगा काढला ते रोज अनिताला पाठकुळीवर बसवायचे आणि जवळच असलेल्या शाळेत घेऊन जायचे तिला फार आनंद व्हायचा. नंतर आण्णांनी कार घेतली पण तिला आण्णांच्या पाठीची सर नव्हती आणि तिला बसायला आण्णांची पाठच खूप आवडायची. अगदी चौथी पाचवीला जाईपर्यंत ती आण्णांच्या पाठीवर बसून शाळेला जायची. अभ्यासात मात्र अनिता ,सुनीता आणि सुरेश पेक्षा थोडी जास्तच अव्वल स्थानी होती.तिच्या हुशारीमुळे आणि आई -आण्णांचा तिच्यावर असलेल्या जास्त जीवामुळे सुनिता आणि सुरेश तिचा राग राग करायचे. सुनिताचे तर तिच्याशी कधीच पटले नाही. अनिता मात्र सगळ्यांशी जुळवून घ्यायची.           

              तिन्ही भावंड हळूहळू मोठी होत होती. सुनिता लग्नाला आली तशी सुनिताला खूप मोठी मोठी स्थळ सांगून यायला लागली. त्यातल्याच एका अतिश्रीमंत मुलाशी अण्णांनी सुनिताचे लग्न थाटामाटात लावून दिले. हळूहळू दिवस जात होते आण्णांनी सुरेशचेही लग्न करायचे मनावर घेतले .आण्णांची परिस्थिती आता चांगलीच सुधारली होती. 30- 40 एकर शेती , गावात भला मोठा वाडा आणि एकुलता एक मुलगा यामुळे सुरेशला चांगली स्थळ चालून आली आणि संगीता लक्ष्मीच्या पावलाने आण्णांच्या घरी सून म्हणून आली.संगीता नक्षत्रासारखी देखणी ,शिकलेली आणि सगळ्याच गोष्टींत पारंगत असलेली होती. आण्णांना आता काळजी लागली होती ती फक्त अनिताची. अनिताला काही चांगलं स्थळ सांगून येत नव्हतं आणि आण्णांना काही कसल्या बसल्या घरी तिला द्यायचं नव्हतं. शिक्षण पूर्ण झालं तशी अनिता एका शाळेत शिक्षिकेचे काम करू लागली.त्याच शाळेत अनिल नावाचा एक मुलगा नुकताच शिक्षक म्हणून रुजू झाला होता. ज्या रंगरूपामुळे अनिताला सगळ्यांनी हिणवले होते,तोच रंग , तेच रूप अनिलला भावले. हळूहळू दोघांची छान मैत्री झाली.अनिताने अनिलबद्दल सगळे काही जाणून घेतले. अनिल अनाथ होता.एका अनाथाश्रमात राहून त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि आता नुकताच तो त्याच्या पायावर उभा राहिला होता. याच गोष्टीमुळे अनिता त्याच्या प्रेमात पडली. पण अण्णांना ही गोष्ट पटणार नाही, अण्णा ही गोष्ट कधीच मान्य करणार नाहीत हे अनिताला माहिती होतं आणि म्हणूनच एके दिवशी पूर्ण विचारांती तिने चिठ्ठी लिहून घर सोडले.

प्रिय आण्णा,

       आण्णा मला माफ करा. माझ्याच शाळेतील एका अनाथ मुलाशी मी लग्न करत आहे. कोणत्याही प्रकारे श्रीमंतांच्या घरात जाऊन मला माझा स्वाभिमान गहाण ठेवून जगता येणार नाही आणि म्हणूनच मी गरीब असला तरी मला स्वाभिमानाने जगू देईल अशा अनिलशी  लग्न करत आहे. आईची आणि स्वतःची काळजी घ्या मला तुमची आठवण येत राहील. जमल्यास मला नक्की माफ करा.

 तुमचीच,

अनु.

          आण्णांनी चिठ्ठी वाचली आणि आण्णा धाडकन खाली कोसळले. आण्णांचा जीव की प्राण असलेली अनिता आज घर सोडून गेली. या गोष्टीतून सावरायला आण्णांना कितीतरी वर्ष लागली. अनिताच्या लग्नाला आता नऊ वर्षे झाली आणि आण्णा अचानक खूप आजारी पडले. शेवटच्या घटका मोजत असताना आण्णांना अनिताची आठवण येत होती,शेवटी त्यांनी सुरेशला सांगून तिला बोलावून घेतले. निरोप मिळताच अनिता, अनिल आणि त्यांची छोटीशी परी आण्णांना भेटायला निघाले.तिला आनंदही होत होता आणि दुःखही. एवढ्या वर्षानंतर ती पहिल्यांदा आण्णांना, आईला भेटणार होती पण आण्णांचा सहवास आता तिला जास्त वेळ लाभणार नव्हता.शेजारच्याच गावात असलेल्या आपल्या माहेरी जात असताना तिला तिचं बालपण आठवलं.लहानपणी आण्णांच्या पाठीवर शाळेत बसून जाणारी अनु, थोडी मोठी होताच आण्णांचा कोट घालून ऑर्डर ऑर्डर म्हणणारी अनु आणि यावर काय मग वकिलीनबाई असं म्हणणारे आण्णा तिला डोळ्यासमोर दिसू लागले. तासाभरातच ती माहेरी पोहचली .वाड्यासमोर उभी राहताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला. आण्णा अशी हाक मारत ती घरात गेली. आजारपणामुळे आण्णा फारच अशक्त झाले होते त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज कुठल्या कुठे गेले होते. पण अनिताला पाहताच त्यांच्या त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर उमटली.त्यांनी तिला जवळ बोलावले. आण्णा- आई माझं चुकलं मला माफ करा असं म्हणून तिने आई आणि आण्णांचे पाय धरले. अनु बाळा तु चुकलीसच पण शेवटच्या क्षणी तुला न भेटता माझा पाय काही निघेना म्हणून तुला बोलावलं. अनिता परवाच तुझी ताई येऊन गेली सुरेश आणि सुनिता मध्ये कडाक्याचे भांडण झाले.सासरी गडगंज संपत्ती असलेल्या सुनीताला माझ्या संपत्तीतलाही समान वाटा हवा आहे, एवढेच नाही तर तिला वाटलं तू निघून गेलीस तर तुझा वाटाही तिलाच मिळावा. या गोष्टीला सुरेशने विरोध केला म्हणून ती त्याच्याशी भांडून निघून गेली .अनिता मी तुझे लग्न लावून दिले नाही, तू सांग तुला काय काय हवं .मी माझ्या नावावर असलेलं सगळं काही तुम्हा तिघा भावंडांच्या नावावर केले आहे.तू एकदा मृत्युपत्र वाचून घे तुला अजून काय हवं असेल तर मी द्यायला तयार आहे.तेवढ्यात

तिथे सुनिताही आली आणि अण्णांचं बोलणं मध्येच तोडत अनिताला ताडताड, नको ते बोलू लागली. इतके दिवस तुला आई आण्णा दिसले नाहीत. आई-आण्णांची इज्जत घालवली ,आम्हाला गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस आणि कशाला पाहिजे तुला आता आण्णांची ईस्टेट. तुला त्यांच्या ईस्टेटीतला एक रुपयाही मिळणार नाही.चल चालती हो इथून‌. आण्णांनी सुनीताला दरडावले तशी ती शांत झाली .अनिता म्हणाली आण्णा मला माफ करा, तुमची माफीच माझ्यासाठी खूप मोठी वाटणी आहे. त्याशिवाय द्यायचंच असेल तर मला तुमचा  कोट द्या. सुनिता आणि सुरेशने शरमेने मान खाली घातली. त्यांना आता कळले की अनिता आण्णांची नेहमीच का लाडकी होती. ती कधीच स्वार्थी नव्हती, तिला कधीच पैशाचा, श्रीमंतीचा मोह नव्हता.आणि म्हणूनच तिने अनाथ असलेल्या अनिलशी लग्न केले होते. आण्णांना पुन्हा एकदा आपल्या लेकीचा अभिमान वाटला. आण्णा म्हणाले भरल्या डोळ्यांनी तुझा संसार एकदा पाहू दे म्हणजे मी डोळे मिटायला मोकळा .अनिताने पटकन आण्णांच्या तोंडावर हात ठेवला. आण्णा तुम्ही इतक्यात आम्हाला सोडून नाही जाऊ शकत. आण्णा म्हणाले ,अनु तुझं घर पहायची खूप इच्छा होती, दाखवशील ?अनुने मानेनेच होकार दिला.

            अनिल,आई-आण्णा आणि अनिताला घेऊन आपल्या गावी आला. छोट्याशा चाळीत दोन खोल्यांमध्ये अनिताने आपला संसार थाटला होता‌. घर छोटं होतं पण सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवलेल्या होत्या. घरात गेल्या गेल्या आण्णांना फार प्रसन्न वाटले. समोरच टेबलवर त्यांना त्यांचा आणि मालतीबाईंचा फोटो दिसला. वकील बाबा म्हणून परीने हाक मारताच आण्णांना फार हसू आलं. त्यांनी परीला जवळ घेतलं.  कधीही पाहिलं नसलं, भेट झाली नसली तरीही अनिताच्या बोलण्यातून आई-आण्णांना ती चांगलीच ओळखत होती. दोन दिवस राहून लेकीचा आणि जावयाचा निरोप घेऊन आण्णा-आई परत आपल्या घरी आले. आज जातील की उद्या अशा अवस्थेत असलेले आण्णा तब्बल एक महिना जगले. आणि एका भल्या पहाटे अनु असा आवाज देत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सुरेशने सगळ्यांना कळवले.आण्णांचे सगळे क्रियाकर्म केले पार पडले, तेरावा झाला. अनिता जायला निघाली,तिने आण्णांचा कोट घेतला. पुढे येऊन ती म्हणाली दादा, ताई मला काहीही नको माझ्या वाट्याचं सगळं मी तुम्हा दोघांना देते. आई म्हणाली लहान असूनही तुमच्यापेक्षा जास्त समज आहे तिला आता कळलं की आण्णा तिच्यावर का जीव ओवाळून टाकायचे .

      सुनिता तिचे वाटणीचे कागद घेऊन तिच्या सासरी परत गेली. सुरेशही त्याच्या त्याच्या संसारात पुन्हा रमला. आण्णांच्या आठवणीने आईला सैरभैर व्हायचं तरीही ती तसेच दिवस काढत होती.आज आण्णांचा वाढदिवस होता,अनिताला आण्णांची फार आठवण येत होती.तिने आण्णांचा कोट छातीशी कवटाळला आणि मनसोक्त रडली, तेवढ्यात तिला कोटच्या खिशात काहीतरी असल्याचा आवाज आला तिने खिशात हात घातला आणि तिला कसली तरी चिठ्ठी सापडली. आण्णांनी अनिताच्या नावे 25 लाख रुपयाची एफडी करून ठेवली होती त्याचीच ती पावती होती. आता मात्र तिला अजूनच रडू आलं.तिने  दुसऱ्या खिशात हात घातला आणि तिला अजून एक शिट्टी सापडली.

            अनु बाळा मला माहिती होतं तू घरात, शेतात कसलीही वाटणी मागणार नाहीस पण तरीही एक बाप म्हणून माझं कर्तव्य मला पार पाडायला हवं. तुझ्या पायावर उपचार करता यावेत म्हणून मी तु लहान असल्यापासूनच थोडे थोडे पैसे बाजूला टाकत होतो. तू घर सोडून जाण्याच्या दोन दिवस आधीच मी तुझ्या पायावर कोणते उपचार करता येतील याची सगळी चौकशी करून आलो होतो. पैशांचीही जुळवाजवळ झाली होती पण तेवढ्यात तू घर सोडून गेलीस. त्याचा राग माझ्या डोक्यात राहिला आणि मी तुला किंवा घरच्यांना याबद्दल काहीच सांगितलं नाही. शरीरानं साथ सोडली तेव्हा मात्र मी बँकेत जाऊन त्या पैशांची तुझ्या नावाने एफडी केली. हे पैसे तुझेच आहेत ते तुझ्यापर्यंत पोहचावे एवढीच आशा होती. मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि म्हणूनच माझ्याकडून ही शेवटची भेट.

-आण्णा…

          अनिता निशब्द झाली.खरंच बाप,बाप असतो आपल्याला त्याच्यापेक्षा मोठं कधीच होता येत नाही. 

-सुरेखकन्या.

ॲड.अश्विनी सचिन जगताप.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *