वैजयंती (भाग सहावा)


©® गीता गरुड.
रात्री यांचा फोन आला. बढती मिळाली सांगत होते. लवकुशच्या वाढदिवसाला येतो म्हणत होते. महिन्यांनी येतो म्हणत होते. मला यांना रेशमविषयी सांगावसं वाटत होतं पण यांना नक्कीच त्रास झाला असता म्हणून मी ते टाळलं.
रेशम माझ्याशी नीट बोलेनासी झाली. मी तिला विचारलं..रेशम चहा देऊ?..उत्तर नाही. स्वतः आत गेली. चहा गाळून घेतला. मला कसंसच वाटलं. तिचं माझ्याकडे असं दुर्लक्ष करणं फारच कष्टदायक होतं माझ्यासाठी.
मी रेशमला लहान बहीण मानत होते. मी तर तिला काहीच बोलले नव्हते. भाऊजी,जीजी इतके बोलले तरी त्यांच्याशी बोलत होती..मीच काय तिचं घोडं मारलं होतं!
———————————————————-
लवकुशकडेही ती दुर्लक्ष करु लागली. ती आणि तिचं विश्व. मी मनात म्हंटलं..प्रेम का कोणाला होत नाही! मला बारावीतला वर्ग आठवला..तेंव्हाचा तो आठवला..त्याची नजर..त्याच्या डोळ्यांतले भाव पण मी सावरले होते. मी त्याच्या नजरेला प्रतिसाद दिला नव्हता..का..माझ्यावरचे संस्कार म्हणून का भीतीपोटी का प्रेम करण्याची,पेलण्याची ताकद नव्हती माझ्यात! काही असो रेश्मावन्संचा अबोला मला असह्य होत होता.
त्यादिवशी दुपारी दादा घरी आले ते अगदी खुशीत. जमिनीच्या केसचा निकाल उशिरा का होईना आमच्या बाजूने लागला होता. एडिशनल कलेक्टरने फेरफाराच्या नोंदी लक्षात घेऊन निकाल दादांच्या बाजूने दिला होता.
मी दादांना पाण्याचं तांब्याभांड दिलं. जीजींनी देवाला गुळखोबरं ठेवलं. म्हणाली,”पावलास रे गणराया. मणाचं ओझं हलकं केलंस डोक्यावरचं. खऱ्याला न्याय दिलास. जीजी,भाऊजी,रेशमवन्सं आम्ही सारे देवाच्या पाया पडलो व त्याचे आभार मानले.
जीजींनी संध्याकाळी बासुंदीचा बेत केला. बासुंदीपुरी दादांनी स्वतःच्या हाताने लवकुशला भरवली. लवकुशचा वाढदिवसही जवळ आला होता. दादांनी वाढदिवसादिवशी सत्यनारायणाची पूजा घालायचं ठरवलं.
भटजीकाकांना सांगून झालं. वाणसामानाची यादी जीजी सांगत गेल्या तशी मी तयार करत गेले. भाऊजी यादी वाण्याजवळ देऊन आले. मी व जीजी बाजारात जाऊन लवकुशसाठी सारख्या रंगाचे बाबासुट घेऊन आलो. पुजेसाठी फुलं वगैरे घेतली.
रेशम मात्र कशातच नव्हती. ऋतुराजने भेटीची सांगितलेली तारीख उलटून पंधरा दिवस होत आले होते. रेशम दिवसेंदिवस रोडावत चालली होती. ती माझ्याशी विनाकारण बोलत नाही याचा मला राग येत होता.
मी कोण साध्वी नव्हते. रेशमचा अबोला,तिची अस्वस्थता समजून घेण्याइतकी मी प्रगल्भ वगैरे मुळीच नव्हते.मीही ठरवलं..गेली उडत. समजते कोण स्वतःला. हिने प्रेमं करायची नि माझ्यावर रागवायचं..का म्हणून!
खरंतर मी थोडं समजुतीने घ्यायला हवं होतं पण भाचरांना जीव की प्राण करणारी ही आत्तू,केवळ ती माझी लेकरं म्हणून रडली तरी दोघातल्या एकाला उचलेना तेंव्हा मात्र जीजी म्हणाली, “वैजू तू नको वाईट वाटून घेऊस. त्या कारटीचं टाळकं ठिकाणावर नाहीए सध्या.”
मलाही आता यांच्या येण्याचे वेध लागले होते.
——————————————————-
पुजेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आई,तात्या व आत्या आले. इतक्या महिन्यांनी माहेरच्या माणसांना बघून मला कोण आनंद झाला होता. तिघांनीही कढत पाण्याने न्हाऊन घेतलं. जीजीने तिच्या मऊ,सुती साड्या आई व आत्याला नेसायला दिल्या. दिगू,प्रसन्ना,आजी,आजोबा,चिंगी..सगळे कसे आहेत..काकू का नाही आली..माझी प्रश्नावली थांबतच नव्हती.
दिगू आता होस्टेलला रहायला गेला होता. प्रसन्नाचा अभ्यास व्यवस्थित चालला होता. काकूची चिंगी यायचा हट्ट करत होती पण नेमकी तिला गालगुंड उठली म्हणून आणता आलं नाही असं आत्या सांगत होती.
“जीजी पुजेसाठी साडी कोणती नेसणार?” मी विचारलं. जीजी म्हणाल्या,”तुझ्या आईने गुलबक्षी रंगाची दिलेय नं तुझ्या लग्नात तिचीच घडी मोडते. दादांना आवडतो गुलबक्षी रंग.”
जीजीचं बोलणं ऐकून आई खूष झाली,”अय्या खरंच! बरं झालं बाई तुमची साडी निवडताना हा गुलबक्षी नि दुसरा पोपटी रंग मनात भरले होते माझ्या. निवड करता येत नव्हती. शेवटी वन्संनी माझी तारांबळ बघून गुलबक्षी साडीवर शिक्कामोर्तब केलं.” आईचं बोलणं ऐकून आत्या गोड हसली.
जीजी आईला म्हणाली,” खरंच कसं मैत्रिणीसारखं नातं आहे तुम्हा दोघीत. मला ना जाऊ ना वन्सं..अप्रूप वाटतं तुमच्या नात्याचं.”
आत्या म्हणाली,” हे तुमचं मोठेपण . नाहीतर आजकालच्या मुलामुलींचं नात्यांशी वाकडंच जरा.”
यावर जीजी म्हणाली,”आपली वैजू नाही हं तशी. या कोर्टकचेरीच्या वावटळीत धीराने उभी राहिली पाठीशी आमच्या. दुसरीतिसरी..मला काय करायचंय म्हणत नवऱ्यासोबत चालू पडली असती. लवकुश नि वैजूने केवढातरी आधार दिलाय आम्हास या अडचणीच्या काळात.”
“जीजी अहो,वैजूचं कर्तव्यच होतं ते.” आई म्हणाली.
“हो नं मग आता आम्ही आमचं कर्तव्य बजावणार. दिड वर्ष झालं दोघं नवराबायको वेगळं रहाताहेत. दोनेक महिन्यांनी काय ती निसटती भेट त्यातही लाजेमुळे एकमेकांशी नीट बोलत नाहीत. आता आला की अशोकला सांगणार तुझं बिर्हाड घेऊन जा. अशोकला बढती मिळालेय. मुंबईस बदली व्हायचीय म्हणे. कंपनीची खोलीही मिळते. तुर्तास तिथे रहातील. आम्हीही अधनंमधनं जाऊन राहू. या बाळगोपाळांची आठवण काही स्वस्थ बसू द्यायची नाही बघा.”
—————————————————-
“तेही खरंच पण राहिले कुठे जावईबापू?” जीजी असं बोलायला नि ओसरीवर यांचा आवाज ..
“आई पाणी आण गं.” मी तांब्याभांडं घेऊन बाहेर पळालेच. जीजी व आईच्या हसण्याचा आवाज मागून कानावर पडत होता.
यांनी चूळ भरली. तोंड धुतलं तोवर मी स्नानासाठी कढत पाणी काढलं. यांनी मिशी ठेवली होती. वेगळेच दिसत होते. मला बाई हसूच आलं. मी टॉवेल खुंटीवर अडकवताना मिशीला पीळ देत म्हणाले,”वैजा,मिशी आवडली का?”
मी फिस्सकन हसले. यांना रागच आला माझा. यांनी मगातलं पाणी माझ्या अंगावर उडवलं. भिजले न् मी. आता घरात तरी कशी जाणार! यांच्याकडे डोळे वटारुन पाहिलं तर म्हणे धर साबण पाठीला लाव. मी निघालेच तिथून. माजघरात जीजी,आईच्या गप्पा रंगलेल्या. आत्या आतल्या खोलीत बसली होती नि तिच्या दुखऱ्या गुडघ्यांना रेशम बाम चोळत होती.
“गुणाची आहे गं तुझी नणंद,” आत्या माझ्याकडे बघत म्हणाली. माझा भिजला पदर पाहून तोंडावर बोटं ठेवत म्हणाली,”अगो,वैजू भिजलीस किती तू ! आंघोळ घालून आलीस वाटतं मोठ्या बाळाला.”
मी आत्याकडेही डोळे वटारुन पाहिलं तसं आत्या म्हणाली,”साबण नीट लावलास नं जावयांच्या पाठीला.” आत्तूला डोळे वटारुन दाखवत मी साडी बदलून आकाशी गाऊन घातला.
आकाशी आवडता रंग वाटतं इकडच्या स्वारींचा..आत्याचं टुमणं चालूच होतं. कितीतरी दिवसांनी मी रेशमच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं.
भाऊजींनी माठाच्या झाकणावर मेंदीचे कोन आणून ठेवले होते. रेशम घेऊन आली आणि आत्याचा तळहात धरून त्यावर मेंदी घालू लागली. आत्याच्या डोळ्यातून टपकन अश्रू सांडले. आत्याचे यजमान गेल्यापासनं तिच्या हातावर कोणी मेंदी घातलीच नव्हती.
————————————————–
हे आपल्याला कधी सुचलच कसं नाही.. का आपण आत्याला रुढींच्या नावाखाली ग्रुहीत धरत आलो आजवर ..मी असा विचार करत असतानाच यांनी माझ्या अंगावर ओलं टॉवेल फेकलं.
मी रागावणार इतक्यात हे पसार झाले आणि कुश उठला. उठायचा तोच पळत सुटायचा बोका. तरी पलंगाला उशा,लोड लावलेले मी. त्याला दुधाला घेतलं.
मी तिरक्या नजरेने आत्याच्या गोऱ्यापान हातावर ,बोटांवर उमटणारी मेंदीची वेलबुट्टी पहात होते.
आत्या लांब कुठेतरी भूतकाळात हरवली होती. आत्याचं झाल्यावर जीजी व आईचे तळहात मेंदीने रंगले.
मी कुशला झोपवलं व ओसरीवर गेले.
—————————————————–
हे पताका लावत होते. पताकांच्या दोऱ्या वर बांधताना दुसरं टोकं ताणून धरण्याचं काम मी करत होते.
स्टुलवर उभं राहुनही यांची नेत्रपल्लवी चालू होतीच.
भाऊजी,दादा व तात्या..तिघं मिळून मखर बनवत होते.
भाऊजी म्हणाले,”निजुया आता. उरलेलं काम सकाळी करुया.”
यावर दादा नकार दर्शवत म्हणाले,”नातवंड पहाटे उठायच्या आधी मला ही ओसरी झळझळीत झाडून हवी. एखादी टाचणी लागली म्हणजे गुलाबी पावलांना!
बरं मखरही आतल्या खोलीत नेऊन ठेवायचा नाहीतर दोघे बंडे घर समजून आत जाऊन बसतील आणि भटजींनी सांगायच्या आधी पाणी सोडतील. “
दादांच्या या कौतुकबोलांवर सगळेच हसलो. खुद्द बाळाचे बाबाही मिशीतल्या मिशीत हसत होते.
“अच्छा म्हणजे हे असं गुपचूप हसण्यासाठी मिशी राखलेय तर.” मी मनाशीच पुटपुटले.
दादा म्हणाले,”वैजू,तू आत झोप जा बरं आणि अशोक तुही प्रवास करुन आलाहेस. जा निजा.”
पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही डिंकाचे हात धुवायला गेलो. इतक्यात भाऊजींचा आवाज..”आणि मी..मलाही झोप आलेय. सकाळपासनं कामं करतोय..आमंत्रण,यादी सगळंच. ” भाऊजी उठत म्हणाले.
“बैस खाली नि हाती घेतलेलं काम पुरं कर. आम्ही दोघं आहोत तुझ्या सोबतीला.” दादा म्हणाले.
आम्ही खोलीत गेलो.
लवकुश दोघे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून झोपले होते. हे त्यांची पप्पी घेऊ लागले.
“अहं,पप्पी घेऊ नये झोपलेल्या बाळांची.” मी दटावलं तसे गपचूप पलंगावर पहुडले.
मीही कानातले वगैरे काढून,केसाचा बँड सोडून त्यांच्याशेजारी पहुडले.
हे अगदी वाकून पाहू लागले.
म्हंटलं,” काय पहाताय?”
“तुला.”
“झोपा गप्प उद्या उठायचंय लवकर.” मी परत दटावलं.
तसं माझ्या भाळावर चुंबून म्हणाले..”मोठ्यांची पप्पी घ्यायला हरकत नाही ना! “
“नको मिशी..”
“का?..आवडली नाही?”
“बरं नाही आवडली तर उडवाल?”
“छे! छे!”
“कळलं तुमचं प्रेम.”
“तू पण नं..काहीतरी माग..एखादा ड्रेस,साडी..ते नाही..सरळ माझ्या मिशीवर घसरतेस.”
“बायकोपेक्षा मिशी प्यारी!”
“इकडे ये दाखवतो कोण प्यारी..आणि क्षणात मी यांच्या मिठीत जायबंदी झाले.”
——————————————————-
पहाटे पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली.
हे शांत झोपले होते. पाळण्यात माझी दोन्ही बाळं शांत निजली होती.
रात्री त्रास देऊ नये म्हणून आत्यानेच की काय त्यांना हगीज घातली होती. मी हळूच तिथून सटकले.
आई,जीजी,आत्या तिघींचंही न्हाणं झालं होतं.
इंदूमावशीही लवकर कामाला आली होती.
मी लगबगीने बाथरूममध्ये शिरले.
आज केसावरुन न्हाताना रात्रीच्या गुलाबी आठवणी अंगभर रेंगाळत होत्या आणि मी वेडी एकटीच हसत होते.
“आवरलं का गं वैजयंती?” आत्याच्या आवाजाने मी भानावर आले. फटाफट कपडे चढवून बाहेर आले.
“चल बरं पंख्याला बैस. केस वाळूदेत.” आत्या म्हणाली.
मी पंख्याखाली बसताच माझे पंचाने गुंडाळलेले केस तिने सोडले व खसखसा पुसू लागली.
“किती सुंदर सुवास येतोय गं केसातून तुझ्या! कोणता शाम्पू?”
“जीजीज शाम्पू. जीजी ना नागरमोथा,आवळकाठी,रिठा,शिकाकाई..हे सगळं दळून आणून ठेवते वर्षभरासाठी. केसाची लांबीही वाढलेय ना गं आत्या.”
“अगं फक्त लांबीच नाही वाढली तर मस्त दाटपणाही आलाय केसांना. भाग्यवान आहेस हो.” आत्या म्हणाली.
लवकुश उठून दादांसोबत बाहेर फिरत होते. दादा त्यांना काल रात्री लावलेल्या पताका दाखवत होते.
इंदूमावशीने साताठ नारळ खवून दिले. आईने वाटप काढलं. मी नाश्त्यासाठी कांदेपोहे बनवले,चहा केला. बघताबघता पांढऱ्या वटाण्याची उसळ,कोबीची भाजी,गोडं वरण,काळ्या वटाण्याची आमटी,सोजी(खीर) असे टोप एका रांगेला लागले.
जीजी तयार व्हायला गेल्या. साडीचा गुलबक्षी रंग जीजीच्या गोऱ्या रंगाला,केसांतील पांढुरक्या छटांना खुलून दिसत होता. मी जीजीच्या इवल्याशा पोनीत मोगऱ्याचा गजरा माळला.
जीजी,आई,आत्या एकमेकींना आपापल्या तळहातावरली मेंदी दाखवत होत्या. लवकुशमुळे माझं मेंदी घालणं राहून गेलं होतं व रेशमचा मुडच नव्हता. तरी बरं ती आत्या व आईसोबत ओढूनताणून का होईना हसूनखेळून होती,बोलत होती. आत्याने तिला मेंदी न काढण्याचं कारण विचारलं तेव्हा सर्दी होते म्हणाली.
मीही साडी नेसायला आत गेले. हे अजुनही गादीवर लोळत होते. बऱ्याच दिवसांनी आल्याने दादांनीही त्यांना उठवलं नव्हतं.
मी कपाटातून जांभळी इरकल काढली. ओलेत्या अंगावर ब्लाऊज चढत नव्हता. मागून येऊन यांनीच मदत केली.
“जा आता आंघोळीला,” मी म्हणाले तर
माझ्या भोवती आपल्या हातांचं रिंगण घालून माझ्या हातातला साडीचा बोंगा स्वत:कडे घेऊन, लांबसडक बोटांनी सराईतपणे निऱ्या घालू लागले. रात्रीत वाढलेल्या दाढीची खुंटं माझ्या मानेला टोचली आणि काही क्षण का होईना मी शहारले.
———————————————–
लवकुशचा वाढदिवस, तसंच वैजयंती अशोकसोबत मुंबईस जाते का वेंगुर्ल्यात रहाते जाणून घेऊया पुढील भागात.
क्रमशः
==================
मागील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-5/
पुढील भाग:
=========================