Skip to content Skip to sidebar Skip to footer

वैजयंती (भाग दहावा)

©® गीता गरुड.

आत्याने सरळ मुद्द्यालाच हात घातला.

“प्रद्युम्न”

“काय आत्या?”

“तुझं प्रेम आहे का रेशमवर?” आत्याने विचारलं.

“नाही म्हणजे होय म्हणजे..”प्रद्युम्न गोंधळला.

“असं ततपप करु नकोस. मांजरासारखं डोळे झाकून दूध पिऊ नकोस.”

————————————————————–

“आत्या खरं सांगू.रेशम आवडते मला.” प्रद्युम्न लाजत म्हणाला.

“आणि तुझे आईवडील..त्यांचं काय?”

“आत्या,मला आईवडील नाहीत.  मी दोन वर्षांचा असताना शेतात वीज कोसळून दोघांचा म्रुत्यु झाला. मी व ताई मामाच्या घरी लहानाचे मोठे झालो.”

“अरे हा आईवडिलांचा विषय आपल्या बोलण्यात आला नव्हता म्हणून बोलले रे. वाईट वाटून घेऊ नकोस हो. ” आत्या म्हणाली.

“रेशमच्या होणाऱ्या बाळासकट स्वीकार करशील तिचा?” आत्याने प्रद्युम्नपुढे पेच टाकला. मीच गडबडले आत्याचा प्रश्न ऐकून.

आता प्रद्युम्न काय म्हणणार..माझा जीव कानात गोळा झाला.

“आत्या, रेशम मला मनापासून आवडते. तिच्या मोकळ्याढाकळ्या स्वभावाचा त्या हैवानाने फायदा घेतला. दुसरीतिसरीने जीवन संपवलं असतं,गर्भपात करुन घेतला असता..पण रेशम मोठी धीराची.. तिने उदरात वाढणाऱ्या भ्रुणाचं रक्षण केलं.

एका अश्राप जीवाला वाढवतेय ती..समाजाच्या वाईट नजरा झेलून.” प्रद्युम्न बोलत होता जे नुकतीच आलेली रेशम दारात उभी राहून ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. कोणीतरी तिला समजून घेणारं भेटलं होतं,आमच्याव्यतिरिक्त.

“प्रद्युम्न मला खरंच कोणाची सहानुभूती नकोय. तू माझ्यावर प्रेम करतोस हा तुझा सहानुभूतीपोटी आलेला चांगुलपणा असू शकतो.

माझं बाळ जन्मलं की तू कदाचित माझा स्वीकार करशीलही पण तू बाळाकडे एक  अडचण म्हणून पहाशील..आणि ते..ते मला सहन होणार नाही. तेंव्हा क्रुपा करुन तू इथून जा प्रद्युम्न आणि मी नसतानाच फोन करुन इथे येत जा,लवकुशला व तुझ्या ताईला भेटायला.

मी तुझी कुणी नाही. मी खरं तर कुणाचीच कुणी नाही. मी माझीही राहिली नाही रे प्रद्युम्न तर तुझी काय होणार! मी खूप दुष्ट आहे म्हणूनच मी माझ्या दादा,जीजींनाही नकोय. माझ्या अनंत भैयाचं लग्न माझ्यामुळे मोडलं. तू जा प्रद्युम्न जा ..माझी काळी

सावली तुझ्या आयुष्यावर पडायला नको.”

प्रद्युम्न तिला समजावू पहात होता पण तिने आतून दरवाजा लावून घेतला. कितीतरी वेळ तिचे हुंदके येत राहिले. प्रद्युम्न निराश होऊन निघून गेला होता.

मी व आत्या पोळ्या करत होतो. मी लाटत होते,आत्या शेकत होती. “आत्या जे झालं ते बरं नाही झालं गं. असं व्हायला नको होतं.”मी म्हणाले.

“अगो,मी आपला खडा टाकून पहात होते. दोन तास लागतील यायला म्हणून सांगून गेलेली रेशम तासाभरात परत येणार हे मला कुठं ठाऊक होतं!

बरं त्यात ही तुझी पोरं दाराची कडी काढून दार उघडून ठेवतात. ते सेफ्टी डोअर नानांनी लावलय तसं लावून घेतलं पाहिजे.  आणि प्रद्युम्नला आईवडील नाही हे कधी बोलली नाहीस तू!”

“आत्या गं. ते राहिलंच बघ सांगायचं..हल्ली मी नोकरीला लागल्यापासनं आपल्या निवांत गप्पा होतात कुठे! आता ही रेशम जेवतेय तरी का कुणास ठाऊक!”

“होईल गं ती नॉर्मल. उलट झालं ते बरंच झालं. तिच्या मनात साचलेलं वरती आलं.”

इतक्यात पाठीमागे पीठाचा डबा उघडा ठेवला होता. लव कधी आला नि डब्यातलं पीठ त्याने आतल्या भांड्याने कुशवर ओतलं. कुशचा अगदी पांढरा बोका झाला.

कुशने तेवढंच पीठ लवच्या डोक्यावर ओतलं. मी त्यांना मारणार तोच आत्याने रेशमला बोलावलं,”रेशम, हे बंडुगुंडु बघ पीठाची रंगपंचमी खेळताहेत. जा जरा पाण्यात बुचकळून काढ दोघांना.”

रेशम बहुदा बोलवायचीच वाट बघत होती. समोर लवकुशचा पिठोरा अवतार पाहून तिला हसू फुटलं.

आत्तू हसतेय हे बघून मार मिळणार नाही हे जाणून बंडुगुंडु दोघे हसू लागले.

रेशम दोघांनाही बाथरुममध्ये घेऊन गेली मग अर्धातास तिघांचा बाथरुममध्ये उच्छाद सुरु होता. रेशम जरा मोकळी हसली हेच मला पुष्कळ होतं.

एकदा हे बातमी घेऊन आले..ऋतुराज कामावर असतानाच त्याला पक्षाघाताचा झटका आला. जीभेने बोलता येत नाही..एक बाजू लुळी पडली.

कुणाचं वाईट चिंतण्याचा स्वभावच नाही आमचा. ऋतुराजचं असं होणं कुठेतरी मनाला वेदना देऊन गेलं.

रेशमने यांच बोलणं ऐकलं..’या जन्मी केलेलं याच जन्मात फेडावं लागतं. मला फसवून माझ्याशी प्रेमाचं नाटक,बायको,मुलीचा विश्वासघात..त्याला सजा ही मिळणारच होती. पटकन मरण यायलाही नशीब लागतं. याच्या कुकर्माने हा खितपत पडणार..’

रेशम आज प्रथमच मनातलं बोलली. तिच्यात प्रगती होत होती. 

आता तिला आठवा महिना लागला होता. मी व जीजी तिला सर्वतोपरी जपत होतो.

माझी नोकरी तशी बरी होती. एका पतपेढीत काम करत होते मी. बँकेपेक्षा थोडे जास्त व्याज देणारी संस्था होती ती. बरीचजणं तिथे पैसै गुंतवत असत.

आजुबाजूचे सहकारी बरे होते. मला फक्त पैसे जमा करुन घेण्याचं व त्याची नोंद असलेलं रजिस्टर  रोकडे साहेबांकडे देण्याचं काम होतं. ते संस्थेचे मालक होते.

प्रसन्नाची अकरावीची वार्षिक परीक्षा संपली तसा यांनी त्याला अलिबागला जाणाऱ्या गाडीत बसवून दिला. आत्या मात्र गेली नाही. रेशमच्या बाळंतपणासाठी थांबली. दिवस जवळ आले तसे रेशमच्या हालचालींत थोडा मंदपणा आला.

लवला बारीक ताप जाणवत होता. त्याच्या मानेजवळ एक पाणेरी फोड दिसला. आत्या म्हणाली कांजिण्यांची सुरुवात आहे. दोन दिवसात लवच्या सर्वांगावर कांजिण्या आल्या. त्याचे ओठ लाल झाले. इकडे रेशमच्याही पोटात दुखू लागलं. तिला घेऊन हे इस्पितळात गेले. काही गुंतागुंतींमुळे डॉक्टरांनी सिझेरियन करण्याचा  निर्णय घेतला.

रक्ताची आवश्यकता होती. यांचा व रेशमचा ब्लडग्रुप जुळेना,तोवर प्रद्युम्न निमाताईला घेऊन इस्पितळात आला. मीच त्याला फोन केला होता कारण कुशलाही लवसारखाच त्रास होऊ लागला होता.

प्रद्युम्न, त्याचे भाऊजी व निमाताई यांच्यासोबत बसले. प्रद्युम्नचा व  रेशमचा रक्तगट जुळला. प्रद्युम्नने रक्त देण्याची तयारी दर्शवली.

रेशमला गोंडस बाळी झाली. बाळाला दुपट्यात गुंडाळणं,रेशमच्या दुधाला लावणं ही सारी कामं निमाताई करत होती.

आत्या व मला रेशमकडे जाता येत नव्हतं कारण लवकुशच्या कांजिण्यांचा भर होता. दोघांनाही मांडीवर घेऊन रहावं लागत होतं.

रेशमची बाळी रात्री जाम रडायची. निमाताईला रात्री तिच्याजवळ रहाणं शक्य नव्हतं कारण सकाळी पाच वाजता तिच्या मिस्टरांना डबा द्यावा लागे.

तरी सकाळीच सारी कामं आवरून ती दिवसभर रेशमसोबत असायची. तिला डबाही घेऊन जायची.

रात्री रेशमसोबत हे व प्रद्युम्न असायचे. यांना रात्रीची झोप अनावर व्हायची. प्रद्युम्न मात्र बाळीसोबत जागा रहायचा, ओलं केलं तर दुपटं बदलायचा..तिच्याशी गप्पा मारायचा.

आठदहा दिवसांत प्रद्युम्न व बाळीचं घट्ट बाँडींग तयार झालं. आता रेशमला डिस्चार्ज देणार होते. हे व प्रद्युम्न सगळी आवराआवर करत होते.

“अशोकदादा” रेशमने साद घातली.

“काय गं काय हवंय,” यांनी जवळ जात विचारलं

“प्रद्युम्नला सांग, छोटीला खेळवायला येत जा आणि थँक्यू पण सांग..मला व छोटीला सांभाळल्याबद्दल.”

“हा बघ प्रद्युम्न आलाच. तू सांग काय ते तोवर मी बील भरून येतो.”

रुममधे फक्त प्रद्युम्न ,रेशम व छोटी होती. छोटीवर सुर्याची कोवळी किरणं पडलेली. त्या उन्हात ती शांत झोपली होती.

प्रद्युम्न छोटीच्या बाजूला जाऊन बसला.

“आई ग..” रेशम ओटीपोटावर हात ठेवत कण्हली तसा प्रद्युम्न तिला म्हणाला,”काही दुखतय का. मी डॉक्टरांना बोलवतो.”

“नको”

“मग नर्सला बोलवू का?”त्याने विचारलं.

“इकडे ये जरा,इथे बैस.”

प्रद्युम्न तिच्याकडेला जाऊन बसला तसा रेशमने त्याचा हात हातात घेतला.

“छकुली आवडते तुला?” रेशमने विचारताच प्रद्युम्नच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. प्रयत्न करुनही एक अश्रु पापणकाठ ओलांडून त्याच्या गालावर ओघळला.

रेशम हळूहळू प्रद्युम्नचा आधार घेत उठली. त्याच्या गालावरचा थेंब पुसत ती म्हणाली,”छकुलीचा बाबा होशील? माझ्याशी लग्न करशील?”

प्रद्युम्न रडतच म्हणाला,”पण मी आवडत नाही नं तुला!”

“सॉरी नं. मी तुला चुकीचं समजत होते. हे बघ कान धरते.”

प्रद्युम्नने रेशमचे हात कानापासून दूर केले व तिला मिठीत घेतलं..पाचेक मिनटं झाली असतील..बाहेरुन यांचा व निमाचा आवाज ऐकू येऊ लागला..”झालं का पँचअप. दार उघडा.”

प्रद्युम्नने हळूच रेशमला बाजूला केलं व दार उघडलं तशी निमाताई गुणगुणू लागली..

“दो दिल मिल रहे है मगर चुपकेचुपके..सबको हो रही है खबर चुपकेचुपके.” रेशम व प्रद्युम्न दोघेही लाजले.

लादी पुसायला आलेली मावशी म्हणाली,”बेस गानं बघा. सलमान नि ती कोणती हाय नव्हं त्यात.”

यांनी मावश्यांना बक्षिसी दिली व इस्पितळाचा निरोप घेतला.

लवकुशची सात दिवसांची अंघोळ झाली होती. आता ते बरे होऊ लागले होते.

रेशम व बाळाच्या अंगावरून मी भाकरतुकडा ओवाळून टाकला..डोळ्यांना पाणी लावलं,पायांवर पाणी ओतलं व त्यांना आत घेतलं. लवकुशला दोनतीन दिवसतरी खेळवायला नानांच्या सुपुर्द केलं होतं.

प्रद्युम्नची निमाताई अधनंमधनं बाळाला बघायला यायची.  तिने डबाभर डिंकाचे लाडूही आणून दिले. मी म्हंटलं,”रेशमवन्सं, सासरी जायच्या आधीपासनंच सासरकडच्यांकडून तुझे लाड सुरु झाले हो.”

प्रद्युम्नने तर छोटीसाठी किती छान छान झगे आणले फुलाफुलांचे,ठिपक्यांचे. मलाही मुलीची खूप आवड जी मी आता छकुलीला पैंजण,डुल घालून पुरी करणार होते. छकुलीचं नाव काय ठेवायचं ते ठरत नव्हतं.

लव कुश दोघेही छकुलीच्या पाळण्यात वाकून बघायचे. ओठांवर हात ठेवून तिला फ्लाइंग किस द्यायचे. त्यांनी तिचं नाव ठमा कसं काय ठेवलं का नानांनी सांगितलं ठाऊक नाही पण सगळ्यांच्याच तोंडी ठमा रुळलं. बारसा जरा उशिराचाच धरला कारण रेशमला अशक्तपणा आला होता. बारशाच्या  दिवशी पहाटेच जीजी व दादा आले.

इतका आनंद झाला त्यांना बघून! रेशम तर रडूच लागली. दादांनी तिला जवळ घेतलं. “मी रागावलो तुझ्यावर म्हणून तुही रुसायचं का ग रेशम! एकदाही फोन लावावासा वाटला नाही का बापाला!”

रेशम दादांना अधिकच बिलगली. जीजीने तिचे डोळे पुसले..”रडत राहिलीस तर दूध आटेल अंगावरचं म्हणाली.

जाई,जुई,मोगऱ्याच्या सरींनी पाळणा सजवला. सगळी तयारी प्रद्युम्न जातीनिशी करत होता. दादांना भावी जावई आवडला.लग्न कधी करणार म्हणताच ..जरा थांबा..वर्षभरात स्वत:चा ब्लॉक घेतो मगच लग्न करतो म्हणाला. दादांनी त्याच्या म्हणण्याला होकार दिला.

निमाताईंनी बाळीचं नाव मयुरी ठेवलं पण आमच्यासाठी ती ठमाच होती. ठमीला न्हाऊ घालण्याचं काम जीजी करु लागली.

अशावेळी लवकुश जीजीच्या अवतीभवती फिरत. तिला हवं ते न्हेऊन देत. ठमा रडू लागली की खुळखुळा वाजवून तिला गप्प करत.

एकदा रात्रीची जेवणं झाली नि फोन आला. फोनवर दिगू बोलत होता..आजी गेली म्हणाला. मी मटकन खालीच बसले.  यांनी परत फोन करुन सविस्तर विचारुन घेतलं. आजीचं वय झालं गोष्ट खरी होती पण तिचं नसणं कधी इम्याजिनच केलं नव्हतं. यांनी आम्हाला नेण्याची व्यवस्था केली. रेशम व ठमाजवळ जीजी व दादा होते. रात्रीच्या प्रवासात डोळे नुसते भरुन येत होते.

आजीने माझं लहानपण व्यापलं होतं..तिच्या हातचा आमटीभात,तिने घालून दिलेल्या घट्ट वेण्या,खाऊ म्हणून दिलेला खारीक,गुळखोबरं..तिने जातं ओढताना गायलेल्या  ओव्या, अंगणात लावलेला पारिजातक..साऱ्या आठवणी फेर धरून नाचत होत्या. आत्या तिची मुलगी..काय अवस्था झाली असेल तिच्या मनाची..तिला धीर द्यायचं त्राण नव्हतं माझ्यात.

घरी पोहोचलो तेव्हा आजी निवांत झोपल्यासारखी दिसत होती. सगळे गप्पगप्प. आत्या इतका वेळ शांत होती तिने आजोबांना मिठी मारुन हंबरडा फोडला तर त्यांनीही मान टाकली. आत्याचीच वाट पहात होते जणू.

अख्खा गाव पालवांच्या घराजवळ लोटला होता.

आजीआजोबा दोघांनी जोडीने इहलोकीची यात्रा संपवली होती. खरंच होतं ते. आजीशिवाय आजोबांचं कधी पानही हललं नव्हतं. कुठेही समारंभाला जायचं असो,जोडीने जायचे दोघं.

आताही जोडीने निघाले होते.

आमचं घरंच काय पंचक्रोशीवर माया केलेली आजोबांनी. आजीच्या हातचं जेवण कित्येकजण जेवले होते.

अगदी महिनाभर लोकांची येजा चालू होती. काळ  दु:खावर मलम लावत होता. लवकुशच्या इथेतिथे घरभर बागडण्याने घरातलं वातावरण प्रफुल्लित झालं होतं.

दिगू अभियांत्रिकीला असल्याकारणाने दोन दिवसासाठी येऊन गेला. हॉस्टेलचं कदान्न खाऊन बराच वाळला होता. त्याला म्हंटलं,”मुंबईला येतोस का?” तर नाही म्हणे आमचं कॉलेज चांगलं आहे. म्हणजेच रुळला होता तो पुण्यात.

यातच अजुन एक बातमी समजली,अनंत भाऊजींबद्दल.

————————————————————

जाणारं जातचं पण त्याच्या आठवणी सोबत करतात. वैजयंतीच्या आजीआजोबांना देवाज्ञा झाली पण आजीआजोबांच्या आठवणी तिच्यासोबत कायम रहातील. अनंतभाऊजींच्या लग्नाचं काय झालं जाणून घेऊया पुढील भागात.

============================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-9/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-11/

=========================

नमस्कार वाचकहो,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: