वेडी ममता

®️©️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
आज सकाळपासून नताशा फारच खूश होती. तिची कामं तिनं पटापट आवरली होती. तिचे लक्षं सारखं घड्याळाच्या काट्याकडे जात होतं, पण आज जणू घड्याळाचा काटा अगदी मंद गतीने चालत होता. ती वैतागली होती. किती हळूहळू चाललाय हा दिवस नाहीतर एरवी दिवस इतका पटापट जातो की काही बघायला नको. कधी एकदा संध्याकाळचे पाच वाजतायत असं तिला झालं होतं. तिची सारखी घालमेल सुरू होती. कारणही तसंच होतं. कालच शाळेच्या ग्रूपवर एक नबर नव्याने सामील करून घेतला होता. आणि तो नंबर होता तिच्या जिवश्च-कंठश्च मैत्रिणीचा संयोगिताचा.
संयोगिता जिचा गेल्या 15-20 वर्षांत कुठेही मागमूसच नव्हता ती इथेच आपल्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर राहतेय हे कळल्यापासून नताशा तर तिला भेटायला आतूर झालेली. खरंतर दोघींनी बाहेरच भेटुया असं नताशा म्हणत होती पण भेटायला जरा काकू करणार्या संयोगिताने शेवटी नताशाला आपल्या घरीच बोलावलं.
नताशा आठवणीत रमली होती. शाळेतली मजा, एकमेकींच्या डब्याचा हक्काने घेतलेला ताबा. उष्टमाष्ट काही न मानता खाल्ल्याला चिचा-बोरे. जायला हवं म्हणत तासभर फाटकापाशी मारलेल्या गप्पा. कधीही मनात आलं की नताशा संयोगिताच्या घरी राहायला जायची नाहीतर संयोगिता तरी तिच्या घरी राहायला जायची. त्या दोघींच्या सर्व नातेवाईकांना त्यांची ही मैत्री माहीत होती. आणि इतका घरोबा होता की, संयोगिताच्या नात्यात जरी लग्न असलं तरी नताशा असायची आणि नताशाच्या नात्यात जरी लग्न तरी संयोगिता हजर असायची. इतकी आपली गाढ मैत्री आणि…
परत ती आठवणीत रमली सतत काही ना काही कारणावरून हसत राहाणारी आपली दोघींची जोडगोळी तिला दिसू लागली. गोरे सर नेहमी म्हणयाचे, सारखं काय तुमचं खुसरफुसर सुरू असत? त्यांनी असं विचारलं तरी हसू यायचं आपल्याला. नताशा आताही हसत होती वेड्यासारखी. आज आपण भेटल्यावर पण असंच हसू, दंगा करू, मजा करू. पण संयोगिताला झालंय तरी काय? ती जरा शांतच वाटली नाहीतर ती वार्याच्या वेगाने मला भेटायला आली असती. मी लवकर येते म्हटलं तरी नको म्हणाली, कशी असेल ती? नताशाला जरा काळजीच वाटली. आत काळजीने तिचं मन राहीना.
चार वाजताच ती तयार झाली. तिने संयोगिताला फिन केला, ‘‘मी येतेय ग लवकर मला आता राहावत नाहीये.’’ बरं संयोगिता म्हणाली. तिचा थोडासा थंड रीस्पॉन्स नताशाला जाणवला पण आता तिला राहवत नव्हतं ती जाम उत्साही झाली होती, तिला जरा काळजीपण वाटत होती. भेटायची ओढ अनावर झाली होती, आपली मैत्रीण कसल्या दु:खात नाही ना? असंही वाटत होतं. अशा संमिश्र भावना घेऊन ती गाडीला कीक मारून निघाली.
संयुने सांगितलेल्या पत्त्यावर ती पोहोचली. तिच्या छातीत धडधडत होतं. आता कधी एकदा संयु भेटते असं झालं होतं. ती ब्लॉकजवळ पोहोचली तर ब्लॉकचा दरवाजा उघडाच होता दारात एक वयस्कर बाई खुर्चीवर बसली होती. या संयुच्या सासूबाई असाव्यात नताशाने अंदाज बांधला. त्या शून्यात नजर लावून बसल्या होत्या म्हणून नताशाने बेल दाबली. बेलचा आवाज येताच आतल्या खोलीतून संयोगिता पळतच आली. त्या दोघींची नजरानजर झाली. आता संयोगिता तिला येऊन मिठी मारणार तेवढ्यात अनपेक्षितरित्या तिच्या सासूबाई उठून उभ्या राहिल्या आणि आणि त्यांनीच नताशाला कडकडून मिठी मारली. त्यांना उठलेलं बघताच संयु जागच्या जागीच थबकली. नताशाही गोंधळली, खरंतर घाबरली, पण त्यांचा तो स्पर्श ती झटकूनही टाकत नव्हती, काय नव्हतं त्या स्पर्शात? प्रेम, माया, आपलेपणाची जाणीव, विरहाची जाणीव. त्यामुळे त्यांचा अतीव प्रेमाचा तो स्पर्श तिला झटकून टाकावासा वाटेना.
भावनावेग ओसरल्यावर त्या रडत रडत बोलू लागल्या, ‘‘मिनू, मिने, किती परीक्षा पाहिलीस ग आईची? आज आठवण झाली का तुला माझी? अग आई जिवंत आहे का मेली हे तरी पाहायला यायचंस.’’ आता प्रेमाची जागा जरा लटक्या रागाने घेतली होती. त्या परत खुर्चीवर बसल्या नताशाचा हात हातात धरूनच.
संयुने तिला खूण केली. की तू जरा धीर धर. काही बोलू नकोस. मग तिनेही काही न बोलता त्यांचा हात हातात धरला. त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून तीही स्वस्थ बसली. तिलाही आईच्या प्रेमात भिजल्याचा आनंद मिळत होता. आई गेल्यापासून इतक्या प्रेमळ स्पर्शाला तीही मुकली होती. त्या खूप काही बोलत होत्या मध्येच संयोगिताला, मिनूला खायला आण, चहा आण. असं सांगत होत्या. तासभर त्या नताशाला परत परत सांगत होत्या, ‘‘आता असं करू नको. येत जा अधूनमधून.’’ मध्येच म्हणत होत्या, ‘‘तुला मी सोडणारच नाही.’’
मग नताशाच म्हणाली, ‘‘अग तुझी नात घरी आहे ती रडेल ना आईची आठवण काढून.’’ असं म्हंटल्यावर नातीला घेऊन परत येण्याच्या बोलीवर तिची सुटका झाली.
मग तिला चहाच्या निमित्ताने संयूने आत नेले. तिला चहा दिला. दोघीही काही बोलतच नव्हत्या. ती कोणाला भेटायला आली आणि हे काय झालं? नताशाला काहीच कळत नव्हतं. तिने शांतपणे चहा पिला. संयू म्हणाली,
‘‘चल मी तुला कोपर्यावर सोडायला येते.’’
मग संयूने नताशाचे पुन:पुन्हा आभार मानले. दहा वर्षांपूर्वी तिच्या नणदेचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या धक्क्याने सासूबाईंच्या मनावर परिणाम झाला होता. त्या कधी राग राग करत, कधी प्रेमाने बोलत. त्यामुळे घरातील वातावरणात एक प्रकारचा विचित्र तणाव असतो. त्या रडल्याही नव्हत्या मुलगी गेल्यावर, पण नताशात आणि त्यांच्या मुलीत जरा साम्य होतं. त्यामुळे असेल कदाचित असायचं पण आज नताशाला बघून त्यांचा बांध फुटला त्यांना ती आपलीच मुलगी वाटली. आता त्यांच्या प्रकृतीत उतार पडावा म्हणून आठवड्यातून एकदा तरी नताशा संयोगिताकडे जणार होती एका वेड्या आईच्या ममतेसाठी. नताशाला एकाच घरात आई पण मिळाली होती आणि तिची बालमैत्रीणही.
®️©️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
==================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============