Skip to content Skip to sidebar Skip to footer

वारसा

अनुला आईचा लग्नाचा शालू अतिशय आवडायचा. गडद हिरव्या रंगाचा शालू..त्यावर बारीक नक्षीकाम केलेला, सोनेरी रंगाच्या काठांचा भरजरी पदर.. आईवर अगदी खुलून दिसायचा.

अनुला आकर्षण असायचं, ते आईच्या नाकातल्या ‘नथीचं.’ नाजूक, पाणीदार मोत्यांची नथ घालून आई फार सुंदर दिसे. आजीने तिला ती ‘नथ ‘देऊ केली होती. तर साखरपुड्याची डाळिंबी खड्याची ‘अंगठी ‘आपल्या बोटात घालायचा हट्ट अनु कित्येकदा आईकडे करायची.

‘कोल्हापुरी साज’ मामा आणि मामीने आईच्या लग्नात भेट म्हणून दिला होता आणि नाजूकशा दिसणाऱ्या ‘पाटल्या- बिलवर’ बाबांनी त्यांच्या लग्नानंतर अनेक वर्षांनी करून घेतल्या होत्या, आईसाठी. या खास ‘सरप्राइजने ‘ किती आनंद झाला होता आईला!

कानातले ‘डुल’ मात्र आजोबांनी ‘लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त’ भेट म्हणून दिले होते आईला. ही आठवण आजी, आई -बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी कायम सांगायची.

नंतर बरेचसे पैसे साठवून आईने काही बारीक- सारीक दागिने करून घेतले.

अनुला वाटायचे, ‘आपल्या आईला किती हौस आहे बाई दागिन्यांची!’ पण हे जपुन ठेवलेले दागिने आई अगदी क्वचितच वापरत असे. दर वर्षी मात्र आजी न चुकता हे दागिने स्वच्छ करून ठेवत असे.

अनुला आठवले..’आपल्या उच्च शिक्षणासाठी आणि बाबांच्या व्यवसायात भांडवल म्हणून आईने यातूनच तर पैसे उभे केले होते. तेव्हा आईने हे दागिने गहाण ठेवले होते. नंतर बाबांनी ते सोडवून आईला परत दिले.’

जेव्हा आईने आपल्या लेकीला म्हणजेच, अनुला लग्नात भेट म्हणून हे सर्व दागिने दिले, तेव्हा त्याचे मोल तिला कळाले.
पाठवणी करताना आई म्हंटली होती..”दागिना म्हणजे केवळ हौस नाही गं अनु ! तो काटकसर, जबाबदारी, प्रेम, भावना, सौंदर्य आणि हौस या साऱ्याचा सुंदर मिलाफ असतो. तसेच सौभाग्याचे प्रतिक आहेत हे दागिने. यामुळे स्त्रीचे रूप खुलून येतेच. शिवाय तिच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात ते.

हे सारे दागिने तुझ्याचसाठी होते बाळा. माझी आठवण म्हणून हे जपून ठेव आणि वेळ प्रसंगी यामध्ये भर घाल किंवा हे मोडून तुला हवे तसे घडवून घे.’
अनुच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आई पुढे म्हणाली, तू जेव्हा आई होशील ना तेव्हा तुला कळेल, आपल्या लेकीच्या आनंदासाठी आई काय, काय करते ते!”

अनुच्या सासुबाईंना आईने दिलेले दागिने पाहून खूपच आनंद झाला होता.

“खरचं आई किती पुढचा विचार करायची. तिने बचत करून ठेवलेले पैसेही वेळेला कामी यायचे. आईने कधी नोकरी केली नाही. पण बचत करून अनेक गोष्टींचा खर्च मात्र वाचवला.”

लहानपणीच्या या साऱ्या आठवणी अनुच्या मनात फेर धरून नाचू लागल्या. तिला वाटलं “आत्ता या क्षणी आई हवी होती.” आईच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले.
याला कारणही तसेच होते. तिच्या लाडक्या लेकीचे लग्न होते आज.

आपल्या आईने दिलेली ही भेट अनुने जपून ठेवली. हे दागिने तिने हौस, आईची आठवण म्हणून वापरलेही. तसेच यात भर घालून आपल्या लेकीसाठी तिच्या आवडी प्रमाणे नवीन पद्धतीचे, छोट्या -मोठ्या प्रकारचे अनेक दागिने बनवूनही घेतले.

आज अनु आपल्या नटलेल्या ,सजलेल्या लेकीकडे कौतुकाने आणि अभिमानाने पाहत होती. ‘आपण आई झालेला क्षण, त्यावेळी आपली आईने घेतलेली काळजी, मग लेकीच बालपण, शिक्षण, नोकरी.. इतक्यात लेक किती मोठी झाली!’ अनुचे डोळे पाणावले.

आईने दिलेली शिकवण, केलेले संस्कार हे सारे अनुने आपल्या लेकीला वारसा म्हणून दिले होतेच आणि हा सारा दागिन्यांचा ‘वारसाही’ आपल्या लाडक्या लेकीकडे ती आज आनंदाने सुपूर्द करणार होती ..कदाचित तिच्याही लेकीकरता !!

===========

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: