“वरणभात”

महादू, त्याची बायको लक्ष्मी आणि त्याची आई एका छोट्याशा घरात आनंदाने राहायचे. लग्नानंतरचे काही दिवस खूप मजेत गेले.आणि दुधात साखर पडावी तशी आपण आई होणार असल्याची गोड बातमी लक्ष्मीने सगळ्यांना दिली. बातमी ऐकताच तिची सासू म्हणाली आता नातवाचं तोंड मी डोळे मिटायला मोकळी..
आणि एक दिवस लक्ष्मीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. झालं.. जे नको होतं तेच झालं. तिच्या सासूला मुलगा हवा असताना मुलगी झाली. तिने आकांड तांडव केला,सगळं घर डोक्यावर घेतलं. आई रोज उठून महादूशी आणि त्याच्या बायकोशी भांडायला लागली. आईच्या आणि बायकोच्या रोजच्या भांडणाला कंटाळून महादू दारूच्या पार आहारी गेला. आता तर तो चोवीस तास नशेतच असायचा.
दिवसभर पिऊन कुठेतरी पडलेला महादू रात्री कधीतरी घरी यायचा तोही पिऊनच. लहानगी छकुली समोर दिसायची अन् आधीच नशेत असलेल्या महादूची तळपायाची आग मस्तकात जायची. तो तिच्या अंगावर धावून जायचा. तिला वाचवायला लक्ष्मी मध्ये जायची तर तो तिलाही मारायचा. महादूने काम सोडल्याने घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. लक्ष्मी एक वेळ जेवून दिवस काढत होती. महादू घरी आला की घरात जे काही असेल नसेल ते खायचा. अगदी छकुलीची खीरही. लक्ष्मीचा जीव लेकीसाठी तिळतिळ तुटायचा पण ती त्या लहानग्या जीवाकडे पाहून सगळं सहन करायची.रडणारया छकुलीला ती साखरेचं पाणी, डोळ्यातल्या पाण्याबरोबर पाजून झोपवायची.
आता महादूचं व्यसन इतकं वाढलं होतं की तो शेवटच्या घटका मोजत होता. तरीही दारू त्याला सोडत नव्हती. आणि अखेर एक दिवस भल्या पहाटे महादूने जगाचा निरोप घेतला. कोणाची नजर लागली की महादूचं नशीब त्याच्यावर रुसलं . बाप काय असतो हे कळण्याच्या आधीच छकुली बापाच्या मायेला मुकली.
लक्ष्मी धाय मोकलून रडत होती. छकुलीही आज शांतच होती. महादूच्या वंशाला दिवा हवा म्हणून हट्ट करणारी त्याची आई स्वतःच्या वंशाचा दिवाही विझवून बसली. आता मात्र तिला काळजी होती त्या मिणमिणत्या पणतीची. महादूच्या मरणाने सारा गाव हळहळत होता.
आज महादूचा दहावा होता. सारा गाव जमला होता. महादूच्या आवडीचं सगळं दहाव्याच्या ठिकाणी ठेवले होते. त्यात वरण-भात ही होता. लक्ष्मी डोळ्याला पदर लावून छकुलीला घेऊन जवळच बसली होती. या आधी कधीच वरणभात न पाहिलेल्या छकुलीने वरणभात पाहून रडायला सुरुवात केली. कोणास ठाऊक ती का रडत होती.
तिला भूक लागली होती की तिला कधीही जवळ न घेतलेला तिचा बाप सोडून गेल्याचं दुःख तिला झालं होतं. ती एकसारखी रडत होती, त्यातच दुपार व्हायला आली तरी महादूच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता.
हळूहळू गर्दी पांगायला लागली. छकुलीचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं.शेवटी न राहवून एका बाईने तिथला वरणभात तिला खायला दिला ती तो खाताच महादूच्या पिंडाला कावळा शिवला अन् छकुली नकळत हसली. तिच्या जीवावर उठलेला महादू, तिची खीरही खाणारा महादू…. पण आज तिला वरणभात खाऊ घातल्यावरच त्याचा आत्मा तृप्त झाला.
त्याचा तृप्त झालेला आत्मा जाताना मात्र सर्वांच्याच मनाला चुटका लावून गेला अगदी कायमचा. .. वरणभाता वरील तूपासारखा…लक्ष्मी आणि तिची सासू हे सगळं भरल्या डोळ्यांनी पहात होत्या. एवढे दिवस महादूला तुम्ही दोघींनीच मारलं असं महादूच्या आईने त्या मायलेकींना प्रेमाने जवळ घेतलं. त्या तिघींना एकत्र पाहून महादू मनोमन सुखावला. ….
आज छकुली अकरा वर्षांची झाली तरीही ती तिच्या वडीलांच्या प्रत्येक पुण्यतिथीला त्यांच्या फोटोसमोर वरणभात ठेवते आणि त्यातला एक घास खाते. फोटोतून महादू तिच्याकडे पाहून मंद हसत असतो…..
“सुरेखकन्या”
ॲड.अश्विनी सचिन जगताप…
==================
तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.