Skip to content Skip to sidebar Skip to footer

वैजयंती (भाग पंधरावा)

©® गीता गरुड.

आपली परावलंबी सासू अशी स्वयंसिद्धा होऊ शकते असं तिलोत्तमाला अजिबात वाटलं नव्हतं. इंग्लिश न बोलता येणारी माझी आत्या तिच्या सचोटीच्या व्यापाराने उतरत्या वयातही स्वयंसिद्धा बनली होती. अवनीलाही आमचं हे यश पाहून धक्काच बसला कारण तिनेही जीजीला द्यावंघ्यावं लागेल म्हणून न च्या बरोबर संबंध ठेवले होते घराशी.

मी मात्र खुश होते. माझ्या गोकुळात, माझी नणंद येतजात होती, सासू, निराधार आत्या स्वकमाई करत होत्या, नवराही कुणाचं मिंध होण्यापरीस आमच्या उद्योगाला हातभार लावत होता नं माझे लवकुश आज्यांच्या सहवासात मोठे होत होते.

—————————————————-  

काळाची पानं  त्याच्या वेगाने पलटतं होती तशी मुलं एका इयत्तेतून पुढच्या इयत्तेत जात होती. मोठी होत होती..वाढीस लागली होती.

ठमाने अगदी ऋतुराजचा चेहरामोहरा घेतला होता. तशी ती बऱ्यापैकी शांत होती पण कधीकधी कळीला यायची. मग रेशम म्हणायची,”बापसावर गेलीय कारटी.” तिला दोन थापटं अधिकच मारायची.  तिला उगाचच मारलेलं निमाताईंना मुळीच आवडत नसे. त्या जीजीकडे यायच्या रेशमची तक्रार घेऊन. म्हणायच्या,”जीजी बघा ना. देव देऊनही बघतो नं घेऊनही बघतो. मी भोगलय सारं. ठमा किती शांत आहे. कधीतरी करते हट्ट तर बिचारीला तिच्या बापसावरनं डिवचणं बरं आहे का! बरं त्या अश्राप जीवाला काय कळतय हो!

तिला बिचारीला प्रद्युम्नच आपला पप्पा वाटतो. जेंव्हा तिला कळेल की आपला पिता कोणी औरच होता, तेंव्हा आईचे संंवाद आठवून काय अवस्था होईल त्या पोरीची! तिने कोणतं आततायी पाऊल उचललं तर! जीजी मी बालवाडी चालवते, मला बालमनं कळतात. फार जपावं लागतं या कोवळ्या कळ्यांना, अगदी ओंजळीतलं पाणी जपावं तसं.”

निमाताई असं काही बोलून उसासत गेल्या की जीजी रेशम इकडे आली की तिला चांगलीच धारेवर धरायची. मग रेशमही उद्विग्नतेने म्हणायची,”मी तरी काय करू जीजी. जसजशी ठमा मोठी होतेय तशा तिच्याबोलण्याच्या,खाण्यापिण्याच्या लकबी पाहून माझ्या डोळ्यांसमोर ऋतुराज येत रहातो. आणि मग अधिक तीव्र होते फसवलं गेल्याची भावना. माझीच मला चीड येते आणि माझ्याही नकळत मी माझ्या ठमीला काहीबाही बोलते, जोरात लगावते.

जीजी रेशमला समजवायची,”अगो, जे झालं ते झालं. माणसाने भूतकाळ ढवळत रहायचं की वर्तमानकाळाचा आनंद घ्यायचा! तुझं तुला समजायला हवं खरं तर.” रेशमही मग सॉरी म्हणून जायची.

खरं पहायला गेलं तर दुसरं बाळ झाल्यावर प्रद्युम्न ठमाशी दुजाभाव करेल अशी आम्हांला धास्ती होती पण प्रद्युम्नच्या तर काळजाचा तुकडा होती मयुरी.

तिघा भावांची लाडकी बहीण! फुलांची तर इतकी हौस! रोज गजरा हवाच असायचा. फुलवाले काकाही तिच्यासाठी खास फुलं राखून ठेवायचे. केस काही जाड नव्हते, पातळच आईसारखे पण तरी वाढवायची भारी हौस. शेवग्याच्या पातळ शेंगेसारख्या वेण्या यायच्या. निमाआत्याकडनंच बांधून, लाल रिबींची फुलं बांधून.हवी असायची, मग त्यावर गजरा माळून मानेला झटका देत तो हलवणं..किती गोड वाटायचं ते ठमाचं सानपण.

एका फाल्गुनात आम्ही सगळीच गावी गेलो होतो. घरात होम घातला. पाहुण्यांसाठी शेवचिवडा राम टी हाऊसमधल्या राऊतांकडून आणला होता. दादा तिथनंच आणायचे नेहमी. आता हेही तिथनंच आणू लागले. चव अगदी अप्रतिम. मी तर तात्यांना सोबत देण्यासाठी शंकरपाळी,शेवची वेगळी ऑर्डरच दिली होती.

अनंतभावजी तेंव्हा अवनीला घेऊन आले होते. अवनीच्या स्वभावात बराच बदल जाणवत होता मला. पुर्वीचं बेफिकीर वागणं, कुणाचाही मान न ठेवता पटकन उत्तर देणं गायब झालं होतं. कुणा साधवीच्या प्रवचनाला जाते म्हणत होती. जीजींनाही अवनीचं हे रुप आवडलं.

वयानुसार, पदोपदी खाल्लेल्या खस्तांनुसार माणूस घडत जातो, खरंच ते. इंदूमावशीची नात जाई, तिला भेटायला यायची सुट्टीला. आम्ही तिथे गेल्यावर तिला म्हंटलं अनायासे सुट्टी आहे तर रहा मुलांसोबत. तिची नि मयुरीची छान गट्टी जमली.

जाईने पोरांना पुरं गावठाण फिरवलंन. कुठला आंबा खोबऱ्यासारखा लागतो, कुणाची जांभळ भेडशी, कुणाची म्हैस व्याली,खरवस कधी करतील..सगळ्याची बित्तंबातमी जाईला. पोरांना समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जायची, खेकडा पकडायला शिकवायची. तिथे लाटांवर खेळायची पोरं. दिपग्रुहातून विराट समुद्र पहायची.

अनंतभावजी, कधी मी व अवनी जायचो त्यांच्यासोबत. समुद्राचं निळशार पाणी पाहून मला अलिबागची आठव यायची. सासर माहेर जोडणारा सखा माझ्यासमोर उभा असायचा, जणू सीतेसमोर हनुमंत. आपल्या फेसाळत्या लाटांनी माझी पावलं भिजवायचा. माझ्या केसांशी,पदराशी तिथला खारा वारा खेळायचा. मी पुन्हा सान व्हायचे. मुलांसोबत किल्ला बनवण्यात रमून जायचे. अवनी शंखशिंपले गोळा करत असायची.

मुलांचा गावाकडला नाश्ता ठरलेला असायचा. इंदूमावशी आमच्यासाठी रेडकरांच्या भट्टीतले चौकोनी पाव घेऊन यायची. चहापाव खाल्ले की मुलं भटकायला सुटायची नि आम्ही आमच्या कामांना. कामं का थोडी असायची, सोलं करणं, वाळत घालणं, पतेरा काढणं, शेतात न्हेऊन टाकणं..आम्ही नसताना किश्या, इंदूमावशी गडीमाणसांकडून करून घ्यायची पण आम्ही गेलो की आम्हीही त्यांच्यासोबत करू लागायचो.

असंच एकदा भाजीसाठी फणसाचे गरे सोलताना अवनीने इंदूमावशीला विचारलं,”मी न्हेऊ का जाईला माझ्यासोबत. तिथे शाळेत घालेन तिला.”

इंदूमावशी म्हणाली,”हयसर कितक्या काम करूचा लागता पोराक. आव्स जाता काजीकारखान्यात नि बापूस मजुरीवर. हेकाच घरातली कामा पडतत. तुमी न्हिलास तर माझी नात चार बुका अपुर्वाईन शिकात तरी. मिया समजावतय सुनेक नि झिलाक.”

इंदूमावशीने सुनेला बोलवून आणलं. तिचं नि अवनीचं बोलणं झालं. अवनीचं बोलणं
मावशीच्या सुनेला पटलं. ती म्हणाली,”जावा घेऊन. माजा बायग्या शिकान मोठा झाला की म्हनात तरी आयेन शेरात पाटवल्यान म्हनान हे दिस दिसतहत. माका वायच जास्तीचा काम पडतला. ता मिया फाटफटी उठान एडजस्ट करीन. मातर रजा पडली की माज्याहारी लावून देवा माज्या बायेक नायतर इसरात आमका.” असं म्हणून तिने पदर डोळ्यांना लावला तशी जाई तिला घट्ट बिलगली.

तिच्या कुशीत डोकं घुसळत म्हणाली,”नाय गे आये. आयेक कोन इसारता काय कधी. मिया शिकून हाफिसर होतलय. बंगलो बांधतलय, रावतांच्या बंगल्यासारो. ती माका गुलाबा काडूक दिनत नायत ना. मिया बंगल्यासभोवती मोठो बगीचो करतलय. न्हान पोरांका काढून व्हयी तेवडी फुला माळा हुनान सांगतलय.” लेकीचं स्वप्नरंजन पाहून रडवेली माऊली हसू लागली.

जाई, अवनी व अनंतभावजींसोबत पुण्याला रहायला गेली. तिथे तिचं हुजुरपागा शाळेत नाव टाकलं. काही दिवसांतच ती तिथल्या वातावरणात रुळली.

दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावी जात होतो. तेंव्हा मग जाई आपल्या आईकडे जायची. अवनीला मम्मी म्हणू लागली होती. गावी आली की सराईतपणे गावची भाषा नि पुण्याला गेली की पुण्याची भाषा, जाई इतक्या शिताफीने बोलायची की पुढे हिला या भाषांतराशी संबंधित क्षेत्रामधे सहज करिअर करता येईल अशी खात्री वाटू लागली होती आम्हाला.

काळ पुढे सरकत होता, काही जुनी पानं घेऊन जात होता, नवीन पालवी घेऊन येत होता. काळाची बाहुली आम्ही त्याच्या तालात नाचत होतो. मुलांनी शिक्षणाबाबतीत मला कधी त्रास दिला नाही. प्रचंड मेहनती होते. बारावीनंतर दोघे हॉस्टेललाच तर राहिले . मी, हे व आत्या आमच्या कुटीरोद्योगात व्यग्र होतो.

बघताबघता लव, कुश दोघंही एमडी डॉक्टर झाले. वेदही त्यांच्याच पावलावर पावलं टाकून शिकत होता. ठमा  कलाशाखेला गेली. बीए झाल्यावर तिने कायद्याचं शिक्षण घेतलं. जाईही आईला दिलेल्या शब्दाला जागली. नीट अभ्यास करत होती. परकीय भाषेत करिअर करायची स्वप्नं पहात होती.

काही वर्षें सरकारी इस्पितळात काम केल्यानंतर लवकुशनी वेंगुर्ल्याला इस्पितळ बांधायचं ठरवलं. , पण त्यांना यातलं काही अशोकना सांगायचं नव्हतं. सरप्राईज द्यायचं होतं म्हणे.

ठमासाठी आता स्थळं येऊ लागली होती. पण ती हो ना करत होती. मला रेशमसारखाच ठमीतलाही बदल कळत होता. देवाने दोन मुठभर जास्तच मला अशा प्रेमीजीवांना ओळखण्याची बुद्धी दिली होती.

अशीच एकदा ठमा शनिवारी रात्रीच आली आमच्याकडे.
“मामी गं जरा चंपी करून दे बघू. बरेच दिवस झाले तुझी बोटं फिरली नाहीत माझ्या केसांतून.” ठमा लाडे लाडे म्हणाली. त्या रात्रीची भांडीही तिनेच घासली होती. ओटा अगदी लख्ख लख्ख केला होता.

“एक दिवस मामीला आराम दिलास नं.” मी तिच्या गालांना हात लावत म्हंटलं.

“त्यात काय एवढं मोठं. तुला हवं तर नेहमी येत जाईन मी मदत करायला.” रेशम म्हणाली.

मी ठमाने वरती पिनअप केलेले केस सोडले. मऊसूत केस तिच्या पाठभर पसरले. मी वाटीतलं खोबरेल तेल बोटांवर घेऊन तिच्या डोक्याला हलके हलके लावू लागले तशी तिचे डोळे मिटू लागले.

तिला जरा पाठीला हलकेच चापटी मारत मी म्हंटलं,”तुझं कुणाशी जुळलय का गं?”

यावर ती गालात हसली. माझ्याशी तिनं खोटं बोलणं केवळ अशक्य होतं.

माझ्याकडे वळून तिने माझे दोन्ही हात हातात घेतले. डोळे मोठे करत म्हणाली,”आईला सांगणार नाहीस नं?”

मी डोळ्यांनीच नाही सांगणार याची खात्री दिली.

माझ्या हातातल्या बांगड्या मागेपुढे करत ती बोलू लागली,”झालं दिडेक वर्ष . अफेअर चालू आहे आमचं. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी सिनिअर आहे. विराज पाथरे नाव त्याचं. त्याचे वडीलही वकील आहेत. लीगल फर्म आहे त्यांची.”

मी पाण्यात खडा टाकावा तसं विचारलं,”हे प्रेमप्रकरण कुठवर आलंय. म्हणजे मानसिक पातळी की त्याहीपेक्षा पुढे.”

तसं माझ्या ओठांवर बोटं ठेवत ठमा म्हणाली,”नाही हं मामी, विराज खूप सोज्वळ मुलगा आहे. तसलं काही तू मनातदेखील आणू नकोस त्याच्याबद्दल. अगं, साधा माझा हात हातात घेताना दहादा विचार करतो विरू . त्याच्या घरी त्याची आज्जी, एक लहान भाऊ नि त्याचे आईपप्पा असतात. आई शिक्षिका आहे त्याची, गंडभीर शाळेत. पाथरेबाई म्हणतात त्या, तू ओळखत असशील त्यांना.”

“अग्गो बाई, तुम्हांला संस्कृत शिकवायच्या आठवी ते दहावी त्या तर नव्हे त्या!”

“आता कसं बरोब्बर ओळखलंस.”

“तुझ्या कुटुंबाची माहितीही पोहोचलीच असेल विराजपर्यंत.”

यावर माझ्या तळहातांवरल्या रेषांवर बोटं फिरवत ती म्हणाली,” हो पण अगदी खरीखुरी.”

“म्हणजे गं.”

“मामी, मला बिल्डींगीतल्या मैत्रिणींकडून कळलय की माझे वडील प्रद्युम्नपप्पा नाहीत तर दुसरेच कुणी ऋतुराज म्हणून होते नि त्यांनी आईला..असो पण मला हे ठाऊक झालंय हे तू आईपप्पांना सांगणार नाहीस. आईचं माहित नाही गं पण पप्पा..पप्पा कोलमडतील मला हे वास्तव कळलय हे जाणून.खूप खूप जीव आहे पप्पांचा माझ्यावर. तुला का ठाऊक नाही ते!” हे बोलताना ठमाच्या डोळ्यातनं अश्रु वहात होते. मी तिला छातीशी धरलं.

झालं. पंधराएक दिवसांत वरवधुपक्षाची बोलणी झाली. नाव ठेवायला दोघांतही जागा नव्हती. विराजचे आईवडील आधुनिक विचारांचे होते त्यामुळे जरी आम्ही मयुरीच्या जन्मपित्याविषयी त्यांच्याकडे क्लीअर केलं तरी त्यांना ते तितकसं महत्त्वाचं वाटलं नाही.मुख्य म्हणजे आमची मयुरी बाईंची आवडती विद्यार्थिनी होती. आम्ही काय गोडवे गाणार तिचे त्यांच्यासमोर!

मयुरीच्या लग्नात यांनी व अनंतभावजींनी पैसे काढून मयुरीसाठी लक्ष्मीहार व पाटल्या केल्या. एवढं कशाला असं रेशमचं चाललेलं पण दादांमागे बहिणीसाठी आपल्या लेकांनी एवढं केलं हे पाहून जीजीचं काळीज सुपाएवढं झालं. प्रद्युम्नच्या गळ्यात पडून मयुरीने पप्पा म्हणत जो सूर काढला..आमचं सगळ्यांचं काळीज पिळवटलं. लव,कुश,यश.. तिघे भाऊ निरोप देताना हमसूनहमसून रडले. जाई मयुरीसोबत धेडी म्हणून गेली.

मयुरीला सासरी जाऊन पंधरवडा होत आला होता. मी नि आत्या रेशमच्या घरी जाऊन बसायचो. मुलगी सासरी गेली की घरात एकप्रकारचं उदासपण येतं तसं आलं होतं रेशमच्या घराला.

आमची ठमा..ठमाच येतं तोंडात.. मयुरी म्हणजे उत्साहाचा झराच जणू. घरात चैतन्य आणलेलं तिने. वेदही आता हॉस्टेलला राहू लागला होता. आम्ही उगाच इकडचं तिकडचं बोलत बसलो होतो. शब्दच नुसते. शब्दांत जीव नव्हता कारण ऐकणाऱ्यांची मनस्थिती बरी नव्हती. काळ जरूर मलम लावणार होता..विरहाचं दु:ख कमी करणार होता पण तोवर तरी ते आईबापाला सोसावंच लागणार होतं.

रेशम नको नको म्हणत असताना मी बसल्याबसल्या गहू पाखडून दिले. आत्यानेही घरातला पसारा व्यवस्थित लावला. “रेशम, खुळी का तू. तुही सासरी गेलीसच नं. अगं, प्रत्येकीला जावंच लागतं. विधिलिखित असतं ते किंबहुना नशिबात असावं लागतं लग्न होणं नं चिरकाळ टिकणं..या आत्याच्या शब्दांवर मात्र आत्याचा आवाज चिरकला. डोळ्यात आलेलं पाणी तिने पडद्यामागे तोंड करून कुंडीतल्या फुलांना गोंजारल्मासारखं करत बळेच पुसलं.

“आली असेल ना गं हनिमुनहून. आपण फोन करुया मयुरीला. बोलू तिच्याशी. सांगते तिला, तुझ्या घरी नळ आलेत. बादल्या घेऊन ये भरायला.” या माझ्या वाक्याला प्रद्युम्न थडा का होईना हसला.

लग्नाचा अलबम घेऊन फोटोग्राफरचा पोऱ्या आला. प्रद्युम्नने त्याला ठरलेल्या रकमेचा चेक दिला..मग आम्ही फोटो बघत बसलो. हळदीचा फोटो, गौरीहर पुजतानाचा फोटो, एवढुशी आमची ठमी..किती मोठी दिसत होती फोटोत. मला मात्र ती माझ्याकडे खारकांसाठी हट्ट करतानाची आठवत होती.. खणाच्या परकरपोलक्यातली दोन शेंड्या हलवणारी, दातांच्या खिडक्या दाखवत मामी मामी करणारी माझी ठमुकली. मला एवढं वाटतं होतं तर तिच्या आईपप्पांच काय!

इतक्यात बेल वाजली. आत्या नि मी जराशाने निघायच्या तयारीतच होतो तर एक बाई आत प्रवेशल्या. केसांचा शेपटा, बरेचसे केस पांढरे..मला चटकन लक्षात येईना. त्या बाईने डोळ्यावरचा चष्मा काढला. माझ्याकडे रोखून बघत म्हणाली,”ओळखलत मला..”

क्रमश:

कोण असेल ती बाई! बघू पुढच्या भागात. वाचत रहा. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा

===================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-14/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-16/

=========================

नमस्कार वाचकहो,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: