Skip to content Skip to sidebar Skip to footer

वैजयंती (भाग आठवा)

©® गीता गरुड.

यांनी तिच्या पाठीवर हात फिरवत रेशम म्हणताच ती यांना बिलगून रडू लागली. हे तिला थोपटत राहिले. म्हणाले,”मी आहे ना.

मी लावतो त्याचा ट्रेस. तू कपडे भर बेगेत नि आमच्यासोबत मुंबईला चल.” इथे सारखं कुढत  बसण्यापेक्षा तिला आमच्यासोबत येणे सोयिस्कर वाटले. मग यांनी तिला बळेबळे चार घास खायला लावले.

———————————————————–

सकाळी आम्ही देवळात जाऊन आलो. मनोभावे प्रार्थना केली देवाची. हे आई भगवतीचं देऊळ घरापासनं दोन किलोमीटरवर आहे. सभामंडप भव्य आहे. गोलाकार खांब आहेत. देवीची मुर्ती काळ्या पाषाणाची आहे. इतर देवतांची देवालयंही आजुबाजुला आहेत. सभामंडपात खूप खूप शांत वाटतं. लोकं येऊन तासनतास देवीकडे बघत बसतात. मनाला शांती मिळते.

——————————————————-

संध्याकाळी सहाच्या सुमारास वडिलधाऱ्यांच्या पाया पडून आम्ही बाहेर पडलो. खरंतर घरातनं पाय निघता निघत नव्हता पण काही वळणावर फाटे घ्यावेच लागतात तरी सोबत आत्या,प्रसन्ना व रेशम होती.

उजाडता उजाडता मुंबईस पोहोचलो. मोठमोठाले रस्ते,रस्त्यांच्या दुतर्फा मोठमोठ्या इमारती..माझ्यासाठी सगळंच नवीन.

लग्नाआधी अलिबाग लग्नानंर वेंगुर्ला सोडून कुठेच गेली नव्हती.

आमच्या बिल्डींगखाली एक चहावाला भल्या मोठया पितळी टोपात  खाडखुड खाडखुड असं चमच्याने आवाज काढत चहा करत होता.

आम्ही तिथे पाणी घेऊन तोंडं धुतली व काचेच्या ग्लासातनं चहा घेतला.

पिशवीच्या दुधाच्या वासानेच माझा हिरमोड झाला. कसाबसा मी तो चहा घशाखाली ढकलला.

चौथ्या मजल्यावरती घर होतं आमचं. एका मजल्यावर चार घरं.

अंघोळ वगैरे करून सरळ झोपून दिलं.

उठले तर चटई अंथरुन त्यावर लवकुश व त्यांचे बाबा खेळत होते. किती प्रसन्न वाटत होते हे.

———————————————————

स्टोव्ह पेटवून जीजीने तांदूळ वैरले होते. गेसवर डाळ शिजत ठेवली होती.

यांनी कुकर घेऊन ठेवला होता.  मनाशी ठरवलं..आता कुकर लावत जायचा नेहमी.

वरणभात व जीजीने सोबत दिलेल्या आंबोळ्या नि काळ्या वटाण्याच्या उसळीसोबत आमची जेवणं झाली. मी भांड्यांवर हात मारुन घेतला. यांनी दोन गोदरेजची कपाटं घेतली होती.

एका कपाटात जीजी व माझ्या साड्या नि मुलांचे कपडे रचून ठेवले. यांच्या कपाटात यांनी प्रसन्नाचे कपडे हेंगरला लावून ठेवले.

दोन शर्ट नि एक पँट तर होती. आता तो कॉलेजला जाणार म्हणजे त्याला कपडे घेणे क्रमप्राप्त होते. तसं आत्याला पेंशन मिळत होती. तिने दर महिन्याला ठराविक रक्कम देते म्हणून सांगितलं.

यांनी आत्याला नाही म्हंटलं नाही. दर महिना तिच्याकडून भाडोत्र्याकडून पैसे घेतात तसे घेऊ लागले. मला फार राग यायचा ह्यांचा. यांना बोलून दाखवायचे मी पण हे शांत..काहीच प्रतिसाद देत नव्हते.

एकदा सुट्टीला आम्हाला मुंबई फिरायला घेऊन गेले. तारापुरवाला मत्सालय, जिजामाता उद्यान, छोटा काश्मीर,,गेट वे ऑफ इंडिया,घारापुर लेणी,..असं बरंच फिरलो. मुंबादेवीचं,सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. आम्ही घरुन डबा न्हेलेला. एका बागेत बसून जेवलो.

दादरला यांनी प्रसन्नाला कॉलेजात घालण्यासाठी कपडे,जीजीसाठी सुती साड्या,लवकुशसाठी दोन बाबासुट घेतले. मला काय कळतच नव्हतं,हा माणूस नक्की कसा आहे ते.

प्रसन्नाचा दहावीचा निकाल लागला. ऐंशी टक्के पडले. प्रसन्ना मार्कलिस्ट आणायला अलिबागला गेला. येताना त्याच्यासोबत तात्या आले होते. दोन दिवस नातवंडांसोबत राहिले. आजीची तब्येत थोडी नरमगरम असते म्हणत होते. तात्या येताना घरच्या दुधाचे पेढे घेऊन आले होते. प्रसन्नाने पेढे देवासमोर ठेवले व हात जोडले.

मग घरातल्यांच्या पाया पडला. बिल्डींगमधे तसं कोण कोणाशी बोलत नव्हतं तरी तात्या व प्रसन्ना प्रत्येक घरी जाऊन पेढे देऊन आले.

हे उगीचच माझ्यावर कावले.

यांना ओळखपाळख नसताना तात्यांनी कोणाचा दरवाजा ठोठावणं आवडलं नाही.

पण यात माझा काय दोष? तात्यांचा स्वभावच तसा..आनंद वाटून साजरा करण्याची सवय त्यांची आणि हे असे घुमे. तात्यांसोबत जाऊन प्रसन्नाने माटुंग्याच्या पोदार कॉलेजमधे वाणिज्य शाखेत प्रवेश मिळवला.

आजीची तब्येत बरी नसल्याने तात्या लवकर निघाले . जाताना यांनी तात्यांजवळ एक किलो मिक्स मिठाईचा डबा तेवढा दिला.

माझ्या मनात होतं..तात्यांना कपडे करायचे पण हे काय म्हणतील….असा विचार मनात आला. तेव्हाच ठरवलं,स्वतःच्या पायावर उभं रहायचं. आपले असे चार पैसे कमवायचे.

मी पेपरमधल्या जाहिराती बघून नोकरीसाठी अर्ज करु लागले. नोकरीसाठी कॉल आला खरा पण परत हे काय म्हणतील! यांनी सांगितलं..तुला नोकरीची काय गरज..तेही खरं होतं म्हणा..पण घरात बसून रहाणं मला परवडत नव्हतं.

शेवटी आत्या म्हणाली,”नको गं एवढा विचार करुस. तुझ्या मनात आहे ना मग कर नोकरी. अनायासे मी आहेच इथे. मी बघेन लवकुशला. तू अगदी निर्धास्तपणे जा.”

आणि माझी नोकरी सुरु झाली. तशी घरापासून अवघ्या अर्ध्या तासावर पतपेढी होती ती. पगारही जेमतेम होता.

रेशम आत्यासोबत घरची सगळी कामं करायची. लवकुशला सांभाळायची पण मी घरात पाय ठेवला की एका बाजूला जाऊन बसायची.

एकदा रात्री मी ओटा आवरत होते. आत्या डब्यासाठी लागणारी भाजी चिरुन ठेवत होती. लवकुश दोघंही मस्तीखोर..प्रसन्नाला अभ्यास करु देत नव्हते.

लवने प्रसन्नाचं पेन पळवलं तर कुशने त्याची स्केल. कुश ती स्केल उभी तोंडात धरत होता.

स्केलचा कोपरा लागून त्याच्या हिरडीतून रक्त येऊ लागलं.

कुश जोरात डोक्यावर हात मारुन रडू लागला. त्याचं रक्त बघून लव जोरात रडू लागला. प्रसन्ना  व हे त्यांना गप्प करत होते.

मला क्षणभर काहीच सुधरेना.

आत्या म्हणाली,”अगो दुधाला घे त्याला. खरंच दोनेक मिनटांत रक्त यायचं थांबलं. असं आधीही झालेलं खरं पण कोणता उपाय करायचा हे आयत्यावेळी खरंच लक्षात येत नाही.”

प्रसन्ना लवसोबत क्याचक्याच खेळू लागला. थोड्या वेळाने कुशही त्यांना सामिल झाला.

एवढं सगळं डोळ्यासमोर होऊनही रेशम टिव्हीकडे डोळे लावून बसलेली.

मला रागच आला रेशमचा.

“काळीज आहे की नाही हिला?” मी आत्याला म्हणाले.

“हिला म्हणजे?”

“आता आपल्या दोघींव्यतिरिक्त ही कोण आहे इथं?” मी जरा चिडूनच विचारलं.

“रेशम होय. वैजू,अगं तुला वाटतं तेवढी वाईट तर मुळीच नाही रेशम. तू नसताना मला सगळ्या कामात मदत करते रेशम. दुपारची स्वतः लवकुशला खेळवते नि मला पडा म्हणून हुकूम सोडते. हां आता प्रसन्ना घरी आला की मात्र या बंड्यांना तोच हवा असतो मग हे दोघं आमच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. अगदी लापशी,दूधही प्रसन्नानेच भरवायचं असतं.” आत्या म्हणाली.

“हो गं. प्रसन्नाचा लळा लागलाय लवकुशला. पण ही रेशम..इतकं सगळं मी नसताना करते..मग माझ्याशीच का बोलत नाही..मी आली की अशी कोपऱ्यात का जाऊन बसते?”

“काहीतरी अढी आहे तुझ्याबद्दल तिच्या मनात.”

“आत्या,मी विचारु का गं तिला,काय सलतय तिच्या मनात ते?”

“वैजयंती,अगं काहीवेळा थोडं थांबलेलंच बरं असतं. थोडा वेळ जाऊदेत. तिचं तिला उत्तर भेटेल.” आत्या म्हणाली.”शिवाय तुही तिच्या जागी तुला स्वतःला ठेवून बघ. कदाचित तुला उत्तर सापडेल तिच्या वागण्याचं.” आत्याने मला समजावलं.

मी मग दोन दिवस विचार करत होते..रेशमच्या जागी स्वतःला ठेवून आणि एका क्षणाला माझ्या ध्यानात आलं..रेशमला वाटतय की मी तिचं गुपित उघड केलंय ती सांगण्याआधी.

मी ठरवलं आपल्याच्याने होईतो रेशमला सावरायचं. यातून बाहेर कढायचं.

मी अनन्याच्या बहिणीला,ईशादीला फोन केला. तिला ऋतुराजचा पत्ता शोधायला सांगितलं. तिने सांगितल्याप्रमाणे मला त्याचा पत्ता कळवला.

मी एक दिवस हाफ डे घेऊन कामावरुन निघाले. बस पकडली. खिडकीजवळ बसले. मनात असंख्य विचार येत होते आपण करतोय ते बरोबर आहे नं! असा दुपारचा कुठे तो भेटणार घरात! दुसरं मन म्हणालं,तो नाही भेटला तर त्याचे आईवडील तरी भेटतील,सांगू त्याला तुमचा मुलगा आमच्या मुलीला खेळवतोय..

असं किती दिवस चालायचं..बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड..एकदा तडा गेला की गेला..सांधता येत नाही..लोकांना गावात चघळायला विषय झालाय..मिनतवाऱ्या करुनही तो आमच्या घरी रेशमला मागणी घालायला येत नाही..

दरवेळी वेगवेगळी कारणं पुढे करतो..अशी सगळी भाषणाच्यावेळी करतात तशी तयारी करत होते.

इतक्यात एक आजीबाई माझ्या बाजूला येऊन बसल्या.

कंडक्टर तिकीट तिकीट करत आला. मी पैसे देऊन तिकीट घेतलं. आजीबाईंकडे नेमकी पाचशेची नोट.

“अरे देवा..सुट्टे सगळे संपले वाटतं बाजारात.” आजी तिचं इवलुसं पाकीट चाचपडत म्हणाली.

“आजी,कुठे जायचंय तुम्हाला?” मी विचारलं तसं चष्म्यातून माझ्याकडे बघत म्हणाली,”मेघवाडी”.

मी कंडक्टरला सतरा रुपये दिले आजीच्या तिकीटाचे.

“आता तुझी उधारी कधी गं देणार मी तुला!” आजीच्या डोळ्यात ऋणभाव दाटून आला.

“अहो,आजी तुम्ही माझ्या आजीसारख्याच अहात हो. पैशाचं कसलं घेऊन बसलाय.” मी हसत म्हंटलं.

आजीने मग माझ्या माहेराची,सासरची चौकशी केली. मेघवाडी करत कंडक्टरने बेल मारली तसं आजीला धरून मी उठले. दोघीही खाली उतरलो.

आजीसोबतच मी एका गल्लीत शिरले. नेमकं मला जायचं होतं त्याच बिल्डींगमधे आजीचं घर..आजीला खुदकन हसू आलं. दुसऱ्या मजल्यावरच्या सात नंबर ब्लॉकसमोर मी थांबले व बेल दाबली. आजी वर जाईनात. त्याही तिथेच थांबल्या व गोड हसल्या.

“आजी हे तुमचं घर?” मी विचारलं.

आजीने होकारार्थी मान हलवली. इतक्यात एका गोड परीने दार उघडलं. मागे तिची आई उभी होती.

“ही सून माझी आणि ही नात. हे माझंच घर. वयावरुन वाटत नाही ना..कसं वाटणार! लग्नानंतर सतरा वर्षांनी लेकरु झालं मला.”

मला काहीच उलगडा होत नव्हता. वाटलं ही थोरली सून असावी आजीची पण आजी थोरली,धाकटी काहीच तर बोलली नाही.

आजी आत गेली हातपाय धुवायला तोवर तिच्या सुनेने चहा आणला माझ्यासाठी. त्या छोटीने तिच्या चुलबोळक्यांतल्या कपबशीतून तसाच खोटुखोटूचा चहा आणला..म्हणाली आमचापन ध्या. मी तो इवलासा कप आधी ओठांना लावला तशी ती छोटुकली खुदकन हसली. पुठ्ठ्याचं बिस्कीटही दिलंन सोबत खायला. मी विचारलं,”नाव काय गं तुझं?”

“तंपदा..”ती फ्रॉकच्या पट्ट्याशी चाळा करत म्हणाली.

तेवढ्यात आजी आली. . सुट्टे पैसे घेऊन. मी नको म्हणत असताना तिने घ्यायला लावले.

मी ऋतुराज वाटोळे म्हणताच आजी हसली म्हणाली “ऋतुराज म्हणजे संपदाचा बाबा. सध्या फिरतीवर गेलाय तिकडे तळकोकणात.”

मी मग एका इंशुरन्स कंपनीतर्फे पॉलिसी काढा हे सांगण्यासाठी आले होते असं जसं सुचलं ते बरळले.

मनात मात्र विचारांचा डोंब उठला होता..म्हणजे ऋतुराज विवाहीत..उगा खेळवतोय तो रेशमला. लग्न करणार म्हणे रेशमशी..मी ओठांवर आलेले शब्द महत्प्रयासाने फेटाळले. या आजीस कसं नि काय सांगणार होते मी!

तिच्या सुनेस काय सांगणार होते..आणि सांगून त्यांचा हसताखेळता संसार कसा बरं मोडणार होते! कुणीतरी तिला सांगायला हवं होतं..बाई ग तुझ्यापाठी तुझा नवरा मुलींना फिरवतो, त्यांना लग्नाचं आमिष दाखवतो.

माझ्याच्याने तरी ते शक्य नव्हतं. मी भिंतीवरील फेमिली फोटोही कव्हर होईल अशा रीतीने आम्हा चौघींचा फोटो काढला.

कसाबसा त्या तिघींचा निरोप घेऊन मी निघाले. आजीने परत ये गं असंही सांगितलं मला.

घरी काय सांगावं,जाऊन त्याला जाब विचारावा का? का सोडून द्यावा त्याला असाच..दुसऱ्या एखाद्या रेशमची पारध करायला? माझी रेशम माझं म्हणणं ऐकून घेईल का? का पुन्हा बिथरेल? मला न विचारता गेलीसच कशाला म्हणेल..प्रश्नच प्रश्न..डोकं भिरभिरलं.

कशीबशी घरी आले. प्रसन्ना व हे लवकुशला हेअरकटी़गसाठी घेऊन गेले होते. रेशम कपड्यांना इस्त्री करत होती.

आत्या टिव्हीवर सिरीयल बघत होती. मी फ्रेश झाले. पाणी घेतलं व खाटीवर बसले.

माझी अवस्था पाहून आत्याने टिव्ही बंद केला व माझ्याजवळ येऊन म्हणाली,”वैजू,बरं वाटत नाहीए का तुला? थांब चहा आणते थोडा.”

मी आत्याला खुणेनेच नको म्हंटलं. आत्या माझ्याजवळ बसली. मी बोलू लागले,”आत्या,मी तुझ्या सांगण्याप्रमाणे ऋतुराजच्या घरी जाऊन आले.”

“भेटला का तो? काय म्हणाला?” आत्याने विचारलं. रेशमही कान देऊन ऐकू लागली.

“नाही तो फिरतीवर गेलाय सध्या पण त्याची आई,बायको व मुलगी भेटली.

आत्या,ऋतुराज..रेशमचा प्रियकर एका मुलीचा बाप आहे.” मी आत्याला सांगत होते तेव्हा रेशमच्या हातातून तांदुळाचं ताट निसटलं..घरभर तांदूळ झाले. रेशमचा चेहरा घामाघूम झाला होता.

——————————————————————

ऋतुराज विवाहित असुनही त्याने रेशमला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं,तिला लग्नाचं आमिष दाखवलं..काय होईल पुढे..रेशमला हे कळल्यावर ती जीवाचं बरंवाईट करुन घेईल का आणखी काही जाणून घेऊया पुढील भागात.

=========================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-7/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-9/

=========================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: