Skip to content Skip to sidebar Skip to footer

वात्सल्य

यशोदे, ताईच्या शेक शेगडीची तयारी करून ठेव ग!

…. दुपटी लंगोटी भिजत ठेवली आहे.. तेवढी ती धुवून वाळत घाल आणि स्वयंपाक घरात जाऊन बाळंतीणीच्या नाश्त्याची तयारी लगेच करून ठेव .
आणि हो ताईच्या खोलीकडे मात्र अजिबात जाऊ नकोस..

शेवटचं वाक्य कानावर पडल्यावर यशोदेच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले.
बाळ बाळंतिणीच्या सगळ्या कामाला यशोदेची गरज होती पण यशोदेची नजर बाळावर पडू नये याची मात्र सासूबाई अगदी पूर्ण काळजी घेत होत्या..
अर्थात या सगळ्या गोष्टींची यशोदेला या गेल्या पाच वर्षांमध्ये खूप सवय झाली होती….

लग्नाला आता पाच वर्ष उलटून गेली होती आणि यशोदेची कुस अजून उजवली नव्हती.
त्यामुळे कोणाचे डोहाळे जेवण ,कोणाचं बारसं अगदी नवी नवेली गर्भवती बाई जरी समोर आली तरी सगळेजण तिला टाळत होते ..
का तर ? तिला अजून मूल झाले नव्हते
मुल नाही हा एक दोष…

कित्येक लोकांकडे पैसा नसतो. रंग, रूप याच्यामध्ये डावं उजवे असतं. कोणी काळे असतं, कोणी बुटकं असतं कोणी जाड असतं पण त्या दोषाकडे आपण इतके दोष म्हणून बघत नाही जितकं की बाईला मूल नाही तर मूल नसणे हा एक मोठा दोष…
असा विचार यशोदा नेहमी आपल्याच मनाशी करायची…
तिला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा. नवऱ्याकडे “आपण मूल दत्तक घेऊया” असा हट्टही तिने करून पाहिला. परंतु व्यर्थ.
दत्तक मुल हे आपलं मूल नाही होऊ शकत…
अशा काहीशा बुरसटलेल्या विचारांचा तिचा नवरा होता…

असे विचारांचे द्वंद यशोदेच्या मनात सतत चालूच असायचे . सतत दुःखी कष्टी असलेली यशोदा मात्र तिच्या लक्ष्मीची खूप छान काळजी घ्यायची आणि लक्ष्मीशी मनातल्या गुजगोष्टी करायची..
कोण होती लक्ष्मी?

लक्ष्मी त्यांची गाय..
सध्या ती गाभण होती आणि यशोदा तिची पुरेपूर काळजी घेत होती. इथे मात्र सासूने तिला यायला अजिबात बंदी घातलेली नव्हती. त्यामुळे ती एखाद्या गर्भवती बाईची जशी काळजी घ्यावी तशी त्या लक्ष्मीची काळजी घेत होती.. लक्ष्मी मध्ये जणू काही ती आपलंच गर्भरूप पाहत होती.

त्यादिवशी सकाळी लक्ष्मीच्या प्रसूतीची वेळ जवळ आली. सासूने तशी ताकीदच दिली ,बाई तू नको तिकडे येऊस. पहिलीटकरीन आहे लक्ष्मी .
हे ऐकता क्षणी यशोदेचे पाय जागीच थबकले…
डोळे पाण्याने भरले.

पण.. अहो इथे काय गोंधळ चालला होता.
लक्ष्मी कुणाकुणाला हातही लावून देत नव्हती.
ती बहुदा वाट बघत होती त्या यशोदेची ..
हे जेव्हा सासूबाईंच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी तिला हाक मारली…

यशोदे ..
ये ग बाई… लक्ष्मीची अवघड सुटका तुझ्याच हातून कर. हे शब्द ऐकता क्षणी यशोदा धावत धावत गोठ्याकडे गेली आणि लक्ष्मीची सुखरूप सुटका केली .

ते छोटेसे पांढरे शुभ्र मोठ्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यांचे वासरू जेव्हा तिच्या हाताशी आलं ..
त्यावेळेला जणू काही ती लक्ष्मी तिला सांगतच होती की बाई माणसांपेक्षा आम्ही प्राणीच भावना समजू शकतो .
वात्सल्य वात्सल्य ते काय असतं हो!!
हे घे ..हे माझं लेकरू ..मी तुझ्या ओटीत देते…
आता तूच त्याची यशोदा मैया ग….

त्या गोंडस वासराला हातात घेतल्यानंतर यशोदेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि इतके दिवस वाट पाहत असलेलया कुशीत वात्सल्य विसावले.
सौ.रश्मी किरण

=================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: