वॉरेन बफे म्हणतात की यशाचे सर्वात मोठे माप म्हणजे तुमचा बँक बॅलन्स नाही, तो म्हणजे….

वॉरेन बफे :
वॉरेन बफे: यश आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खूप जास्त महत्त्वाची गोष्ट असते. प्रत्येक व्यक्ती यश मिळवण्यासाठी धडपड करत असतो. मग ते करिअर बद्दल असो, वियक्तिक आयुष्यातील असो किंवा कोणत्याही गोष्टीसाठी असो. यशस्वी होणे ही प्रत्येकाची सुप्त इच्छा असते.
प्रत्येकाची यशाची परिभाषा वेगवेगळी असते. आज आपल्या देशभरात असे अनेक लोक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करून यशाचे शिखर गाठले आहे. स्त्री आणि पुरूष यांनी असे कोणतेच क्षेत्र मागे ठेवले नाही ज्यात ते यशस्वी ठरले नाही.
आज अशाच एका यशस्वी उद्योजकाची यशाची परिभाषा आपण समजून घेणार आहोत ज्यांच्या संपत्तीचा आकडा पाहून आपले तोंड आश्चर्याने मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. आज शेअर बाजारात त्यांना ओळखत नाही असा व्यक्तीच नसेल आणि त्यांच्या टिप्स ऐकून कित्येकांनी अपार पैसा मिळवला आहे असे शेअर बाजाराततील सगळ्यात मोठे आणि यशस्वी गुंतवणूकदार म्हणजे वॉरेन बफे.
आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल वॉरेन बफे हे शेअर बाजाराततील खूप मोठे यशस्वी गुंतवणूकदार आहेत. बफे यांचे गुंतवणूक सल्ले इतके लोकप्रिय आहेत की त्यांचे सल्ले ऐकून लोक खूप पैसे कमावतात. त्यांनी आर्थिक गुंतवणुकीची वेगळीच सूत्रे जगासमोर मांडली आणि ती यशस्वी ठरली.
म्हणूनच आज त्यांना आर्थिक गणिततज्ञ मानले जाते. व्यवसायाचे उत्तम ज्ञान, कामाची समज आणि राहणी मानतील साधेपणा हेच त्यांच्या यशाचे श्रेय आहे. बफे यांची संपत्ती ११६ बिलियन डॉलर्स पेक्षाही जास्त आहे. बफे बर्कशायर हैथवेंचे सी.ई.ओ आहेत.
हेही वाचा
आईला तिचा निर्णय ऐकून लाज वाटली होती पण आज रिचा कर चालवते ७०० कोटींची कंपनी
रतन टाटांनी देखील अपयशातून यशाची शिखरे गाठली
अफाट संपत्ती असलेल्या बफे यांची यशाची परिभाषा ( मंत्र ) मात्र खूप वेगळी आणि सगळ्यांना उपयोगी पडेल अशीच आहे. त्यांच्या मते यश पैसा आणि लोकप्रियता किंवा बँकेतील पासबुक यावर अवलंबून नाही.
बफे आज इतके यशस्वी आहेत की, त्यांच्यावर एक पुस्तक लिहले गेले आहे. त्या पुस्तकाचे लेखक एलिस श्रीएडर असून पुस्तकाचे नाव द स्नोबोल : वॉरेन बफे एंड द बिझनेस ऑफ लाईफ हे आहे. त्यांच्या यशाबद्दल २००१ मध्ये जॉर्जिया विद्यापीठात त्यांना काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले असता ९१ वर्षीय बफेट म्हणाले :
जेंव्हा तुम्ही माझ्या वयात याल आणि वास्तविक जीवनात आपले यश मोजल की तुम्ही किती लोकांवर प्रेम केले आहे, अजून किती लोकांवर प्रेम करायचे राहिले आहे आणि त्यातील किती लोक तुमच्यावर प्रेम करतात यावरूनच ते ठरेल. कारण मी अशा अनेक लोकांना ओळखतो ज्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि रोज त्यांच्या यशाचे कौतुक करणारी पत्र त्यांच्याकडे येतात पण जगात कोणीही त्यांच्यावर प्रेम करत नाही. हे या गोष्टीचे प्रमाण आहे की तुम्ही तुमचे जीवन कसे जगले आहे.
कारण प्रेम विक्रीसाठी नाही. त्यामुळे प्रेम खरेदी करता येत नाही. तुम्ही लोकांवर प्रेम करा म्हणजे तुम्हाला प्रेम मिळेल. हाच एक प्रेम मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. तुमच्या जवळचा अफाट पैसा तुम्हाला त्रास देईल. पैशाने प्रेम विकत घेता येईल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे होणार नाही, ते केवळ अशक्य आहे. लोकांना तुम्ही जितके प्रेम देता तितकेच ते तुम्हाला मिळते.
तुमच्या बँकेत कितीही पैसा असला तरीही तुम्ही आयुष्यभर किती लोकांवर प्रेम केले आणि किती लोक तुमच्यावर प्रेम करतात यावरूनच तुमची संपत्ती किंवा तुमचे यश ठरते. जवळ पैसा असून चालत नाही, कारण पैशाच्या जोरावर प्रेम विकत घेता येतच नाही त्यामुळे तुमच्यावर प्रेम करणारी तुमची जवळची माणसे यावरूनच तुमचे यश ठरते. हेच बफेट यांचे विचार सांगतात.
त्यामुळे यश मिळाले म्हणून हुरळून जाऊ नका. आपल्या जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. ज्या लोकांच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला ते मिळाले आहे त्यांना कधीही अंतर देऊ नका, स्वतः पासून लांब करू नका. सतत त्यांना प्रेम देत रहा आणि प्रेम मिळवत रहा. कारण पैसा शाश्वत नसतो. कोण कधी रांकाचा राव आणि रावाचा रंक होईल सांगता येत नाही.
पण आपल्यावर प्रेम करणारी माणसे कधीही सोडून जात नाहीत, दगा देत नाहीत. त्यामुळे ती माणसेच आपली खरी संपत्ती असतात आणि यशाचे कारण सुद्धा. त्यामुळे त्यांना जपा जितकी तुमच्यावर प्रेम करणारी माणसे जास्त तितकेच तुम्ही यशस्वी ठराल.
===============