Skip to content Skip to sidebar Skip to footer

वैजयंती (भाग सोळावा..अंतिम भाग)

©® गीता गरुड.

लग्नाचा अलबम घेऊन फोटोग्राफरचा पोऱ्या आला. प्रद्युम्नने त्याला ठरलेल्या रकमेचा चेक दिला..मग आम्ही फोटो बघत बसलो. हळदीचा फोटो, गौरीहर पुजतानाचा फोटो, एवढुशी आमची ठमी..किती मोठी दिसत होती फोटोत. मला मात्र ती माझ्याकडे खारकांसाठी हट्ट करतानाची आठवत होती.

इतक्यात बेल वाजली. आत्या नि मी निघायच्या तयारीतच होतो तर एक बाई आत प्रवेशल्या. केसांचा शेपटा, बरेचसे केस पांढरे..मला चटकन लक्षात येईना. त्या बाईने डोळ्यावरचा चष्मा काढला. माझ्याकडे रोखून बघत म्हणाली,”ओळखलत मला..”

——————————————–————–

क्षणात मी काळाची पानं पालटत मागे गेले. भूतकाळ कधी वर्तमानकाळात येऊन आपल्याला परत गाठेल काही नेम नाही. मला तो फोटो आठवला, भिंतीवरचा..ऋतुराज, त्याची पत्नी, मुलगी संपदा..हो संपदाची आईच होती ती..इतक्या वर्षांनी..का बरं..तिला कळलं असावं?..पण कसं शक्यय..’ अनेक प्रश्न माझ्यासमोर, रेशमसमोर उभे ठाकले. रेशमनेही पाहिलेलाच तो फोटो.

आत्याने तिला बसायला खुर्ची दिली. पाणी आणून दिलं.
“बऱ्या अहात ना.” आत्यानेच विचारलं.

“हो. आता बरीय अगदी बरीय. ऋतुराज गेले. पंधराएक दिवस झाले असतील जाऊन.”

“अरेरे. सॉरी.” माझ्या तोंडून निघालं.

“का तुम्ही का सॉरी म्हणताय. मी उलट थँक्स म्हंटलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही माझ्या घरावर आलेली वावटळ रोखून धरलात. रेशम तुम्हीही किती संयमाने वागलात.”

“म्हणजे तुम्हाला..” रेशम बोलली.

“हो रेशम. ऋतु नंतर आजारीच पडला. पडला म्हणजे कायमचा जायबंदी झाला होता. एकदा तो बोलून गेला तुझ्याबद्दल . मी त्याची सेवा करत होते ना आणि त्याने मला धोका दिला होता त्या आगीत तो होरपळत होता. त्याने तुला फसवल्याचं सांगितलं मला. मला प्रचंड संताप आला होता त्याचा.

मी चांगलच फैलावर घेतलं त्याला. गेली पंचवीसेक वर्ष सकाळ, दुपार, रात्र मी.. रेशम तुझ्याबद्दल बोलून बोलून भंडावून सोडलं त्याला. वेडं व्हायचा बाकी होता तो.

संपदाला तिची आज्जी काकाजवळ घेऊन गेली. माझी मानसिक स्थिती बरी नाही या कारणात्सव. अरे पण कोणी केली माझी मानसिक स्थिती उध्वस्त, तुझ्या मुलाने त्याच्याबद्दल एक अवाक्षर नाही. त्याने काही केलं तरी ते चालतय. पोरगीही त्यांचीच झाली नि ऋतुराजला मात्र मी सिंह आपल्या भक्ष्याला खातो तसा खात राहिले. कणाकणाने मरत राहिला तो माझ्यासमोर.”

“क्षमा..” आत्याच्या तोंडून आलं. त्यावर ती आणिकच बिथरली. “याने माझ्या अपरोक्ष मौज केली. मी याला क्षमा करायची..का एक स्त्री म्हणून. तेच जर मी ऋतुच्या जागी असते तर घरात घेतलं असतं त्याने मला! सांगाना..सगळ्या मर्यादा, चौकटी काय त्या बाईपणालाच का.

“त्याचा छळ करून तरी काय मिळवलस?” आत्याने निग्रहाने विचारलं.

ती हमसू लागली,”ठाऊक नाही काय मिळवलं ते खरंच ठाऊक नाही पण त्याने तरी का केला माझा विश्वासघात!”

“अगं मग डिव्होर्स घ्यायचा होतास ना.” मी म्हंटलं.

“आणि त्याला तसं मलमुत्रात एकट्याला ठेवून! मी खरं प्रेम केलं होतं ऋतुराजवर. रेशमच काय कित्येक मुलींशी खेळला होता तो. रेशमचं मला कळलं इतकंच.”

“तुझं प्रेम होतं म्हणतेस मग छळ का केलास त्याचा. असं अघोरी प्रेम..” मी विचारलं.

“काय सांगू. आम्ही तिघी बहिणी. माझ्या पुढलीचा, मागचीचा संसार अगदी सुरळीत चालू आहे. मलाही चारचौघात तसंच रहायचं होतं. दाखवायचं होतं म्हणा  ना की मी कशी पतीव्रता आहे. माझा स्वार्थ असेल तो पण आता संपलं सगळं त्याच्या जाण्याने. पूज्य झालं.”

“आणि संपदा..” रेशमने विचारलं.

तिने मान वर केली. रेशमला निरखत म्हणाली,”मीही तुमच्यासारखीच तर दिसत होते ना ओ. काय कमी होतं माझ्यात!”

“संपदा..” रेशम पुन्हा उच्चारली.

“संपदा..ती माझी राहिली कुठे..तिची आई ठार वेडी ना म्हणून तिच्या आज्जीने माझ्या वाऱ्यालाही उभं केलं नाही तिला. लग्न झालं म्हणे तिचं. यूएसला असते आता. मला फक्त रेशम तुला भेटायचं होतं.

तुझ्या जीवावर मी एक  भातुकलीचा का होईना संसार करत राहिले. लोक काय म्हणतील या नावाखाली सारं काही माहित असून अडाणीपणाचा बुरखा पांघरून राहिले.

लोकांची भीती दुसरं काय..एकवेळ जनावरांची भीती परवडली पण लोक काय म्हणतील? या भीतीपोटी छान छान चालल्याचं ढोंग करून वावरू लागलो तर आयुष्यभर एक नाटकच वठवत रहातो माणूस.

मी जगले कुठे..भूमिका पार पाडली फक्त. लोकांच्या द्रुष्टीने एक संसारी स्त्री जी नवऱ्याची सेवा करत होती त्याच्या जाण्यापर्यंत. मुलीबाबत लोकांना सांगून ठेवलेलं, इथलं रोगट वातावरण म्हणून आज्जीसोबत काकाकडे रहातेय अशी.”

“आता पुढे काय करणारैस?” रेशमने विचारलं.

“माऊंट अबूला एका आश्रमात जायचा विचार आहे. त्यासाठीच हे रहातं घर विकलं. पुढल्या महिन्यात तो नवीन मालक ताबा घेईल घराचा. जे पैसे आले आहेत, ते संपदाला देणार होते पण संपदाने नकार कळवला. म्हंटलं तुम्हाला अर्धे..”असं म्हणत ती चेकबुक बाहेर काढू लागली.

यावेळी मात्र रेशमच्या आधी प्रद्युम्नने रोखलं तिला.” रेशमकडे तिला जे हवं ते सारं काही आहे. तुम्हाला पैसे द्यायचेच असतील तर तुमच्या सासूला द्या.”

“आहे कुठे ती. संपदा घेऊन गेली आपल्या आज्जीला युएसमधे. असो, अजून विचार करा. तुमच्या मुलीच्या नावावर करते.” यावर मात्र प्रद्युम्न किंचाळलाच,”मयुरी माझी लेक आहे. तिला कोणाच्याच छदामाची गरज नाही. तुम्ही जाऊ शकता आता.”

“बरं.” असं म्हणत ती बाई आपली पर्स काखेला लावून निघून गेली नं रेशम मात्र प्रद्युम्नच्या गुडघ्यांवर डोकं ठेवून इतका वेळ रोखून ठेवललं रडू मोकळं करू लागली.”  प्रद्युम्न तिच्या पाठीवरनं हात फिरवत राहिला.

“रेशम बाळा पुरे आता.  किती रडशील!” आत्या म्हणाली.

“मला भिती वेगळीच वाटतेय. त्या बाईने माझ्या मयुरीला गाठलं तर..”

“रेशम, तुला काय वाटतं मयुरीला काहीच ठाऊक नाही. भ्रम आहे तुमचा. अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात. लोकं एकवेळ कुणाचं चांगलं झालेलं पसरवणार नाहीत पण अशा गोष्टी पसरवल्याशिवाय चैन पडत नाही काहींना. “

“म्हणजे..” प्रद्युम्न अगदी कातरतेने माझ्याकडे पाहू लागला.

“आपल्या मयुरीला ठाऊक होतं हे. बिल्डींगीतल्या बायका बोलताना त्यांच्या मुलींनी ऐकलं असावं नि हिला सांगितलं. मलाही हल्लीच लग्नाआधी काही दिवस बोलली ती. माझ्याकडून प्रॉमिस घेतलेलं तिने आईपप्पांना  तिला हे कळलय असं कळता कामा नये म्हणाली होती नाहीतर माझ्या पप्पांना खूप वाईट वाटेल म्हणत होती.”

आपल्या मुलीचे हे विचार ऐकून ती दोघंही कातर झाली.
आत्या नि मी घरी आलो. त्या दोघांना एकांत देणं गरजेचं होतं. काही दु:ख आपली आपणच कुरवाळायची असतात, रेशमचंही तसंच झालेलं. एक तारुण्यातली चूक असा पिच्छा पुरवत होती तरी बरं  प्रद्युम्न  देवासारखा होता पाठीशी.

जीजी भजनी मंडळासोबत कुठे वनात गेली होती. तिथे पायाला विषारी काटा लागला, चपलातून नि ते दुखणं वाढतच गेलं. शुगर डिटेक्ट झाली. शेवटी एडमिट करावं लागलं. दोघे नातू डॉक्टर म्हंटल्यावर नामांकीत रुग्णालयात तिला हलवलं. ताप तर तिची पाठ सोडत नव्हता. त्यात रक्तदाब खाली जाऊ लागला, किडनी काम करीनाशा झाल्या. मोजून चार दिवस मी व रेशम जीजीच्या उशाला बसून होतो.  डोळ्यांतल्या पाण्याला खळती नव्हती.

गेली त्यादिवशी सकाळीच उठून बसली. आम्हाला म्हणाली,”पेंगताय काय चला अंघोळ घाला मला.” आम्ही दोघींनी नर्सकडून कोमट पाणी मागवलं नं तिचं स्पंजिंग केलं. नर्सला म्हणाली,”आज तुमचं डाएट फाएट नाश्ता नकोय मला. रेशम तू थोडी सोजी करून आण. जीभेची चव गेलीय बघ.”

रेशम गेली तशी जीजीने माझा हात हातात घेतला” वैजा, आपलं माणूस आपल्याला आयुष्यभर पुरण्यासाठी नसतंच मुळी. हे ठाऊक असुनही आपली त्याला धरून ठेवण्याची हाव काही केल्या जात नाही. मला सगळं भरभरून मिळालं. यांच्यापश्चातही तुम्ही काही कमी पडू दिलं नाहीत. तू तर मलाही कमवायला शिकवलस. माझ्या मुलीला, नातीला सांभाळून घेतेस. नाती जपतेस. माझ्यामागेही आपल्या घराचा आधारस्तंभ हो. अवनीही आता बरीच सुधारलेय. तिच्याकडे जाणंयेणं ठेवत जा.” दिवा मालवताना दिव्याची ज्योत अधिक तेजस्वी व्हावी तसा जीजींचा चेहरा भासत होता मला. बोलणंही अगदी खणखणीत.

मला म्हणाली,”पुढच्या जन्मी तुझी नात बनून येईन हो मी. नातवांची लग्नकार्य तेवढी राहिली बघायची. देव त्यांना उदंड आयुष्य, यश, मानमरातब देवो.” झालं तेवढंच..जीजी गेली आम्हा सगळ्यांना सोडून.

अनंतभावजी व अवनी महिनाभरतरी आमच्याकडेच होते.  आप्त मंडळी, सगेसोयरे येऊन भेटून, धीर देऊन जात होते. याकाळात आत्या घारीसारखी आमच्या पाठीवर पदर ठेवून होती.

रेशमचा वेद दहावीत मेरीटमधे आला. त्याच्या या यशाने घरातलं सुतकी वातावरण थोडं का होईना निवळलं. त्याचं एडमिशन, कागदपत्रांची जमवाजमव यांची बोलणीचालणी होऊ लागली.

लवकुश दोघे हल्ली वेंगुर्ल्यातच रहात होते. सोबत किशाभाऊ व इंदुमावशी होतीच.

एकदा गाडी करून आम्हा सगळ्यांना घेऊन गेले. पोट्ट्यांनी मलाही वरवरच कळवलं होतं.

बघतो तर काय! घराचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. घराची डागडुजी करून वरती दोन मजले वाढवले होते. खालची रचना होती तशीच ठेवली होती. वरच्या मजल्यांवर इस्पितळासाठी हवेशीर वॉर्ड्स काढले होते. त्यात पांढऱ्या खाटी, गाद्या, चादरी..सगळं नीट लावलं जात होतं. केबिन्सचं सुतारकाम चालू होतं.

बाहेर ओसरीवर जीजीदादांचा फोटो लावला होता. फोटोला लवने चंदनाचा हार घातला. यांनी लवकुश दोघांनाही जवळ घेतलं. यांच्या डोळ्यातनं आनंदाश्रु वहात होते. मी, आत्या, अनंतभावजी,अवनी,रेशम सारे सद्गदित झालो होतो.

गावातलीच मुलं इस्पितळात कामाकरता ठेवली होती. लव, कुशकडे हळूहळू पेशंट येऊ लागले.
“काकांनू काय बरा नाय वाटना काय?”असं कुशने विचारायची सोय..खुर्चीवर बसलेले काका अगदी आज्यापंज्यापासूनची ओळख सांगू लागायचे.

तुझो बापूस नि मी शाळासोबती म्हणायचे. इतके रंगात यायचे की जाताना त्यांना विचार पडायचा आपण नेमकं कशासाठी आलो होतो.

कुश माणसांना आपलंस करून घेण्यात पटाईत होता. लवकडे तेवढं वाक्चातुर्य नव्हतं पण तरी लवकडे ऐकणारा कान मात्र होता.लव अजिबात न कुरकुर करता,. आपल्याजवळ आलेल्या पेशंट स्त्रिया कशाकशाने त्रस्त आहेत ते जाणून घ्यायचा.

स्त्रियांच्या समस्या बऱ्याच असायच्या. सणासुदीला पाळी पुढेमागे करण्यासाठी कुणी गोळ्या, इंजेक्शनं घ्यायला यायच्या. लव त्यांना अशी इंजेक्शन्स,गोळ्या सारखीसारखी घेणं आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे म्हणून सांगायचा पण मग त्यांचा पुढला प्रश्न असायचा,”देवाचा कार्य असा. वाडीउपरात ठेव्क व्हयो. माका बाय भायरचा रव्हान जमाचा नाय. सासुबायेक काय सुधरताहा! पोराटोरा करतीत तर न्हान आसत माजी. हे भायरला करतीत काय भुतूरला करतीत.”

डॉक्टरांनी जरी हार्मोन्सच्या गोळ्या दिल्या नाही तरी त्या मेडीकलवाल्याकडनं मिळवून सण होऊन जाईपर्यंत घेत रहायच्या. कुणाला पटायच्या, कुणाला नाही. पटली नाही की मळमळ सुरू व्हायची, प्रचंड प्रमाणात पोट दुखू लागलं, विव्हळू लागल्या की घरातली माणसं त्यांना रिक्षात घालून परत डॉक्टरकडे घेऊन जायची.

मी, हे व आत्या मुंबईस रहात होतो खरे पण लवकुश आम्हाला या अशा समस्या फोन,पत्रांद्वारे कळवायचे तेंव्हा  वाटू लागलं की गावी राहून गावातल्या बायांसाठी काम करण्याची गरज आहे.

इतक्या वर्षांच्या सहवासात माझा नं यांचा स्वभाव जुळू लागला होता. माझ्या मनात जो विचार आला तोच यांच्या आणि हे मला म्हणाले,”वैजा, आता अर्थार्जन पुरे. कुठे थांबांव ते कळलं पाहिजे माणसाला नाहीतर माणूस शेवटच्या श्वासापर्यंत धावतच रहातो, कमावलेल्याचा आनंद घेणं राहून जातं शेवटी.”

मला पटत होतं पण मी म्हंटलं,”अहो इथल्या व्यवसायाचं काय?”

त्यावर हसत म्हणाले.”डझनभर शिष्या तयार केल्या आहेस. त्यांच्या हाती सोपव हा व्यवसाय. गुरुसारख्याच हुशार आहेत. सगळं निगुतीने करतील बघ. हा ब्लॉक आपण त्यांना भाड्याने देऊ. व्यवहारात उपकाराची भाषा नको. आपल्याला दर महिन्याला भाडं व यांच्या नफ्यातला ठराविक भाग मिळेल . मुलींनाही मिंध असल्यासारखं वाटणार नाही. तुझ्या स्वयंसिद्धा आहेत नं त्या.” यांचं हे बोलणं मला पटलं नि मी मनापासनं हसले.

तात्यांच्या पंचाहत्तरीसाठी आम्ही सर्व अलिबागला गेलो होतो. तात्यांसाठी कोटाचं कापड,धोतरजोडी, आईसाठी साडी सगळं यांनी स्वतः घेतलं.  सोहळा अगदी लक्षात रहाण्यासारखा झाला. तात्या व आईचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसत होता. दोघांचंही औक्षण केलं. लवकुशने आजीआजोबांसाठी बऱ्याचं भेटवस्तू आणल्या होत्या. काकाची चिंगी आपल्या नवऱ्याला व मुलीला घेऊन आली होती.

तात्यांनीच दुसऱ्या दिवशी विषय काढला”लव,कुश डॉक्टर झालात. इस्पितळ उभारलात ..सगळं छान पण पुढे काय!”

यावर दोघेही आजोबांकडे पाहू लागले.

त्यांच्या बावऱ्या चेहऱ्यांकडे पाहून गडगडाटी हसत तात्या म्हणाले”अरे पुढे काय म्हणजे, लग्नाचं काय तुमच्या? पाहून ठेवल्यात का आपल्या आपल्या?

यावर लव म्हणाला,”कसलं काय आजोबा..घर नि इस्पितळ यातच वेळ जातो सगळा.”

तात्या म्हणाले ,”एक मुलगी आहे माझ्या बघण्यात म्हणजे तुझ्या दादाआजोबांनीच हेरून ठेवली होती तुझ्यासाठी. माझ्या कानावर घालून ठेवलेलं. मुलगी शिक्षिका आहे. तुमच्या शेजारच्या गावातल्या सौदत्तींची मुलगी प्राजक्ता.” तात्यांनी फोटो दाखवला. लवला फोटोतलं ते टवटवीत प्राजक्तफुल बघताक्षणी आवडलंं हे त्याच्या गालातंल्या गालात हसण्याने हेरलं मी.

मुंबईकडचा व्यवसाय आमच्या ग्रुपच्या हाती सोपवून आम्ही आमचं बस्तान गावी हलवलं.

आत्याच्या सूचनांनुसार आमंत्रणं,पत्रिका, आहेर देणंघेणं ..सारं सुरळीत सुरू होतं. लग्नात सगळे सगेसोयरे उपस्थित होते. कोनफळी रंगाच्या साडीतली प्राजक्ता फार सुरेख दिसत होती. अनंता व अवनी दोघांनी खूप मदत केली लग्नाच्या तयारीत. जाई परकीय भाषांचा अभ्यास करत होती खरी पण इथे मात्र अस्सल मालवणी बोलत होती. अनंत भावजीही सेवानिव्रुत्तीनंतर इकडेच रहायला यायचा विचार करत होते.

संधिप्रकाश पानापानांवर पसरला होता. माझं मन स्वत:शीच हितगुज करत होतं..याच अंगणात मी आले होते सून बनून. आता माझी सून प्रवेशत होती. वेळ कसा सरसर पुढे गेला होता, जाताना माझी जीवाभावाची जीजी नं दादा घेऊन सरकला होता पण त्यांच्या असंख्य आठवणी इथल्या कणाकणांत रुजल्या होत्या.

माझ्या डोळ्यांत स्वप्नं तरळत होती. इथल्या महिलांना आरोग्याबाबत जागरुक करण्याचं स्वप्न, कुशसाठी अशीच छानशी जोडीदारीण निवडण्याचं स्वप्न . इतक्यात कुश कुणा मुलीला माझ्यासमोर घेऊन आला. आई ही शैलजा..माझी क्लासमेट. “पाया पडते हं आई असं म्हणत ती गौर माझ्या पायाशी वाकली.” मी काय समजायचं ते समजले.

लग्नात आठवडाभर शैलजा माझ्यामागून सावलीसारखी वावरत होती. अखंड बडबड. प्राजक्ता जितकी शांत, संयमी त्याउलट ही शैलजा उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यासारखी. तिने नर्सिंग केलं होतं.

त्यांची जवळीक पाहून माझ्या मनात..म्हंटलं नं कळतं मला.. मी कुश व शैलजाला विहिरीपाशी घेऊन गेले.

दोघं मला इकडचं तिकडचं काहीतरी निरर्थक सांगत होते. मी थांबवलं त्यांना, म्हंटलं,”हे बघा बाळांनो. मांजराला वाटतं आपण डोळे बंद करून दूध पिलं की कुणाला दिसणार नाही.” यावर दोघंही चक्क लाजली.

तेवढ्यात परड्यातली दोडकी, काकडी काढण्यासाठी इंदूमावशीसोबत आत्या तिथे आली.आत्या म्हणाली,”कार्य निर्विघ्नपणे पार पडलं. गणरायाची क्रुपा.”

मी आत्याला म्हंटलं,”आत्या दुसरं लग्नकार्यही या वर्षभरात पार पाडायचय आपल्याला.”

“अगो पण मुलगी नको बघायला..”
आत्या वेलीवरचं दोडकं काढत म्हणाली.

“भावीजोडा जोडीने फिरतोय परड्यात.” मी असं सूचक म्हंटलं तेंव्हा कुठे आत्याचं लक्ष, कुश व शैलजाकडे गेलं.”अग्गो बाई! असं आहे होय.” असं म्हणत आत्या मिश्कील डोळ्यांनी शैलजा व कुशकडे पाहू लागली.

एक सून शिक्षिका तर दुसरी नर्स यांच्या सोबतीने मी आता गावातल्या माताभगिनींना त्यांच्या आरोग्याप्रती संवेदनशील, जागरूक बनवण्याचे कार्य करणार होते.

(समाप्त.)

नमस्कार

वाचकहो तुम्ही कथेतल्या प्रत्येक पात्रावर जीवापाड प्रेम केलंत. माझ्या लेखणीसोबत कथेतील परिसरात कथेतील पात्रांसमवेत फिरत होता तुम्ही. माझ्यासोबत कथा जगत होता तुम्ही.

तुमच्या  बोलक्या प्रतिक्रियांतून ते मला प्रत्येक भागात जाणवत होतं. म्हणतात नं,थोडक्यात गोडवा असतो. कुठे थांबायचं कळलं की कथेचा आब राखला जातो.

वैजयंतीची मुलं आता शिकूनसवरून मोठी झाली आहेत, कामाला लागली आहेत. वैजयंती, अशोक,आत्या, अवनी, अनंत सारी पुन्हा आयुष्याच्या संध्याकाळी एकत्र आलीहेत.. मुलं,सुनाही सोबत आहेत.

घर म्हंटलं की भांड्याला भांड लागतच, प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात..त्यातूनही वाट काढत वैजयंती सासूने सांगितल्याप्रमाणे कुटुंबाचा कणा बनत सर्वांना घेऊन चालत राहील, सोबत गावाचाही विकास करेल.
तेंव्हा या सुरेख वळणावर आपल्या वैजयंतीला व तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया.

लघुकथांच्या माध्यमातनं मी तुम्हाला भेटत राहीनच आणि बघू पुढे तुमच्या आशीर्वादाने अशीच एखादी सजीव कथा लिहिणं झालं तर नक्की घेऊन येईन तुमच्यासाठी. असाच लोभ कायम ठेवा.

रीतभातने ही कथा मांडायला दिली त्याबद्दल रीतभातचे मनापासून आभार.  याच वेबसाईटवर आधी चाकोरीबाहेर व प्रपंच या स्त्रीवादी कथामालिका मी लिहिल्या आहेत. अवश्य वाचा व रीतभात पेजला सबस्क्राईब, फॉलो करा.💕🙏

तुमची गीता.

======================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-15/

===========

नमस्कार वाचकहो,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

1 Comment

  • Poonam Velaskar
    Posted Aug 12, 2022 at 10:31 am

    तुमच्या कथा खूप छानच असतात. पण वैजयंती जास्त आपली वाटली.

    Reply

Leave a Comment

error: