वैजयंती (भाग चौदा)


©® गीता गरुड.
आम्ही जड अंत:करणाने जीजीस निरोप दिला नि एसटीच्या थांब्याजवळ आलो.
इथून कुडाळला जाणारी एसटी पकडायची मग तिथून परत रेल्वेस्टेशनपर्यंत रिक्षा. थांब्यावर गाडीला जाणारे एकेक जमा होत होते. यांची विचारपूस करीत होते. पाऊस तसा निवांत होता.
राती झड लागून गेली होती. पहाटेही थोडा पडला होता. शेतात लोकांची कामं चालू होती. हिरवंगार निसर्गाचं रुपडं कितीही केलं तरी नजरेत भरत नव्हतं. डोळ्यापुढे अश्रुंचा दाट पडदा साकळला होता. बुधवारचा कुडाळच्या बाजार ..बाजारात जाण्यासाठी काहीजणं आली होती तर काहींची कचेरीत कामं होती.
गाडीचा लांबूनच आवाज आला तसे आम्ही रस्त्याच्या पल्याड गेलो. गाडीत बसणार इतक्यात शेजारचा वसंता धावत आला…पाठी फिरा म्हणाला.
यांनी तिथेच बसकण मारली. कसंबसं किश्याने व इतर गावकऱ्यांनी यांना उभं केलं नि घराकडे निघालो. तिन्हीसांज होईस्तोवर सगळे नातेवाईक जमा झाले.
रेशम व प्रद्युम्न मुलांना घेऊन आले. अनंतभाऊजी अवनीला घेऊन आले. तात्या,आई,अवनीच्या माहेरची मंडळी आली. प्रसन्ना आत्याला घेऊन आला.
तात्या सावलीसारखे यांच्या पाठीशी होते. सगळा गाव हळहळत होता. दादांनी पुऱ्या गावावर मायेची पाखर केली होती. वीसेक दिवसांनी जीजीला घेऊन आम्ही मुंबईस निघालो. इंदुमावशी व किश्या घरभाट बघणार होते. ते घरातलेच सदस्य झाले होते.
याचदरम्यान काकाच्या चिंगीचं लग्न झालं..आम्हाला सूतक असल्याने जाता नाही आलं.
यावेळी आत्या नाराज दिसली. भाऊ गेल्याचं दुःख होतंच पण आणखी बरंच होतं. मी खोलात जाऊन विचारलं तेव्हां कळलं की प्रसन्नाने एका दाक्षिणात्य मुलीशी सूत जुळवलय. त्यांचं लिव्ह इन रिलेशन चालू झालं..लग्न केल्याशिवाय ती मुलगी घरात येऊन राहू लागली.
आत्याच्या हे पचनी पडत नव्हतं. त्यांना मुलंही नको होती म्हणे. सगळाच आधुनिक कारभार.
घरकामाला,स्वैंपाकाला बाई होती. सगळा स्वैपाक ती लीव्ह इनवाली सून म्हणेल त्या पद्धतीचा. आत्याने स्वैंपाकघरात वावरलेलं तिला आवडत नसे.
आत्याच्या कोंडमारा होत होता. ते रस्सम आत्याच्या घशाखाली जाईना..बरं पोटाचं कसंबसं एडजस्ट करेल पण तोंडाचं काय! तिच्या सुनेला काय बाई नाव तिचं..हां.. तिलोत्तमा. तिलोत्तमाला इंग्लिश व तमिळशिवाय इतर कोणतीही भाषा येत नव्हती.
प्रसन्ना व तिलोत्तमा दोघं एकमेकांशी इंग्रजीत बोलत. शेजारी कोणाशी बोललेलं प्रसन्नाला आवडत नसे. आत्याची अवस्था पिंजऱ्यातल्या पक्ष्यांसारखी झाली होती.
आत्याला हाताला काम व सोबत तोंड भरुन बोलणारी आपली माणसं हवी होती. तिच्या सासरच्यांनी तिला अवलक्षणी ठरवून तिचा नवरा गेल्यापासून तिच्याशी संबंध तोडले होते.
आत्याला माहेरचाच काय तो आधार होता. पेंशन वगैरे होतीच पण त्याहीपलिकडे मानसिक सोबत लागते जी प्रसन्नाच्या घरी गेल्यापासून तिला दुर्लभ झाली होती. मी तिची सारी व्यथा ऐकून घेतली पण काहीच करु शकत नव्हते सध्या.
———————————————————————–
जीजींना घेऊन घर गाठलं. नाना सांत्वन करण्यास आले. म्हणाले,बरं झालं घेऊन आलात जीजीला. इथे नातवंडांत मन रमेल तिचं. खालच्या गोखले काकू व तिरळे काकूही येऊन गेल्या. चारपाच वाजता जीजीस पाय मोकळे करण्यास घेऊन जाऊ लागल्या.
हळूहळू जीजी त्यांच्यासोबत किर्तनास जाऊन बसू लागली..थोडी स्थीर वाटू लागली. घरातही थोडी बहुत कामं करायची. मीही तिला नाही म्हणत नव्हते. लसूण सोलणं,ओले कपडे वाळत घालणं..असं तिचं चालू असायचं. रेशमही मुलांना घेऊन यायची. नातवंड आजीसोबत बसायची मग जीजी त्यांना देवळात ऐकलेल्या कथा रंगवून सांगायची.
आता नोकरीला नसल्याने मी निवांत कधीही बाजारात जाऊन भाजीपाला घेऊन येत असे. कुठे स्वस्त,ताजी भाजी मिळते ते कळत होतं. यातूनच एक कल्पना मनात आकार घेत होती.
आमच्या सोसायटीतल्याच सात बिल्डींग्स शिवाय आजुबाजूच्या सोसायट्यांमधेही ओळख होती. सर्विसला जाणाऱ्या बायका संध्याकाळी येताना भाजी घेताना दिसायच्या. मोलभाव करायला,त्या अंधुक उजेडात भाजी निरखून पहायला त्यांच्याकडे वेळच नसायचा.
मी विचार केला, यांना लागणारा भाजीपाला आणून निवडून,धुऊन, चिरुन वगैरे पाकिटं करुन दिली तर..त्यांनाही सोयीचं होईल नि मलाही घर बसल्या चार पैसे मिळतील. जीजीला विचारलं..जीजी म्हणाली,” कल्पना छान आहे पण आधी घरोघरी जाऊन बायकांची मतं घे. त्यावरून ठरव. ग्रुहिणी यात उत्साही नव्हत्या पण नोकरदार यहिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसंच व्रुद्ध आजीआजोबाही,” हे काम करच ,आम्हाला सोयीचं होईल म्हणाले.”
रेशमने स्वत:ची गाडी आणून दारात उभी केली. म्हणाली,”वहिनी,सध्या तुला गाडीची गरज आहे. मी निमिताईसोबत बालवाडीत काम करते त्यामुळे गाडी तशी जागेवरच असते. तू चालव.”
रेशमची नि माझी मुलं एकमेकांत इतकी मिसळली होती की सख्खी भावंडच वाटायची. रेशमला वाटलेलं, दुसरं अपत्य झालं की प्रद्युम्न ठमाला अंतर देईल पण वास्तवात तसं काहीच झालं नाही. प्रद्युम्न, निमिताई तसेच निमिताईचे यजमान रेशमच्याच काय तर माझ्या लवकुशलाही खूप माया लावत होते. रेशमचा वेदू अगदी रेशमसारखाच दिसायला. नाकावर रागही तसाच. पण ठमा मात्र आता ताईगिरी करू लागली होती. वेदूला काय कळत होतं! पण ही कंबरेवर हात ठेवून त्याला शिस्त शिकवायची.
या साऱ्या माझ्या माणसांच्या आधारामुळेच तर मला नवीन उद्योग करण्याचं साहसं करता आलं होतं. नाहीतर मुलांचीच कामं किती असतात! त्यात माझी जुळी…. पण रेशमआत्या हुशार असल्याने आणि मुलं तिचं जरा जास्त ऐकत असल्याने त्यांचा अभ्यास घेण्याची जबाबदारी मी तिच्यावर सोपवली होती. माझी व जीजीची व्यवसायासाठीची धडपड पाहून रेशमनेही भाच्यांना शिकवायची जबाबदारी आनंदाने स्वीकारली होती.
सकाळी डबे झाले,जीजीला नाश्ता दिला की ठेले घेऊन बाहेर पडायचे. कातकरी बायका छान कोवळी,कवकवीत भाजी घेऊन बसायच्या. त्यांच्याकडून एकहाती खरेदी करायचे..भेंडी,शिराळी,दुधी,चवळीच्या शेंगा,माठ,शेपू..ठेल्यांत भरुन आणायचे. घरी आले की जीजी पेपर पसरून बसलेलीच असायची. माझ्यासोबत भाज्या नीट करु लागायची. मग त्या स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळवून चिरुन त्यांची पाकिटं भरायचो. मटार,फरसबी,फ्लॉवर, गाजर..अशी मिक्स भाजीची,पुलावसाठीची सेपरेट पाकिटं बनवायचो..शिवाय ग्राहकांच्या मागणीनुसार कडधान्य भिजवून ठेवू लागले. जीजींनी कडधान्य भिजवून ठेवलं की छान मोड यायचे कडधान्याला.
बायका आदल्या दिवशी रात्री ऑर्डर देऊन जायच्या. ऑर्डरनुसार पाव किलो,अर्धा किलोची पाकीटं भरायचे. व्यवस्थित पँकिंग करुन फ्रिजमधे ठेवली की संध्याकाळी त्या येऊन घेऊन जायच्या. काहीजणी जीजीकडून भाजीची रेसिपीही विचारुन घ्यायच्या. यातूनच मग आयतं वाटण..वाटणाचे क्युब्स करुन देणं..हे सुचत गेलं.
आमचा स्वयंसिद्धा कुटीरोद्योग अल्पावधीतच प्रसिद्ध झाला. भाजीवाल्या वैजयंती बाई ही नवीन ओळख मिळाली मला. हाताखाली चार गरजू बाया ठेवल्या. त्यांना तासानुसार रोजगार देऊ केला. जीजी आता महिलांच्या भजनीमंडळात सहभागी झाली होती. त्यांच्यासोबत मंदिरांमधे जायची. तिची गायनाची आवडही जोपासली जात होती.
अनंतभावजी सुट्टीला दोन दोन दिवस रहायलाच यायचे. अवनी व अनंतभावजींच्या घरी पाळणा हलत नव्हता. डॉक्टरीउपचार चालू होते पण यश येत नव्हतं पण अनंतभावजींनी ते स्विकारलं होतं. लवकुश, मयुरी,वेद यांच्यासाठी येताना मगनलाल चिक्की, लक्ष्मीनारायण चिवडा, वेदसाठी मलईपेढे असं बरंच खाऊ घेऊन यायचे. भाचरांत जीव रमवत होते.
अवनीची अवस्था मात्र कानकोंडी झाली होती. तिची वहिनी आल्यापासनं माहेरीही तिला तेवढं वेटेज राहिलं नव्हतं नि तिला इकडे आमच्याकडेही यायचं नसायचं. बिचारीच्या डिप्रेशनच्या गोळ्या चालू होत्या, अनंतभावजींकडून कळत होतं. त्यांना म्हंटलंही,”इकडे आणून सोडा तिला महिनाभर.” तर म्हणाले,”एकटं रहाण्याची आवड. राहुदेत एकटीच.” यावर काय बोलणार नं.
मी सुचवलं,”दत्तक वगैरे घेतात तसं काही..”
त्यावर ते म्हणाले,”त्या मुलाला माया लावता आली पाहिजे मनापासनं. उगाच स्वार्थासाठी नकोच.”
एकेदिवशी अचानक प्रसन्ना आला,म्हणाला..”इथे एका मित्राकडे आलो होतो.” माझ्या व्यवसायाचं त्याने कौतुक केलं. मी त्याला पुलाव,कोशिंबीर करुन जेवण वाढलं. हे येईस्तोवर थांबण्यास सांगितलं..तो थांबलाही.
हे दोन तासांत आले. मी दोघांना चहा करुन दिला. कामाला आलेल्या बाया निघून गेल्या होत्या.
यांनी विचारलं,”कसं काय मजेत ना प्रसन्ना.”
“हो भाऊजी,मी व तिलोत्तमाने रजिस्टर्ड लग्न केलं.” प्रसन्ना म्हणाला. हे ऐकून आम्हाला समाधान वाटलं. त्याने कसं का होईना लग्न करावसं मनापासून वाटत होतं.
मी विचारलं,”आत्या काय म्हणतेय?”
तर म्हणाला,”हल्ली एकटीच बडबडत असते..काहीतरी पुर्वीचं..एकच विषय पुन्हा पुन्हा रवंथ केल्यासारखा बोलत असते. बरं ते आईचे काही एफडीज तुमच्याकडे असल्याचं कळलं. मिळाल्या असत्या तर बरं झालं असतं. त्याचं कायकी मी नि तिलोत्तमा दिल्लीला शिफ्ट होतोय,तिच्या आईवडिलांचा बंगला आहे तिथे.
तिथेच जवळपास घर पाहिलय. सध्या भाड्याने. दिल्लीतली थंडी आईला मानवणार नाही, तेंव्हा तिच्यासाठीच ओल्ड एज होमचं बघतोय. तिलोत्तमाच्या माहेरच्या घराजवळच ओनरशीपची जागा घ्यायची म्हणतोय.
तिच्या आईवडिलांशी तिच्या वहिनीचं पटत नाही. तिला ते डोळ्यासमोर नको झालेत. म्हणून मग त्यांना आमच्या घरी घेऊन जाणार. आम्हालाही आधार.”
मला कळत नव्हतं. हा प्रसन्ना इतका कसा बदलला! ज्या आईने दोन तपाहून अधिक काळ त्याला सांभाळलं..तिची रवानगी व्रुद्धाश्रमात.. आणि याला पुळका कुणाचा तर सासूसासऱ्यांचा. सासूसासऱ्यांना सांभाळच रे पण आईनेच काय घोडं मारलं तुझं नि तुझ्या बायकोचं!
मी काही बोलणार एवढ्यात हेच म्हणाले,”त्या एफडी मी तुला मुळीच देणार नाही.”
प्रसन्ना म्हणाला,”माझ्यासाठी नकोत ते. तिच्याचसाठी.”
हे म्हणाले,”आत्याला आमच्याकडे आणून सोड. इथे जीजीसोबत आरामात राहील ती. माझ्या कुटुंबासाठी बरंच केलंय आत्याने. आम्हाला तिच्या रहाण्याचा,गप्पांचा मुळीच त्रास होणार नाही.”
प्रसन्ना थोडा त्रासिक सुरात म्हणाला,”तुम्हाला त्रास होणार नाही पण लोक काय म्हणतील. मुलगा असताना भाचीकडे रहाते वगैरे.”
यावर मात्र जीजी म्हणाली,”कोण काय म्हणेल त्यांना उत्तर द्यायला मी आहे. व्रुद्धाश्रमात ठेवलंस तरी लोकं बोलणारच की. इथे ती आपल्या माणसांत राहील.”
प्रसन्नाने आत्याला आमच्याकडे आणून सोडलं. आईला आमच्याकडे सोडून जाताना परत पहायला कधी येत जाईन असंही त्याला म्हणावंस वाटलं नाही. साधा नमस्कार करण्यासही वाकला नाही तो. काय केलं नव्हतं आत्यानं त्याच्यासाठी! आयुष्यभर दुसरं लग्न केलं नव्हतं. व्रतस्थासारखी राहिली होती. त्याचं भलं व्हावं हेच तर तिचं स्वप्न होतं.
तिचा प्रसन्ना आता कर्तासवरता झाला होता. घर होतंच. लवकरच ऐसपैस असं नवीन घर घेणार होता, दिमतीला गाडी होती,.आयुष्यभराच्या सोबतीसाठी जोडीदारीण होती.
सारी सुखं होती प्रसन्नाकडे पण ही सुखं ज्या माऊलीमुळे त्याला लाभली होती ती माझी आत्या,.त्याची आई त्याला अडगळ वाटू लागली होती.
मला वाटलं, प्रसन्ना असा सोडून गेला म्हणून आत्या रडेल पण छे! आत्याचे डोळे ठार कोरडे झाले होते. आत्यासाठी मी चार सुती साड्या घेऊन आले. तिच्याजवळच्या साड्या पार धुवट झाल्या होत्या. आत्याही आमच्या कुटीरोद्योगात सामील झाली. भाज्यांची प्याकींग वगैरे करू लागली. नातवंडांत रमू लागली.
एकदा आत्याने यांना म्हंटलं,”जावईबापू,. या माझ्या भाचीकडे पाहून मलाही काहीतरी नवीन करावंसं वाटतय.”
“आत्या, तुम्ही वैजूला मदत करता आहात. वैजू तुम्हाला परकी आहे का!”
यावर आत्या म्हणाली,”मला माझ्या एफडीतून एक पिठाची चक्की घेऊन द्या. मी जोंधळ्याची, नागलीची पीठं करून त्यांची पाकीटं ठेवीन विक्रीला. नाहीतरी बाया भाजी घ्यायला येतातच आपल्याकडे. पीठंही घेऊन जातील.” यांना कल्पना आवडली.
घरात पीठाची चक्की आली. घरचं दळण होत होतंच शिवाय घावणपीठ, वडेपीठ,मोदकासाठी पीठ, थालिपीठ भाजणी, डांगर,..आत्याने जो काही सपाटा सुरू केला..आम्ही सगळी चकीत झालो. आत्या आता स्वतःसाठी जगत होती, स्वत:ची तिने दडवून ठेवलेली इच्छा पुरी करत होती. आत्याने कात टाकली होती जणू? तिची शुगरही नियंत्रणात राहू लागली होती. माणसाचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहू लागलं की शारिरीक व्याधीही कमी होऊ लागतात म्हणतात, मला पटत होतं ते आत्यातला, जीजीतला बदल पाहून.
आमच्याकडच्या महिला कर्मचाऱ्यांची आम्ही पोस्टात बचत खाती काढली. त्या स्वत:हून ठराविक रक्कम खात्यांत नियमित जमा करू लागल्या.
जीजीच्या सांगण्यानुसार मी प्रत्येकीच्या नावाने पोस्टात आवर्त ठेवी काढल्या. त्यात ठराविक रक्कम टाकू लागले. अशाप्रकारे त्यांच्या वर्तमानासोबत आम्ही त्यांच्या भविष्याचाही विचार करत होतो. त्यांना खऱ्या अर्थाने स्वयंसिद्धा बनवत होतो.
आमचं घर आता पुऱ्या कॉलनीत ओळखलं जाऊ लागलं. बाजुच्यांचा ब्लॉक विक्रीला काढला. तोही आम्ही घेतला. वाढता पसारा पाहून हेही नोकरीस राजिनामा देऊन आमच्या उद्योगात सहभागी झाले.
उद्योगास पाच वर्ष झाली तसं आम्ही कामावर येणाऱ्या महिलांसाठी, आमच्या ग्राहक महिलांसाठी एक छोटंसं गेटटुगेदर ठेवलं. तात्या व आईलाही हे लेकीचं यश बघायला घेऊन आले. कामावरच्या महिलांनी मी, जीजी व आत्या आम्हा तिघींचं कौतुक करणारी भाषणं केली. या सोहळ्याला प्रसन्नालाही बोलावलं होतं. तो तिलोत्तमासह आला होता.
आपली परावलंबी सासू अशी स्वयंसिद्धा होऊ शकते असं तिलोत्तमाला अजिबात वाटलं नव्हतं. इंग्लिश न बोलता येणारी माझी आत्या तिच्या सचोटीच्या व्यापाराने उतरत्या वयातही स्वयंसिद्धा बनली होती. अवनीलाही आमचं हे यश पाहून धक्काच बसला कारण तिनेही जीजीला द्यावंघ्यावं लागेल म्हणून अगदीच न च्या बरोबर संबंध ठेवले होते घराशी.
मी मात्र खुश होते. माझ्या गोकुळात, माझी नणंद येतजात होती, सासू, निराधार आत्या स्वकमाई करत होत्या, नवराही कुणाचं मिंध होण्यापरीस आमच्या उद्योगाला हातभार लावत होता नं माझे लवकुश आज्यांच्या सहवासात मोठे होत होते.
(क्रमश:)
काही माणसांचा स्वभाव बदलत नाही. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडंच..तशीच राहिल का अवनी का बदलेल तीही! प्रद्युम्न ठमावर आधीसारखीच माया करेल ना की आणखी काही..पाहू पुढच्या भागात.
=================
मागील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-13/
पुढील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-15/
=========================
नमस्कार वाचकहो,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.