वारांगना

©️®️ सौ. गीता गजानन गरुड
अनय उच्चशिक्षण घेण्यासाठी होस्टेलवर रहायचा. इतरही विद्यार्थी त्याच्यासारखेच, लांबवरच्या गावातनं आले होते.
अनयचा मित्र सदू आणि तो दोघे कँटीनमध्ये जेवायला जायचे. रविवार असल्याने कँटिन बंद होतं. संध्याकाळ झाली तसा सदू आला. दोघंजण दहा बारा मिनटं चालून शिवाजी चौकात गेले. तिथे तिखट आमटी भात,बटाट्याची गोडी भाजी असं जेवण जेवले. सदू अनयला एका वस्तीत घेऊन गेला. त्या वस्तीत वेश्याव्यवसाय चालायचा. अनयला ऐकून माहीत होतं.
सदू तिथे एनजीओचं काम करायचा. तो व त्याचे मित्र या स्त्रियांना साबण, हँडवॉश,..अशा स्वच्छतेच्या वस्तू, सेनेटरी पेक, निरोधाची पाकीटं, औषधगोळ्या वाटायचे. अनय सदूसोबत लाकडी जिन्याने वरती जाऊ लागला.तसं इन्ही लोगोने छिन लिया दुपट्टा मेरा..या गाण्याच्या ओळी त्याच्या कानावर पडल्या. अनयमधला सामान्य माणूस थरथरला. त्याच्या काळजाचं पाणी झालं. सदू मात्र प्रत्येक खोलीत जाऊन सामानाचं वाटप करत होता.
एकीदोघींनी डोळ्यांनी इशारा करत अनयला आत बोलावलेही. मग सदूनेच त्याची त्यांच्याशी ओळख करुन दिली. तिथेच एक शैलाताई म्हणून सदूची मानलेली बहीण होती. तिने तर बळजबरी अनयला बसवलेच. लिंबू सरबत प्यायला दिले. तिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त ममता होती.
अनय सदूला हळू आवाजात विचारु लागला,”ही तर चांगल्या घराण्यातील दिसतेय.इथे कशी काय?”
त्याचे बोल शैलाच्या कानावर पडले. शैला तिथेच येऊन जमिनीवर भिंतीला टेकून बसली व सांगू लागली,” साहेब हा सदूदादा नेहमी आमच्या आरोग्याची काळजी घेतो . माझ्याकडून राखी बांधून घेतो पण माझा भूतकाळ कधी विचारला नाही त्याने. साहेब मी पश्चिम बंगालची. लहानपणीच माझी आई गेली. घरात आम्ही तिघी बहिणी. आम्ही स्वैंपाक करायचो. जेवायचो. शाळेत जायचो.
मी नववीत असताना माझ्या बापानं दुसरं लग्न केलं. मला ती बाई आवडत नव्हती. तीही आमच्याशी परकेपणानेच वागत होती. त्यात मला शाहरूख खान जास्त आवडू लागला होता. त्याचे सगळे पिक्चर व्हिडिओवर दहा दहा वेळा बघायची तरी पोट नाय भरायचं.
शेवटी तो व्हिडिओवाला चंदूच माझ्या पिरेमात पडला. मला म्हणला,”आपुन शेरात जावया. तिथे मी तुझ्यासंग लगीन करीन. चार पैसे साठवून आपलं घर घेऊया.” मला खरंच वाटलं. त्याने वचन दिलेलं मला शाहरुख खानशी भेट घडवून आणण्याचं.
एका रात्री त्याच्या सांगण्यानुसार मी माझं घर सोडलं. निजलेल्या माझ्या बहिणींचा निरोप घेताना अगदी जीवावर आलं होतं. काळजावर दगड ठेऊन निघाले खरी.
माझा मित्र चंदू मला त्याच्या मित्राच्या टेम्पोजवळ भेटला. त्यात बसून आम्ही शहरात आलो. शहरात चंदूने खोली भाड्याने घेतलेली. झोपडपट्टीतली खोली. समोर सगळा उकीरडा होता. माझ्या पोटात ढवळून आलं.
एक स्टोव्ह,जेवणाचे चारपाच टोप, दोन चार डाळ,तांदळाचे डबे,साखर,चहा पावडरचे डबे एका फळीवर लावलेले. तिथून उंदीर आरामात ये जा करीत होते.
कोपऱ्यात लहानशी मोरी,तिच्याबाजूला पिंप, उजव्या बाजूला खाट,खाटीवर बिछाना,गाद्या. एवढाच काय तो संसार.
मी घरात शिरताच आजुबाजूच्या बाया वाकूनवाकून पाहू लागल्या. कुजबुजू लागल्या. चंदूने दार लावून घेतलं. मी खोली साफसूफ केली. सगळ्या वस्तू जागच्याजागी मांडल्या.
बादलीभर पाण्याने आंघोळ केली. चंदू चिकन घेऊन आला. मी माझ्या बेगेतला देवाचा फोटो एका खिळ्याला अडकवला व त्याला नमस्कार केला. थोड्याच वेळात मी चिकन,भात रांधला. आम्ही दोघं जेवलो.
त्या दुपारी चंदूने माझी कापडं दूर सारली. एखाद्या पाशवी प्राण्यासारखा संभोग करत होता तो. मी विव्हळत होते. रात्रीही तसंच. तो दारुही प्यायचा. मला तो वास सहन होत नव्हता. मी पुरती फसले होते. त्याला हवं तेंव्हा तो माझा देह ओरबाडत होता. माझं सर्वांग ठणकत होतं.
किती सुंदर कल्पना होत्या, पहिल्या रात्रीच्या माझ्या मनात. म्हणजे अगदी टिव्हीत दाखवतात तसं फुलांची शेज वगैरे नाही पण पहिल्या रात्री जोडीदाराने मला जवळ घ्यावं. अगदी हळूवार फुलवावं. इतके दिवस सांभाळून ठेवलेल्या यौवनाचं रसभरीत वर्णन करत मला मोहरावं पण तसं काही काहीच घडलं नव्हतं. जे काही घडत होतं त्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
माझं प्रेम फसवं निघालं होतं. त्याचं मला, माझ्या शीलाला लुटणं अविरत चालू होतं. ज्या संसाराची मी अपेक्षा करत होते तसं तर काहीच नव्हतं तिथे. प्रेमाच्या आणाभाका फोल निघाल्या होत्या. त्याने दाखवलेली लग्नानंतरच्या सहजीवनाची स्वप्नं चकाचूर झाली होती. मी फसले होते त्याच्या मायाजालात.
कौलांवरुन उंदीर,घुशी फिरायच्या बिनधास्त..मला आता त्यांचा हेवा वाटू लागला होता. ते मुक्तपणे संचार करत होते नं मी माझ्याच मुर्खपणामुळे एका नशेली माणसाच्या जाळ्यात अडकले होते.
तिथून सुटण्याचा मार्गही सुचत नव्हता. विचार करकरुन डोकं भंजाळून गेल होतं. रडूनरडून डोळ्यातले अश्रु सुकले होते. त्याला कदर नव्हती माझ्या रडण्याची.
तो रोज मटणाची पिशवी घेऊन यायचा. माझ्याकडून रांधून घ्यायचा. दारुच्या बाटलीसोबत ते मांस नि भात पोटात ढकलायचा नि माझ्यावर तुटून पडायचा.
चारेक दिवसांनी त्याने त्याच्या दोन मित्रांना घरी आणलं. जेवून वगैरे झाल्यावर त्या सर्वांनी मिळून माझ्यावर सामुहीक बलात्कार केला. मी खूप घाबरले होते. आक्रंदत होते.
हे असंच नेहमी होऊ लागलं. त्याचे मित्र का गिर्हाईकं रोज घेऊन येऊ लागला. त्याने मला, माझ्या इज्जतीला पैसे कमवण्याचं साधन बनवलं. पुर्वी व्हिडिओवर सिनेमे दाखवून पैसे कमवायचा आता माझं शील वापरायला देऊन आपली थैली भरत होता, भरत कसली होता..मिळालेले पैसे दारू, जुगार यांत खर्च करत होता.
बरोबर दुपारी चारला बाहेर नळ यायचे. मी पाणी भरायले गेले की एकमेकींशी पाण्यावरनं भांडणाऱ्या बाया मला बघितलं की लांब जायच्या. मला टाळायच्या त्या. पण दुरुन एकमेकींशी तोंडाला पदर लावून माझ्याकडे बघत काहीतरी बोलायच्या.
एके रात्री चंदू उशिरापर्यंत घरी आलाच नाही. दारू जास्त होऊन कुठेतरी फुटपाथवर पडला असावा. मी विचार केला, हिच संधी चालून आलेय स्वतःला या जीवघेण्या नरकातनं सोडवण्याची. बाहेर आले, सगळीकडे सामसूम होतं.
मी माझी भिंतीला अडकवलेली देवाची तसबीर नं माझे चार कपडे पिशवीत कोंबले नि निघाले तिथून. तरी मनात भीती होती, वाटेत चंदू भेटला तर..तर त्याने मला फरफटत घरी न्हेलं असतं नि दारुच्या बाटलीने, मिळेल त्या अवजाराने मारलं असतं. मी घाबरीघुबरी होऊन भरभर चालत होते, रस्ता न्हेईल तिकडे झपझप पावलं टाकीत होते.
माझ्या उरातली धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. समोरच रेल्वेलाइन दिसली..म्हंटलं बरंच झालं. इथे कुणी अडवणारं नाही. इथे जीव दिला तर भूक,कपडे,इज्जत..सगळ्या गरजा मिटून जातील. .
दुरुन गाडी येतेय अशी दिसल्यावर रुळावर झोपले. खूप शांत होते मी. धडधडतही नव्हतं. मी दीर्घ झोप घेणार होते आणि ती पटरी जणू गादी होती माझ्यासारख्या कलंकितांसाठी अंथरलेली.
तेवढ्यात तिथून एक त्रुतीयपंथी जात होता. त्याने मला पाहिलं. तोंडाला भडकसा मेकअप, रंगवलेले ओठ, भडक साडी, अंगभर दागिने..त्याने मला पाहिलं. त्याने आरडाओरडा करताच झोपड्यांतली लोकं बाहेर आली. दोघातिघांनी मला तिथून खेचलं. गाडी भरधाव वेगाने निघून गेली.
त्या त्रुतियपंथीने मला पाणी घेऊन दिलं. तहान तर लागली होती. घटाघटा पाणी पिलं. ‘बेचारी मुसीबत की मारी,’ तो हळहळला. “कुछ खायेगी?” त्याने विचारलं. मी नाही म्हंटलं. “घर जाना है क्या? घर छोड दूँ?” मी पुन्हा मानेनेच नकार दर्शवला.
“चल मेरे साथ. ऐसे कुत्तेके माफीक मरनेसे अच्छा चंपाबाई के कोठेपर जिस्म बेचके आरामसे रहेना।” तोच बोलत होता एकटा. माझा मेंदू बधीर झाला होता..मी त्याच्यामागून चालले होते.
त्याने मला चंपाबाईच्या माडीवर न्हेलं. चंपाबाईने माझी सारी विचारपूस केली. मला प्यायला दूध नि सोबत रोटी दिली.
मला त्यांनी इथे कामाला लावलं. दहा वर्ष होतील मला इथे. इथे मी बरी आहे. माझ्या चुकांची शिक्षा मला मिळाली. फसव्या प्रियकराच्या तावडीतून सुटले. चंदू चार भिंतीआड माझ्याकडून जे करून घेत होता, तेच मी इथे करतेय. माझ्यासारख्या परिस्थितीने गांजलेल्याचं हे आश्रयस्थान आहे.
इथे चंपाबाईने आमच्यासाठी टिव्ही,फ्रीजची व्यवस्धा केली आहे. साहेब,आम्हीपण तुमच्या सारखीच माणसं आहोत साहेब. घाबरु नका आम्ही या परिस्थितीच्या विळख्यात अडकलो खरे. पण हाही एक व्यवसायच आहे. आम्ही चोरीमारी करत नाही. खोटं बोलून कोणाला फसवत नाही. आम्ही आमच्या देहाचा व्यापार करतो आणि आमच्या पोटाची खळगी भरतो. सदूदादासारखी देवमाणसं आमच्या तब्येतीची काळजी घेतात. कँप लावून आमचं मेडीकल चेकअप वेळोवेळी करुन घेतात. आम्ही साऱ्या मिळून स्वैंपाक करतो,जेवतो,गप्पागोष्टी करतो. नाचगाणं करतो.
आमच्या गावंच एक गिर्हाईक इथे यायचं. त्याच्याकडे बहिणींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैसे पाठवायचे पण त्याच बहिणींनी साधं लग्नाचं आमंत्रण दिलं नाही मला. मी जाणार नव्हतेच कारण तुमचा समाज वेगळा तो कसं मिसळू देणार माझ्यासारख्यांना पण माझ्या नातेवाईकांना माझे पैसे चालतात.”
शैलाचं बोलणं ती दोघं भान भरपूर ऐकत होती. एखाद्या लेखकाने लिहिलेली शोकांतिकाच जणू पण ही वास्तवातली होती. एक स्त्री कोणकोणत्या प्रसंगातून गेली आणि तरी पुन्हा आपल्या पायावर उभी राहिली..सगळंच अचंबित करणारं..पांढरपेशी समाजापासून फार दूरवरचं जीणं.
तितक्यात एक साताठ वर्षाचा मुलगा शैलाला येऊन बिलगला. सदूने त्याला चॉकलेट्स दिली तर घेईना. मग आई घे म्हणाल्यावर घेतली. मोरीत जाऊन स्वच्छ हातपाय धुवून त्याचं दप्तर घेऊन बसला.
शैला म्हणाली,”दादा,हा सुरज माझा मुलगा. याला मी खूप शिकवणार मोठा ऑफिसर बनवणार. जवळच्याच शाळेत घातलंय याला.”
अनयने सुरजला दोनशे रुपये खाऊसाठी देऊ केले तर शैलाताई नाही म्हणाली. नका अशी पैशाची सवय लावू त्याला म्हणाली. त्यापेक्षा वेळ असेल तेंव्हा त्याला घेऊन जा व थोडा अभ्यास शिकवा म्हणाली.
“दादा, माझ्या सुरजला नं मला सैनिक स्कूलमध्ये घालायचाय. माझी मदत कराल नं. मग पुढे हाही पांढरपेशी होईल. तुम्हा लोकांसारखा. मला ओळखणार नाही आणि ओळखूही नये त्याने मला. साधं बापाचं नाव नाही देऊ शकले मी याला. मी तरी का अपेक्षा ठेवाव्यात याच्याकडून! शिकून मोठा होऊदेत, देशाची सेवा करूदेत बास.”
अनय म्हणाला,”आम्ही जरूर मदत करू तुम्हाला.” त्या माऊलीला नमस्कार करुन अनय सदूबरोबर बाहेर पडला.
एक वेगळं जग,समाजाने स्वतःच्या स्वार्थासाठी कोपऱ्यात टाकलेलं आज त्याने जवळून पाहिलं होतं. त्याने सदूसोबत या वारांगनांसाठी पुढेही काम करत रहाण्याचा मनाशी निश्चय केला.
–समाप्त
=============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============