वेळेचं दान

©️®️ सौ. गीता गजानन गरुड
एकदाच्या परीक्षा झाल्या नि चंगूच्या शाळेला सुट्टी पडली. किती सारे प्लान होते चंगूचे. सकाळी उठून सायकल चालवत दूरच्या पाड्यावर जायचं. तिथे फुलणाऱ्या रानफुलांचे, चरावयास येणाऱ्या शेळ्यामेंढ्यांचे फोटो काढायचे. मेंढपाळ आजोबांकडून बासरी वाजवायला शिकायची, दुपारी मित्रांसोबत बैठे खेळ खेळायचे, संध्याकाळी क्रिकेट, बेडमिंटन पण उन्हाची काहिली वाढू लागली नि चंगू बिच्चारा आजारी पडला.
आईच्या ऑफिसमधे नव्या प्रोजेक्टची धामधुम सुरू होती तर पप्पा महत्वाच्या बिझनेस मिटींगसाठी दिल्लीला गेले होते. तशी ती दोघंही मोबाईलवरनं चंगूची खुशाली घेत होती.
चंगूचा ताप उतरेना तसं डॉक्टरांनी त्याला इस्पितळात भरती करण्यास सांगितलं. हे ऐकून चंगूच्या आईचा जीव नुसता अळूमाळू झाला. कामात तिचं लक्ष लागेना. चंगूच्या आईची आईही चंगूच्या दिमतीला येऊन थांबली. दोघी आज्यांनी चंगूच्या आईला धीर दिला. “अगं,आम्ही आहोत चंगूकडे. विशेष काही लागलं तर तुला फोन करुच.” काळजावर दगड ठेवून चंगूची आई ऑफीसला जायची.
दोघीतली एक आज्जी चंगूसोबत इस्पितळात थांबायची. चारेक दिवसांत चंगूला बरं वाटू लागलं पण प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. त्यांत सुधारणा होईस्तोवर डॉक्टर काही चंगूला सोडणार नव्हते. दुपारी आज्जीला डुलकी लागायची. चंगूचा वेळ जाता जात नसायचा. मग तो आजुबाजूला असणाऱ्या रुग्णांच्या खाटीजवळ जायचा नं त्यांच्याशी बोलायचा. शाळेतल्या गंमतीजंमती सांगायच्या. तिथले बरेच रुग्ण त्याचे मित्र झाले.
चंगूला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला तेंव्हा इतर रुग्ण मात्र चंगू आपल्याला परत भेटणार नाही म्हणून किंचीत नाराज झाले. त्यांनी चंगूला बिस्कीटं,फळं दिली.
चंगू घरी आल्यावर चंगूचे मित्र त्याला बघायला आले. सूरज म्हणाला,”सुट्टीतले साताठ दिवस चक्क वाया गेले तुझे. आम्ही कित्ती खेळलो ठाऊकै. त्या पुर्वेकडच्या डोंगरावरसुद्धा जाऊन आलो. भरपूर करवंद, जांभळं खाल्ली.”
दिनू सूरजवर डाफरला,”अरे तू चंगूला बघायला आलास की आपलीच शेखी मिरवायला! गेला असशील अमेरिकेला पण सध्या कोणत्या कामासाठी आला आहेस! चंगूची विचारपूस करायला ना, मग याचे भान ठेव जरा.”
चंगू म्हणाला,”अरे शेखीबिखी नाही. तो आपला सहज म्हणाला असणार. मित्रांत एवढं चालतंच. मी मात्र तिथे अजिबात बोअर झालो नाही. तिथे एक काकू होती, जिच्या पोटात दुखत होतंं. एक आजोबा होते ज्यांचं बीपी सतत वाढायचं. एका काकांना पाठीचा आजार होता.”
“ए चला ना रे खेळायला जाऊ आपण. खालीच बेसमेंटमधे खेळू काहीतरी. उन्हात नकोच.” दिनू म्हणाला.
“माझ्या डोक्यात काहीतरी शिजतय.” चंगू म्हणाला.
“डिश नि चमचे घेऊन येऊ का?” सूरजने विचारलं.
“गप रे. पीजे नको मारुस. मी सिरयसली बोलतोय. इस्पितळात मला सोबतीचं महत्व कळलं. माझी आजी माझ्यासोबत होती म्हणून. तीही नसती येऊ शकली तर! तर मी एकटाच राहिलो असतो तिथे. इस्पितळातच काय इथे आपल्या सोसायटीतदेखील कित्येकजणं एकेकटी रहातात. काही नं काही कारणं असतात त्यामागे.”
” अरे हो पण आपण काय करु शकतो त्यांच्यासाठी?” स्वरांगीने विचारलं.
“आपण आपल्या फावल्या वेळातील काही वेळ अशा दोस्तांसाठी घालवायचा ज्यांना एकटंएकटं वाटतय म्हणजे जे एकटे आहेत. त्यांची बारीकसारीक कामं करुन द्यायची. त्यांच्याशी बोलायचं.”आपल्या पालकांची परवानगी घ्यायची नि अशा एकाकी पडलेल्यांसोबत वेळ घालवायचा.”
“ही तर फारच छान कल्पना आहे,” स्वरांगी चित्कारली
“पण त्यांना आवडलं नाही तर उगाच ओरडा खावा लागेल आपल्याला,” दिनूने शंका मांडली.”
“छ्या! आधीपासून नकारघंटा नको बडवूस.” चंगू म्हणाला.
त्यादिवसापासनं चंगू व त्याच्या दोस्तंमंडळींनी एकटे रहाणाऱ्या लोकांची यादी तयार केली. नेमून दिल्यानुसार एकेकाकडे जाऊ लागली.
सूरज चारशेपाच मधल्या पत्रेकाकांशी बुद्धीबळ खेळताखेळता आपणही बऱ्याच नव्या चाली शिकला.
एकशेदोन मधल्या भिडे काकूच्या गोष्टींना स्वरांगी बसली.
तीनशेपाचमधल्या नानांच्यासोबतीला चंंगू बसला आणि नानांनी मुलांना काही जादूचे प्रयोगही शिकवले.
दोनशेसहामधे विदुलाकाकू रहायची. तिचं वर्षाचं बाळ सारखं चिडचिड करे, रडत राही. ही बच्चेकंपनी त्या बाळाशी खेळायला जाऊ लागली. विदुलाकाकूला तिची स्वैंपाकाची कामं करायला वेळ मिळू लागला नं दादाताईंशी खेळायला मिळाल्यामुळे बाळाचीही किरकिर थांबली. बाळाच्या बाबांनी तर बच्चेकंपनीला फिरायला न्हेऊन आयस्क्रीम पार्टीही दिली.
वॉचमन काका या मुलांच्या वागण्यावर लक्ष ठेवून होते. त्यांनीच मोरे आजींसोबत शुगर चेक करण्यासाठी जायचय. तुम्ही जाल का विचारलं. दिनू नि सूरज मोकळे होते. त्यांनी अगदी आजीचा हात धरुन तिला डॉक्टरांकडे न्हेलं. परत घरी आणून सोडलं. आजीला सांगूनही ठेवलं की कोणती औषधं किंवा दुकानातनं दूध, दही काहीही आणायचं असलं तर वॉचमन काकांना फोन लावा. ते आम्हाला सांगतील. आम्ही पैसे नि लिस्ट तुमच्याकडनं घेऊन जाऊ आणि वेळात वस्तू आणून देऊ. केवढा आधार वाटला मोरे आजींना!
मुलांचे एकमेकांना साहाय्य करण्याचे वर्तन पाहून पालकही मुलांवर खूष झाले त्यांनी मुलांना सरप्राईज गीफ्ट्सही दिले.
वॉचमन काकांनी मुलांना विचारलं,”यातून काय शिकलात मुलांनो?”
चंगू म्हणाला,”आपणही दुसऱ्यांना काहीतरी देऊ शकतो. वेळेइतकं अमुल्य काहीच नाही. आपल्याकडचा वेळ आपण ज्यांना सोबतीची गरज आहे त्यांच्यासोबत घालवला तर आपल्याला देण्याचा आनंद मिळतो व बरंच नवं काही शिकायला मिळतंं.”
वॉचमन काकांनी आनंदाने मान डोलावली.
समाप्त
====================
=============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============