Skip to content Skip to sidebar Skip to footer

वैजयंती (भाग नववा)

©® गीता गरुड.

मी आत्याला खुणेनेच नको म्हंटलं. आत्या माझ्याजवळ बसली. मी बोलू लागले,”आत्या,मी तुझ्या सांगण्याप्रमाणे ऋतुराजच्या घरी जाऊन आले.”

“भेटला का तो? काय म्हणाला?” आत्याने विचारलं. रेशमही कान देऊन ऐकू लागली.

“नाही तो फिरतीवर गेलाय सध्या पण त्याची आई,बायको व मुलगी भेटली.

आत्या,ऋतुराज..रेशमचा प्रियकर एका मुलीचा बाप आहे.” मी आत्याला सांगत होते तेव्हा रेशमच्या हातातून तांदुळाचं ताट निसटलं..घरभर तांदूळ झाले. रेशमचा चेहरा घामाघूम झाला होता.

————————————————————–

रेशम त्वेषाने माझ्याकडे धावली व स्फुंदत म्हणू लागली,”आधी भैयाला मग आत्याला..एकेक करुन सगळ्यांना माझ्या विरोधात फितवत आहेस!

हे आता नवीन कुभांड रचलंस..ऋतु विवाहित असल्याघं! माझा ऋतु फक्त माझा आहे फक्त माझा.” बोलताबोलताच रेशम कोसळली. तिचं सर्वांग घामाने निथळत होतं. तिचा तो अवतार पाहून मी घाबरले.

आत्याने व मी रेशमला खाटीवर झोपवलं. डॉक्टरांना फोन लावला. डॉक्टर आले..तपासणीअंती डॉक्टर म्हणाले..तिला दिवस गेलैत. काय करणार होतो आता?

 गर्भपात करणं शक्य होतं पण ती ऐकली पाहिजे..खरंच कशी वहावली रेशम! आमचं दुर्लक्ष झालं का तिच्याकडे!

हे आले. मी लवकुशला न्हाऊ घातलं. वरणभात भरवून झोपवलं.

तोवर आत्याने सगळं यांच्या कानावर घातलं. पहिल्यांदा मी या माणसाला लहान बाळासारखं रडताना पाहिलं. अगतिक,असहाय्य पाहिलं.

काय करायचं..पोलीस केस..त्यातून काय साध्य होणार तर त्याचा गुन्हा,त्याला शिक्षा नि रेशमची,पुऱ्या घराची नामुष्की. डोक्यात घण पडत होते.

यांनी ऋतुराजच्या घरी जाऊन काहीबाही कारण सांगून त्याला खाली आणलं. दोनतीन मुस्काटात लगावली नि घरी घेऊन आले. रेशम तोवर शुद्धीत आली होती.

तिचा ऋतुराज माफी मागू लागला. त्याने तो विवाहीत असल्याचं कबूल केलं. क्रुपा करुन गर्भपात करुन घे म्हणू लागला. रेशम भयंकर संतापली. तिचा राग अनावर झाला.

त्याही स्थितीत रेशम ऋतुराजच्या अंगावर धावून गेली पण चक्कर येऊन तिथेच कोसळली.

या संधीचा फायदा घेत ऋतुराज निसटू पहात होता. यांनी त्याची गचांडी धरली व सज्जड दम दिला..म्हणाले,”केवळ तुझ्या पत्नी व मुलीकडे बघून सोडतोय तुला पण माझ्या नजरेच्या परिघात राहशील. जर रेशमला किंवा कुणा मुलीला फितवायचा प्रयत्न केलास तर..

तो यांच्या पाया पडून रडूभेकू लागला. यांनी त्याला जावू दिलं. जे झालं त्यात रेशमचाही दोष होताच कारण तिच्या संमतीनेच ते एकत्र आले होते जे अनैतिक होतं.

काहीही असलं तरी रेशमला पुन्हा उभं करायला हवं होतं.

आधीच तिची तब्येत तोळामासा त्यात हे असं. ती मनाने फार हळवी झाली होती. मधुनच रडत बसायची.

गर्भपात करायला रेशम तयार होईना. तिने तिचं बाळ वाढवायचं ठरवलं. खरंच त्या येणाऱ्या बाळाचा काय दोष होता!

अरोमाथेरपी असते. ती सुरु केली. तिच्याने हळूहळू का होईना रेशममधे फरक पडू लागला.

तिच्या मनातील माझ्याबद्दलचा सल गेला पण माझ्याशी बोलणं  तिला अवघड जात होतं.

मीच पुढाकार घ्यायचं ठरवलं. लवकुशला खाऊ दिला की जा आत्तुला द्या सांगायचे.

आत्तुला घेऊन या सांगायचे. परिणाम चांगलाच झाला. आमच्या रेशमची कळी खुलली. ती आता स्वत:हून माझ्याशी बोलू लागली.

दादा,जीजी काळजी करतील म्हणून आम्ही घडलेली घटना गावी कळवली नाही..पण कोंबडा झाकून ठेवला म्हणून उजाडायचं रहात नाही.

रेशमशी आम्ही सगळीजणं अगदी मिळूनमिसळून वागायचो. चुकूनही त्या ऋतुराजचं नाव घरात उच्चारलं जाणार नाही याची दक्षता घेत होतो.

समोरच्या खोलीत एक बिर्हाड रहायला आलं. दोघेच होते पितापुत्र. मुलगा सकाळी उठून कामाला जायचा. नि वडील साठीच्या जवळचे..त्यांना घरात करमत नसायचं.

शेवटी अधनंमधनं आमच्यात येऊन बसू लागले. त्यांचा मुलगा त्यांना नाना म्हणायचा म्हणून आम्हीही त्यांना नाना म्हणून संबोधू लागलो.

लव व कुशही त्यांना आजोबा म्हणा म्हंटलं तरी नन्ना नन्ना म्हणून साद घालू लागले.

गेल्यावर्षीच नानांची सहचारिणी गेल्याने त्यांच्या जीवनात एकलेपणा आला होता.

नानांना माणसांची गरज होती जी आमच्यासारख्या शेजाराने भागू लागली.

नाना आले की आत्या चहा टाकायची. तिच्या हातचा आलं, वेलची घातलेला चहा प्याले की त्यांची मरगळ निघून जायची.

हळूहळू आमच्या घरात काय स्पेशल बनलं की ते नानांच्या घरी जाऊ लागलं.

नानांच्या मुलाने जो डबा लावला होता त्यात एवढुसा जाड्या तांदळाचा भात,वरणाचं पाणी,सपक भाजी नि चिवट चपात्या असायच्या.

शेवटी कधीही स्वैंपाकघरात न डोकावणारे नाना आता पाककृतींची पुस्तकं वाचून बेसिक स्वैंपाक शिकू लागले. कधी जमायचं तर कधी करपायचं.

एकदा तर नानांनी कमालच केली. लवकुश बाहेरुन दार ठोकावत होते.  नानांनी दार उघडलं नि बाहेर येऊन त्यांना कडेवर घेतलं. त्यांच्याशी लाडेलाडे बोलत होते. इकडे मागचं दार  हवेने लोटलं गेलं.

झालं ल्याच लागलं. एक्सट्रा चावीही आतच होती.

अजून एक चावी त्यांचा लेक नितीन त्याच्या ब्यागेत ठेवायचा. नितीनचा फोन नंबर  त्याने आम्हाला दिला नव्हता पण नानांच्या लक्षात होता. मी नितीनला फोन लावला पण लागेना.

नानांनी कुकर लावला होता जो जोरजोरात शिट्ट्या मारत होता. प्रत्येक शिटीसोबत नाना आणखीनच हवालदील होत होते.

जवळपास चावीवालाही नव्हता. शेवटी रेशम दुचाकीवर जाऊन चावीवाल्याला घेऊन आली.

नशीब आत जास्त नुकसान झालं नव्हतं

आम्हाला वाटलेलं..आता कुकरचं झाकण उडणार व सिनेमात दाखवतात तसा तो भात छताला चिकटणार पण सुदैवाने झाकण जागच्याजागी होतं,मात्र कुकर आतून काळाठिक्कर पडला होता.

त्यादिवशी त्या दोघांना आत्याने आमच्याकडेच जेवायला बोलवलं. वरतून कुकर साफ होण्यासाठी लिंबू,साबणाची पावडर,पाणी कुकरात घालून शिट्ट्या काढा असा उपयोगी सल्लाही दिला.

हळूहळू बिल्डींगीत कर्णोपकर्णी रेशम अविवाहित असुनही गर्भार असल्याची बातमी पसरली.

मिटींगमधे काही कर्मठ सदस्यांनी,  रेशम इथे रहाणे आमच्या मुलांसाठी धोकादायक आहे. आमची मुलंही तिचा कित्ता गिरवतील तेंव्हा ती इथे रहाता कामा नये असा सूर लावला.

हे प्रकरण एवढं चिघळेल याची आम्हा दाम्पत्याला सुतराम कल्पना नव्हती. आमच्या तोंडातून शब्द निघेना.

नाना मदतीला धावून आले..म्हणाले,”अरे सुशिक्षित म्हणवता स्वतःला नि कुठल्या जगात वावरता! स्वातंत्र्यपुर्व काळात अविवाहित गर्भवती मुलींच्या संगोपनासाठी आश्रम काढले होते.

त्यांना वाऱ्यावर सोडलं नव्हतं, आणि म्हणे आम्ही आधुनिक विचारसरणीचे. रेशमबद्दल कोणीही वाईटसाईट बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही. कबूल आहे निसरड्या वाटेवर पोरीचा तोल गेला पण सावरतेय ती स्वतःला तर तिला धीर द्यायचा का ढकलून द्यायचं!”

नानांचं बोलणं ऐकून सगळे खजिल झाले. विशेष म्हणजे त्यांनी आमची माफी मागितली व कोणतीही मदत लागल्यास सहकार्य करु असंही म्हणाले.

दरम्यान अनंत भावजींचं लग्न ठरतय असं कळलं.

मुलगी  नात्यातलीच होती.  ठराव झाला.

आम्ही काही कारण सांगून गेलो नाही. खरंतर जायची खूप इच्छा होती पण रेशमबद्दल कसं सांगायचं तेच सुचत नव्हतं.

दादा हा धक्का पचवतील का हीच भिती होती.

साखरपुड्याच्या दोन दिवस आधी मुलीचे मामा आमच्या गावच्या घरी गेले. त्यांनी लग्न मोडतोय असं सांगितलं.

दादांनी कारण विचारताच रेशमचा विषय बोलले. दादा जाम चिडले..हे सगळं खोटं आहे म्हणाले. त्यांनी रेशमला फोन लावला व फोन स्पीकरवर ठेवून म्हणाले,”रेशम बाळ, हे मुलीचे मामा तू गर्भवती आहेस असं सांगताहेत. कुणीतरी ही घाणेरडी भंकस केली आहे तरी तू यांच्याशी बोल जरा.”

किती विश्वास होता दादांना आपल्या मुलीबद्दल!

रेशमने ते मुलाचे मामा खरं बोलत आहेत असं सांगताच

दादा एकदम खालीच बसले म्हणे. तो मामा गेला निघून.

दादांच्या छातीत दुखू लागलं. ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं.

डॉक्टरांनी तपासून इस्पितळात एडमिट करावं लागेल सांगितलं. एम्बुलन्सची व्यवस्था केली.

इस्पितळात नेल्यावर इसीजी काढण्यात आला. आवश्यक ती तपासणी करण्यात आली.

ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता दादांना. हे ताबडतोब गावी गेले. दोन दिवस दादा एडमिट होते.

घरी आणल्यावर थोडे सुधारताच यांनी अगदी शांतपणे त्यांना घडला प्रकार सांगितला. दादा रडू लागले. जीजी डोक्यावर हात घेऊन बसली.

भाऊजीही आले होते. ते तर जाम संतापले होते रेशमवर. त्यांचं ठरलेलं लग्न मोडलं होतं ज्याला कारण रेशम होती.

रेशमला त्यांनी समजावून,धमकावूनसुद्धा ती वहावत गेली होती.

रेशमची अजाणतेपणी झालेली एक चूक शिर्केकुटुंबाला महाग पडत होती. आता गर्भपात करणं शक्य नव्हतं. सगळंच तिरपागडं होऊन बसलं होतं.

हीच रेशम जर विधीवत लग्न होऊन गर्भार राहिली असती तर तिचे किती लाड झाले असते!

मनात तर खूप यायचं..त्या ऋतुराजची पोलिसात तक्रार करावी पण त्याची बायको,मुलगी डोळ्यासमोर दिसायची. यांचं त्याच्यावर लक्ष होतं.

आता तो आपलं घर नि आपलं कुटुंब एवढंच करत होता. रेशमला एकदा येऊन भेटावसंही त्याला वाटलं नाही.

आत्या रेशमची सर्वतोपरी काळजी घेत नव्हती. स्वतःच्या लेकीसारखं तिला जपत होती.

रेशमचं नाव हॉस्पिटलमध्ये घातलं होतं. सांगितल्यावेळी मी तिला घेऊन जायचे. आधीच्या तिच्या गव्हाळ रंगाला गर्भारपणाने अधिकच तेज आलं होतं.

बघताबघता सातवा महिना उलटला. दादा,जीजी तिला बघायला आले नाहीत.

त्यांना वाटत असावं बघावसं..त्यांच्या रेशमविषयीच्या चौकशीवरुन ते कळत होतं.

रेशमशी मात्र त्यांनी बोलणं टाकलं होतं. भाऊजीही तिच्याशी बोलत नव्हते.

भाऊबीज जवळ येऊन ठेपली होती. प्रसन्ना इथे होताच तरीही मला दिगूची फार आठवण येत होती. तसा तो फोनवर बोलायला कमीच.

यातच एकदा फोन आला. नंबर ओळखीचा नव्हता म्हणून मी कट केला तर परत..मग मात्र कंटाळत रिसिव्ह केला.

“हेलो,ताई मी प्रद्युम्न. आपली रेल्वेत भेट झालेली. काल तुम्हाला मंडईत पाहिलं.”

“हेलो,अरे सॉरी प्रद्युम्न. मला वाटलं असेल कोणतरी. मंडईत पाहिलं म्हणजे..कुठे रहातोस तू?”

“मी बाजारगल्लीतच सुदर्शन चाळीत. ताई मला भेटायचंय..तुला,लवकुशला. येऊ का मी?”  

“नक्की ये. असं करना. भाऊबीजेलाच ये तू.” मी म्हंटलं.

“हो ताई नक्की येतो”, तो म्हणाला.

मी दुकानात जाऊन प्रसन्ना व प्रद्युम्नसाठी शर्टपीस घेऊन आले.

भाऊबीजेदिवशी सकाळीच प्रद्युम्न आला. मी नाश्त्याला इडलीचटणी केली होती. सगळ्यांना दिली. प्रद्युम्न व यांच्या गप्पा रंगल्या.

मी पाटाभोवती रांगोळी काढली. प्रद्युम्नला तिलक लावून औक्षण केलं. मग हे बसले. रेशमने यांना व लवकुशला ओवाळलं. तिघांनाही मिठाई भरवली.

मी प्रद्युम्नची रेशमशी ओळख करवून दिली. प्रद्युम्न मग अधुनमधून येतजात राहिला. त्याचा स्वभाव हसरा,खेळकर. रेशमलाही त्याने बोलकं केलं.

प्रद्युम्नची निमाताईही त्याच्यासोबत एकदोनदा येऊन गेली. ती आता बरीच सावरली होती. माँटेसरीचा कोर्स पुर्ण करुन तिने फुलबाग नावाची बालवाडी काढली होती. प्रद्युम्नने निमाताई रहात असलेल्या चाळीतच रुम घेतल्याने निमाताईकडेच तो सध्या जेवायला होता.

रेशमनेच त्याला तिच्या गडद भूतकाळाबद्दल सांगितलं. तिला वाटलेलं..आता तो आपल्याला टाळणार..पण तसं काही झालं नाही. प्रद्युम्न मोकळ्याढाकळ्या विचारांचा होता.

रेशमविषयी प्रद्युम्नचा सॉफ्ट कॉर्नर मला जाणवू लागला होता पण रेशम त्याला टाळत होती का तिलाही त्याच्याबद्दल..हे सगळं माझ्या आकलनशक्तीपलिकडे होतं.

आत्या मात्र म्हणाली,”प्रद्युम्न रेशमच्या मुलासकट तिला स्वीकारणार असेल तर काय हरकत आहे!”

जेमतेम नववी शिकलेली माझी आत्या पण किती प्रगल्भ विचार करत होती ती.

नवऱ्याशिवाय बाईच्या जीवनाचा कसा वैशाख होतो हे ती पुरती जाणून होती.

एकदा रेशम घरात नसताना प्रद्युम्न आला.

मी आत चहा टाकायला गेले. लवकुश इकडून तिकडे धावत होते. या भिंतीला हात लावून ये..त्या भिंतीला हात लावून ये..असं त्यांच चाललं होतं. त्यांच्या राज्याच्या स्वतंत्र भाषेत ते एकमेकांशी बोलायचे. प्रद्युम्न त्यांची मजा बघत होता.

आत्याने सरळ मुद्द्यालाच हात घातला.

“प्रद्युम्न”

“काय आत्या?”

“तुझं प्रेम आहे का रेशमवर?” आत्याने विचारलं.

“नाही म्हणजे होय म्हणजे..”प्रद्युम्न गोंधळला.

“असं ततपप करु नकोस. मांजरासारखं डोळे झाकून दूध पिऊ नकोस.”

——————————————————————

प्रद्युम्न मान्य करेल त्याचं रेशमवरचं प्रेम का तोही करतोय प्रेमाचं नाटक? रेशमचा तो स्वीकार करेल का? जाणून घेऊ पुढील भागात.

===================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-8/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-10/

=========================

नमस्कार वाचकहो,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: