Skip to content Skip to sidebar Skip to footer

वैजयंती (भाग तिसरा)

©️®️ गीता गरुड.

कितीतरी दिवसांनी त्या रात्री आम्ही एकत्र झोपलो. खिडकीतून ताटलीएवढा चंद्र आत डोकावत होता..हे थट्टा करत होते..चंद्राला म्हणत होते..तुझं प्रतिबिंब तुझ्यापेक्षा सरस आहे. मी म्हंटलं..चंद्राचं प्रतिबिंब?..कुठेय? तर त्यांनी बोटांनी माझी हनुवटी वर केली.

माझ्या पापण्या आपसूक मिटल्या गेल्या. मला जाणवलं..हे आता फक्त माझे नाहीत तर वडीलपण आलंय त्यांत.

एक हात माझ्यावर ठेवून कानांनी बाळांच्या रडण्याचा कानोसा घेत होते मग मीच म्हणाले..”दोघं एकदम दुपटी ओली करतात आणि टँटँ करतात. आई बदलत असेल.”

थोड्या वेळाने बाळांचा आवाज शांत झाला तसं आमचं प्रीतगुज परत सुरु झालं.

सकाळी सासरची मंडळी निघाली खरी पण यांच जाणं मला जास्तच लागलं. आपसूक डोळ्यांना धारा लागल्या.

आत्याने मला जवळ घेतलं. मी विचार करत होते..एवढ्याशा दुराव्याने माझं असं होतंय तर आत्या कसं सहन करत असेल तिच्या नवऱ्याचं कायमचं जाणं..या विचाराने मला आणखीच रडू आलं.

आईने दटावलं..म्हणून सांगते जास्त हसू नको..मग असं रडू येतं बघ.

संध्याकाळपर्यंत मी सावरले. यांची फोनाफोनी चालू होतीच.

माझा लहान भाऊ दिगू (दिगंबर) यंदा बारावीला होता. अभ्यासातून वेळ काढायचा,,इतर भावंडांसोबत खेळायचा. आम्ही सोप्यावर बसलो होतो.

काकू परसातली अबोली काढून वळेसर ओवत होती. तिची लेक चिंगी तिला गजऱ्यात ओवण्यासाठी हिरव्यागार कातऱ्याचे झुबे देत होती.

मला मात्र यांची आठवण येत होती.

सासरच्या साऱ्याच मंडळींनी लळा लावला होता. माझं गप्प रहाणं काकूला उमजत होतं.

रात्री निजताना काकूने माझ्या माथ्यावर तेल चोपडलं आणि हळूच कानात म्हणाली,”काल जावयांच्या गालावरची टिकली पाहिली हो मी.” कुठे तोंड लपवावं माझं मला कळेना.

क्षणात मनाचं उदासपण काकूने दूर केलं होतं आणि ते आठवणींचे रेशमी धागे माझ्या हाती आणून दिले होते. रात्रभर स्वप्नात हे माझ्यासोबत होते.

पुष्पाआत्याचा लेक,प्रसन्ना यंदा दहावीला होता. सध्या त्याच्यात बरेच बदल होत होते. आवाज बदलत होता,उंची भरभर वाढत होती.

आई,काकू,आम्ही भावंड..कधीच प्रसन्नाला परकं म्हणत नव्हतो पण तरीही नकळत्या वयात त्याला त्याच्या वडिलांची आठवण यायची.

वयाची आठ वर्ष का होईना..वडिलांची सोबत मिळाली होती त्याला. गतस्म्रुतींचे धागे विणत तो पेळेवर बसला की ह्रदयात कालवाकालव व्हायची मग दिग्या अभ्यास सोडून का होईना त्याच्यासोबत जाऊन बसायचा.

प्रसन्नाला काही विनोद सांगून हसायला लावायचा. आत्याला का दु:ख होत नव्हतं! पण चेहऱ्यावर बेमालूमपणे समाधानी भाव आणायची,सतत काही न काही उद्योग करत रहायची.

लवकुश दोघंही दिवसा खुशाल झोपायचे नि रात्रभर जागरण करायचे..तसे ते खेळत असायचे तरी लक्ष ठेवावं लागायचं.

लवला तर कुशच्या डोळ्यांची भारी उत्सुकता. सारखा त्याच्या डोळ्यात बोट घालायला बघायचा. त्याचे गाल धरायचा.

जास्तच झालं की कुश खालचा ओठ पुढे करुन रडू लागायचा आणि लव आपण काही केलंच नाही या अविर्भावात इकडेतिकडे बघत रहायचा,पायाने सायकल चालवायचा.

तात्यांनी मला सासरी नेऊन सोडायचं ठरवलं पण आई ऐकेना..राहुदेत ओ थोडे दिवस..आई तात्यांना विनवत होती पण तात्या म्हणाले,”कधीना कधी जावंच लागणार तिला तिच्या सासरी. शेवटी कितीही म्हंटलं तरी परधन ते.

त्या दोघांतला तो संवाद ऐकून मला एकदम भरुन आले.

आईने लोणची,कुरडया,मेथीचे लाडू,बेसनाच्या वड्या असं बरंच काही बांधून दिलं. लवकुशची बाळगुटी एका छोट्या डब्यात भरुन दिली.

बदाम,बाळहिरडे,वेखंड,बेहडा,काकडशिंगी,जायफळ,खाखारीक,मुरुडशिंग..प्रत्येक औषधीचे किती फेरे घ्यायचे ते दाखवलं. अगदी प्रात्यक्षिकही करुन घेतलं माझ्याकडून व म्हणाली,”तिथे सासरी जीजी दाखवलीलच तुला सगळं पण त्या केसमुळे,दादांच्या आजारपणामुळे घरातलं वातावरण तितकंसं बरोबर नसेल.

तुझ्या बाळांकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून नाराज होऊ नकोस. जीजी उद्विग्नतेने काही बोलल्याच तर लेकीच्या मायेने दुर्लक्ष कर.

चांगली माणसं मिळालैत वैजू तुला..त्यांना जप..त्यांची मनं जप.

दिग्याला म्हंटलं नीट अभ्यास कर रे. परीक्षा जवळ आली ना आता.

दिग्या,प्रसन्ना दोघंही रडवेले झाले होते. लवकुशचा लळा लागला होता त्यांना.

आधी मी माहेरपणाहून सासरी जाताना ताई जाणार म्हणून होत असलेल्या दु:खाची व्याप्ती आता ताईसोबत लवकुशलाही घेऊन जाणार एवढी व्यापक बनली होती.

लवकुशला मांडीवर घेऊन बसायचे दोघं नि मोठमोठ्याने कविता म्हणायचे. लवकुशही अगाग..अगा..असे अनाकलनीय स्वर तोंडाच्या इवल्या बोळक्यातून काढायचे. कधी दादाचं बोट गच्चं धरुन ठेवायचे.

ट्रेनमधे बसलो. निरोप द्यायला आजोबा आले होते. सोबत दिग्या होता. गाडी सुटू लागली तशी आजोबांनी चष्मा काढून रुमालाने डोळे टिपले.

मी लवला मांडीवर घेऊन बसले. तात्यांनी कुशला घेलं.

लवला कुशकडे जायचं होतं. त्याची नुसती चुळबुळ चालू होती.

ट्रेनमधले इतर प्रवासी या जुळ्या भावंडांकडे कौतुकाने पहात होते.

समोरच्या सीटवरचा तरुण त्याचं बोट कुशला दाखवू लागला तसं कुशने ते गच्च पकडलं.

आता लवलाही त्याचंच बोट हवं झालं. मग त्याने दुसरा हात लवपुढे केला तसं लवने त्याची करंगळी पकडली.

बाकीची लोकं कौतुकाने पाहू लागली.

तो मुलगा होस्टेलला रहात होता. सुट्टीनिमित्त घरी चालला होता. माझ्या छातीत परत धस्स झालं. माझे लवकुश काही वर्षांत मोठे होणार नि शिक्षण,नोकरीनिमित्त परगावी जाणार मग मी एकटी.

खिडकीतून गार वाऱ्याची झुळूक आली तसे लवकुश दोघेही पापण्या मिटू लागले. हळूहळू गाढ झोपले.

त्या तरुणाची बोटं आपसूक सुटली. तरी तो लवकुशकडे पहात होता.

आता मात्र मला त्याचं पहाणं रुचेना. आईने सांगितलेलं..झोपलेल्या बाळाला एकटक बघायचं नसतं.

त्याला बहुदा कळलं असावं.

तोच मग बोलू लागला..”मी प्रद्युम्न..माझी मोठी बहीण आहे निमा नाव तिचं..तिलाही जुळी मुलं होती..एक मुलगा,एक मुलगी.

निमाताईचं घर रस्त्याच्या कडेला आहे. ताई,तिची सासू डोळ्यात तेल घालून मुलांवर लक्ष ठेवायच्या पण एकदा तिची सासू आजारी पडली. बेफाम ताप आला होता तिला.

ही दोघं नवराबायको तिच्या सरबराईत नि नियतीने डाव साधला.

दोन्ही मुलं धावत रस्त्यावर गेली आणि भरधाव येणाऱ्या गाडीच्या चाकाखाली मिळाली. तिथल्या तिथेच त्यांनी प्राण सोडले.

तेंव्हापासून माझी ताई बधीर झाली आहे.

माझंही मन कशात रमत नाही.”

तात्यांनी प्रद्युम्नचा हात हातात घेऊन किंचीत दाबला.

कुशला आमचं स्टेशन येईपर्यंत प्रद्युम्नकडे सुपुर्द केलं. मी प्रद्युम्नला नजरेनेच सॉरी म्हंटलं. त्याला ते कळलं.

मुलं दोघंही उठली तशी दुधासाठी रडू लागली.

बाटलीतनं आणलेलं पिईनात. मग मीच खिडकीच्या बाजूला तोंड केलं.

प्रद्युम्न लवला तात्यांकडे देऊन माझ्या पाठमोरा भिंतीसारखा उभा राहिला. मी निर्धास्तपणे कुशला पाजलं मग लवला पाजलं.

दोघंही मग चांगलेच तालात आले. मी प्रद्युम्नला आमच्या घरचा पत्ता दिला. वेळ काढून ये म्हंटलं भाचरांना भेटायला.

प्रद्युम्न म्हणाला,”ताई एवढं बोललीस तेच खूप झालं बघ. नक्की येईन मी. आमचं स्टेशन जवळ आलं तसं दाराजवळ जाऊन थांबलो.”

प्रद्युम्नने सामान उतरवून दिलं व पिलांना टाटा केला.

रिक्षात बसून आम्ही घरी येऊन पोहोचलो. जीजींनी आमच्यावरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला. नातवंडांच्या डोळ्यांना पाणी लावलं.

दोघे अगदी चटकन आत्या व आजीकडे गेले जणूकाही आधीपासूनचीच ओळख होती त्यांची.

घरात एक प्रकारची शांतता होती,नकोनकोशी. मी साडी बदलायला खोलीत गेले तेंव्हा रेशशमकडून मला दादा केस हरल्याचं कळलं.

आमची बाजू खरी असतानाही पैसे देऊन प्रतिपक्षाने पुरावे फिरवून घेतले होते. दादांचा तो स्वभावच नव्हता. न्यायदेवतेवर प्रचंड विश्वास होता त्यांना पण फासे उलटे पडले होते.

असत्याचा विजय झाला होता.

दादांची नदीकाठची जमीन त्यांच्याच चुलतचुलत भावंडांनी हिरावून घेतली होती.

दादांचे वडील म्हणजे माझे आजेसासरे अडाणी होते. त्यांना दारु पाजून काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर त्यांचा अंगठा घेण्यात आला होता.

ती हार दादांच्या जीवाला फार लागली होती.

मी स्वैंपाकघरात गेले.

काय आवडतं तुझ्या तात्यांना? कायतरी गोडधोड बनवुया..जीजी म्हणाल्या.

“नको जीजी साधंच बनवुया वरणभातभाजी. केसबद्दल कळलं मला. असं व्हायला नको होतं खरं.” मी म्हणाले.

जीजी माझ्या जवळ आल्या..म्हणाल्या ..”वैजयंती,असं गं का म्हणतेस! हारजीत चालायचीच. आपणच असं तोंड पाडून राहिलो तर दादांना कोण सावरणार! तो वरचा सारं काही बघतोय. या न्यायालयात नाही तरी वरच्या न्यायालयात न्याय मिळेलच. आज माझी नातवंड घरात आलैत. किश्याने(घरगडी) बागेतले जून आंबे आडीत घातलैत. काही पिकलेत. सुवास येतोय खोलीत. रेशम नि तू दोघी जा नि घेऊन या. मस्तपैकी आमरस करा.

ओल्या काजुगरांची उसळ करते मी नि कुकर लावते. मग तुम्ही दोघी पुऱ्या करा तोवर आधी चहा नेऊन दे त्या दोघांना. “

जीजींच्या धीराचं मला खरंच कौतुक वाटलं.

ओसरीवरच्या सोप्यात दादा व तात्यांची बोलणी चालली होती. मी चहा नेऊन दिला. दादा थोडंसं बोलले माझ्याशी. तात्या त्यांना सावरत होते.

एकंदरीत तात्यांसारखा समवयस्क जवळ असणं ही दादांची गरज होती. तात्यांनी ते ओळखलं नि दोन दिवस लेकीकडे रहायचं ठरवलं.

सुखात तर सगळेच साथ देतात. अडचणीच्या प्रसंगात मार्गदर्शन करणारा,मदत करणारा खरा मित्र असतो.
माझे तात्या तसे होते.

लवकुश उठले तसं त्यांना पाजून,छान झबलं,टोपडं घालून मी दादा,तात्यांकडे सुपुर्द केलं नि आंब्याच्या खोलीकडे वळले. काही आंबे पेपरवर रांगेत ठेवले होते तर काही गवताच्या अडीत. रेशमबरोबर पिकलेले आंबे काढून मी नेलेल्या सुपात ठेवू लागली.

“वहिनी,दादांनी वरच्या कोर्टात पिटीशन केली पाहिजे ना गं,”

“तसं नसतं गं ते प्रांत अधिकाऱ्यांकडे अपिल केलं पाहिजे. त्यांनीही विरोधात निर्णय दिला तर एडिशनल कलेक्टरकडे..अशी ती प्रोसेस लांबलचक असते. तात्या समजावत होते दादांना तू नको काळजी करुस.” मी रेशमला धीर दिला.

“काळजी करु नकोस बोलायला सोप्पं आहे गं. त्या बागेत खेळायचो आम्ही. तिथल्या आंबोल्या शिपल्यात आम्ही जीजीसोबत. तिथली झाडंपेड आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि आता एका निर्णयाने आम्ही त्या जागेपासून पंरके होणार,कल्पनाच सहन होत नाही. सत्याला वाली नसतो का गं वैनी?” रेशमच्या शब्दांतली कळकळ मला जाणवत होती.

“तू नको बरं विचार करुस इतका. सगळं सुरळीत होईल बघ..” मी रेशमला धीर दिला.

मला यांची तीव्रतेने आठवण आली. हे या वेळी दादांसोबत हवे होते पण आधीच भरपूर सुट्ट्या झालेल्या.

मी व रेशम स्वैंपाकघरात आलो. किशाने ओले काजुगर आणले व मागीलदारी बसून चिरून दिले. या ओल्या काजींचा डिंक लागतो मग हाताची बोटं मेंदी लावल्यासारखी लाल होतात. सालपटं निघतात. किशाला काज अंगठ्यात धरुन हिराने कशी चिरायची नि अख्खा गर कसा बाहेर काढायचा हे चांगलंच ज्ञात होतं. गर त्याने पाण्यात घालून ठेवले. जीजीने ओल्याखोबऱ्याचं वाटण घालून सरसरीत उसळ केली. सुरय तांदळाचा बैठा भात केला.

रेशमने कणीक मळली. रेशम व मी दोघींनी मिळूनआमरस केला व पुऱ्या करायला घेतल्या. आमरस प्रथम देवाला दाखवला. सगळे व्यवस्थित जेवले. सुग्रास जेवणामुळे वातावरणातला ताण थोडा हलका झाला.

जेवणं झाल्यावर दादांसोबत तात्या शतपावली करत होते तेंव्हा त्यांनी दादांना प्रांत अधिकाऱ्याकडे अपिल करण्याचा सल्ला दिला.

दुसऱ्याच दिवशी तात्या स्वतः दादांना प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. दादा घरी आले ते चेहऱ्यावर सकारात्मकता लेवून. तात्यांनी दादांना आशेचे किरण दाखवले. कितीही अपयश आलं तरी प्रयत्न सोडायचे नाहीत हे दादांच्या मनावर तात्यांनी बिंबवलं.

लवकुशच्या बाललीलांनी घराला गोकुळाचं स्वरुप आलं होतं. दोघांचं हसणं,रडणं,खेळणं यात सारं घर गुंतल गेलं.

घरालाही वय असतं.

लवकुशच्या येण्याने,त्यांच्या दोरीवर विसावलेल्या झबल्या,टोपड्यांनी,दुपट्यांनी घर पुन्हा लहान झालं.

बाळगुटी कशी द्यायची ते आईने शिकवलेलं खरं पण जीजींनी ती वेळ माझ्यावर येऊच दिली नाही.

ठरवलेल्या वारी म्हणजे बुधवारी,शुक्रवारी जीजी दगडी सहाण बाहेर काढायची..स्वच्छ धुवायची व एकेका वस्तूचे ठराविक फेरे घेऊन गंधासारखं औषध तयार करायची. एकेका बाळाला दोन पायांत घ्यायची.

त्यांच्या तोंडात बोट घालून दुसऱ्या साइडने चमच्यातलं औषध भरवायची. दोघेही गडगड आवाज करुन फेकून द्यायला बघायचे पण जीजीचं बोट त्यांच्या तोंडात असल्याने त्यांचा औषध फेकून टाकायचा प्रयत्न असफल व्हायचा.

काही थेंब त्यांच्या नाकातोंडावर उडवायचे मग मी व रेश्मा दोघी एकेकाला खांद्यावर घेऊन ढेकर काढायला लावायचो. औषध घेतल्यावर बाळं दोनअडीच तास सूस निजायची.

तात्या दोन दिवस का होईना आपल्यासोबत रहाणार म्हणून मला बरं वाटलं.

दादांना न्याय मिळेल का? रेशमच्या प्रेमप्रकरणाचं काय?..जाणून घ्यायचंय ना वाचा पुढील भागात.

==========================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-2/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-4/

=========================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: