Skip to content Skip to sidebar Skip to footer

वैजयंती (भाग दुसरा)

माहेरात लाडाकोडात वाढलेली वैजयंती जीजीच्या तालमीत आपल्या संसाराचा रहाटगाडा चालवायला शिकेल का? की नुकतीच उमललेली कळी जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने कोमेजून जाईल? तुम्हांलाही जाणून घ्यायचंय ना मग लवकरच भेटूयात पुढच्या भागात.

मैत्रिणींनी सासूबाईबद्दल बरंच काही चांगलंवाईट सांगितलेलं. शिवाय टिव्हीसिरियलमधे वेगवेगळ्या अतरंगी सासबहु बघितलेल्या.

आमच्या घरातही आजी होती ना सासू आई व काकूची पण आजीची गोष्टच वेगळी. जेवढं ती आत्याला बोलायची तेवढंच सुनांना बोलायची आणि जेवढे आत्याचे लाड करायची तेवढेच सुनांचे लाड करायची.

आई,काकू आजारी झाल्या की आजीचा जीव वरखाली व्हायचा. आजारी सुनेस बरी होईस्तोवर सक्तीचा आराम करायला लावायची. तिला ऊनऊन गुरगुट्या भात वर मेतकूट पेरून द्यायची. तोंडाची चव गेली असेल तर तिच्या पद्धतीचा बडीशेप,सुकंखोबरं किस,धण्याची डाळ घातलेला खास मुखवास बनवायची.

काहीजणी तर बोलायच्या,बऱ्याच सासवा चार दिवस अगदी मधाहून गोड वागतात मग हळूहळू रंग दाखवायला सुरुवात करतात,त्यात नणंद असली की भांडणात तेल,रॉकेल,पेट्रोल जे मिळेल ते टाकते.

हे सारं ऐकून मला नवरा कसा असेल याहीपेक्षा सासूचा स्वभाव कसा असेल,नणंदबाई कशी असेल..याची काळजी लागून राहिलेली पण आजी नेहमी सांगायची..आपण बरं तर जग बरं. आजीच्या उक्तीप्रमाणे मी सासरी वागायचं ठरवलं.

जीजीला पहाटे उठायची सवय मग मी तरी कशी झोपून रहाणार..उठून जीजीच्या मागोमाग फिरायचे.

ती सांगेल ती कामं करायचे.

जीजीनेच शिकवलं मला अंगणात सडा घालायला.

ठिपक्यांच्या रांगोळ्यांची पुस्तकं वगैरे जीजीच्या खिजगणतीतही नसत. किती सुंदर रांगोळ्या काढे जीजी..बघत रहाव्याशा..पाण्याचे थेंब पडावे तसे तिच्या चिमटीतून ठिपके पडत आणि एका कलात्मक रितीने सांधले जात.

रोज नव्यानव्या रांगोळ्या..त्यांवर हळदीकुंकू,बागेतलं फुल. अंगणातल्या तुळशीला पाणी देणं..बागेतल्या प्रत्येक रोपट्याजवळ जीजी जाई..त्याला झारीने पाणी घालून झालं की त्याच्याशी बोले,त्याला आंजारेगोंजारे. मलाही गंमत वाटे..कुठेसं अभ्यासात वाचलेलं झाडांना संवेदना असतात..जीजीच्या सानिध्यात असतानाची झाडं पाहून मी त्या संवेदना अनुभवत असे.

देवाची भांडी,तांब्यापितळेचे हंडे,कळशा अगदी चिंच लावून घासायची. बघतच रहावी अशी तिची स्वच्छता. मी आधी अहोजाहोच करायची जीजीला पण जीजीचं म्हणाली,”अहोजाहोने अंतर वाढतं. मला नुसतंच जीजी म्हण.”

मला बाळ होणार हे कळताच केवढी खूष झाली जीजी. मला कुशीत घेतलं तिने. अंगणातली पोसवलेली केळ दाखवून म्हणाली..ही बघ ही स्रुजनता बेटा.

ही शक्ती देवाने स्त्रियांना दिली आहे.

दिसामाजी तुझ्या उदरातला गर्भ वाढेल मग या केळीसारखीच तुझी कांती रसरसेल, बाळाची हालचाल जाणवू लागेल,
डोहाळजेवण होईल,सासरमाहेराकडून लाड करुन घेत एका निरागस बाळाला जन्म देशील. आता कसलाही ताण घ्यायचा नाही बरं . मस्त आनंदी रहायचं.

किती छान समजावलं मला जीजीने. रेशमही मला जपू लागली होती. कुठूनकुठून चिंचा,बोरं,आवळे आणून द्यायची. आपणही खायची माझ्यासोबत. अशोक ना फोनवर सांगू का नको असं चाललेलं माझं पण मग म्हंटलं सरप्राईज देऊ.

हे सुट्टीला आले तेंव्हा यांना मी गोड बातमी सांगितली कानात. बघतच राहिले माझ्याकडे. यांनी माझ्या गालावरुन हळुवार हात फिरवला. पोटाजवळ कान लावला. मला हसूच आलं..म्हंटलं,अजून बाळाची हालचाल जाणवायला खूप अवकाश आहे.

यांनी मला मिठीत घेतलं. “वैजू,किती मोठं गीफ्ट दिलंयस तू मला आज! वैजू मी बाबा होणार न् तू आई. मला किती आनंद झालाय ते मी शब्दांत नाही व्यक्त करु शकत,” यांचं प्रत्येक वाक्य माझ्या तनामनावर चांदणं पेरीत होतं.

रात्री आम्ही दोघं खूप वेळ येऊ घातलेल्या बाळाबद्दल बोलत होतो. भविष्याची स्वप्नं रंगवत परस्परांच्या मिठीत झोपी गेलो.

आमच्या प्रीतीचा वेल जो फुलायला लागला होता!

माझ्या पोटात अन्नाचा कण टिकेना. मी सिंकजवळ गेले की जीजी मागून येऊन पाठीवर हात फिरवे. मला गरम लिंबूपाणी करुन देई.

आजीने दिलेला मोरावळाही कामी येत होता.

माझी गलितगात्र अवस्था पाहून यांना फारच अपराधी वाटे. दोन दिवस अगदी माझ्या सेवेस रुजू होते.

अशोक मला जवळच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.मित्तल यांच्याकडे घेऊन गेले . डॉक्टरांनी मला तपासून मी गरोदर आहे असं सांगितलं. माझं वजन तपासलं, फाईल बनवली व त्यावर दर महिन्यात कोणत्या तारखेला भेटायला यायचं, कोणत्या महिन्यात सोनोग्राफी करायची आहे तसंच कॅल्शियम , आर्यन, फॉलिक ऍसिडच्या गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं. पहिले तीन महिने बाळाच्या आईला जपायला हवं असं अशोकना समजावून सांगितलं.

रेशमवन्सं दादाच्या मागून होतीच. यांचे कपडे इस्त्री करुन बेगेत भरणं आनंंदाने करत होती.

माझी थट्टा करत होती ..बघ हं वैनी..हा दादा तिकडे दुसरं बिर्हाड थाटेल. तू लक्ष ठेव बारीक..याचा काही भरवसा नाही..मग भावाबहिणींची ही मारामारी.

अशोक थोड्या नाराजीनेच औरंगाबादेस गेले. जाताना रेशम व जीजीस माझी काळजी घेण्यास सांगून गेले.

हे नजरेआड होईस्तोवर मी भरल्या डोळ्यांनी यांच्या दूरवर जाणाऱ्या छबीकडे पहात राहिले.

रेशमने सारीपाटाचा डाव मांडला. तिच्या सानिध्यात मी विरहाचा ताण थोडा का होईना विसरले.

चौथ्या महिन्यात माझ्या पोटात दुखलं..बाथरुमला गेले तर थोडंसं ब्लिडींग झालं. लगेच जीजीने मला डॉक्टरकडे न्हेलं. डॉक्टरांनी तपासून मला बेडरेस्ट घ्यावी लागेल असं सांगितलं.

अजून बरेच महिने जायचे होते. जीजी सारं काही हातात देत होती. तिच्या जोडीला रेशम होतीच.मला कधीकधी ओशाळल्यासारखं व्हायचं,पण जीजी मला समजवायची.,एकदा मोकळी झालीस की भरपूर कामं कर म्हणायची.

रात्री यांचा फोन आला की यांच्याशी बोलायची सगळ्यांना घाई असायची. जीजी माझी मनोवस्था ओळखून माझ्या हातात रिसीव्हर द्यायची नि बाकीच्यांना आत,बाहेर पाठवायची..मग आम्ही दोघंच असायचो..दोन टोकांना..तरी बोलायची भीतीच वाटायची. हेच बोलायचे..पिलांची चौकशी करायचे..यांची तगमग यांच्या आवाजातील कंपनांतून जाणवायची.

सोनोग्राफीत जुळं आहे असं कळलं. दोन अंश वाढत होते माझ्या उदरात..आमच्या प्रेमाच्या साक्षीचे.

बघताबघता सातवा महिना लागला. प्रवासाची दगदग नको म्हणून डोहाळजेवण सासरीच करण्याचं योजलं.

माहेरी जाता येत नाही म्हणून मी थोडी नाराज झाले होते खरी पण जीजीने जो काय थाट उडवला डोहाळजेवणाचा..तिचा उत्साह पाहून मी स्तंभित झाले.
डोहाळजेवणाच्या आदल्यारात्री हे औरंगाबादहून आले.

आई माझ्यासाठी माहेरची ओटी घेऊन आली होती. माझी काकू व आत्याही समारंभाला हजर होत्या.
फुलांचा मुकुट,कंबरपट्टा,बाजूबंद ल्यालेली लाल रंगाची साडी नेसलेली मी जणू फुलराणी भासत होती.

काकू,आत्या व आईने मिळून पेढे, लाडू, काजूबर्फी, जिलेबी, रसगुल्ले, गुलाबजाम, जिलेबी, करंजी..हे गोडाधोडाचे पदार्थ बनवून माझ्यासाठी सजवलेल्या झोपाळ्यासमोर टेबलवर, सभोवार फुलांची रांगोळी रेखून रचून ठेवले.

अशोक येताना भरपूर फुलं,फुलांच्या माळा घेऊन आले होते. अशोक व रेशमने मिळून समारंभाची,सुशोभिकरणाची तयारी केली.

झोपाळ्यावर जाईजुईच्या माळा सोडल्या होत्या, रंगीबेरंगी जरबेराच्या फुलांनी झोपाळा अजूनही सुरेख दिसत होता. लाल रंगाची जरीकाठाची साडी नेसलेली मी, आणि मोती कलरचा कुर्ता घातलेले अशोक..

दोघांच्या आयुष्यात येणा-या पाहूण्याच्या स्वागताचे क्षण रेशम कॅमे-यात कैद करत होती..

पाच सवाष्णींनी माझी फुलानारळाने ओटी भरली, दृष्ट काढली. वाटीत झाकून ठेवलेली पेढाबर्फी ओळखण्याचा खेळ झाला.

पांढऱ्या शेवंतीच्या माळांनी सजवलेलं धनुष्य, वेगवेगळ्या पद्धतीने हाती पकडत अशोकच्या हातात हात देत फोटोशूट झालं. फुलांनी सजलेल्या चंद्रकोरीवर बसलेली मी ..माझंच मला अप्रूप वाटत होतं.

माझं बाळंतपण होईस्तोवर जीजीच्या आग्रहात्सव आई आमच्याकडेच राहिली.

अशोक आठवड्याभराची सुट्टी घेऊन आलेले. रात्री माझ्या पोटावर हात फिरवत रहायचे. मधूनच उठून आपल्या बाळांशी बोलायचे..आईला त्रास द्यायचा नाही..गाठ माझ्याशी आहे..शहाण्यासारखं वागायचं..किती न् काय..मला हसूच यायचं.

हे निघायच्या वेळेस माझ्या एका डोळ्यात विरहाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात प्रितीचे आनंदाश्रू.. किती तरल भावना होत्या त्या. यांना सोबत न्यायला दोघी विहिणींनी मिळून लाडूचिवडा करुन दिला.

दादांच्या जमिनीच्या केसचा निकाल लागायचा होता. त्यांच्या कोर्टात खेपा वाढल्या होत्या. एक प्रकारचा ताण असायचा त्यांच्या चेहऱ्यावर पण तो लपविण्याचा आटापिटा करायचे.

याच काळात मी एकदा रेश्मा वन्संचं पुस्तक वाचत असताना..एक चिठ्ठी खाली पडली. मी हळूच उचलली. ते प्रेमपत्र होतं..ऋतुराजचं.

प्रकरण बरंच पुढे गेलं होतं. दोन मनं एकमेकांत गुंतली होती.

मी थरथरले. सर्वांग घामाने निथळलं.

रेशम..इतकी साधीभोळी,सुशील मुलगी पण अशी कशी नादावली गेली? कोण हा ऋतुराज.. तिच्या बोलण्यात तर कधी आला नव्हता. बरं आता मी हे प्रकरण घरच्यांपुढे मांडलं असतं तर..रेशम रुसली असती.

मी काही दिवस गप्प रहायचं ठरवलं कारण एकतर दादांना केसचं टेंशन होतं..त्यात रेशमचं प्रेमप्रकरण सांगितलं असतं नि दादा संतापले असते..तब्येत बिघडली असती म्हणजे..म्हणून मौनच बाळगायचं ठरवलं.

एके रात्री माझ्या पोटात खूप दुखू लागलं. कळा सुरु झाल्या.

दोन मुलगे झाले मला,जुळे. एकास झाकावं नि दुसऱ्यास काढावा इतकं साम्य. माझ्यासारखेच गोरेपान होते. इस्पितळातून आईबाबांनी मला व बाळांना माहेरी न्हेलं.

आमची दोघांचीही इच्छापूर्ती झाली. आंधळा मागतो एक डोळा नि देव देतो दोन तसं झालं. दोघांना दूध पाजणं म्हणजे कसरतच असायची.

तात्या दोघांना मांड्यांवर घेऊन जोजवायचै. दोघंही एकत्र मुठी चोखायचे, भिरभिरत्या डोळ्यांनी सभोवतालची ओळख पटवून घ्यायचे. झोपेत खुदकन हसायचे.

बारशाला हे आले होते. दादांची तब्येत जरा नरमगरम होती असल्याने जीजी आल्या नव्हत्या. रेशम आली होती. ती आत्याबाई म्हणून तिचा मान मोठा होता.

आमच्या घरी आजोबांच्या काळातला लाकडी पाळणा होता. त्याची डागडुजी करण्यात आली. जाईजुई,मोगऱ्याचे लांबलचक गजरे पाळण्याच्या चारी बाजुंनी सोडले होते. मधल्या भागांना मोगऱ्याच्या जाळ्या लाल्या होत्या. एकंदरीत सुगंधित, प्रफुल्लित वातावरण झालं होतं घराचं.

आजोबांनी पांढरा नेहरुसदरा व धोतर नेसलं होतं. डोक्यावर पांढरी टोपी घातली होती. अतिशय प्रसन्न भाव होते आजोबांच्या चेहऱ्यावर.

आजीची धांदल काही विचारु नका. जांभळं धारीकाठाचं लुगडं,व्ही गळ्याचा कंच हिरवा ब्लाऊज,गळ्यात बोरमाळ,मंगळसूत्र, नाकात पाणीदार मोत्यांची नथ, इवलुशा अंबोड्यावर इवलुसा अबोलीचा गजरा. माझ्याकडून लवकुशाचा पाळणा मुखोद्गत करुन घेतला होता आजीने. मी माझ्या बाळांकडे बघत ते पाळणागीत गायलं.

मी हिंडविते गाउनिया लडिवाळा । पाळणा लवकुश बाळा ।

मी वासंती आळविते अंगाई । छकुल्यांनो तुमची आई ।

लुकलुकती चिमणॆ डोळॆ । जिभली ही चुट चुट बोले ।

वर उचलाया बाळ भुवयांची जोडी । लवितसे लाडीगोडी ॥१॥

किती दिवस अशी चाटणार ही बोटे । व्हा गडे लवकर मोठे

मग जाऊ या आपण सारी मिळुनी । बघण्यास अयोध्या भुवनी ।

अळी मळी गुपचिळी बरं का । सांगाल कुणाल जर का ।

कुस्करीन गाल हे बरं का । अन् इवलाले ओठ असे झाकुनी ।

ठेवीन मुके घेऊन।।

मला आईच्या रुपात..तेही असं पाळणागीत गाताना पाहून यांची नजर माझ्यावरुन हटत नव्हती.

रेशमने बाळांच्या कानात कुर्र केलं. एकाचं नाव लव व दुसऱ्याचं कुश ठेवलं

शकू मावशी,आत्या,काकू..सगळ्या नजरेने चेष्टा करत होत्या. मी डोळे मोठाले करुन यांच्याकडे पहायचे तर हे अजुनच रंगात यायचे.

रात्री जेवणखाण झाल्यावर आप्तांची संगीत मेहफिल जमली होती..यांनी मला उद्देशून ये चांदसा सुंदर मुखडा गायलं. साऱ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या तशी मी लाजून मान झुकवली. यांच्यानंतर एकदोघांनी गाणी गायली.

आजीनेही तुझ्या गळा माझ्या गळा घुंगुरमोत्यांच्या माळा गायलं. संध्याकाकू मला कोपराने हलवत होती. तिच्याकडे पाहिलं तर तिने माझ्या खोलीकडे कटाक्ष टाकला..तेंव्हा माझं लक्ष गेलं.

हे माझ्या खोलीकडे चालले होते. मी हळूच काकूला म्हंटलं,”अगं काकू माझी बाळं इथेच आज्यांच्या म़ाड्यांवर पेंगलेत.” तीही हळूच कुजबुजली,”सारखी काय गं बाळंबाळं. आम्ही आहोत की बघायला. जा जरा तुझ्या मोठ्या बाळाकडे बघ जा.” कसली लाजत बोलत होती काकू!

तिच्या गालावरची खळी अधिकच उठून दिसली. मी जरा क्रुतककोपाने तिच्याकडे पहात हळूच उठले अन् मागल्यामागे तिथून पसार झाले.

खोलीत आले तर हे पलंगावर पहुडले होते. मीही मग कपडे चेंज केले नि यांच्या बाहुपाशात शिरले.

क्रमश:

दोन गोंडस बाळांच्या रूपाने स्वर्गीय सुखच पदरी पडलं होतं वैजूच्या पण एकीकडे दादांच्या जमिनीची केस तर दुसरीकडे रेशमचं प्रेमप्रकरण. वैजू कशी हाताळेल पुढे येणारी परिस्थिती. वैजू परिस्थिती हाताळू शकेल की एखादं नवं वादळ उभं करेल सर्वांसमोर.

==========================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-1/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-3/

==========================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

1 Comment

  • Pooja ogale
    Posted Jul 28, 2022 at 10:57 am

    👌👌👌

    Reply

Leave a Comment

error: