Skip to content Skip to sidebar Skip to footer

वैजयंती (भाग तेरावा)

©® गीता गरुड.

सुट्टीत मी व आत्या मुलांना घेऊन अलिबागला गेलो. तात्यांची तब्येत बिघडली होती.  ताठ कण्याचे तात्या यावेळी मला वाकलेले दिसले नि काळजात कळ गेली. ‘आई गं,का असं?’,मी विचारता आई म्हणाली,” काकाची नि तुझ्या तात्यांची काहीतरी बाचाबाची झाली. काकाने मनाला लावून घेतलन कायतरी नि आता  वेगळं राहू लागलाय.”

मला आता अलिबागेस पुर्वीसारखं रहावं वाटत नव्हतं. माझ्या हसत्या खेळत्या माहेराची पार रया गेली होती.

आम्ही असतानाच दिगू आला. दिगू बीई झाला..पेढे घेऊन आला होता. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जायची तयारी सुरु केली होती.

————————————————— 

दिगू त्यादिवशी मागच्या खोलीत गेला. काकू भाकऱ्या थापत होती. काका बाजुलाच बसलेला. दिगू काकाच्या मांडीला मांडी लावून बसला.

काकूने दिगूलाही ताट वाढलं. भाकरी ,कुळथाचं पिठलं नि ताक. दिगू भरपेट जेवला. काकूला म्हणाला,येऊन चार दिवस झाले पण तुझ्या हातचं पिठलं खाल्लं नाही तर चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. बाहेर पिठल्याचा सुवास सुटताच..पोटात भुकेचा डोंब उसळला..लाळेची कारंजी बरसू लागली..तेव्हा म्हंटलं..काकूने हाकललं तरी चालेल पण तिच्या हातचं पिठलं ओरपायचंच.

काकूने आपले भरलेले डोळे पदराने टिपले नं अजून दोन चमचे पिठलं दिगूच्या ताटात वाढलं.

दिगूने काकाची समजूत काढली..तात्यांचं वय झालंय, काका. बोलले असतील कमीजास्त. तुझ्या जीवावर तात्या व आईस सोडून मी निर्धास्तपणे बाहेरगावी रहातोय. काही चुकत असेल तर मला हक्काने सांग पण अशी एकाच घरात वेगळी चूल मांडू नका असं कळकळीने सांगितलं.

दिगूच्या बोलण्याचा असर झाला. एवढा दुरुन पुतण्या आला पण आपण त्याला भेटू शकत नाही हे कुठेतरी काकाला खात होतं. काका स्वत:हून तात्यांच्या खोलीत गेला. तात्यांनी त्याला मिठीत घेतलं. माझं माहेर पुन्हा फुलारत होतं. माझ्या डोळ्यात आनंदाश्रु आले.

थंडीचे दिवस होते. काका म्हणाला,” संध्याकाळी शेतात जाऊ. पोपटीचा बेत करतो तुमच्यासाठी खास.”

आम्ही सगळी अगदी तात्या नि आईसुद्धा तिथे पोहोचलो. काकाने आम्हाला बसण्यासाठी झाडून जागा झळझळीत करून ठेवली होती.

काकूने मडकं, शेंगा आणि भांबुर्डीचा पाला स्वच्छ धुवून घेतला. मडक्याच्या तळाशी भांबुर्डीच्या पाल्याचा थर व्यवस्थित पसरला. त्यावर अर्ध्या शेंगा, थोडं चिकन, अर्धा डझन अंडी, अर्धे कांदे-बटाटे आणि वांगी ठेवली. नंतर थोडासा ओवा व मीठ वरती शिंपडलं. . पुन्हा भांबुर्डीचा पाला व उरलेल्या जिन्नसाचा असाच एक थर लावला. काका अगदी निगुतीने सगळं करत होता. मला लहानपणची आठवण आली. तेंव्हाही मी वाकून वाकून काका काय करतोय ते पहात असायचे.

काकाने मडक्याचं तोंड पाल्यानं सीलबंद केलं.तोवर प्रसन्नाने जवळच वीतभर खोल खड्डा खणला. त्यात थोडा सुकलेला पाला टाकला त्यावर मडकं उलटं ठेवलं. मडक्याभोवती सुकी लाकडं,  शेणाच्या गोवऱ्या व्यवस्थित लावून पेटवून दिलं. पोपटी होईस्तोवर आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तात्या नं काका अगदी मस्त बोलत होते. प्रसन्नाने विचारलं तात्यांना,”काकाशी बोलत नव्हता नं!”

यावर तात्या म्हणाले,”कुणीतरी काडी लावून दिली होती भावाभावांमधे. बरं झालं तू आलास नं आग विझवलीस.” काकाने तात्या व प्रसन्नाचा हात हातात धरला. तिघेही मग त्या पेटत्या ज्वालांकडे बघत बसले.

खूप दिवसांनी मी ही पोपटीची मेजवानी खाल्ली. हे आम्हाला न्यायला आल्यामुळे जावयाचाही स्पेशल पाहुणचार झाला. निघताना काकूने मला एका पिशवीत सोडे, सुके भोंबील बांधून दिले. म्हणाली,”जावयबापूंना आवडतात नं. करून घाल. हल्ली रोड दिसताहेत. प्रकुतीकडे लक्ष दे त्यांच्या.”

मी म्हंटलं,”तुम्ही दोघी पुन्हा कट्टी नै नं घेणार !’ यावर आईला बिलगत ती म्हणाली,”तुझी आई म्हणजे माझी थोरली बहीण गं. या तुझ्या काकामुळे अंतर पडलेलं आमच्यात पण घास गोड लागत नव्हता दोघींनाही.” माहेरच्यांचा निरोप घेऊन मी  पुनश्च कर्मभूमीकडे निघाले.

दिगंबर (दिगू) पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. त्याला स्कॉलरशीपदेखील मिळाली. त्याच्याच क्लासमधल्या लिंडाशी त्याचं सूत जुळलं. 

लिंडाची आई अमेरिकन तर वडील भारतीय वंशाचे होते. त्यांचं भारतात जवळचं असं कुणी उरलं नव्हतं. सगळे नातेवाईक जगभर विखुरले होते. लिंडाचे वडील जोसेफ फर्नांडिस हे तिथल्या ख्यातनाम उद्योगपतींमधील एक होते.

जोसेफ फर्नांडिस यांचा स्वभाव अतिशय विनम्र होता. त्यांनी लिंडावर भारतीय संस्कार केले होते. डस्टी स्कीनच्या आमच्या दिगूकडे ती निळ्या डोळ्यांची,सोनेरी केसांची गुलाबी बाहुली आकर्षिली गेली. अनेक विषयांवर ती त्याच्याशी चर्चा करे. सुरुवातीच्या काळात दिगूला प्रचंड मानसिक भिती होती जी लिंडाने समजून घेतली. तिने त्याला बोलतं केलं. लिंडा उत्सुकतेपोटी मराठी शिकत होती,ज्याचा ही दोघं एकत्र यायला खूप फायदा झाला.

लिंडा वीकएंडला त्याला घरी बोलवू लागली. लिंडाच्या मम्मीने नुकताच डिव्होर्स घेतला होता. ती तिच्या ब्रिटनमधील फ्रेंडकडे गेली होती. त्याच्याशी लग्न करणार होती.

लिंडा फार अपसेट असायची. दिगू तिच्याशी हलक्याफुलक्या गप्पा मारायचा. दिगूचा इनोसन्स तिला खूप आवडायचा. लिंडा दिगूला घरी बोलवू लागली.

दिगू यायचा असला की लिंडा इंडियन रेसिपीज आवर्जुन बनवायची. पोर्चमधे कॉफी व लंचसोबत लिंडा,दिगू व तिच्या वडिलांच्या गप्पा छान रंगायच्या.

जोसेफ अंकलने लिंडाच्या मनातलं दिगूविषयीचं प्रेम ओळखलं. खरं तर त्यांनी त्यांचा बिझनेस फ्रेंड विल्यम डिसोजाचा मुलगा ऑगस्टीनसोबत लिंडाचं लग्न करायचं ठरवलं होतं. ऑगस्टीनलाही लिंडा खूप आवडली होती. पुर्वी त्याच्यासोबत पार्टीजना जाणारी लिंडा, त्याच्या अय्याशीपणामुळे आता त्याला टाळू लागली होती.

ऑगस्टीन एकदा खूप ड्रींक घेऊन मि.जोसेफच्या घराजवळ गेला. त्याचे गुलाबी गाल अधिकच लाल झाले होते.  गेटवरुन त्याने ओरडायला सुरुवात केली. वाचमनला त्याला हटवतादेखील येईना. लिंडा व दिगू तिच्या लायब्ररीत पुढील प्रोजेक्टबद्दल डिसकस करत होते. बाहेरचा आवाज ऐकून तेही गेटजवळ आले. मि.जोसेफ त्याला सांगत होते,”My boy you are overdrunk. You come tomorrow. “

पण ऑगस्टीन कोणाचंच ऐकत नव्हता. त्याने लिंडाला पहाताच अतिशय अर्वाच्य शिव्या द्यायला सुरुवात केली. दिगूला भयंकर संताप आला. तो ऑगस्टीनला मारायला धावला पण सिक्युरिटीने त्याला अडवले. मि.जोसेफनी पोलिसांना फोन लावला. पोलिस दोनेक मिनटांत येऊन त्याला घेऊन गेली. झाल्याप्रकाराने लिंडा व्यथित झाली. जोसेफनी ऑगस्टीनच्या वडिलांना घडला प्रकार सांगितला. ते म्हणाले,”तू केलंस ते बरं केलंस. लिंडाच्या पात्रतेचा नाही तो.”

जोसेफने लिंडा व दिगूला त्वरीत लग्न करण्याचा सल्ला दिला. दिगू, मि.जोसेफच्या सांगण्याप्रमाणे वागत होता. लिंडा व दिगंबरचं लग्न झालं. दिगंबरने याबाबत सविस्तर पत्र घरी पाठवलं पण तात्यांना दिगूने असं परदेशातल्या मुलीशी लग्न करणं रुचलं नाही.

शेवटी दिगू एक महिन्याची सुट्टी घेऊन लिंडा व मि.जोसेफसोबत भारतात आला. तात्यांचं मन मि.जोसेफनी वळवलं. लिंडाने तर आई आई अशी लाडीक हाक मारत आमच्या आईला आपलसं केलं. मीही सुट्टीला मुलांना घेऊन माहेरी गेले होते. लिंडा,मी,लवकुश,चिंगी सगळे समुद्रकिनाऱ्यावर जायचो.

लिंडा मुलांत अगदी लहान मुल व्हायची. वाऱ्यासोबत धावायची.

तिचे कुरळे केस वाऱ्यासोबत डुलायचे. तिचा फिटनेस थक्क करणारा .. रोज पहाटे उठून सुर्यनमस्कार घालण्याचा तिचा शिरस्ता..सगळ्यांशी आदरपुर्वक बोलण्याची तिची रीत..बरंच काही शिकण्यासारखं होतं लिंडाकडून.

कोण कुठची पोरगी, भाषा भिन्न, पेहराव भिन्न पण तरीही घरातल्या प्रत्येकाला जीव लावत होती.

 जाताना आय विल मिस यू अ लॉट म्हणत प्रत्येकाला अलिंगन देत होती.

इकडे आत्याच्या प्रसन्नाला अकाऊंटंटची नोकरी मिळाली. वसईला त्याचं ऑफिस होतं. रहायला जागाही मिळाली तसा आत्याला घेऊन जातो म्हणाला. अधनंमधनं प्रसन्नासोबत लवकुशला बघायला येत जाईन असं म्हणत आत्याने माझी समजूत घातली.

आत्या जायला निघाली तसं यांनी तिला आत बोलावून घेतलं व तिच्याकडून घेतलेल्या पैशांचा चेक तिला देऊ केला.

आत्या आता रागावतेय की काय मला कळेना पण आत्या यांच्या खांद्याला हात लावत म्हणाली,”जावईबापू,तुम्ही माझ्या भविष्याच्या सोयीसाठीच माझ्याकडून पैसे घेऊन ते गुंतवत असणार हे आधीच ठाऊक होतं मला पण सध्या तरी हे तुमच्याजवळच राहुदेत. पुढेमागे गरज लागली तर तुम्ही अहातच.”

आत्या व प्रसन्नाला निरोप द्यायला आम्ही स्टेशनवर गेलो होतो. आता घरात आम्ही चौघजणंच.  आत्याच्या जीवावर मुलांना टाकून इतकी वर्ष नोकरी केली.. आता ते शक्य नव्हतं. बरं मुलांना पाळणाघरात ठेवण्याएवढा भरभक्कम पगारही नोकरीतून मिळत नव्हता. शेवटी नोकरी सोडली नि घरी बसले. सकाळी कामात वेळ जाई पण दुपार अंगावर येई.

वेंगुर्ल्यावरनं फोन यायचे. कधी फोनवर आपली व्यथा न मांडणारी जीजी आजकाल अस्वस्थ वाटायची, कारण होतं दादांच आजारपण.

डॉक्टरी उपचार घेऊनही त्यांची तब्येत  बिघडतच चालली होती. जीजी चोवीस तास त्यांची सेवा करत राही. 

 मुलांच्या शाळेमुळे आम्हाला वेंगुर्ल्यास जाणं शक्य नव्हतं. इकडे घेऊन यायचा पर्याय होता पण दादा नाही म्हणाले,”माझं काय व्हायचंय ते इथे माझ्या घरात होऊ दे,”असा आग्रह धरला.

घरात विलक्षण तणाव होता. दादा,जीजींनी कधीच आपली जबाबदारी आमच्यावर लादली नव्हती. मला तर मुलीसारखंच वागवलं होतं पण त्यांना जेंव्हा आमची गरज होती,तेंव्हा आम्ही जाऊ शकत नव्हतो.

शेवटी रेशमला विचारलं. ती म्हणाली,”आठदहा दिवस मुलांना मी सांभाळते. तुम्ही दोघं जाऊन या.” रेशमआत्याकडे रहायला मिळणार म्हणून लवकुश खूप खूष झाले. रेशमलाही यायचं होतं आमच्यासोबत पण तिने मुलांसाठी स्वतःला रोखलं.

जनशताब्दीने निघालो. पावसाळ्याचे दिवस होते..खिडकीतून हिरवा निसर्ग दिसत होता. हिरवाईने नटलेले डोंगर,त्यांतून कोसळणारे चंदेरी धबधबे..हिरवीगार कुरणं,बाळसं घेत असलेला,वाऱ्यावर डोलणारा पोपटी तरवा..नेहमी हे सारं स्रुष्टीसौंदर्य पहाण्यास आतुर असलेली मी..यावेळी मात्र निसर्ग मला खुणावत नव्हता..माझ्या नजरेसमोर येत होता दादांचा चेहरा..पंधरा दिवस वेंगुर्ला व पंधरा दिवस अलिबाग असं आमचं गणित दरवर्षीच्या सुट्टीतलं  ठरलेलं.

दादा मुलं काय मागतील ते आणून देत.  त्यांच्या बाळबोध प्रश्नांची सोप्प्या भाषेत उत्तरं देत. निघताना मला,मुलांना मारू नकोस हा सांगत..हे सारं आठवत होतं नि डोळे भरून येत होते.

आम्ही स्टेशनवर उतरलो. वाडीतल्या रिक्षावाल्याने न बोलताच आमचं सामान रिक्षात न्हेऊन ठेवलं. मधल्या वाटेत यांचं नि रिक्षावाल्या बाळूचं बोलणं चाललेलं..दादांचं आजारपण पुऱ्या गावाला अस्वस्थ करत होतं.

आम्ही घरी पोहोचलो. आतल्या होवरीत दादांचा क्रुश देह निजला होता. फक्त हाडं राहिली होती. डोळे उघडे,छताकडे नजर.

जीजीने आम्ही आलोय म्हणून त्यांना सांगितलं पण माणसं ओळखण्याच्या पलिकडे गेलेले ते तरी यांचा आवाज ऐकून डोळ्यांच्या बाहुल्या थोड्या हलल्या.

जीजीने पेज आणून दिली ती यांनी चमच्याने भरवली. अर्धी तोंडात..बरीचशी बाहेर ओघळायची. एकदाच तोल जाऊन पडले नि त्यात हे असं झालं. डॉक्टर म्हणाले,”आहेत तेवढे दिवस सेवा करायची बास.”

मी घरातलं सगळं माझ्या हातीत घेतलं. जोडीला इंदुमावशी नि किश्या होतेच.

 जीजीचं सगळं लक्ष दादांवर एकवटलं होतं. पाणीसुद्धा प्यायच्या आधी पहिलं दादांना पाजायची मगच आपण प्यायची. त्यांची अंथरुणं,पांघरुणसुद्धा स्वतः धुवायची.

एकटीच त्यांच्यासोबत बोलत बसायची. त्यांना कळत होतं का कुणास ठाऊक. आम्हाला आता जीजीचीच जास्त काळजी वाटत होती.

पंधरा दिवस झाले तरी परिस्थिती जै च्या थै. यांना सुट्टी वाढवता येणार नव्हती.

मला मुलांची ओढ लागली होती. कुश माझी आठवण काढून जेवीनासा झाला होता. रेशम सगळा व्रुत्तांत फोनवर देत होती.

नणंद असणं म्हणजे भाग्यच जे मी अनुभवत होते. तिच्या जीवावर मुलांना सोडून आले होते.

 यांनी अनंतभाऊजींना फोन करुन इथे यावयास सांगितलं. ते बघतो म्हणाले. म्हंटलं,बरं झालं..भाऊजी काहीतरी व्यवस्था करुन येतीलच.

आम्ही यायच्या तयारीला लागलो. एकीकडे जीजीला या अवस्थेत सोडून जायचं दु:ख तर दुसरीकडे मुलांना भेटण्याची आस..

रात्री अनंतभाऊजींचा फोन आला,”अवनी ऐकत नाहीए. ती म्हणते..तू जा हवं तर..मी आईकडे राहीन तू येईस्तोवर असं म्हणतेय. मी तिला तिच्या माहेरी सोडून उद्या दुपारपर्यंत येतो.”

अडीअडचणीलातरी अवनीने आमची साथ द्यायला हवी होती. कबुल माहेरी मुळं घट्ट रोवलेली असतात..सासरीही जीव लागतोच की बाईचा, तरी  इंदुमावशी म्हणाली,मी नि  किशा आहोत ना, नका काळजी करु.

  दादांना नमस्कार करुन काळजावर दगड ठेवून आम्ही निघालो. नेहमी निघताना सतरा सूचना करणारे दादा मृत्यूशय्येवर होते तरी जीजीच्या डोळ्यातून टिपूस नव्हता. आम्हालाच धीर देत होती…”जीजी येतो थोड्या दिवसांत” हे म्हणाले.

“अरे,मरण कोणाला चुकलय,अशोका. माझ्या हातून यांचं सारं काही होऊ देत हीच इच्छा.” जीजी यांची समजूत घालत होती.  किती साधंसोपं असावं माणसाने! जीजी अशीच..साधी सोपी..बिनामुखवट्याची.

आम्ही दादांच्या पावलांना स्पर्श केला. जड अंतःकरणाने जीजीस निरोप दिला नि एसटीच्या थांब्याजवळ आलो.

(क्रमश:)

——————————————————————-

रेशमच्या जीवावर मुलांना ठेवून वैजयंती अशोकसोबत वेंगुर्ल्यास गेली खरी पण तिथे तरी किती दिवस थांबणार..दादांच्या बरं होण्याची डॉक्टर खात्री देत नव्हते. दीर्घकाळचं दुखणं नि जीजीचे हाल सगळं गणितच बिघडलं होतं. वाचताय ना..वाचत रहा..भेटू पुढच्या भागात.

====================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-12/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-14/

=========================

नमस्कार वाचकहो,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: