वैजयंती (भाग पाचवा)


©® गीता गरुड.
मला असं गोंधळलेलं पाहून रेशम माझ्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत म्हणाली,”चिल भाभी चिल. “ऋतू नवीन फ्रेंड आहे माझी.”
यावर काय बोलणार! कधीही निळ्या रंगाचा ड्रेस न घालणाऱ्या रेश्माने आज चक्क माझा निळ्या रंगाचा,चंदेरी काठांचा चुडिदार घातला होता. अचानक ती आपल्या पेहरावाकडे लक्ष देवू लागली होती..थोडाफार मेकपही करु लागली होती.
दादा त्यांची कागददपत्रं गोळा करण्यात गुंग होते. जीजी लवकुशमधे रममाण होती.
मला काहीच सुचत नव्हतं.
————-
यांना फोन लावून रेशमवन्संबद्दलचा माझा संशय सांगावा का? आणि हे तिला काही बोलले तर मग मी कानफाटी ठरेन..बरं हा माझा संशय..किती टक्के खरा आहे..कदाचित तसं काही नसेलही.
रेशम, मी नुकताच बांधलेला जाईचा गजरा माळून मला व जीजीला बाय करुन निघालीही होती. अनंतभाऊजी माझ्या बाजूला येऊन बसले. त्यांच्या दोन्ही कडांवर लव व कुश होते. नुसतं खाली उतरून मातीत खेळण्यासाठी चुळबूळ चालेली पठ्ठ्यांची. आता बाsबा,काsका असे काही शब्द उच्चारू लागले होते.
“वैनी रेशमची काळजी करते आहेस ना!”
माझ्या मनातलं कसं बरं ओळखलं भाऊजींनी या विचारांनी मी गांगरले.
“ऊं हूं. तू कशाला गिल्टी फिल करतेस! रेशमच्या वागण्यात खरंच बदल झालाय. एरवी मी घरी आलो की फुलपाखरासारखी भिरभिरत असायची माझ्याभोवती. अनंतभैया माझ्यासाठी काय आणलंस..हेच का आणलंस?पेपर्स कसे गेले..भारंभार चौकश्या करायची पण यावेळी बघतोय..एवढे फायनलचे पेपर्स देऊन आलो तरी एका शब्दाने विचारलंन नाही.”
“भाऊजी,मी म्हणजे माझा संशय खरा आहे का?” मी धीर करुन विचारलं.
“हो वैनी. मला शैलामावशी बोलली फोनवर. तिथेही नेहमीसारखी रुळली नाही म्हणे..फोनवरच असायची. मावशीने विचारलंही पण ताकास तूर लागू दिला नाही पठ्ठीने. शैलामावशीच्या लीलीशीही फिसकटलं म्हणे तिचं. मी बघतो कायतरी करतो.”
“हे असं,लवकुशसोबत पायरीवर बसून?” मी विचारलं तसे जोरात हसले व म्हणाले..”अगं वैनी तू ओळखलं कुठैस मला अजून! हमारे जासूस चारोतरफ फैलाए है हमने. संध्याकाळपर्यंत.. अगदी उद्या सकाळपर्यंत तरी कळेलच मला. कोण ऐरागैरा असला तर घेतील त्याला कोपच्यात.”
भाऊजींचा कॉन्फिडन्स बघून मला हसूच आलं शिवाय ते अशावेळी घरी आहेत याचाही कोण आधार वाटला मनाला, पण रेशमही काही कच्ची खेळाडू नव्हती. तिच्या सराईतपणे खोटं बोलण्यावरुन मला ती प्रेमात कुठवर वहावत गेली असेल याचा अंधुकसा का होईना अंदाज येत होता.
—————————————————-
आज लवकुशला डॉक्टरांकडे डोससाठी न्यायचं होतं. मी भाऊजींसोबत गेले. जीजीने इंदूमावशीच्या मदतीने स्वैंपाक आवरला.
इंदूमावशी या घरात गेली पंधरा वर्ष स्वैंपाकाचं काम करते म्हणे. त्यांचा हसतमुख स्वभाव मला आवडला.
बाजारातनं येताना कुंकवाची डबी घेऊन या म्हणाल्या होत्या. डॉक्टरांनी अगदी हलक्या हाताने इंजेक्शन्स दिली तरी मी डोळे गच्च मिटून घेतले होते. लवकुशपेक्षा जास्त वेदना मला होत होत्या.
खरंच आई होणं म्हणजे नेमकं काय असतं ते टप्प्याटप्प्यावर अनुभवत होते. दोघांनी टेंटें करताच डॉक्टरांनी शिट्ट्या वाजवून दाखवल्या. दोघे लबाड हसू लागले.
डॉ. म्हणाले,”आईला सांगा..आम्ही दोघं शूर आहोत. तू रडतेस कसली!”
औषधं वगैरे घेऊन घरी आलो तोवर दिड वाजून गेला होता. दादांनी व जीजीने लवकुशाला घेतलं..खरंतर मला त्यांना पाजून झोपवायचं होतं पण जीजी म्हणाली,”उन्हातून आलीएस ना. जरा पंख्याला बस. पाणी पी. मी इंदुमावशीला कुंकवाची डबी व लांबसं गंगावण,आकड्याचं पाकीट दिलं. इंदूमावशी खूप खूष झाली,म्हणाली,”व्हयाच होता गंगावन माका पन मागुक लाज. बरा केलास आनुन दिलास ता.”
माझं आवरेस्तोवर इंदुमावशीने जेवणासाठी पानं घेतली होती. वरणभाततूपलिंबू..सोबत डाळिंब्याची उसळ व अधमुऱ्या दह्याची वाटी..जेवण बघूनच माझी रसना चाळवली. पण दादांनी लवला घेतलं होतं व त्यांचं जेवण झालं नव्हतं. मी दादांना म्हंटलं,”लवला माझ्याकडे द्या नि तुम्ही व भावोजी जेवून घ्या.”
“तू आधी जेव वैजयंती. तुझ्यावर दोन लहान जीव अवलंबून आहेत बाळा. तुम्ही दोघं जेवा. मी माझ्या सौ सोबत जेवतो नंतर.” दादा मुलांशी खेळत म्हणाले.
“इश्श! काय बाई बोलणं हे. वय काय नि बोलता काय!”
“का? काय चुकीचं म्हणालो मी. फक्त जोडीने जेवतो म्हणालो. उखाणा तर नाही नं घ्यायला सांगितला मी आजीला.” दादा असं म्हणताच जीजी चिडली..”नातवांचं निमित्त करुन मला आजी आजी म्हणता सारखे. कळतात सगळी बोलणी.” जीजी फुरंगटली.
“झालं आम्ही काही बोलतच नाही. अळी मिळी गुप चिळी.” लवच्या ओठांवर त्याची अनामिका ठेवत दादा म्हणाले तसं कुशला काय कळलं कोण जाणे दोन्ही हाताच्या बोटांनी पायाची बोटं पकडत लब्बाड खुखु हसू लागला. तसे दादा कुशला दटावित म्हणाले,”शुss आजीला राग येईल हं.”
पालथ्या घड्यावर पाणी म्हणत जीजी ओटा आवरायला गेली.
रेशम सकाळी निघाली ते ऋतुराजने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन थांबली. अनंताचे खबरे तिच्या मागावर होतेच.
रेश्माला तिथून रिक्क्षा पकडून ये असा त्याचा फोन आला. ती सांगितल्याप्रमाणे इप्सित स्थळी पोहोचली. ऋतुराज कोपऱ्यात उभा होता. दोघंजण हातात हात गुंफून एका हॉटेलाच्या फेमिली रुममधे शिरले.
“रेशम” ऋतुराजने रेशमच्या ल़ाबसडक बोटांवर हात ठेवला.
“ऋतु मला असं सारखंसारखं भेटणं शक्य होणार नाही. आज अनंतभैयाचे दोस्त पाळतीवर होते माझ्या. तू येशील माझ्या घरी? माझ्या दादांकडे येऊन माझा हात माग ऋतू.”
“बरं बाई. यावेळी तरी शक्य नाही. परत आलो की बघतो. थोड्याच महिन्यांत तू माझ्या मुंबईच्या घराची राणी होशील.”ऋतुराज तिला समजवू लागला.
इतक्यात वेटर ऑर्डर घेऊन आला. ऋतुने दिलेली गोड बातमी ऐकून रेशमला आजचा फालुदा अधिकच गोड लागला. दोघांनी एकमेकांना एकेक स्कुप आयस्क्रीम भरवलं. रेशमला तिथून निघावसंच वाटत नव्हतं पण घरी तर तिला यावच लागणार होतं.
तब्बल चार वाजता रेशम घरी आली. ऋतुच्या घरुन जेवून आले म्हणाली. इतक्यात अनंत भाऊजी पुढे आले..”थांब रेशम, कोणाशी खोटं बोलतैस तू? कोणासोबत फिरतेस? आज कोणासोबत नवतरंग हॉटेलच्या फेमिली रुममधे बसली होतीस? सगळं खरंखरं सांग.”
अनंत भाऊजींच्या कपाळावरची शीर ताडताड उडत होती. त्यांची लाडकी एकुलती एक बहीण आपल्याच गावाबाहेरच्या हॉटेलात मित्रांना कोणासोबत बसलेली दिसणं हे त्यांच्यासाठी अतिशय लाजिरवाणं होतं.
रेशम खोटं बोलून घराबाहेर पडत होती याचा भावजींना खूप राग आला होता. एव्हाना ही गोष्ट जीजी व दादांनाही कळली. जीजीचा ज्वालामुखी फुटणारच होता. त्या काही बोलणार इतक्यात दादांनी हाताने त्यांना थांबण्याची खूण केली.
रेशम..दादांनी नेहमीसारखी प्रेमाने साद घातली खरी .।रेशमने आतापर्यंत थोपवून धरलेला अश्रुंचा बांध फुटला. रेशम दादांच्या कुशीत शिरली व हुंदके देऊन रडू लागली.
भाऊजींना आता रेशमचा खूपच राग आला. ते रागाने मुठी आवळत म्हणाले,”नाटकं आहेत सगळी हिची. इथे बरी भेदरलेल्या सशाचा आव आणते नि बाहेर रंग उधळते.”
यावर रेशम हमसतहमसत म्हणाली,”दादा,मी खरं सांगते. मी कुठचंही चुकीचं पाऊल उचललं नाहीए. ऋतुराजला भेटायला जाते म्हणलं असतं तर मला कोणी जाऊ दिलं नसतं.”
“बरं,आता रडणं बंद कर नि मला सांग तुला हा भेटला कुठे?” दादा म्हणाले.
रेशम म्हणाली,”मला अनन्याकडे भेटला होता ऋतूराज. तिच्या बहिणीचे,ईशादीचे साहेब आहेत ते. ईशादी मुंबईला रहाते ना. सध्या बाळंतपणासाठी इथे आली होती तर बारशाला ऋतुराजलाही आमंत्रण होतं. अनायासे इथे असणाऱ्या त्यांच्या मुंबईतील फर्मच्या युनिटमधे जायचंच होतं त्यांना.
आठवडाभरासाठी आले होते. बारशाच्यावेळी ईशादीने आमची रुजवात घालून दिली. ऋतुराजचं बोलणं,आपलं म्हणणं ऐकून घेणं,त्याच्या मनात असलेला स्त्रियांबद्द्लचा आदर..या साऱ्या गोष्टींनी ऋतु मला पहिल्या भेटीतच आवडला.
अनन्या व मी मिळून ऋतुला आपल्या गावातला पुरातन किल्ला,डोंगरी..सारं काही दाखवलं.
एकदा अनन्या आमच्यासोबत आली नव्हती तेव्हा नदीकाठी ऋतुने मला प्रपोज केलं न् मी नाही म्हणू शकले नाही पण वेळ मात्र मागून घेतला. काही दिवस काहीच संपर्क ठेवला नाही ऋतुशी..ऋतु समजदार..त्याने मला टेक युवर ओन टाइम असं सांगितलेलं। मलाच ऋतुवाचून रहावेना तेव्हा मी अनन्याला बोलले त्याच्याबद्दल.
तिच्याकडून कळलं की तो इथल्या युनिटमधे पंधरवड्याने येतो. मी स्वतः जाऊन ऋतुला भेटले. त्यानंतर आम्ही भेटतच राहिलो.”
“अच्छा,म्हणजे प्रकरण बरंच पुढे गेलंय म्हणायचं.
त्याचं पुर्ण नाव,तो काय करतो, कुठे रहातो,त्याचे आईवडील काय करतात?” दादांनी विचारलं.
जीजी पुढे झाली..म्हणाली ,”भावंडं किती त्याला?”
“खरंच मला काही ठाऊक नाही. मी कधी विचारलंच नाही.” रेशम म्हणाली.
जीजी वैतागत म्हणाली..”त्या पोरासोबत फिरलीस तू गावभर आणि काहीच माहिती नाही त्याच्या घरादाराची! किती महिने चाललंय हे?”
“चारेक महिने झाले.” रेशम स्फुंदत म्हणाली.
“आणि इतक्या महिन्यांत तू त्याचं पुर्ण नाव,भावंडं किती,त्याचं शिक्षण,नोकरी..काहीच विचारलं नाहीस!” जीजी संतापाने पेटत होती.
“ऋतुराज वाटोळे. सीएस म्हणजे कंपनी सेक्रेटरी आहे तो. मुंबईत कुठत्यातरी बड्या कंपनीत कामाला आहे म्हणाला. आम्ही चार महिन्यात आठेक वेळाच भेटलोय. तो काही सारखासारखा येत नाही इकडे.”रेशम जमेल तसं स्पष्टीकरण देत होती.
“रेशम, तुला काही विचारलं त्याच्याबद्दल तर तू नन्नाचा पाढा वाचतेयस. मग इतकं फिरुन केलात काय,बोललात काय?” जीजी कळवळून म्हणाली.
“इश्श, आम्ही घरचे विषय बोलायला भेटत नाही.” रेशम त्याही स्थितीत लाजत म्हणाली.
“तसलं नाही तर मग कसलं बोलता..हवामान,तापमान का चंद्रसूर्य,तारे का झाडंझुडपं,जडीबुटी वगैरे.” भाऊजी उपहासात्मक म्हणाले.
तसं रेशम फणकारली,”भैया तू प्रेमात पडशील जेव्हाकेव्हा तेव्हाच कळेल तुला. बायदवे, प्रेम करावं लागत नाही,होत तं ते आपसूक.”
“दिडदमडीची नाही अक्कल नि प्रेम करते म्हणे!” भाऊजी ओरडले.
तसं रेशम म्हणाली,”प्रेम करायला अक्कल लागत नाही भैया. मन लागतं. दोन मनं जुळावी लागतात. काय कमी आहे माझ्या ऋतुमधे! एवढा उच्चशिक्षित आहे,चांगल्या कंपनीत कामाला आहे,चांगला पाच आकडी पगार आहे . उगा आरोप करायचा म्हणून करु नका.
खरंतर मीच तुम्हाला योग्य वेळी हे सारं सांगणार होते पण त्याआधीच भैयाने..असो. तुम्हाला वाटतं तसा ऋतु मला फसवून वगैरे जाणार नाही. त्याने आज मला कबूल केलंय की पुढच्या वेळी तो नक्की आपल्या घरी येऊन माझा हात मागणार आहे.”
“एकटाच येणार! त्याचा भाऊ,आईवडील वगैरे?” जीजीने विचारलं. खरं तर तो येणार म्हंटल्यावर जीजीला थोडं हायसं वाटलं.
“त्या नंतरच्या गोष्टी. आधी तो तुम्हाला तरी आवडू दे.” रेशम म्हणाली.
“जसं काय आम्ही नाही म्हणालो तर तू नाद सोडणार त्याचा.” भाऊजी मान झटकत म्हणाले.
दादा म्हणाले,”जीजी,अनंता..ती म्हणतेय ना एवढं त्याला घरी घेऊन येणार आहे मग आपण हा विषय तुर्तास इथेच थांबवूया. रेशम लहान राहिली नाही आता. तिला तिचं भलंबुरं समजतं. ठेचकाळलीच तर आपण आहोतच पाठीशी.”
जीजी व अनंत भावजींना दादांचा निर्णय आवडला नाही. अनंत भाऊजी म्हणाले,”हे असंच होणार होतं. मला ठाऊक होतं. मुलगी..परक्याचं धन म्हणून नेहमीच तिला पाठीशी घालत आलात तुम्ही. तुम्हाला ना कोणीही गंडवू शकतं.”
जीजी म्हणाली,”अनंता,जा बघू जरा पड जा. नको जास्त विचार करुस. तिची अक्कल मसनात गेली म्हणून आपण आपल्या घराची शांती नको बिघडवायला. घराला मोठ्या आवाजात बोलणं सहन.होत नाही.” जीजी भाऊजींची समजूत घालत म्हणाली.
तसे भाऊजी त्यांच्या खोलीकडे निघाले पण तो ऋतू इथे येइस्तोवर त्याला भेटायचं नाही अशी जाताजाता बहिणीला तंबी देऊन गेले.
इंदूमावशी सारं ऐकत होती पण जीव गेला तरी धन्याच्या घरच्या गोष्टी चारचौघात पसरवणार नाही इतकी ती इमानदार होती.
रेशमला मात्र बरंच हलकं वाटत होतं. तिच्या डोक्यावरचं मणाचं ओझं जे उतरलं होतं. तिच्या खात्रीप्रमाणे दादा तिच्या पाठीशी होते.
रात्री यांचा फोन आला. दोन महिन्यांनी येतो म्हणत होते. मला यांना रेशमविषयी सांगावसं वाटत होतं पण यांना नक्कीच त्रास झाला असता म्हणून मी ते टाळलं.
रेशम माझ्याशी नीट बोलेनासी झाली. मी तिला विचारलं..वन्सं चहा देऊ..उत्तर नाही. स्वतः आत गेली. चहा गाळून घेतला.
मला कसंसच वाटलं. तिचं माझ्याकडे असं दुर्लक्ष करणं फारच कष्टदायक होतं माझ्यासाठी.
मी रेशमला लहान बहीण मानत होते. मी तर तिला काहीच बोलले नव्हते. भावजी,जीजी इतके बोलले तरी त्यांच्याशी बोलत होती..मीच काय तिचं घोडं मारलं होतं!
—————————————————–
बोलेल का रेशम माझ्याशी? निदान माझ्या माहेरचे येतील त्यांच्याशी तरी.. जाणून घ्यायचंय ना भेटुया पुढील भागात.
क्रमश:
===================
मागील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-4/
पुढील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-6/
===================