Skip to content Skip to sidebar Skip to footer

वैजयंती (भाग अकरावा)

©® गीता गरुड.

दिगू अभियांत्रिकीला असल्याकारणाने दोन दिवसासाठी येऊन गेला. हॉस्टेलचं कदान्न खाऊन बराच वाळला होता. त्याला म्हंटलं,”मुंबईला येतोस का?” तर नाही म्हणे आमचं कॉलेज चांगल आहे. म्हणजेच रुळला होता तो पुण्यात.

—————————————————————

यातच अजून एक बातमी समजली. अनंतभावजींचं लग्न ज्या मुलीशी ठरवलं होतं..आणि तिच्या मामाने येऊन मोडलं होतं. त्या मुलीचे,अवनी रोकडेचे वडील स्वतः अनंतभावजींना जाऊन भेटले. अवनीची आई भावाच्या बाजूने होती तर अवनीला मात्र अनंतभावजींशीच लग्न करायचं होतं.

अवनीच्या वडिलांचं  बायकोपुढे काही चालत नव्हतं. तिच्या भावाचे आर्थिक उपकार होते त्यांच्यावर पण अवनीची अवस्थाही पहावत नव्हती त्यांना म्हणूनच त्यांनी मधला मा्र्ग काढला होता. अवनीला पळवून न्या म्हणून सांगत होते. शेवटी यांच्याशी व दादांशी बोलून एक प्लान तयार केला.

रविवारी पोहे खाल्ल्यानंतर अवनीच्या बाबांच्या छातीत दुखू लागलं. अवनीच्या आईसोबत ते दवाखान्यात जायला निघाले.

अवनीच्या भावालाही सारं ठाऊक होतं. थोड्याच वेळात अनंतभावजींची मोटरसायकल मागीलदारी येऊन उभी राहिली.

अवनी नेसत्या वस्त्रानिशी मागील सीटवर जाऊन बसली. भावाने हात दाखवला व मागचं मी बघतो असं सांगितलं.

अनंतभाऊजी व अवनी परस्पर मुंबईस गेले. दादांनी त्यांचं लग्न लावून दिलं. प्रसन्नाचं कॉलेज सुरु झालं तसं त्याला मुंबईस पाठवलं. आत्या व मी माहेरवाशिणी आणिक महिनाभर अलिबागेस राहिलो.

यावेळी मुंबईस परतताना खरंच जड गेलं . मातापित्यांच्या वियोगाने तात्या फारच थकलेले वाटत होते. शिवाय लवकुशचाही त्यांना लळा लागला होता.

दिगू हॉस्टेलला,प्रसन्ना आमच्यासोबत मुंबईला त्यामुळे घरात मुलांचा आवाज कमी झाला होता. यावेळी दारातला अनंताही  मला वाळलेला वाटला. कदाचित तोही आजीच्या आठवणीत झुरत असावा.

न्हाऊन आली की आजी तिची कंगवापेटी काढायची. हस्तीदंताचा कंगवा होता तिचा, तिच्या माहेरून दिलेला. आजी त्यातल्या आरशात पाहून भांग पाडायची,लांबसडक केसांना तेल लावून चापूनचोपून विंचरायची. अंबाडा घालायची..त्यांना आकडे लावायची. चेहऱ्याला मीना खाकी पावडर लावे. मग मेणाची डबी उघडून बोटाने मेण घेऊन ते गोलाकार असं कपाळावर लावायची. बोटावर पिंजर घेऊन त्या मेणाच्या जागी गोलाकार लावायची.

देवपूजा, तुळशीची पूजा झाली की आजी अनंताजवळ जाऊन फांदीवरचं एखादं सुवासिक फूल काढून केसात माळायची. आजीच्या केसांनीही तिचा नीटनेटकेपणा अंगिकारला होता. अनंता बहुदा रोज त्याची मालकीण फुल काढायला येईल म्हणून आतुरतेने वाट पहात होता.

——————————————————-

आम्ही घरी आलो तर  नवं जोडपं साडेआठ वाजले तरी कडी लावून झोपलं होतं. रेशमने चहा ठेवला. तिची ठमा(मयुरी) गोल फिरु लागली होती. मान वर करुन लवकुशकडे पहात होती. लवकुशची पेंग ठमाला बघून दूर पळाली. नाना येऊन विचारपूस करुन गेले.

कामाच्या बाबतीत अवनीचा आनंदीआनंद होता. आता तिचं तिच्या आईशी पँचअप झालं होतं. आईला फोन लावून तिच्याशी तासनतास गप्पा मारे.

मी सकाळचं जमेल तसं आवरून ऑफिसला निघायची.  आत्याला घरातलं आवरुन मुलांकडे बघणं भारी पडू लागलं. मुलांनी शू केली तरी अवनी त्यांची चड्डी बदलत नव्हती. शी चं सोडाच.

रेशम मदत करायची आत्याला पण तिची ठमाबाई रात्रपाळी करत असल्याने तिच्यासोबत रात्रभर जागून रेशममधे सकाळी कामं आवरण्याचं त्राण नसे. आत्या तिला आराम करायला सांगे मग रेशम झोपते तर मीच का काम करु या हेकेखोर विचाराने अवनीही डोकंदुखीचं निमित्त करुन झोपून रहायची.

जीजींच्याने जास्त कामं होत नव्हती. अवनीचा तिकडचा जॉब तिला सोडावा लागला होता आणि इथे मी म्हंटलं माझ्यासोबत चल तर नाही म्हणाली. म्हंटलं पुण्याला गेली की करेल नोकरी.

सुट्टी संपली तसे अनंतभाऊजी पुण्याला नोकरीच्या ठिकाणी गेले. अवनीला घेऊन जाण्यासाठी आधी रुम घेणं गरजेचं होतं. पुण्यात जागांचे दरही अव्वाच्या सव्वा.

अनंतभाऊजींनी एक ब्लॉक पाहिला कोथरुडजवळ..लोन घेऊनही दहा लाख कमी पडत होते. दादा नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने ते पैसे दादांनी भरावेत अशी भावजींची अपेक्षा होती. दादा म्हणाले देतो पण तुला दर महिन्याला थोडेथोडे करुन माझे परत करावे लागतील.

भाऊजींना व अवनीला दादांकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती. नेहमी मवाळ वागणारे दादा कोर्टाचे टक्केटोणपे खाऊन पक्के व्यवहारी झाले होते. भाऊजी नाराज होऊन निघून गेले. अवनीला तेवढंच मिळालं.

ती एवढ्यातेवढ्यावरून भांडू लागली. रेशमला तर पाण्यात बघू लागली. मुद्दाम रेशमच्या पुढ्यात गळ्यातलं मंगळसूत्र,हातातला हिरवा चुडा फिरवत बसे.

वटपौर्णिमेच्या दिवशी मी तिला घेऊन वडाची पूजा करायला गेले. आल्यावर नेहमीप्रमाणे आत्याला व रेशमला वाण दिलं तर म्हणाली,” वैनी रेशमला कशाला? तिचं कुठं लग्न झालंय..आता तरीही एका मुलीची आई आहे ही गोष्ट अलाहिदा. ” रेशमच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. असं दुसऱ्याला टोचून बोलून सण साजरं करण्यात काय अर्थ! मला तर अवनीला भाऊजी कधी घेऊन जाताहेत असं झालं होतं.

दादा व जीजी अवनीच्या स्वभावाला कंटाळून गावी निघून गेले.

मी काही सांगायला गेले तर अवनी टांगायला उठायची. समजून घ्यायची तयारीच नव्हती तिची. पैसे दिले असते तर इतक्यात पुण्यात आमचा ब्लॉक झाला असता हेच पालूपद जातायेता लावायची.

मी अवनीचा विषय यांच्या कानावर घातला तर म्हणाले..असल्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत.

एकदा मीच अवनीच्या आईला फोन लावला व अवनी वडिलधाऱ्या माणसांना उलट बोलते ,तिला समज द्या असं सांगितलं तर तिची आई म्हणे,”माझी अवनी असं उलट उत्तर करणं शक्यच नाही.  मी रेशमशी तिची वागणूक सांगितली तर म्हणे.. “कुमारिका मातेला अशीच वागणूक देतात..त्यात नवल ते काय!”

झक मारली नि तिला फोन लावला असं झालं मला.

अवनीने भावजी बोलवेस्तोवर किंवा रेशमचं लग्न होईस्तोवर तिच्या माहेरी जाऊन रहावं असं वाटू लागलं मला. काय चूक होतं त्यात? उठसूठ आत्यावर हुकूम सोडायची. आत्या जरा चहा करा,सोबत शिरा करा. उकडतय..सरबत करा. आत्याचं वय किती नि ही बया कामाला लावू पहायची तिला.

आत्याही मी अवनीला काही बोलेन मग शब्दाला शब्द  वाढतील म्हणून अवनी काय सांगेल ते काम निमुटपणे करायची. मी विचारलं तर म्हणायची,”असुदेत गो. काम करुन काय पातळ होत नै मी.” हे बाकी खरं होतं.

दिवस , महिने चालले होते. रहाटगाडगं सुरू होतं.

आत्याचं वजन काही कमी होत नव्हतं. बर तिचं जेवणही चिमणीसारखं..मग वजन कशाने वाढत असावं बरं. सुट्टीच्या दिवशी आत्याला घेऊन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुपमांकडे गेले. त्यांनी आत्याच्या बऱ्याच तपासण्या केल्या. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार गोळ्या घेऊन  आम्ही दोघी समोरच्या हॉटेलमध्ये गेलो.

हॉटेलमध्ये एसी होता. जरा थंड वाटलं.

मी आत्याच्या आवडीचा मसालाडोसा व दहीवडा मागवला. नंतर मँगो आईसक्रीम घेतलं. आत्या बऱ्याच दिवसांनी निवांत दिसली.

“आत्या गं, तब्येतीची हेळसांड करु नकोस नं.

मला,प्रसन्नाला,लवकुशला तू हवीऐस.जप तब्येतीला.” मी आत्याला आर्जवाने सांगितलं.

आत्या म्हणाली,”अगं वेडाबाई,घाबरलीस! कुठे जात नाहीए मी तुम्हांला सोडून. वयानुसार थोडी दुखणी व्हायचीच.”

तिथून आत्याला साडीच्या दुकानात घेऊन गेले. तिच्या आवडीच्या सुती साड्या दाखवायला सांगितल्या.

नेहमीप्रमाणे आत्याने पुसटसे रंग निवडले पण तिची नजर एका गर्द हिरव्या साडीवरुन हटत नव्हती. माझ्या ध्यानात आलं ते.

खरंतर उशीरच झालाय ध्यानात यायला. आत्यालाही साजश्रुंगार आवडतो,उठावदार रंग आवडतात हे अगदी सहज विसरले होते मी. मग ती हिरवी व एक जांभळ्या रंगाची साडी मी आत्यासाठी निवडली.

आत्या म्हणाली,”हे रंग खरंच आवडतात गं मला पण माझ्यासारखीनं नेसणं बरं दिसेल का?”

“आत्या गं किती वर्ष हौसमौज मारशील..स्वत:कडे पैसाअडका असुनही रंगांशी का नातं तोडलंस!” मी म्हणाले तसं तिथली सेल्सगर्लही पटल्यासारखं हसली  व तिने ती हिरवी साडी आत्यावर  लावून किती छान दिसते ते दाखवलं. म्हंटलं,अवनीलाही एक साडी घेऊ. तिच्यासाठी लिंबूकलरची साडी घेतली.

घरी आलो तर रेशम भांडी घासत होती. तिन्ही बाळं झोपली होती व अवनी कसलसं पुस्तक वाचत पडली होती.

रेशमचं तरी लवकरात लवकर लग्न होऊदे अन् हिच्या तावडीतून सुटूदेत असं मनात म्हंटलं.

बोलाफुलाची गाठ पडायला तसा प्रद्युम्न निमाताईसोबत हजर. ब्लॉक बुक केला म्हणे. लग्नाचा मुहूर्त काढा. लग्न साधेपणाने करायचं ठरवलं. तरी मानपानाचे कपडे घ्यायला हवे होते.

मी,हे,निमा ताई, प्रद्युम्न खरेदी करायला बाहेर पडायचो. वधुवरांचा पोशाख, इतर कपडे,दागिने,..सगळं होईस्तोवर वीसेक दिवस कसेच गेले.

रेशमच्या लग्नासाठी जीजी,दादा,तात्या,आई,काकू,अनंत भाऊजी सगळी आली होती. घरच्या,बाहेरच्यांनी हॉल भरून गेला होता.

नानांच्या घरामधेही पाहुण्यांची सोय केली होती. नाना स्वतः त्यांना अंघोळीसाठी पाणी तापवून देत होते. प्रद्युम्नच्या निमाताईकडची व मामाकडची सोडली तर जास्त माणसं नव्हती.

सकाळी साडेअकराच्या सुमारास लग्न लागले. भरजरी शालूतली रेशम एका मुलीची आई असेल असं मुळीच वाटत नव्हतं. ठमाही लग्न होईस्तोवर आईकडे गेली नव्हती. तिच्या दादांसोबत हॉलभर पकडापकडी खेळणं चालू होतं तिचं.

खणाच्या परकरपोलक्यात खूपच गोजिरी दिसत होती. एवढुशा केसांचा पोनी बांधून त्यावर जुईचा गजरा माळला होता. ठमा मान हलवत होती तसा तो गजरा इकडून तिकडे हलत होता. काजळ घातल्याने उठून दिसणारे तिचे भोकर डोळे नि गोबरे गाल प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होते.

शेवटी मीच पुढे झाले. माझ्या डोळ्याच्या कडांचं काजळ बोटाने काढून तिच्या गालावर स्पष्टशी तीठ लावली.,तेव्हा कुठे माझं समाधान झालं.

लग्नात रेशमचा शालू दोन हजाराचा तर अवनीने अनंतभावजींसोबत जाऊन स्वत:साठी साडेचार हजाराची साडी ,त्यावर मँचिंग एक्सेसरीज घेऊन आली. स्वतःसाठी पार्लरवालीची अपॉइंटमेंट घेऊन तिकडूनच केशभूषा, वेशभूषा करुन आली.

मी आपली भटजींना सामान देणं,आलेल्या बायांना हळदकुंकू,फूल देऊन,ओटी भरुन त्यांचा मानपान करणं यातच व्यस्त होते. निमाताई व तिचे मिस्टरही वावरत होते.

रेशमला निरोप द्यायची वेळ आली आणि मला,जीजीला,आत्याला अगदी भरुन आलं. एक मन म्हणत होतं..बरं झालं रेशमच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली तर दुसरं मन मात्र धास्तावलं होतं,यांना मुल झालं की ठमाला प्रद्युम्न आता एवढाच जीव लावेल का!

ठमा आईसोबत जायला तयारच नव्हती. आम्हालाही घर ओकंबोकं वाटणार होतं म्हणून ठमाला आमच्यासोबत ठेवून घेतलं. नाहीतरी तिला कधी माझ्या,कधी आत्याच्या कुशीत निजायची सवय होतीच . फक्त परीराणीची गोष्ट हवी असायची निजताना. त्या परीराणीचे पंख,तिचा ड्रेस,तिचे केस,जादुची छडी..हे इतकं वर्णन करेस्तोवर आमची परीराणी झोपून जायची. तर कधी स्पेशल गाणं गाऊन झोपवावं लागायचं..

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे

सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे

दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक

आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी

भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी

जे ते तयास टोची दावी उगाच धाक

होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले

भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले

पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक

त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक

––––––—–—-

रेशमाच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अनंतभाऊजी अवनीला नवीन घरी घेऊन गेले. घर बघायला या असंही दोघातलं एक म्हणालं नाही. मी आत्याला म्हंटलं,तर आत्या म्हणाली..”वैजू कुणाकडून कसलीच अपेक्षा करायची नाही राजा. अपेक्षा केली की दु:ख होतं.”

दादा,जीजींचं मेडीकल चेकअप करुन घेतलं. त्यांना इथेच रहायला सांगत होतो पण गावचं घरदार टाकून इथे रहाणं त्यांना शक्य नव्हतं. जड अंत:करणाने नातवांचा निरोप घेऊन ते गावी परतले.

रेशम व प्रद्युम्नला मी माझ्या पगाराच्या पैशातनं महाबळेश्वरची हनिमुन पेकेजची तिकीट्स दिली होती. ती दोघं हनिमुनला गेली. ठमा आईची आठवण न काढता बरी रहात होती.

प्रसन्ना यंदा बारावीत. यांनी चार जणांना क्लाससंबंधी विचारलं. ब्रीजजवळच्या रेगेसरांचा क्लास छान आहे असं  कळताच यांनी प्रसन्नाचं नाव तिथे नोंदवलं. एकदोन महिने ठीक गेले.

हल्ली प्रसन्नाच्या वागण्याबोलण्यात फरक पडला होता. प्रसन्ना गप्पगप्प असायचा. कोणाशी बोलायचा नाही.

मी बरेचदा विचारून पाहिलं, प्रसन्ना काही दुखतय का रे. पूर्वीसारखा बोलत नाहीस, मजामस्ती करत नाहीस.. थोडंसं हसायचा पण उत्तर द्यायचा नाही.

आत्यानेही विचारून बघितलं पण तिला तर त्याने जवळजवळ उडवूनच लावलं.

—————————————————-

का बरं प्रसन्ना वागत असेल असा? तो कसल्या मोहजालात तर नाही ना फसला! आत्याची एकमेव निशाणी प्रसन्ना, तोच तुटक वागू लागला तर आत्याला कसं वाटेल! रेशम हनिमुनहून परत आल्यावर कसं असेल तिचं पुढचं आयुष्य? जाणून घेऊया पुढच्या भागात.

======================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-10/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-12/

=========================

नमस्कार वाचकहो,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: