वय काय नि नटते काय!

©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
प्राचीताईंना नवनवीन दागिने परिधान करण्याची,साड्या नेसण्याची,नटण्याथटण्याची भारी हौस होती. तसं सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब होतं प्राचीताईंचं. त्याही महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खर्चाची जुळवाजुळव करताना मेटाकुटीला यायच्या..तरी पोस्टात बचत करण्याचा सासूबाईंनी दिलेला वसा त्यांनी सोडला नव्हता.
प्राचीताईंच्या सासूबाई, पुर्वी शिक्षिका होत्या..तेच नोकरीपेशाचं नाव त्यांना घरातही पडलं. घरातही सगळी त्यांना बाईच म्हणत..अगदी दारावर येणारा भाजीवाला,फुलवाला ते गल्लीतलं शेंबडं पोरही त्यांना बाईच म्हणे. नुसतं बाईच म्हणत नसत तर तसा मानही देत. त्यांचा शब्द प्रमाण मानत.
बाईंची रहाणी मात्र अत्यंत साधी होती. स्वच्छ धुतलेली बारीक काठाची सुती साडी, किंचीत सैलसर गोल गळ्याचं ब्लाऊज, सुतरफेणी केसांची इवलीशी वेणी. गळ्यात एक सोनसाखळी, कानात कुडी नि हातात दोन पाटल्या..पतीनिधनानंतर याउपर त्यांनी सोनं घातलं नव्हतं.
बाईंनी स्वत:चं मंगळसूत्र नातसुनेकरता जपून ठेवलं होतं..म्हणजे सूनबाईस त्या बोलल्या होत्या की हे देऊन तुझ्यासाठी काहीतरी ऐवज घेऊन ये पण प्राचीताईंचा धीरच नाही झाला तसं करण्याचा. सोन्यानाण्याच्या लोभी नव्हत्याच त्या तशा. त्यांना आवडायचे ते मोत्यांचे दागिने..डाळींबी खडे गळ्याबरोबर मिरवणारी चिंचपेटी, त्याखालोखाल तन्मणी, कानवेल, मोत्यांचे झुमके, तोडे, बाकदार नथ..सगळंच. . एकुणच इमिटेशन ज्वेलरीत हरवून जायच्या त्या.
बाजारातून फिरताना त्या मुद्दामहून शोरुमच्या बाजूने जायच्या. जरा हळूच पावलं टाकत ते दागिने डोळे भरभरून पहायच्या..मोत्यांच्या बांगड्या, पाणीदार मोत्यांच्या नथी, बुगडी, बाजुबंद,कंबरपट्टा, लखलखणारी अमेरिकन डायमंड्सची ज्वेलरी..काय नं काय .किती परी!
बेंटेक्सकडेही घुटमळायच्या..बेंबीपर्यंत येणारं चारपदरी आगरी मंगळसूत्र, लक्ष्मीहार,राणीहार.. अंजिरी, मोरपंखी,गुलबक्षी.. साड्या नेसून वन साइडेड पदर घेऊन दिमाखात उभ्या राहिलेल्या मॉडेल्स..हे सगळं हरखून बघेतोवर यजमान मात्र त्यांच्या नजरेपल्याड गेलेले असायचे ..मग त्यांच्या काळजात धस्स व्हायचं. आता काही धडगत नाही..असं मनात म्हणत त्या भरभर चालू लागायच्या.. तरी नजर टोपल्यांतल्या जाईजुई,चमेलीच्या गजऱ्यांवरुनही नकळत फिरत रहायची.
झप झप झप पावलं टाकीत प्राचीताई घरी पोहोचेतोवर त्यांचे यजमान घरी येऊन पोहोचलेले असायचे..मग त्यांचं वेंधळी म्हणणं,ध्यानभ्रष्ट म्हणणं तिला ऐकून घ्यावं लागायचं.
बाई मात्र डोळे मिचकावून नं हात विशिष्ट पद्धतीने हलवून त्या तिरशिंग्याचं मनावर घेऊ नकोस हो म्हणून प्राचीताईंना सांगायच्या. प्राचीताईही मग खुसुखुसु हसत स्वैंपाकाला लागायच्या. बाईंच्या आवडीची दाण्याचं कुट घातलेली काकडीची कोशिंबीर आवर्जुन करायच्या नं यजमानांच्या ताटातही त्यांच्या आवडीची तूपसाखर वाढायच्या. त्या तुपसाखरपोळीच्या घासासोबत यजमानांचा राग कुठल्याकुठे विरुन जायचा नं रात्री गादीवर मोगरा फुलायचा, शेजेची चूण विस्कटायची.
नवरा ऐन तारुण्यात गेलेल्या बाई.. मुलासुनेचा संसार बहरताना पाहून सुखी व्हायच्या..जुन्या मधुर आठवणी काढत स्वप्नात जायच्या..तिथे बाईंचे दिवंगत यजमान यायचे त्यांच्या भेटीला, पांढराशुभ्र सदरालेंगा घालून..ओंजळभर बकुळीची फुलं बाईंच्या ओच्यात घालायचे..वडाच्या पारंब्यांच्या झोक्यावर बाई बसायच्या..यजमान झोके द्यायचे..आजुबाजूला मंदधुंद फुलांचा सुगंध घमघमायचा..मोगरा, बकुळ, रातराणी..प्रत्येक रात्री वेगळा सुगंध नि ती फुलांनी भरलेली ओंजळ.
सकाळी सूनबाई चहाचा पेला घेऊन उठवायला यायची..तेंव्हा सुनेचा चेहराही त्यांना टवटवीत दव पडलेल्या फुलासारखा दिसायचा. शब्दावीण संवाद व्हायचा दोघींत. सूनबाई लाजली की तो रात्रीचा मोगरा तिच्या गालांवरच्या खळ्यांत लपायचा. बाई खुदकन हसायच्या..म्हणायच्या..काल काही आणलंस का? असं विचारलं की प्राचीताईंना म्हणजेच सूनबाईस हुरुप यायचा. “थांबा यांना जाऊदेत.” प्राचीताई लहान मुलाने एखादं गुपित सांगावं तशा बाईंच्या कानी कुजबुजायच्या.
यजमान कामाला गेल्यावर प्राचीताई आदल्यादिवशी केलेली एखादी छोटीशी खरेदी उत्साहाने दाखवायला आणायच्या. काहीही असायची ती वस्तू. अगदी अगदी काहीही ..कधी रंगीत मण्यांची आकडेवाली मिनीपर्स, कधी वीसेक रुपयावाले झुमके तर कधी चमचमणाऱ्या रंगीत बांगड्या..आणि मग किती दर होता..कसं घासाघीस करुन घेतलं याचं रसभरीत वर्णन.
दुपारच्याला बाई स्वतःच्या हाताने एखादा आठवणीतला सोप्पासा,चवदार पदार्थ करायच्या..दोघींच्या आवडीचा कधी धिरडे, कधी आंबील तर कधी वरणफळं. कधी दोघीच बाजुच्या बिल्डींगीतल्या अण्णाकडे उत्तपम खायला जायच्या. क्वचितच दोघींत कुरबुरीही व्हायच्या पण वाफाळत्या चहावरील वाफ विरावी नं चहा पिण्याजोगा व्हावा तसं त्यांचं पुन्हा खुसूफुसू चालू व्हायचं.
सूनबाईच्या वाढदिवसाला बाई आवर्जून पाकीट द्यायच्या, पैशाचं नि काय आवडेल ते घेऊन ये सांगायच्या.
सूनबाईला मुल मात्र झालं नाही..सूनबाईतच काही दोष होता पण बाईंनी तिला कधीच ते जाणवू दिलं नाही. ती कशी खूष राहील ते पहायच्या. सूनबाई नि मुलाने बाळ दत्तक घेतलं..एखादं रोपटं नर्सरीतनं आणावं..तसं त्या तान्हुल्याला आणून वाढवलं..त्यावर मायेची पखरण केली नि अनय इनामदार नावाचा राजबिंडा तरुण आकारास आला, बघता बघता..सुविद्य,देखणा,सुशिक्षित.
अनयने आपलं आपणच जमवलं..प्राचीताईंना लेकाच्या लग्नात कित्ती नटायचं होतं! साड्यांवर साड्या बदलायच्या होत्या..होमाच्या वेळी कांजिवरम, मंगलाष्टकांच्या वेळी इरकल, रिसेप्शनला पेशवाई पैठणी पण रजिस्टर लग्न झाल्याने सगळी हौस बासनात गुंडाळली गेली.
कुणीतरी पाहुणंमाणूस यावं तशी नवीन सूनबाई घरात आली..आराध्या..आराध्याचं नि फ्याशनबिशनचं वाकडं होतं. असं हातभर बांगड्या,वेगवेगळ्या डिझाइन्सचे कानातले न् गळाभर हार वगैरे तिला नकोच असायचे. पण प्राचीताईंच्या कुठलं डोक्यात शिरायला..आपल्या सासूला जसा खजिना दाखवायच्या तसा त्या आराध्यालाही दाखवू लागल्या. इमिटेशनचे पोहेहार,बोरमाळ,बकुळहार,ठुशी,वज्रटिक,कोल्हापुरी साज..एकेक काढून दाखवताना..ते घेतलं त्या त्यावेळच्या आठवणी सांगायच्या.
आराध्या तोंडदेखलं हसायची..मागून नाक मुरडायची. प्राचीताईंच्या ते लक्षातच यायचं नाही पण बाईंना नातसूनेचं हे वागणं चांगलच खटकायचं..सोन्यासारखी सून माझी..नं ही नखाएवढी पोरगी नाक मुरडून दाखवते..बाई चरफडायच्या.. त्यांचा संताप संताप व्हायचा.
एकदा आराध्याच्या माहेरकडची मंडळी आली. तिची आत्या,आई व मावशी.. आणिक दोनचार चिल्लीपिल्ली होती. प्राचीताईंना किती करु नं किती नको झालं होतं..रसगुल्ले काय नं पनीरकुर्मा काय..आवडतय नं आवडतय नं विचारत आग्रह करकरुन वाढत होत्या.
बाईंचेही कान होतेच पाहुणेमंडळींच्या बोलण्याकडे.
“काय गं तुझी सासू लहान मुलींसारखे ऑक्सिडाइजचे वगैरे काय हार घालते..शोभतं का ते या वयात ?” आराध्याच्या आत्याने विचारलं.
“काय विचारू नकोस गं आत्या. वाचन,भरतकाम,विणकाम वगैरेचा छंद नाही त्यांना. विंडो शॉपिंग आवडते. पैशांची उधळपाधळ नुसती. बांगड्यांच्याच चारेक पेट्याऐत..उघडून उघडून दाखवतात..आपण आपलं छान छान करायचं की फक्कड कॉफी मिळते.” तिच्या या बोलण्यावर त्या माहेराच्या साळकाया माळकाया एकमेकींच्या हातांवर टाळ्या देत फिस्सकन हसल्या.
बाईंना मात्र फार वाईट वाटलं. नातसुनेचा रागच आला त्यांना. त्या साळकाया माळकाया गेल्यावर त्यांनी नातसुनेला बोलावून घेतलं. बाई बाई करत प्राचीताई आल्याच. “प्राची तू माझ्यासाठी टोमॅटो सूप कर जा तोवर मी हिच्याकडनं पाय दाबून घेते.”
“हो. आता आणते बाई,” म्हणत प्राचीताई गेल्यासुद्धा.
“बघितलंस आराध्या. लहान बाळासारखी निरागस आहे माझी सून..तुझी सासू. अगं वाचनाचा छंद नाही तिला..कबुल पण छान छान पद्धतीचे, बनावटींचे दागदागिने ल्यायला आवडतात तिला. त्याबद्दल तुला वाईट वाटण्याचं कारणच काय!
खर्चाचं म्हणशील तर घरासाठी आवश्यक ती बचत करुन नंतरच ती तिची हौसमौज करतेय. तुला मी माझं मंगळसूत्र भेट म्हणून दिलं ते आधी तिलाच देऊ केलेलं..चांगलं घसघशीत पाच तोळ्यांचं पण ते तुझ्यासाठी जपून ठेवा म्हणाली ती. मी अंगावर ल्यायलेलं ते स्त्रीधन मोडायला; ऐकेना तिचं मन. फारच हळवी बया. चटकन डोळे पाणावतात तिचे.
तुझा नवरा..प्राचीचा दत्तकपुत्र..आईच्या मायेनं लहानाचं मोठं करतेय त्याला. गुणाची आहे प्राची माझी. आज तू तिला तिच्या अपरोक्ष हिणवलंस..मला खूप वाईट वाटलं बघ. तुला आताच दटावलं नाही तर तू उद्या चारचौघात बोलशील तिला आणि तिही भाबडी हसण्यावरी न्हेईल..
आराध्या, अगं हाडाची शिक्षिका आहे मी..त्या नात्याने सुनावते तुला..वेळीच आवर घाल तुझ्या वागण्याला. तू खूप सारी पुस्तकं वाचतेस कबुल पण माझ्या सुनेने जगण्याचं पुस्तक वाचलय..माणसं जपतेय ती..बरंच काही शिकण्यासारखं आहे तुला तुझ्या सासूकडून.”
बाईंच्या या बोलण्यावर आराध्या चपापली. बाईंच्या डोसाने थोडं का होईना काम केलं. आराध्याला तिची चूक उमगली..परत कधी तिने प्राचीताईंचा अपमान केला नाही.
©️®️ सौ. गीता गजानन गरुड.
====================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/