Skip to content Skip to sidebar Skip to footer

व्रात्य

©️®️सायली.

वर्षा आपल्या दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी निघाली होती. तिच्या सासुबाईंनी बरेच पौष्टिक पदार्थ आणि खाऊ तिच्यासोबत बांधून दिला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या, “सावकाश जा आणि लवकर गोड बातमी कळवा आम्हाला. वाट पाहतो आहोत बरं आम्ही!”

“हो. सासुबाई.” वर्षा आपल्या सासऱ्यांच्या पाया पडली.

हे पाहून तिचा चार वर्षांचा मुलगा वेद म्हणाला, “अगं आई, या म्हातालीच्या पण पाया पड ना..”
हे ऐकून वर्षाच्या सासऱ्यांनी आपल्या नातवावर हातातली काठी उगारली.

“वेद, असं म्हणतात का आपल्या आजीला? सॉरी म्हण आधी.” वर्षा त्याच्या पाठीत धपाटा घालून म्हणाली.

“अगं आई, तूच म्हणतेस ना बाबांना? तुमची आई आता म्हातारी झाली..आता तिच्याने काही होत नाही म्हणून?” वेद रडवेला होत म्हणाला.
हे ऐकून वर्षाला कळेना, हसावं की रडावं? ती रागाने वेदकडे पाहू लागली.
पण झटकन सासुबाईंना नमस्कार करून म्हणाली, “येते आई “आणि खाऊ की गिळू या नजरेने पाहत ती वेदला घेऊन बाहेर आली.

बाहेर वर्षाचा नवरा विनय गाडीत बसून तिची वाट पाहत होता. गडबडीने वर्षा आणि वेद गाडीत बसले. तसे दारात उभे राहून सासुबाई आणि सासरे गाडी दिसेनाशी होईपर्यंत दोघेही हात हालवत राहिले.

गाडी दूर गेली आणि अचानक सासरे हसू लागले.
“आता काय झाले?” वर्षाच्या सासुबाई चिडून म्हणाल्या.
“अगं, तुझी सून तुला म्हातारी म्हणते, म्हणून हसू आले इतकेच.” सासरे आपले हसू आवरत आत गेले.
“हसा..हसा. वर्षा अवघडलेल्या अवस्थेत आहे म्हणून मी काही बोलले नाही. नाहीतर चांगलेच फैलावर घेतले असते तिला.” सासुबाई मागोमाग आत येत म्हणाल्या.

इकडे वर्षा वैतागली होती. “अहो, काय करावे या मुलाचे? अगदी व्रात्य झाला आहे. कुठेही काहीही बोलतो.”

“अगं आई, तूच आजीला म्हाताली म्हणतेस ना? म्हणून म्हणालो मी.” वेद निरागसपणे म्हणाला.
हे ऐकून वर्षाने पुन्हा वेदच्या पाठीत धपाटा घातला.

“अगं, त्याला का मारतेस? लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. त्यांच्या पुढे जपून बोलावं नेहमी. हे लक्षात ठेव आता.” विनय.

साधारण तासाभराचा प्रवास होता. गाडीत नुसत बसून वेद लवकरच कंटाळला. गाडीच्या खिडकीतून हात बाहेर काढ. कुठे दरवाज्याचे लॉक उघड.. असा त्रास दिल्यावर बाबा ओरडल्याने, आजीने दिलेला बिस्कीटपुडा खाऊन अखेर झोपून गेला.

माहेरी वर्षा आणि विनयचे छान स्वागत झाले. बऱ्याच दिवसांनी जावईबापू आल्याने सारेजण विनयची सरबराई करण्यात गुंतले तर वेदने शेजारी- पाजारी जाऊन आपल्या बडबडीने सर्वांची छान करमणूक केली.

संध्याकाळी विनय सर्वांचा निरोप घेऊन परत गेला. तसा वेद रडू लागला. त्याला समजावताना सर्वांच्या नाकी नऊ आले. मग सर्वांना त्रास देऊन झाल्यावर एकदाचा झोपून गेला.

दिवस वेगाने जात होते. शेजारून रोज वेदच्या काही ना काही तक्रारी घरी येत होत्या. त्यामुळे वर्षा वैतागली होती.

एक दिवस वर्षाच्या पोटात दुखु लागले, म्हणताना तिला लागोलाग दवाखान्यात हलवले. सर्वांची धावपळ झाली. वेद आणि त्याची मामी दोघेच घरात राहिले. आपल्या जवळ कोणीच नाही हे पाहून वेद एका कोपऱ्यात फुरंगटून बसला.
बऱ्याच वेळाने मामीचे लक्ष त्याच्याकडे गेले.

“वेद, काय झाले बाळा?” मामी त्याला जवळ घेऊन म्हणाली.

“मामी, मी एकटाच बसलो आहे इथं आणि सगळे बाळाला आणायला निघून गेले.” वेद गाल फुगवून म्हणाला.

“मी आहे ना तुझ्यासोबत? सांग बरं, काय हवे आहे तुला?” मामी त्याला पुन्हा जवळ घेत म्हणाली.

“तू नतो मला. आई म्हणते, मामी चांगली नाही म्हणून..” असे म्हणत वेद उड्या मारत बाहेर गेला आणि मामी मात्र विचार करत राहिली, ‘ताई असे का बरं म्हणत असतील माझ्याबद्दल?’

पाच दिवसांनी वर्षा आपल्या गोड मुलीला घेऊन घरी आली. तिचे छान स्वागतही झाले आणि मामी सारे काही विसरून पुन्हा कामाला लागली.

वेद मात्र मुलगा बाळ नाही म्हणून खट्टू झाला. पण गोबऱ्या गालाची आपली इवलीशी बहीण पाहून खुशही झाला. पण मध्येच येऊन बाळाला त्रास देऊ लागला. तिचे गाल ओढू लागला. त्यामुळे घरचे सारेच वैतागले.

दोन दिवसांनी वर्षाच्या सासुबाईंनी विनयसोबत डिंकाच्या लाडवांचा डब्बा पाठवला आणि सोबत ‘आम्ही पंधरा दिवसांनी बाळाला पाहायला येऊ.’ असा निरोपही पाठवला.
वर्षाला आनंद झाला. पण विनयला ती म्हणाली, “वेद खूप मस्ती करतो. त्याला सोबत घेऊन जा नि पंधरा दिवसांनी आई -बाबांच्यासोबत पुन्हा पाठवून द्या.”
हे ऐकून वेदने ‘इथेच राहणार म्हणून’ खूप धिंगाणा घातला. त्यामुळे विनय एकटाच निघून गेला.

आता रोज आठवणीने लाडू खायचे म्हणून वर्षाने लाडवांचा डब्बा आपल्या कॉटखाली सरकवून ठेवला. नेमके हे वेदने पाहिले.

नंतर दोन दिवसांनी वर्षाला लाडवांची आठवण झाली, म्हणून तिने डब्बा बाहेर काढला. तर त्यातले बरेचसे लाडू कमी झाले होते. खाल्ले असतील कोणीतरी म्हणून तिने दुर्लक्ष करून डब्बा पुन्हा ठेऊन दिला.
संध्याकाळी डब्बा बघताना हीच तऱ्हा. ‘आता विचारावे तरी कोणाला?’ म्हणून ती गप्प बसली.

दुसऱ्या दिवशी दुपारी कसल्याशा आवाजाने वर्षाला जाग आली. तर वेद कॉट खालून हातात लाडू घेऊन बाहेर पडत होता.
“अस्सं आहे होय? वेद, लाडू हवा तर सांगायचे आम्हाला. असे चोरून का घेत होतास लाडू?” वर्षा त्याला रागवू लागली.

“ते आजीने सांगितले होते ना, हे लालू फक्त
तुलाच द्यायचे म्हणून? मग मला वाटलं मला कोणी देनाल नाही.” वेद कसाबसा म्हणाला.

“वन्स, का रागावता आहात त्याला?” वर्षाची वहिनी आवाज ऐकून आत आली. तशी वर्षाने सारी हकीकत तिला सांगितली आणि पुढे म्हणाली, “आता तुला काही लागलं तर मामीला सांग. ती देईल तुला.”

तसा वेद रडू लागला. ” नको आई. तूच सांगितलेस ना? ही मामी चांगली नाही म्हणून? तिच्याकडून मला काही नतो .”
हे ऐकून वर्षाला काही सुधरेना. ‘मी असे कधी वेदला सांगितले?’ हे तिला आठवेना.

“वन्स, अहो पाच -सहा दिवसांपूर्वी हा असंच म्हंटला होता.” वहिनी थोड्या रागानेच म्हणाली.

अचानक वर्षाला काही आठवले. “अगं, तुला नव्हते म्हंटले मी. ते…विनयच्या मामी मोठया चालू आहेत. त्यांना म्हंटले होते मी. “वर्षाने आपली जीभ चावली.
“ह्याला फक्त एकच मामी माहिती आहे आणि ती म्हणजे तू. म्हणून त्याचा तसा समज झाला असावा. सॉरी गं वहिनी, या मुलासमोर काही बोलून फायदा नाही. अर्थाचा अनर्थच होतो नेहमी. आपलीच लाज निघते गं अक्षरशः” वर्षाने आपल्या कपाळावर हात मारून घेतला.

हे ऐकून मामीने वेदच्या पाठीत एक हलकासा धपाटा घातला. त्यावर आई काही बोलत नाही हे पाहून वेदने भोकाड पसरले आणि मामीने मारले म्हणून तो रडत रडत आजीकडे जाऊ लागला. आता वर्षाला काय करावे कळेना! तर मामी आपल्या सासुबाईंना समजवायला वेदच्या मागे धावली आणि वर्षा मात्र केविलवाण्या नजरेने त्या दोघांकडे पाहत राहिली.

समाप्त.

================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.