Skip to content Skip to sidebar Skip to footer

विसर्जन

सौ.प्रतिभा परांजपे

दोन दिवस पावसाची संततधार लागली होती. आज मात्र सकाळ झाली तीच, छान सूर्यदर्शनाने. हवेमध्ये किंचित गारवा आला होता.
गौरी ,”अथर्वला रात्री झोपताना टोपड घालून घे बाई हवा पहा ना कशी गारठली आहे लहान मुलं अंगावर जराही पांघरून राहू देत नाही तेव्हा जरा लांब बाह्यांचंही घाल.” आजींच्या गोड सूचना येत होत्या.
रात्री गौरीच्या सासूबाई शोभाताईंनी कालनिर्णय पाहून “श्रावण संपत आला उद्या पिठोरी आहे “असे म्हटले.
शोभाताई आणि आजीं दोघींनी उपवास ठेवला.
“गौरी तू पुढच्या वर्षीपासून कर उपवास , अथर्व अजून दूध पितो म्हणून तुला उपास झेपणार नाही” अशी गोड ताकीद तिला मिळाली.
संध्याकाळी सासुबाईंनी रोहित व अथर्व ला ओवाळून,खीर पुरी करून,”अतीत कोण” विचारत पिठोरी साजरी केली.
पण त्याच वेळेस सुमन आजी मात्र आपल्या खोलीत निघून गेल्या.
गौरी ला त्यांच्या या वागण्या चा काही अर्थ उमजला नाही . पण आजी थकल्या असतिल असे तिला वाटले.

गौरीला सण, उपवास या सगळ्याची खूप हौस, सासर ही तसेच हौशी मिळाले.
घरात आजेसासू, सासू-सासरे नवरा रोहित व ती एवढेच जण मोठी नणंद नंदा आपल्या सासरी सुखात .

गौरी आणि रोहित च्या लग्नाला दोन वर्षे झाली .त्यातच अथर्व पण झाला, त्यामुळे इकडच्या रीतीभाती ,कुळधर्म गौरी ला नीट से कळले ही नव्हते.
माहेरी गौरी गणपती अगदी दणक्यात साजरे होत. गणपतीच्या आगमनाची सगळी तयारी गौरी आणि तिचा भाऊ देवेश दोघे मिळून आनंदाने करत. दरवेळेस गणपतीसाठी नव्या तर्हे चे मखर तयार होत असे.
गौरी रोज नवनव्या रांगोळ्या काढी,आई नित्य नवाप्रसाद बनवत असे .
त्याशिवाय कॉलनीतला सार्वजनिक गणपतीही असे. तिथे रोज आरत्या कार्यक्रमाची रेलचेल असे.
दहा दिवस खूपच छान उत्सवाचं वातावरण असे.
लग्नानंतर लवकरच गौरी ला दिवस गेले. गौरी ला सातवा महिना लागताच ,सासरी डोहाळ जेवण झाले त्यानंतर ती माहेरी गेली. अथर्व दोन महिन्यांचा झाल्यावर ती दिवाळी त सासरी परत आली .
रोहितला तिने ‘आपल्याकडेही गणपती स्थापना करूया कां’ असे विचारले, तेव्हा त्याने आपल्याकडे गणपती नाही असे मोघम सांगितले.
सकाळी गौरीने सासू बाई शोभा जवळ विषय काढला.” आई आपण गणपतीची स्थापना का नाही करत? करू या न अथर्वसाठी?/
“अगं हो– पण आजींना विचारावं लागेल” आपल्याकडे भाऊजी गेल्यापासून गणपती स्थापना नाही करत.
“मी विचारू आजींना “.
,”हो विचार सकाळी, पण त्या म्हणतील तसं-“–

हा सगळा संवाद आतल्या खोलीत झोपलेल्या सुमन आजींच्या कानावर येत होता. पडल्या पडल्या त्या विचार करत होत्या, त्यांचे मन परत हो -की- नाही च्या झोक्यावर जाऊन बसले.

झोका मागे मागे जाऊ लागला.
माधव आणि अनंत,दोनच मुलं होती सुमन आणि केशवराव यांना. माधव मोठा शांत समजूतदार तर, अनंत मस्तीखोर, बडबड्या पण् खूप उत्साही. प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साहाने भाग घेणारा.
अगदी होळी असो वा दिवाळी प्रत्येक सणाची उत्साहाने तयारी करण्यात पुढे.
सार्वजनिक कार्यक्रमातही अगदी वर्गणी गोळ्या करण्यापासून महाप्रसादाच्या भोजनाच्या तयारीत जातीने लक्ष घालणारा. त्यामानाने माधव आपला अभ्यास बरा नि घर , त्यामुळे अनंताची सर्वांना गरज भासत असे.
घर सुखाने भरलेले होते पण– नशिबाने ते सुख हिरावून घेतले.

सुमन ताईंना आठवले ,ते गणपतीचे दिवस होते. दहा दिवस खूप आनंदात पार पडले. विसर्जनाचा दिवस आला, सुमनताईंनी 21 उकडीच्या मोदकांचा नैवेद्य केला, आरती झाली,”पुनरागमनायच “म्हणून गणपती विसर्जनाला निघाले.

“आई मी घरी आलो की पोटभर फक्त मोदकच खाणार आहे ” असे सांगून सर्वांबरोबर अनंत गणपतीच्या विसर्जनाला निघाला.

सर्वजण आपले आपले गणपती घेऊन गावाबाहेरच्या तळ्यात विसर्जनाला गेले.
तळ्यावर पोहोचल्यावर परत आरती झाली . “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ” म्हणत सर्वांनी आपापले गणपती डोक्यावर घेत तळ्यात उतरले. अनंता ही त्यांच्यात होता, त्याने “जय गणेश” म्हणत पाण्यात बुडी मारली.

सर्वजण गणपती विसर्जनात लागलेले होते. त्यामुळे कोणाचेच कोणाकडे लक्ष नव्हते, बराच वेळाने काठावर अनंता दिसला नाही तेव्हा माधवच्या लक्षात आले, आणि एकच गोंधळ उडाला. अनंताची शोधा शोध सुरू झाले पण तो सापडला नाही. ज्या जागी त्याने गणपती विसर्जन केले होते तिथे फुलांचा हार तरंगताना दिसत होता .
सर्वजण घाबरले, रात्रभर शोध घेतला पण हाती काही आले नाही .
दुसरे दिवशी अनंताचे शरीर पाण्यात तरंगत वर आले.अनंताला जणू जलसमाधी मिळाली. सोमणांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला .
त्या वर्षा नंतर गणपती ची स्थापना सोमणाच्या घरात बंद झाली.

दरवर्षी श्रावण लागला की सुमन आजींच्या मनात ही आकाशातल्या काळ्याभोर ढगांप्रमाणे आठवणींचे घन भरून बरसू लागायचे.

काळ कोणासाठी ही थांबत नाही. पुढे माधवचे लग्न झाले त्याचा संसार मार्गी लागला. केशवराव ही गेले. माधवला एक मुलगी नंदा आणि मुलगा रोहित झाला.
त्यावेळेस माधवला शोभाने विचारले “आपण गणपती बसवायचा कां?” त्यावर माधवने “आपल्याकडे लाभत नाही”, असे म्हणून सर्व हकीकत सांगितली, तेव्हा मग शोभाने पण नाद सोडला.
आणि आता, रोहितला अथर्व म्हणजेच सुमनआजींना पणतू झाला. नात सून उत्साही आहे, तिलाही वाटतं गणपती स्थापना करावी. काय हरकत आहे? डोळे पुसत आजी विचार करू लागल्या. किती दिवस आपण आपले दुःख उगाळायचे ?
जाणारा तर गेला. त्यांच्या जाण्याचे दुःख रहाणार आपल्या मनात, पण आलेल्यां चा आनंद का नाही साजरा करावा.
हो म्हणावे का उद्या गौरीला? तिची इच्छा आहे तर होऊ द्यावे. हा अथर्वही अनंत चतुर्दशीला झालाय. जणू अनंताच परत आला असे त्याला पाहिल्यापासून वाटते. होऊ द्यावे मुलांच्या मनाप्रमाणे
आजींच्या होकाराने घरात उत्साहाचे वातावरण तयार झाले. गौरीने खूप उत्साहाने सर्व मांडणी केली, दोन्ही वेळा पूजाअर्चा व्यवस्थित व्हायची.आरती कधी रोहित तर कधी माधव करत. शोभाने दोन्ही वेळ प्रसादाची रेलचेल केली. अथर्वसाठी हे सर्वच नवं होतं त्याला खूप कळत नसलं तरी आरतीला टाळ्या वाजवून तोही सहभागी व्हायचा.
सुमन आजींनी जरी परवानगी दिली तरी मनातली भिती पूर्णपणे गेली नव्हती . काही अघटित तर होणार.नाही न, ही मनात सतत भीती,शेवटपर्यंत सर्व नीट पार पडू दे रे देवा अशी रोज रात्री झोपताना त्या प्रार्थना करत.
एक दिवस गणपती ला महाअभिषेक करून , अथर्वशीर्षाचे २१ वेळा आवर्तनही केले.

पाहता पाहता विसर्जनाचा दिवस आला. रोहित पेढे व हार घेऊन आला. गौरीने पेढ्यांचे साच्यात घालून मोदक तयार केले. शोभाताईंनी दूर्वा आणि जास्वंदाच्या फुलांचा हार तयार केला आणि आरतीची तयारी केली.
आरती करायला माधव नी हातात तबक घेतलं ,सुमन आजींच्या हृदयाची धडधड क्षणाक्षणाला वाढत होती.आरती संपवून गणपतीला” पुनरा गमनायचं” म्हणत हलवलं तशी आजींच्या डोळ्यात पाणी आलं.

गणपतीला घेऊन सर्व बाहेर बागेत आले, अनंताच्या झाडाखाली जागा स्वच्छ करून एका मोठ्या घंगाळात पाणी ठेवले होते त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून समोर रांगोळीने सुशोभित केले होते.
आता गणपती विसर्जन करायचे म्हणताच गौरीने आजींना बोलावले एकीकडून अथर्वचा हात लावून दुसरीकडे आजी ना धरायला सांगितले, व गणपतीचे विसर्जन केले, काही अघटीत न होता व्यवस्थित पार पडले”
हे सर्व पाहून
सुमनआजींनी त्या विसर्जनाच्या घंघाळात मनात साचलेल्या दुःखाचे व भितीचे ही विसर्जन केले.”
—————————————-लेखन. सौ.प्रतिभा परांजपे

=====================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: