Skip to content Skip to sidebar Skip to footer

वैजयंती (भाग चौथा)

©️ ®️ गीता गरुड.

तात्या दोन दिवस का होईना आपल्यासोबत रहाणार म्हणून मला बरं वाटलं.

लवकुश उठले तसं त्यांना पाजून,छान झबलं,टोपडं घालून मी दादा,तात्यांकडे सुपुर्द केलं नि आंब्याच्या खोलीकडे वळले. रेशमबरोबर पिकलेले आंबे काढून मी नेलेल्या सुपात ठेवू लागली.

“वहिनी,दादांनी वरच्या कोर्टात पिटीशन केली पाहिजे ना गं,”

तसं नसतं गं ते प्रांत अधिकाऱ्यांकडे अपिल केलं पाहिजे. त्यांनीही विरोधात निर्णय दिला तर एडिशनल कलेक्टरकडे..अशी ती प्रोसेस लांबलचक असते. तात्या समजावत होते दादांना तू नको काळजी करुस.

काळजी करु नकोस बोलायला सोप्पं आहे गं. त्या बागेत खेळायचो आम्ही. तिथली झाडंपेड जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि आता एका निर्णयाने आम्ही त्या जागेपासून पंरके होणार,कल्पनाच सहन होत नाही. सत्याला वाली नसतो का गं वैनी?

तू नको बरं विचार करुस इतका. सगळं सुरळीत होईल बघ.. मी रेश्मावन्सला धीर दिला. यांची तीव्रतेने आठवण आली. सध्या दादांसोबत असते तर किती आधार वाटला असता त्यांना! अनंतभावजीही तिकडे पुण्याला..त्यांच्या परीक्षा,अभ्यास यात इकडे आलेच नव्हते.

किश्याने ओल्या काजी(फकं) काढून आणल्या. एक हिर घेऊन अंगठ्यात पकडून काज फोडून त्यातून डग्गळ गर बाहेर काढला नि जीजीने दिलेल्या पाण्याच्या पातेल्यात असे गर काढून टाकू लागला.

हे असे गर काढणं तेवढं सोप्पं नव्हे. हातास डिंक लागतो आणि आठवडाभर बोटं मेंदी लावल्यासारखी लालतांबडी दिसतात,बोटांची सालपटही जातात.

जीजीने ते गर एकदा धुवून घेतले व ऊन पाण्यात ठेवले. सालं निघू लागली तसे सालं काढून टाकली व ओल्या खोबऱ्याचं वाटण घालून फर्मास उसळ बनवली.

रेशम व मी मिळून आमरस तयार केला. माहेरी आमरस तयार करताना रस काढल्यावर ठेवलेल्या कोयी चोकून पांढऱ्याशुभ्र करणं मला फार आवडायचं. इथे मात्र त्या तशाच टाकल्या नि पुऱ्या करायला वळले.

त्याच तेलात पापड,फेण्या तळून घेतल्या.

जीजीने ऊनऊन बैठा भात रांधला. ओला नारळ,जिरं पाट्यावर वाटून सात्विक गोडं वरण बनवलं.

पहिला आमरस प्रथम देवाला दाखवला. सगळे मन भरुन जेवले. सुग्रास जेवणाने वातावरणातला ताण थोडा हलका झाला.

दादा व तात्या ओसरीवर चटया टाकून लवंडले. दुपार असली तरी आजुबाजूच्या आंबे,जांभळं,फणसाच्या झाडांमुळे सावली व गारवा होता.

चारेक वाजता मी त्यांना चहा नेऊन दिला. मग दोघं अंगणात गप्पा मारत बसले. तात्यांनी दादांना प्रांत अधिकारांकडे अपिल करण्याचा सल्ला दिला.

दुसऱ्याच दिवशी तात्या स्वतः दादांना प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. दादा घरी आले ते चेहऱ्यावर आशेचे किरण लेवून. तात्यांनी त्यांना सकारात्मकतेचा मार्ग दाखवला होता.

लवकुशमुळे घराला गोकुळाचं स्वरुप आलं होतं.

दोघांचं हसणं,रडणं,खेळणं यात सारं घर गुंतल गेलं.

घरालाही वय असतं. खरंच. लवकुशच्या येण्याने,त्यांच्या दोरीवर विसावलेल्या झबल्या,टोपड्यांनी,दुपट्यांनी घर पुन्हा लहान झालं.

बाळगुटी कशी द्यायची ते आईने शिकवलेलं खरं पण जीजींनी ती वेळ माझ्यावर येऊच दिली नाही. ठरवलेल्या वारी म्हणजे बुधवारी,शुक्रवारी जीजी दगडी सहाण बाहेर काढायची..स्वच्छ धुवायची व एकेका वस्तूचे ठराविक फेरे घेऊन गंधासारखं औषध तयार करायची मग विशिष्ट आकाराच्या चमच्यातून एकेका बाळाला दोन पायांत घ्यायची.

बाळाच्या तोंडात बोट घालून दुसऱ्या साइडने चमच्यातलं औषध भरवायची. दोघेही गडगड आवाज करुन फेकून द्यायला बघायचे पण जीजीचं बोट त्यांच्या तोंडात असल्याने त्यांचा औषध फेकून टाकायचा प्रयत्न असफल व्हायचा.

काही थेंब त्यांच्या नाकातोंडावर उडवायचे मग मी व रेशम दोघी एकेकाला खाद्यावर घेऊन ढेकर काढायला लावायचो. औषध घेतल्यावर बाळं दोनअडीच तास सूस निजायची.

सुनावणीच्या वेळी मी येईन सोबत असा दादांना धीर देऊन तात्या जायला निघाले. जीजीने आंब्याची पेटी व नुकतेच उतरवलेली रामफळं सोबत दिली.

नातवांना सोडून जायला तात्यांचं मन होत नव्हतं. डोळ्यातले अश्रू महत्प्रयासाने लपवीत त्यांनी बाळांचे गालगुच्चे घेतले व माझ्या डोळ्यांत न बघता छत्री टेकवीत निघाले.

माझा कंठ दाटून आला होता. खरंच देवा हे सासर,माहेर..हा काय खेळ निर्माण केलाहेस मन आक्रंदत होतं.

लांब बाहीचा सदरा,काळा कोट,लाल किनारीचं धोतर,एका हातात छत्री रेटत जाणाऱ्या तात्यांच्या आक्रुतीकडे मी एकटक बघत होते..अगदी नजरेच्या टप्प्यातून दूर जाईपर्यंत.

जीजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला.

“चल बघू घरात,” जीजी म्हणाल्या. लवकुश झोपले होते..खाली चटईवरच. आज जीजी त्यांच्यासाठी झोळ्या बांधणार होती. पाळण्यापेक्षा झोळीत बाळ निजल्याने त्याचं डोकं छान आकार घेतं असं जीजीचं मत होतं.

जीजीने तिच्या धुवून वाळवलेल्या जुन्या साड्या काढल्या व किश्याच्या मदतीने झोळ्या बांधून घेतल्या. मी अजुनही मुडमधे नव्हते.

जीजी एकच वाक्य म्हणाली,”वैजयंती,तुझे वडील तुला काही महिन्यांनी दिसू तरी शकतील. आमच्यासारख्यांनी काय करायचं! आपलं दु:ख कितीही मोठं असलं तरी संसार हा करावाच लागतो. आपल्या उदासिनतेची छाया घरावर पडता कामा नये. बाई ..दोन अक्षरी शब्द पण अर्थ माहिती आहे त्याचा! वैजू,बाई म्हणजे त्याग,समर्पण,सहनशक्ती,मर्यादशीलता,आनंद,खळखळाट,खोली. बाई होणं सोप्पं नाही. या साऱ्या भूमिका निभवाव्या लागतात बाळा.”

जीजीचं वाक्य न् वाक्य माझ्या मनोपटलावर बिंबत होतं. किती खरेपणा होता त्या वाक्यांत. माणूस असेपर्यंत आपला. एकदा गेला की संपतं सारं..उरतात त्या फक्त आठवणी,ज्या जीजी वहात होती. मी ठरवल़ं,जीजीला कधीच टाकून बोलायचं नाही.

रेशमची लास्ट इयरची परीक्षा चालू झाली. परीक्षा होईस्तोवर ती अभ्यासात गुंतलेली असायची.

मधुनच येऊन लवकुशशी खेळायची. माझ्यासोबत आता तिला हव्या तशा गप्पा मारता येत नव्हत्या. तिच्या त्या चिठ्ठीबद्दल विचारायचं होतं मला पण धीर नाही झाला.

रेशमची परीक्षा संपली त्यादिवशी ती खूप खूष दिसत होती. परीक्षेचा ताण मनावरुन गेल्याने तिला हलकंहलकं वाटत असावं..मी माझा सर्वसामान्यी कयास लावला.

मधे सुट्टीत रेशम तिच्या मावशीकडे रहायला गेली. लवकुशमधे दर महिन्यात प्रगती होत होती. आता मीही या घराला सरावली होती.

हे मध्यंतरी दहा दिवसांची सुट्टी घेऊन आले. लवकुशला कुशीने वळताना पाहून फार खूष झाले. त्या दहा रात्री माझ्यासाठी सुगंधी फुलांची ओंजळ घेऊन आल्या होत्या. यांच्या मनात मला औरंगाबादला न्यायचं होतं.

“वैजू,मी विचारु दादांना बिर्हाड औरंगाबादेस नेण्याबद्दल? अगं तिथे कंपनीने मोठं घर दिलंय आपल्याला. तिथे शाळाही चांगल्या आहेत. फक्त तू हो म्हण.” हे म्हणाले.

“तुम्ही म्हणताय ते पटतय मला पण सध्या इथे माझी जास्त गरज आहे. दादा कोलमडलेत. अनंत भावजी(धाकटा दिर) तिकडे लांब पुण्याला. रेशम..असो(मी तो विषय टाळला). शिवाय मुलं लहान आहेत. तिथे औरंगाबादला आपलं असं कोण आहे.
काल कुशने डोकं आपटून घेतलं. ओठ रक्ताळला. मला काहीच सुधरेना, त्याचं रक्त पाहून अगदी भिरभिरल्यासारखं झालं मला, पण जीजींनी कुशला पाज म्हणताच मी त्याचा ओठ पुसून त्याला अंगाशी घेतलं आणि काही मिनटांत तो रक्तस्त्राव थांबला. हे असं गाईड कोण करणार तिथे?”

माझ्या प्रश्नावर हे निरुत्तरीत झाले पण नंतर दिवसभर घुम्यासारखे बसून होते. एक शब्द बोलले म्हणून नाहीत माझ्याशी.

मीच रात्री भरल्या फुग्याला टाचणी मारावी तसं विचारलं,” राग आलाय का माझा? मी इतकी वाईट आहे का? हवं तितकं रागवा मला,वाटल्यास तिथे घेऊन जा पण असं बोलणं नका थांबवू. हा तुमचा अबोला माझा जीव घेईल.”

” तुझं म्हणणं रास्त आहे वैजू. मी खरंच भाग्यवान. मला तुझ्यासारखी सहचारिणी लाभली. दादांच्या केसचं काम झालं की मात्र तू व मुलं माझ्यासोबत रहायला या. एकट्याच्याने मला तिथं करमत नाही. तुझी,बाळांची आठवण येते खूप.”

हे माझ्याशी बोलत होते आणि मी यांचा आवाज ह्रदयाच्या कप्प्यात साठवून ठेवत होते ,बेगमी करतात तसा. सारखीसारखी रजा यांना मिळत नव्हती नि इकडच्या फर्ममधे बदलीही तुर्तास मिळाली नसती.

चार पैसे संबंधितांच्या हातावर टेकवले असते तर कदाचित पण ह्यांच्याच्याने ते होणं शक्य नव्हतं. मी माझ्या भोळ्याभाबड्या नवऱ्यावर खूष होते.

हे औरंगाबादला गेल्यानंतर चारेक महिन्यात धाकटे भाऊजी,अनंत इंजिनिअरींगची परीक्षा देऊन आले. कॉलेजमधे असतानाच त्यांना जॉब मिळाला होता.

अनंतभाऊजींची व माझी फारशी ओळख नसल्याने मला ते आल्यापासनं उगाच बावरल्यासारखं होत होतं.

मुळात दोन्ही भाऊ दिसायला एवढे सारखे की एकाला झाकावा नि दुसऱ्याला काढावा.

माझा संकोच अनंतभाऊजींच्या लक्षात आला. तेच माझ्याशी बोलत बसले. माझंं शिक्षण,आवडीनिवडी,कॉलेज असं बरंच काही बोलत बसले.

हॉस्टेलवरील त्यांच्या मित्रमैत्रिणी..विनोदी किस्से सांगून इतके हसवत होते की माझ्या डोळ्यातून पाणीच आलं. चारेक दिवसांत अनंतभाऊजी व माझी छान गट्टी जमली.

माझ्याकडे पाहून जीजी कौतुकाने म्हणायची..”माझी थोरली सून माणूसप्रेमी आहे हो. पाण्यासारखी मिसळून जाते अगदी आबालव्रुद्धांत.”

अनंतभाऊजी म्हणाले,”धाकटीही तशीच असेल हो.”

“म्हणजे ठरलय की काय तुमचं?” मी सहज विचारलं,अगदी निरागसपणे.

यावर भाऊजी हसत म्हणाले,”नाही गं वैनी,इंजिनिअरिंग करेस्तोवर केस पांढरे झाले बघ माझे. असाइनमेंट्स,प्रेझेंटेशन,व्हायवा..यातच गुरफटलेलो. वेळ होताच कुठे प्रेम वगैरे करायला.”

यावर जीजी म्हणाली,”हे बाकी सोळा आणे खरं. माझी मुलं अगदी भोळे सांब आहेत. ते बरं नि त्यांचं काम बरं. कुणा पोरीकडे डोळे वर करुन पहायचे नाहीत.”

“म्हणजे वैनी,दादा बघतो ना तुझ्याकडे?” भाऊजींनी हसत विचारलं. मी लाजले. इतक्यात लवकुश उंबऱ्यापर्यंत आले हात पुढे सारत..पोहल्यासारखे नि टुकुटुकु बघू लागले आमच्याकडे.

प्रांत अधिकाऱ्याने अपिल फेटाळल्याकारणाने दादांनी तात्यांसोबत जाऊन एडिशनल कलेक्टरकडे अपिल केलं. तात्या दादांना आर्थिक, मानसिक दोन्ही मदत करत होते. व्याह्यांचे ऋणानुबंध चांगलेच जुळले होते.

रेशम दुपारी चार वाजता अगदी नटूनथटून बाहेर पडलेली. जीजी व दादा निजले होते. भाऊजीही प्रवासामुळे जरा आत आराम करत होते.

रेशमने सिल्कचा गुलाबी ड्रेस घातला होता. त्याला मेचिंग बांगड्या,कानातले,पर्स..सँडल तेवढी काळी होती..बाकी सगळं गुलाबी गुलाबी. मी विचारायच्या आधीच म्हणाली,”वैनी जरा हिमांगीकडे जाऊन येते गं.”

हिमांगीकडे जायला एवढा नट्टापट्टा कशाला करायला पाहिजे..मी स्वत:शीच म्हणाले.

दादा,जीजी अनंतभाऊजींना घेऊन देवळात गेले होते.

तिन्हीसांजेला रेशम घरात आली.

“रेशम इतका उशीर का झाला तुला?” मी विचारलं.

“अगं वैनी,हिमांगीसोबत ग्रंथालयात गेले होते. तिला सुहास शिरवळकरांचं एक पुस्तक हवं होतं. ते शोधण्यात वेळेचं भानच राहिलं नाही बघ.”.. रेशम बेमालूमपणे खोटं बोलत होती का ग्रंथालयातच कोणाला भेटायला जात होती काही अंदाज येत नव्हता.

बरं तिला जास्त खोलात जाऊन विचारलं नि ती बोलायचीच बंद झाली तर..मला तसं नको होतं व्हायला. रेशमसारखी मैत्रीण मी गमावू इच्छित नव्हते.

मी तिला जेवायला वाढलं नि माझ्या खोलीत गेले. लवने लंगोट ओलं केलं होतं..त्याचं बदलेपर्यंत कुशने जी धार सोडली ती सरळ माझ्या गाऊनवर.आपलं लंगोट मात्र सुकं ठेवलन. मला ठाऊक होतं..रेशमवन्सं मला नक्की सांगेल तेवढा धीर धरण्याचा मी निश्चय केला.

सकाळी ती जरा लवकरच बाहेर जाण्यासाठी तयारी करू लागली. मी विचारलंच.
“रेशम दुपारी जेवणाला येशील ना?”

“माझं काही सांगता येत नाही वैनी मी ऋतुच्या घरी जातेय. ” रेशम उत्तरली. रेशमच्या जवळच्या मैत्रिणी हिमांगी,अनन्या नेहमी आमच्या घरी येणाऱ्या. ही ऋतू मला ठाऊक नव्हती.

मला असं गोंधळलेलं पाहून रेशम माझ्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत म्हणाली,”चिल भाभी चिल. “ऋतू नवीन फ्रैंड आहे माझी.” यावर काय बोलणार! कधीही निळ्या रंगाचा ड्रेस न घालणाऱ्या रेशमने आज चक्क माझा निळ्या रंगाचा,चंदेरी काठांचा चुडिदार घातला होता. अचानक ती आपल्या पेहरावाकडे लक्ष देवू लागली होती..थोडाफार मेकअपही करु लागली होती.

दादा त्यांची कागदपत्रं गोळा करण्यात गुंग होते. जीजी लवकुशमधे रममाण होती.

मला काहीच सुचत नव्हतं.

खरंच काय होणार पुढे? रेशम वैनीजवळ तिचं प्रेम व्यक्त करणार का आणखी काही..जमिनीच्या केसचं पुढे काय? अशोक बिर्हाड औरंगाबादेस न्हेतो का? जाणून घ्यायचंय ना.जाणून घ्या पुढील भागात

===================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-5/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-3/

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

1 Comment

  • Sujata
    Posted Jul 30, 2022 at 4:05 pm

    Very nice way of presenting the story line. I like the way you have kept the curiosity angle intermingled with what seems to be a day to day life narrative.

    Reply

Leave a Comment

error: