वैजयंती (भाग सातवा)


©® गीता गरुड.
मी कपाटातून जांभळी इरकल काढली. ओलेत्या अंगावर ब्लाऊज चढत नव्हता. मागून येऊन यांनीच मदत केली. “जा आता आंघोळीला,” मी म्हणाले तर..
माझ्या भोवती आपल्या हातांचं रिंगण घालून माझ्या हातातला साडीचा बोंगा स्वत:कडे घेऊन, लांबसडक बोटांनी सराईतपणे निऱ्या घालू लागले.
रात्रीत वाढलेल्या दाढीची खुंटं माझ्या मानेला टोचली आणि काही क्षण का होईना मी शहारले.
——————————————————–
“अहो,काय करताय हे. मला येते साडी नेसता.” मी क्रुतककोपाने म्हणाले. यावर यांनी मला आवडतं साडी नेसवायला मग थोडा पॉज घेऊन माझ्या बायकोला म्हंटलं.
खाली वाकून यांनी सर्व निऱ्या एका रेषेत करुन आतून सेफ्टीपीन लावला. वरचा निऱ्यांचा गुच्छाही यांनीच आत खोवला. अगदी सराईतपणे मला पदर काढून दिला व पाठीमागे पीनअपही केला.
आरशात माझ्यामागे उभे रहात माझं प्रतिबिंब न्याहाळत म्हणाले..”तूच बघ नवऱ्याने नेसवलेल्या साडीत किती खुलून दिसतेस ते.” यांनी माझ्या बटवेणीत मोगऱ्याचे दोन लांबसडक गजरे माळले आणि परत जवळ येणार तोच बाळांचा दारावर थाप मारण्याचा आवाज आला. हे निराश झाले. मी खुदकन हसले तर माझ्या मानेवर बोटं फिरवत म्हणाले..”नंतर बघतो तुझ्याकडे.”
यांनी दोघा चिरंजीवांना उचलून बाथरुममध्ये शंभोसाठी न्हेले. आज बापलेक एकत्र शंभो करणार होते.
आत्या माझ्याकडे बघत राहिली. हळूच कानात म्हणाली..”वैजा,इतक्या पद्धतशीर निऱ्या,पदर..हे तुझ्याच्यानं होणं नाही. ही कमाल जावईबापूंचीच.”
मी परत आत्याला लाडीकपणे दटावले.
आज लवकुशचा वाढदिवस. मी माझ्या बाळांना पावडरटिकी लावली. दोघांना एकाच रंगाचे बाबासुट घातले. दोघांना पाटावर बसवून त्यांचं आम्ही चौघीं व इंदुमावशींनी औक्षण केलं. त्यांना नारळीपाक भरवला.
थोड्याच वेळात भटजीकाका आले. भाऊजींनी पुजेची सारी पुर्वतयारी करुन ठेवली होती . मखर खरंच फार सुंदर दिसत होता.
त्यात सत्यनारायण देवाचा फोटो बसवला. मी पितांबरीने लख्ख केलेलं ताम्हण,पळी तिथे जवळच ठेवलं. परातीत तुळशी ठेवल्या. समोरच्या पाटावर ऑफव्हाइट सदरालेंगा व डोक्यावर नेहरुटोपी घातलेले दादा व कित्येक दिवसांनी नटलीथटलेली जीजी बैसली.
आईने मागून दादांच्या उपरण्याची व जीजीच्या शालीची गाठ बांधली. पूजा ऐकायला आम्ही सतरंजी घालून बसलो. मधेच आत्या स्वैंपाकघरात गेली. तिने बैठा भात करून घेतला. सर्वांनी मिळून आरती म्हंटली.
भटजीकाकांनी प्रसाद बनवला. पानाभोवती रांगोळ्या रेखाटल्या. हिरव्या कंच केळीच्या पानावर वरणभाताची मूद,उसळ,कोबीची भाजी,लोणचं,पापड,चटणी,कोशिंबीर वाढण्यात आलं. कितीतरी दिवसांनी जीजी व दादा एकत्र जेवायला बसले. लव व कुश त्यांच्यासमोर बसून आपल्या हाताने आपल्याला हवं तसं खात होते. मधूनच हाहा करुन पाणी मागत होते.
संध्याकाळी प्रसादाला गावातली झाडून सगळी मंडळी आली होती. चिवडालाडूची डिश ठेवली होती. तीर्थप्रसाद द्यायला भाऊजी बसले होते. मी बेळगाव सिल्क
नेसले होते. केसांची घट्ट वेणी घालून तीवर अबोलीचा गजरा माळला होता.
खरंतर घरात असं काही असेल तर रेशम साडी नेसायचीच पण यावेळी ती चक्क चुडीदारमधे होती. जसा आईच्या वेणीत माळला तसा आत्याच्या वेणीतही तिने मोगऱ्याचा गजरा माळला. आम्हाला नको म्हणणारी आत्या रेशमला नाही म्हणत नव्हती. आत्याच्या तळहातावरली मेंदीही छान गडद रंगली होती.
रेशम चिवडालाडूच्या प्लेटी भरत होती आणि हे सर्वांना आग्रहाने देत होते. मी आलेल्या बायकांना हळदीकुंकू लावत होते. माझ्या कपाळावर हळदकुंकू इतक्या जणींनी लावलं की माझी टिकलीही त्यात गुडुप झाली होती.
माझ्या लवकुशचा पहिलावहिला वाढदिवस. मी खूप खूष होते. हे आणि भावजी केक आणायला गेले होते. दोन किलोमीटरवर एक नवीन केकशॉप यांच्याच वर्गमित्राने उघडलं होतं. तिथून आणणार म्हणाले होते.
सव्वाआठ झाले तरी यांचा पत्ता नाही. मी खूप चिडले होते. लव कुश मात्र प्रसादावर फिदा झाले होते. आबांकडून थोडाथोडा प्रसाद भरवून घेत होते. माझे डोळे मात्र यांच्या वाटेकडे लागले होते.
आणि शेवटी मी चेंज करायला जाणार तोवर गाडीचा हॉर्न ऐकू आला.
हे हातपाय धुवून केकचा बॉक्स घेऊन आत आले. टिपॉयवर डिश ठेवून त्यावर दोन केक ठेवले. मेणबत्त्या लावल्या नि आम्ही दोघं आमच्या पिलांना घेऊन उभे राहिलो. काका व आत्याने बर्थडे साँग म्हंटलं.
मुलांऐवजी आम्हीच मेणबत्त्यांवर फुंकर मारली व त्यांचा हात धरुन केक कट केले. केक दोघाही गुलामांना आवडेना. चिडचिडू लागले मग दादांनी परत दोघांना मांडीवर घेतलं व तळहातावर द्रोण ठेवून त्यातील प्रसादी चिमटीचिमटी भरवू लागले तर दोघेही मिटक्या मारु लागले.
आत्या म्हणाली,”जावईबापू,नाहीतरी तुमच्या लग्नाच्या रिसेप्शनला आम्ही नव्हतो. तो आता सेलिब्रिट करा. भरवा बघू केक एकमेकांना.” बास. यांना तेच हवं होतं. यांनी केकचा पीस अलगद बोटांत पकडला व मला भरवला. मी तशीच उभी..गालात केक भरलेला.
आई म्हणाली,”अगो खा तो लवकर नि भरव बघू जावईबापूंना.”
मी तोंड मोकळं केलं नि मोठासा तुकडा यांच्या तोंडात कोंबला. यांची जी फजिती झाली ती मी मिश्कील डोळ्यांनी पहात होते . शेवटी न रहावून मी यांना पाणी आणून दिलं.
रात्री पावभाजीचा बेत होता. जोडीला साजूक तुपातली डाळतांदळाची खिचडी व मठ्ठा होता. जिलबी बाहेरुन आणली होती.
बर्थडेपार्टीला रेशमची मैत्रीण अनन्या तिच्या बहिणीला,ईशाताईला घेऊन आली होती. तिला मी हळूच खुणेने स्वैंपाकघरात मदतीला बोलावून घेतले. विळी दिली तिच्याकडे नि लिंबू दिले,चिरायला.
गप्पागप्पांत मी ईशाच्या कंपनीचं नाव ,पत्ता विचारुन घेतला. मग तिला थँक्यू म्हणून बाहेर पाहुण्यांत पाठवले. मी ठरवलं..आता या ऋतुराज प्रकरणाचा छडा लावायचा.
जेवणं झाल्यावर पानसुपारीसोबत गप्पा छान रंगात आल्या होत्या. तात्या दादांना सांगत होते,”उशिरा का होईना विजय हा सत्याचाच होतो. तुमची वाडवडिलांची जमीन तुम्हाला मिळाली. नातू घरात खेळू लागले. हे बघून समाधान वाटतय जीवाला.”
——————————————————
“आई..आई ग..”
कोणाचा आवाज?
मागे वळून बघितलं तर हे ओरडत होते. चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती.
मी लगेच पाणी घेऊन आले..पण यांना धड पाणी प्यायलाही जमेना.
छातीत भरल्यासारखं होतय म्हणू लागले. मी प्रचंड घाबरले.
कोणत्याही क्षणी रडू फुटणार अशी माझी अवस्था झाली.
गळा दाटून आला. भाऊजींनी लगेच डॉक्टरकाकांना फोन लावला. दहाएक मिनटात डॉक्टरकाका हजर. त्यांनी यांना तपासलं. दंडावर इंजेक्शन दिलं व गोळ्या दिल्या.
नेहमीच बाहेर जेवतोस का विचारलं तर हे हो म्हणाले. डॉ. सरोदे पंचक्रोशीतले नावाजलेले डॉक्टर. कधीही मध्यरात्री फोन लावला तरी त्यांची तपासायला येण्याची तयारी. पेशंट तर त्यांच्या बोलण्यानेच अर्धा बरा व्हायचा. बाहेरची महागडी औषधं वगैरे काही नाही. त्यांच्या औषधगोळ्यांनीच बरं वाटायचं।
डॉ.काका म्हणाले,” बाहेरच्या भोजनाचा परिणाम आहे हा. आता मिसेसला घेऊन जा सोबत. चांगलंचुंगल करुन घालेल,घरच्या तिखटाचं. बाकी काही घाबरण्यासारखं नाही. एसिडीटी आहे. वाटेल बरं.”
जीजी पुढे झाली,”डॉ.साहेब किती दिवस सांगते यांना नोकरीच्या ठिकाणी बिर्हाड थाटायला पण ही दोघंही ऐकत नाहीत माझं.”
मी कानकोंडी झाले. अंगठ्याने जमीन पोखरु लागले.
मग परत या विषयावर चर्चा झाली..बाहेरचे अन्नपदार्थ,त्यातलं अतिप्रमाणातलं शीळं तेल, हलक्या दर्जाघे मसाले वगैरे वगैरे आणि एकमताने मला व लवकुशला यांच्यासोबत मुंबईस पाठवण्याचा ठराव पास झाला.
पण एकेक वर्षाच्या बाळांसोबत नवख्या ठिकाणी रहाणं..हे दिवसभर कामावर..नाही म्हंटलं तरी मला अवघडच वाटू लागलं.
इथे माझ्या लवकुशला घ्यायला,खेळवायला जीजी,दादा होते..तिथे माझी पिल्लं कावरीबावरी होऊन आपल्या माणसांना शोधतील, रडू लागतील..मग मी कसं आवरणार त्यांना. अनेक विचार मनात पिंगा घालू लागले.
दादांना घरभाटलं टाकून येणं शक्य नव्हतं आणि जीजींना दादांपासून दूर न्हेणं..केवळ माझ्या बाळांच्या देखरेखीसाठी हे माझ्या मनाला पटत नव्हतं.
आत्याने माझी मनोवस्था ओळखली पण ती तरी कशी म्हणणार मी येते तुमच्यासोबत रहायला..शिवाय प्रसन्ना नुकताच दहावी झालेला..त्याचाही विचार घ्यायला हवा होता.
डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी यांना खूप बरं वाटलं। छातीवरचं दडपण गेलं. हे म्हणाले,”तुझी आत्या येईल का आपल्यासोबत रहायला? आपण प्रसन्नाच्या शिक्षणाची तिथे व्यवस्था करु.”
मला एकदम हायसं वाटलं. मी आधी प्रसन्नाला फोन लावून त्याचं म्हणणं विचारलं. मुंबईला रहायला मिळणार,तिथल्या कॉलेजात जायचं,लवकुशसोबत खेळायचं या विचारानेच नुकतच मिसरुड फुटलेला प्रसन्ना खूष झाला.
आता मला उजाडतय कधी नि आत्याला विचारतेय कधी असं झालं होतं. लवकुश रात्रभर आत्याजवळच होते.
पहाटे भिनभिनतानाच मी आत्याला उठवलं..तिला रात्रीचं यांचं बोलणं मग प्रसन्नाला केलेला फोन..सगळं काही सांगितलं.
“आत्या गं,आता फक्त तू हो म्हण.” मी आत्याला म्हणाले.
“तू,प्रसन्ना..तुमच्या दोघांचा निर्णय तो माझा निर्णय. तुझ्या लहानपणी तुला साभांळलं. आता तुझ्या लवकुशला सांभाळेन.”
“आत्या गं”,म्हणत मी आत्याच्या गळ्यात पडले.
आत्या व प्रसन्ना आमच्यासोबत रहाणार म्हणताच जीजी,दादा,आई,तात्या निर्धास्त झाले.
यांनी व भाऊजींनी मुंबईला जाऊन किचनमधली भांडी,किराणा..या सगळ्याची व्यवस्था केली. त्यासाठी दोन दिवस तिथेच राहिले.
मुंबईस जाणं जीवावर आलं होतं पण त्या रात्री यांचं आजारपण बघितलं नि म्हंटलं यांना असं एकटं सोडून चालणार नाही.
प्रसन्ना, त्याची व जीजीची कपड्यांची बेग घेऊन हजर झाला. काकूने त्याच्यासोबत मला आवडतात म्हणून तिच्या हातच्या भाजणीच्या चकल्या व अनारसे दिले होते.
घरी ठेवण्यासाठी वेगळे नि मुंबईला नेण्यासाठी वेगळे. त्याशिवाय सांडगे,ताकातल्या मिरच्या,बटाट्याचे वेफर्स,नागलीचे पापड,करवंदाचं लोणचं..
जीजी ते सारं पाहून म्हणाली,”अगं तुझ्या काकूने आमच्याकडून तुला देण्यासाठी असं काही शिल्लकच ठेवलं नाही बघ.” तरी यांनी जीजीकडून हट्टाने बेसनलाडू आणि पोह्यांचा चिवडा करुन घेतलाच.
आम्ही जायच्या आधी दोन दिवस..रेशम अगदी उड्या मारत आली. जीजीला म्हणाली,”जीजी,मला बोलावलय ऋतुने स्टेशनवर. त्याला घेऊन येते मी.”
जीजी भडकली..म्हणाली,”महिना झाला येतो येतो म्हणून हुलकावण्या देतोय तो. आजचं तरी कशावरुन खरं. जायचंच झालं तर एकटी जाऊ नकोस. अनंताला घेऊन जा सोबत.”
“पण जीजी,भैया गरम डोक्याचा आहे,त्यापेक्षा मी जाते ना एकटी.”
अनंताभाऊजी म्हणाले..”बरं जा पण लवकर ये त्याला घेऊन.”
ऋतुराज येणार म्हणून जीजीने नातवंडांनी केलेला पसारा जरा नीट लावला. कांदाभजी व चहा केला. तिन्हीसांज होत आली तरी रेशमचा पत्ता नाही.
हे तालुक्याला गेलेले दादांसोबत ते आले. त्यांना रेशम कुठे दिसेना.
“जीजी रेशम कुठे शेजारी गेलीय का?” यांनी विचारलं.
“नाही..तुला सांगायचं होतं पण तुझं आजारपण वगैरे. त्यात राहून गेलं बघ.”
“नक्की काय झालंय? कोण सांगेल का मला?”
“आपली रेशम एका मुलाच्या प्रेमात पडलेय.” जीजीने कोंडी फोडली.
“काय? प्रेमात पडण्याएवढी मोठी झाली का ती? कुणीतरी फुस लावली असेल तिला. नाव काय त्याचं?” हे जीजीला विचारु लागले.
ऋतुराज वाटोळे..अकाऊंटंट आहे म्हणे. पगार उत्तम आहे.
बरं फेमिली..
“नाही त्याबद्दल काहीच माहित नाही तिला. आज त्याला घरी घेऊन यायचीय ती.” जीजी म्हणाली व यांच्या प्रतिक्रियेची वाट बघू लागली. हे केसांत बोटं घालून निपचित बसून राहिले. वाट बघण्यापलिकडे आता दुसरा पर्याय नव्हता.
इतक्यात रेशम आली. आम्ही सर्वांनी तिच्या मागे पाहिले..पण कुणीच नव्हते. ती एकटीच आलेली.
जीजीने विचारलं..”कुठेय तुझा ऋतु..आज येणार होता ना तो. फसवा मेला.”
“जीजी तो आलेला पण त्याला अर्जंट काम निघालं म्हणून परस्पर गेला. सॉरी म्हंटलय त्याने. लुच्चालफंगा नाहीए तो. ऋतुबद्दल वाईट बोललेलं मी मुळीच खपवून घेणार नाही.” रेशम तरातरा तिच्या खोलीत निघून गेली.
“वर तोंड करुन बोलतेय कारटी. जीभ हासडून हातात द्यायला पाहिजे हिची. आम्हाला काळजी वाटते,कळकळ वाटते म्हणून बोलतो ना.
रक्ताच्या नात्यापेक्षा आता तो पोर प्यारा झाला हिला. आम्ही का दुष्मन आहोत हिचे!” जीजीने बोलताबोलता पदराने डोळे टिपले.
हे जीजीजवळ जाऊन म्हणाले,”मी आहे नं. तु नको काळजी करुस.”
मग रेशमचं जेवणाचं ताट घेऊन हे तिच्या खोलीत गेले. रेशम उशीत डोकं खुपसून होती.
यांनी तिच्या पाठीवर हात फिरवत रेशम म्हणताच ती यांना बिलगून रडू लागली. हे तिला थोपटत राहिले. म्हणाले,”मी आहे ना.
मी लावतो त्याचा ट्रेस. तू कपडे भर बेगेत नि आमच्यासोबत मुंबईला चल.” इथे सारखं जीजीची बोलणी ऐकत बसणण्यापेक्षा तिला आमच्यासोबत येणे सोयिस्कर वाटले. मग यांनी तिला बळेबळे चार घास खायला लावले.
———————————————————-
मुंबईत यायला आत्या तयार झाली म्हणून वैजयंतीला धीर आला. रेशमलाही सोबत न्हेणार. रेशम तिथे नीट वागेल का? वैजयंती, ऋतुराजला शोधून काढण्यात यश मिळवेल का? जाणून घेऊया पुढच्या भागात.
जाणून घेऊया पुढील भागात.
========================
मागील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-6/
पुढील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-8/
=========================