Skip to content Skip to sidebar Skip to footer

वैजयंती (भाग बारावा)

©® गीता गरुड.

प्रसन्ना यंदा बारावीत. यांनी चार जणांना क्लाससंबंधी विचारलं. ब्रीजजवळच्या रेगेसरांचा क्लास छान आहे असं  कळताच यांनी प्रसन्नाचं नाव तिथे नोंदवलं. एकदोन महिने ठीक गेले.

हल्ली प्रसन्नाच्या वागण्याबोलण्यात फरक पडला होता. प्रसन्ना गप्पगप्प असायचा. कोणाशी बोलायचा नाही. मी बरेचदा विचारून पाहिलं, प्रसन्ना काही दुखतय का रे. पूर्वीसारखा बोलत नाहीस, मजामस्ती करत नाहीस.. थोडंसं हसायचा पण उत्तर द्यायचा नाही. आत्यानेही विचारून बघितलं पण तिला तर त्याने जवळजवळ उडवूनच लावलं. पहिल्यासारखे मार्क्सही सांगत नव्हता.

——————————————————-

माझ्या सांगण्यावरुन हे एकदा प्रसन्नाच्या क्लासमध्ये गेले. तिथे रेगे सरांकडून कळलं की प्रसन्ना आठदहा दिवस क्लासला आलाच नाही. इतकंच नाही तर क्लासमध्ये होणाऱ्या periodical tests ना ही तो बसला नाही.

हे त्या क्लासच्या रेगे सरांवर उखडले,”आमचा मुलगा,तुमच्या क्लासला इतके दिवस अनुपस्थितीत राहतो तर एक फोन करून ते कळवण्याची तुमची जबाबदारी नाही का?”

सर म्हणाले,,”अहो,त्याने अगदी कळकळीने त्याची आई आजारी असल्याकारणाने तो क्लासला येत नाही असं सांगितलं, वर असंही म्हणाला की त्याचे वडील बाहेरगावी असतात म्हणून त्याच्या आईकडे लक्ष देणं त्याला भाग आहे.”

यांनी ही गोष्ट माझ्या कानावर घातली. माझं तर डोकंच उसळलं. रेशमचं निस्तरतोय तोवर हे याचं. काय करावं कळत नव्हतं. आत्याने विचारलंसुद्धा,”वैजू, डोकं दुखतंय का तुझं. दाबून देऊ का?”

मी या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवलं कारण हे तर महत्वाचं वर्ष होतं प्रसन्नासाठी.

मला ठाऊक होतं आमचा प्रसन्ना वाईट नाही पण मग..

___________

प्रसन्नाचा मित्र रत्नेश याला मी फोन लावला. प्रसन्ना आत झोपला होता. मी रत्नेशला घरी बोलावलं.

रत्नेश आला

प्रसन्ना आमचा बारीक अंगकाठीचा तर रत्नेश थोडा स्थूल. रत्नेशला बरी दाढीमिशी आलेली. 

“रत्नेश, प्रसन्ना हल्ली क्लासला जात नाही? कुठे जातो ते नक्की सांग.”

“ते ताई..” रत्नेश बोलायचा थांबला.

“रत्नेश, तू प्रसन्नाचा जिवलग मित्र ना,मग आपला मित्र चुकीच्या वाटेने जात असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करावं किंवा त्यासंबंधी त्याच्या पालकांनाना कळवावं असं नाही का वाटत तुला?” मी अगदी पोटतिडकीने बोलत होते.

“ताई कसं सांगू तुला प्रसन्ना हल्ली माझ्याशी बोलत नाही.” रत्नेश म्हणाला.

“का?” मी विचारलं.

“तो नं राजस आणि देवेनच्या ग्रुपमध्ये गेला आहे. ती दोघंही मोठ्या श्रीमंत लोकांची मुलं आहेत. राजस, देवेन जसं सांगतील तसं हा वागतो. ते याला क्लास बंक करुन सिनेमाला घेऊन जातात. बरेचदा हॉटेलात न्हेऊन खाऊपिऊ घालतात. ती मुलं अपुरे कपडे घालणाऱ्या मॉडेल्सची मॅगझिन्स बघत बसतात आणि यालाही बघायला लावतात.”

कालच एकाला प्रसन्ना सांगत होता,”मला हे खोटं बोलणं,दांडी मारणं पहिलं भारी वाटलं पण मी या दलदलीत आतआत रुतत चाललोय. मला यातून बाहेर पडायचंय पण ती लोकं सहजासहजी मला सोडणार नाहीत.”

इतक्यात प्रसन्ना उठून आलेला. दारात उभं राहून आमचं बोलणं ऐकत होता. तो ओक्साबोक्सी रडू लागला.,”ताई,मला माफ कर. सगळीजणं आपल्या वडिलांविषयी सांगत असतात म्हणून मीही माझे वडील बाहेरगावी असतात असं बोललो सरांना. 

वडील नसलेल्या मुलांकडे सगळी करुणेने बघतात. मला नाही आवडत ते. मला नको कुणाची सहानुभूती. त्या राजस, देवेनच्या नादी लागलो..त्यांची मर्जी राखण्यासठी आई आजारी असल्याचं खोटं कारण सांगून क्लास बुडवले.

पहीलेपहीले त्यांनी मला सिनेमाचं,हॉटेलिंगचं आमिष दाखविलं,पण आत्ता नको त्या क्लिप्स देतात आणि पूर्ण बघायला सांगतात,त्या चित्रांबद्दल प्रश्न विचारतात. नकार दिल्यास सिगारेटचे चटकेही देतात.त्याने हात दाखवला माझ्या छातीत धस्स झालं.

मी म्हटलं,”ते दोघेही आत्ता तुला कोणताही त्रास देणार नाहीत. लवकुश इतकाच तू जवळचा आहेस मला आणि हे सारं एकट्याने सहन केलंस? अरे प्रसन्ना,हे वयच निसरडं असतं. भलेभले वाट चुकतात. चकवा लागतो त्यांना.

तू काही काळजी करू नकोस. मी ह्यांना सांगते त्या मुलांना समज द्यायला. तू मात्र क्लासच्या सरांची माफी मागायची. ” मी प्रसन्नाचे डोळे पुसले.

आत्या लवकुशला अंगणवाडीतून घेऊन आली. ती हे सगळं ऐकत होती. तिच्या आकलनशक्तीच्या पल्याडचं होतं हे सगळं.

प्रसन्नाने रत्नेशची माफी मागितली. दोघे मित्र पुन्हा जवळ आले. रत्नेशने घरी येऊन प्रसन्नाला शिकवायचं कबूल केलं. मीही प्रसन्नाच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ लागले.

प्रसन्ना आधीसारखा सांगितलेलं ऐकत नाही म्हंटल्यावर, ती मुलं त्याला दम देऊ लागली.  एकदा लायब्ररीच्या बाजूच्या जिन्यात त्यांनी प्रसन्नाला घेरलं. त्याला एक मासिक देऊन त्यातल्या एका चित्रातील मॉडेलच्या अनाव्रुत्त अवयवांवर बोट ठेव व त्यांना स्पर्श करताच तुला काय नि कसं कसं वाटतय ते सांग, म्हणू लागली.

ती पोरं विनवण्या करूनही ऐकेनात तसा प्रसन्ना रडवेला झाला.  रत्नेश पुस्तक बदलत होता. एकाने रत्नेशला प्रसन्नाला त्यांनी  पकडलय सांगताच तो प्रसन्नाच्या मदतीसाठी धावला.

सौम्य शब्दांत रत्नेशने “प्रसन्नाला सोडा”म्हणून सांगितलं पण त्या धनदांडग्यांनी रत्नेशला तिथून कलटी मारायला सांगितली पण रत्नेश घाबरला नाही. त्याने त्या देवेनच्या मानेवर  आपला खांदा ठेवून त्याला वाकायला भाग पाडलं. रत्नेश सशक्त असल्याने देवेनला स्वत:ची सुटका करून घेता येईना.

आवाज ऐकून शिपाई तिथे गेले. रत्नेशने त्यांना राजस, देवेन करत असलेल्या bulling, ragging बद्दल सांगितलं. शिपायाने राजस,देवेन दोघांनाही सर्व मुलांसमोर दंडुक्याचा चांगलाच प्रसाद दिला. त्यांच्या इतर मित्रांनाही व्यवस्थित समज दिली. प्रसन्नाची माफी मागायला लावली.

त्या प्रसंगानंतर मात्र प्रसन्नाने मागे वळून बघितले नाही की जीजीने कधी त्यासंबंधी त्यास जाब विचारला नाही. प्रसन्नाची गाडी रुळावर आली होती. प्रसन्ना बारावी चांगल्या गुणांनी पास झाला. पुढेही त्याने शेवटच्या वर्षापर्यंत प्रगतीचा आलेख कायम ठेवला.

——-–—————————-–-–————-

वर्षामागून वर्ष जात होती. लवकुश आता तिसऱ्या इयत्तेत शिकत होते.  रेशम व प्रद्युम्नचा संसार छान चालला होता. जवळच घरं असल्याने आमचा एकमेकांकडे राबता असायचा.

रेशम त्यादिवशी घरी आली ती जरा घाबरलेलीच. मी तिला लिंबूसरबत दिलं. लिंबांचा रस साखरेच्या पाकात घालून फ्रीजमधे ठेवल्याने कोण आलं की लिंबांची शोधाशोध वाचते. तिने एकदोनघोटात सरबत संपवलं. कपाळावरचा घाम पुसला.

मी विचारलं,” रेशम काही अडचण आहे का? अशी का दिसतैस भेदरल्यासारखी?”

थोडा पॉज घेऊन रेशम बोलू लागली..”वहिनी,सगळी प्रिकॉशन्स घेऊनही प्रेग्नंट राहिले. वहिनी,खरं सांगते तुला,मला हे बाळ नकोय. हे बाळ मी जन्माला घालणं म्हणजे माझ्या मयुरीवर अन्याय होईल.”

आत्या आमचं बोलणं ऐकत होतीच..ती बोलू लागली,”काही अन्यायबिन्याय होत नाहीए. ठमा आता मोठी झालीए. तुम्ही दोघं आयुष्यभर पुरणार अहात का तिला! तुमच्यानंतर एखादं सख्खं भावंड असलं तर किती आधार मिळेल तिला.”

“आत्या,सख्खं आणि कशाला पाहिजेल! लवकुश दोघं भाऊ आहेत ना तिचे.” रेशमने तिची बाजू मांडली.

मी म्हणाले,”ते तर आहेतच गं पण तिच्या पाठीवर येऊदेत एखादं. तिलाही मिळूदे थोडा अधिकार गाजवायला,ताईगिरी करायला..आणि तू असं दुसरं बाळ नाकारणं हा प्रद्युम्नवर अन्याय होईल..याचा विचार केलास का?”

“खरंय गं वहिनी तुझं पण माझ्या मयुरीचं काय?”

“तू आता हा किंतू मनातला काढून टाक. उलट छोटं भावंड आल्याने मयुरी खूश होईल बघच तू. ” आत्या म्हणाली.

थोडंसं का होईना रेशमला आमचं म्हणणं पटलं व ती जायला निघाली पण आत्याने तिला थांबवून घेतलं. म्हणाली,”एवढी गोड बातमी दिलीएस आज तू आम्हाला. आज माझ्याकडून तुला ट्रीट. तुझ्या आवडीचे रसघावणे करते. जावईबापूंनाही बोलवून घे इथेच जेवायला.”

आत्याने लुसलुशीत घावणे केले. नारळाचं दूध,गुळ,वेलची घालून नारळाचा रस तयार केला. सगळीजणं एकत्र जेवलो. निमाताई व भाऊजींनाही आग्रहाने बोलवून घेतलं होतं.

निघताना प्रद्युम्न आत्याला हळूच थँक्यू म्हणाला तशी आत्या खुदकन हसली व ‘गुण्यागोविंदाने रहा बाळांनो’ म्हणाली.

————————————————————-

रेशमचं हे दुसरं बाळंतपण..निमाताई म्हणाली मी रेशमचे सारे डोहाळे पुरवणार. आणि बोलल्याप्रमाणे ती करतही होती. रेशमचे डोहाळे तसे कडकच..पोटात पाणी टिकत नसे पण निमाताई वरणभात, मेतकूट,लिंबाचं लोणचं, चिंचेचं सार असं चवीचं करुन तिला खाऊ घाले. मयुरीचा अभ्यास,तिचं खाणंपिणं बघे.

पहिल्यावेळी रेशमचं ओटी भरणं केलं नव्हतं पण यावेळी मात्र निमाताईने रेशमसाठी मोरपंखी पैठणी आणली होती. करंज्या,लाडू,चकल्या घरी केल्या होत्या. विविधरंगी मिठाया आणल्या होत्या.

यांनी व प्रद्युम्नने मिळून फुलांची सजावट केली होती. रेशमला चंद्रकोरीवर,झोपाळ्यावर बसवून फोटो काढले. मयुरी कल्पनासाडी घालून मुरडत होती.

रेशम जणू गुणगुणत होती..

ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा

ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा

आठव्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रेशमला त्रास होऊ लागला. गर्भपिशवीतलं पाणी आटल्यामुळे सिझेरियन करावं लागलं. अपुऱ्या दिवसांचं बाळ काचेच्या पेटीत ठेवलं होतं.

काही दिवसांत ते सुधारलं मग  डॉक्टरांनी त्याला आईच्या हवाली केलं. मयुरीच्या पाठीवर भाऊ आला.  सगळ्यांना आनंद झाला.

प्रद्युम्नने बाळाचा बारसाही थाटात केला.

निमाताईने बाळाला पाळण्यात ठेवलं. बाळाच्या कानात कुर्र केलं नि वेद नाव  ठेवलं.

बायांनी पाळणागीतं गायला सुरुवात केली..

हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा

पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

सजली गं मऊमऊ मखमालीची शय्या

निजली गं बाळाची गोरीगोरी काया

बाळारुपडे देवाचे भुलविते लोचना

हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा

पेढे करण्यासाठी आमच्या दुधवाल्या भोईरमामांना बोलावलं होतं. तेही हौसेने दूध, मोठाली कढई वगैरे घेऊन आले होते.

भोईरमामा,भल्या मोठ्या कढईत दूध आटवत होते. खवा होत आला तसं त्यात साखर,वेलचीपूड घालून हटवून घेतलं व दोन माणसं पेढे करायला बसली.

दोन बाया दुसऱ्या चुलीवर मोठाली कढई ठेवून त्यात डाळ्या,शेंगादाणे,खोबऱ्याचे तुकडे हे क्रमाने तळून घेऊन   तळलेल्या पोह्यांवर टाकत होत्या. तेलात लसूण, मिरचीपूड,धणेजीरेपूडची फोडणी देऊन ती फोडणी पोह्यांवर पसरून साखरमीठ घालून चिवडा वरखाली करुन ठेवला होता.

एका टोपात दूध उकळत ठेवलं होतं. मसालादूध करण्यासाठी प्रसन्ना सुकामेवा कुटत बसला होता.

आल्यागेल्या पाहुण्यांना पेढेचिवड्याच्या प्लेटी नि मसालादुधाचे ग्लास दिले जात होते.

बाळराजाला मरून रंगाचा बाबासुट घातला होता नि पिवळा  फेटा घातला होता. निमाताईने बाळासाठी सोन्याचा गोफ केला होता. मी पायातले पंचधातुचे वाळे व हातातल्या चांदीच्या वाक्या केल्या होत्या. हे सारं बाळाला परिधान केलं होतं.

पावडर लावून त्याच्या डोळ्यांत काजळ रेखाटलं होतं. डाव्या,उजव्या गालावर,कपाळावर काजळाची तीठ लावल्याने वेद फार गोड दिसत होता. हळूच इवलीशी जीभ बाहेर काढायचा, इवल्याइवल्या डोळ्यांनी आजुबाजूला पहायचा, मुठी चोखायचा.

———————————————————-

अनंतभाऊजी व अवनीही बारशाला येऊन गेले. अनंतभाऊजींनी पुण्यात ब्लॉक घेतल्याचं कळलं. वास्तुशांतीही केली. अवनीच्या माहेरच्यांना आमंत्रण होतं,सगळी पलटण गेलेली पण आम्हाला बोलावलं नाही.

आमचं जाऊदेत, दादाजीजींनाही बोलावलं नाही. मधे तिचं मिसक्यारेज झालं म्हणे. बातम्या लांबच्या नातेवाईकांकडून कळत होत्या पण आम्हाला सांगावसं वाटत नव्हतं त्यांना.

पैसे दिले नाही त्याची अढी भाऊजींनी कायमची मनात ठेवलेली आणि अवनी भावाभावांतली,वडीलमुलातली दरी वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण भाऊजींना कळू नये..आईवडिलांनी काहीच केलं नव्हतं का त्यांच्यासाठी!

भाऊजी कॉलेजात असताना  हॉस्टेलला रहात होते. हॉस्टेलचा खर्च,इंजिनिअरींगचा खर्च सगळा दादांनीच केला होता ना शिवाय हे सर्विसला लागल्यापासनं हेही त्यांना दरमहिना पॉकेटमनी देत होते..हे सारं केवळ कर्तव्य होतं का! भाऊजींनी थोडीतरी जाण ठेवायला हवी होती.

बरं सेव्हिंगच्या नावाने बोंब. किटीपार्ट्या,शॉपिंग.. यातच अवनीला रस होता आणि भाऊजी तिच्या हो ला हो करत होते.

मधे भाऊजींचा अपघात झाला. फोन येताच हे लगोलग गेले. पाय फ्रेक्चर झाला होता. डोक्याला थोडं लागलं होतं. चार दिवस हॉस्पिटलमध्ये भाऊजींसोबत थांबले. येताना हॉस्पिटलचं बीलही ह्यांनीच भरलं,तेंव्हा मात्र भाऊजींचं घर बघून आले. चांगल्या,सधन वस्तीत आहे म्हणत होते..शिवाय बिल्डींगसमोर बाग वगैरे. त्या अपघातानंतर मात्र भाऊजी अधनंमधनं यांना फोन करु लागले. 

माझी आजी म्हणायची,पाण्यात काठी मारली तरी पाणी वेगळं होत नाही. खरंच की ते.

———————————————————-

सुट्टीत मी व आत्या मुलांना घेऊन अलिबागला गेलो. तात्यांची तब्येत बिघडली होती.  ताठ कण्याचे तात्या यावेळी मला वाकलेले दिसले नि काळजात कळ गेली. ‘आई गं,का असं?’,मी विचारता आई म्हणाली,” काकाची नि तुझ्या तात्यांची काहीतरी बाचाबाची झाली. काकाने मनाला लावून घेतलन कायतरी नि आता  वेगळं राहू लागलाय.”

मला आता अलिबागेस पुर्वीसारखं रहावं वाटत नव्हतं. माझ्या हसत्या खेळत्या माहेराची पार रया गेली होती.

आम्ही असतानाच दिगू आला. दिगू बीई झाला..पेढे घेऊन आला होता. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जायची तयारी सुरु केली होती..

———————————————————-

मयुरीच्या पाठीवर भावंड आलं. भाऊजींचं घर झालं. माहेरी तात्या व काकांमधे आलेल्या दुराव्यामुळे आपल्या या माहेरवाशिणीचं मन मात्र खट्टू झालं. लेक माहेरी येते ती फक्त चांगलंचुंगलं खाण्यासाठीच नाही तर आपल्या मायेच्या माणसांशी हसण्याबोलण्यासाठी. माहेर नेहमी हसतखेळतं रहावं असंच तुम्हाआम्हा प्रत्येक माहेरवाशिणीला वाटतं, हो ना!

======================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-11/

पुढील भाग:

=========================

नमस्कार वाचकहो,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: