Skip to content Skip to sidebar Skip to footer

वैजयंती (भाग पहिला)

“वैजयंती,चल ना गं सिनेमाला जाऊ,” कॉलेजच्या शेवटच्या दिवशी मैत्रिणींनी मला गळ घातली. मी,मोहिनी,आशा,वीणा,सरोज अशा पाचजणी मिळून सिनेमाला गेलो.

सलमान खान व भाग्यश्रीचा मैने प्यार किया..गुलाबी गालांची,सुंदर डोळ्यांची,रेशमी केसांची भाग्यश्री आणि एव्हरग्रीन सलमान सोबत लक्ष्मीकांत बेर्डे..पिक्चरने आमच्या मनावर अक्षरश: गारुड केलं.
आजा शाम होने आई
मौसमने लि अंगडाई
तो किस बात की है लडाई
तू चल..मै आई
तू चल..मै आई

एकसे बढकर एक गाणी होती. इंटरव्हलमधे आम्ही समोसे घेत होतो तेव्हा दोन मुलं आमच्या आसपास घुटमळत होती..साधारण आमच्याहून दोन चार वर्षाने मोठी असावीत.

मोहिनी व सरोज..त्या दोन मुलांसोबत सटकल्या. मी वीणाला विचारताच वीणा म्हणाली,”अगं त्यांची सेटींग आहे.”

“अच्छा,मला नव्हतं माहिती! डेंजरैत ना या प्रेमबीम करतात. कसं काय जमतं यांना!”मी विचारलं.

“वैजू,ज्या वाटेला जायचं नाही तिथला पत्ता विचारायचा नसत़ो. हे सगळं प्रेम वगैरे आपल्या कुटुंबांत चालणार नाही.”वीणाचं म्हणणं मला शतप्रतिशत पटलं..तरी त्यांच्या अफेअरबद्दल उत्सुकता होतीच.

ज्या गोष्टी करणं आपल्याला शक्य नाही ते दुसरी करत आहेत..कुठेतरी तलावावर फिरायला जात आहेत..अभ्यास सांभाळून? प्रेमाच्या आणाभाका घेत आहेत ..हे माझ्या द्रुष्टीने सॉलिड उत्कंठावर्धक होतं.

ती मुलं मोहिनी व सरोजला कधी आईसक्रीम पार्टी देतात,कधी मेकअप बॉकस तर कधी पर्स वगैरेही गीफ्ट देतात ही अतिरिक्त माहिती आशाने पुरवली.

वीणा मग डाफरली, त्यांचं ती बघतील गं. आपण आपल्याआपल्या गप्पा मारु म्हणाली.
आशा लाजत म्हणाली,”माझं किनई लग्न ठरलं. हे भेटायला येतात मला. डॉक्टरआहेत. गाडी आहे चारचाकी.”

आम्ही दोघींनीनी आशीचं कौतुक केलं. साठ टक्केच्या वर मार्क्स न मिळवणाऱ्या आशीला डॉक्टरीणबाई म्हणून चण्याच्या झाडावर चढवलं तेंव्हा कसली लाजली आशी! मीच विचारलं.”नाव काय गं तिकडच्या स्वारीचं?” तर लाजत लाजत म्हणाली,”गुलाब हणमंतराव मानकापे.”

वीणा न् मी पोट धरुन हसलो..एकतर हिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव गुलाब तोही कसा गुलाब मानकापे. तशी आशी फणकारली..”आमच्या ह्यांना काही बोलायचं नै.” म्हणू लागली. आम्ही कसंतरी हसू दाबलं. तरी मी मधेच घोडं दामटलं..”आशी,तू उखाणा कसा घेणार गं..”
वाऱ्यावर फडकतोय रुमाल
गुलाबरावांचा गुलकंद सुमार

“ए काय गं तुम्ही.” आशी परत चिडली. वीणा म्हणाली,”मला बाई अजून शिकायचं आहे. मी एम.ए. करणार. मी म्हंटलं,” हो बाई एम.ए. कर पुढे पीएचडी कर पण मला ते शिक्षणाचं जास्त अप्रुप वगैरे नव्हतं. डिगरी मिळाली बास.” बाकीच्यांचा निरोप घेऊन एका हाताने वेणीचा शेपटा हलवीत मी घरी आले.

मोठा ऐसपेस बंगला होता आमचा..आजोबांनी बांधलेला. दिमतीला नोकरचाकर होते. माझे आजोबा बीडीओ होते.

आमचं कुटुंब,काकांचं कुटुंब,एक विधवा आत्या, तिचा मुलगा प्रसन्ना ,आजीआजोबा असं माणसांनी,पोराटोरांनी भरलेलं घर होतं आमचं.

—–

काही महिन्यांत बीएचा निकाल लागला. मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. निकाल घेऊन घरी आले. वडीलधाऱ्यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतला. देवाजवळ पेढे ठेवले. माझ्या तोंडात अख्खा पेढा कोंबत काकू म्हणाली,”अजून एक गोड बातमी द्यायचीय तुला.”

“अय्या,काकू तुला बाळ.. पिंकीला भाऊ येणार!”

“गप गं,चावट. चाळीशी उलटली माझी तरी चिडवायचं सोडू नकोस. गुड न्यूज तुझ्याबद्दल आहे. गुरुजी तुझी पत्रिका घेऊन गेलेले..वेंगुर्ल्याच्या स्थळाला दाखवायला. ती मंडळी बघायला यायचीएत. पत्रिकेतील गुण जुळलेत. फक्त बघायचा कार्यक्रम उरकला की लागतो लग्नाच्या तयारीला.”

“काकू,आडनाव काय गं त्यांचं?”

“शिर्के..नावाजलेलं घराणं आहे. घरातली माणसं नि नवरामुलगा सगळी चांगल्या स्वभावाची आहेत.” आत्याने उत्तर दिलं.

“पण मला इतक्यात लग्नच..” असं मी बोलणार तोच आईने माझ्या ओठांवर हात ठेवला व म्हणाली. पहिल्यालाच नाट लावू नये कधी. काकाने मला फोटो दाखवला..कुरळ्या केसांचा..टप्पोऱ्या डोळ्यांचा कमल हसनच जणू. नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच त्याच्यात. उलट मीच त्याच्यापेक्षा रुपाने किंचीत डावी होते.”

“ए काका,नाव काय रे ह्याचं?” मी विचारताच काका हसला.

काकू म्हणाली,”ह्याचं नाही हं वैजू..यांच म्हणायचं. मान द्यावा मान घ्यावा. आपणच आपल्या नवऱ्याचा मान ठेवला नाही तर लोकं कशी ठेवतील! अशोक शिर्के नाव बरं का भावी जावईबापूंच.”

“अगो पण काकुडी. तो माझा नवरा झालाय कुठे अजून.” मी ठेंगा दाखवत म्हंटलं.

“कसं व्हायचं या पोरीचं!” आई उसासली तशी आजी तिला हात दाखवत म्हणाली,”तुम्ही काही काळजी करु नका माझ्या वैजयंतीची. एकत्र कुटुंबातल्या संस्कारात वाढलेय माझी नात. तसुभरदेखील तक्रारीस वाव द्यायची नाही सासरच्यांना. इथे आपली फुदकतेय चिमणीसारखी माहेरच्या घरात. तिथे बघा शिर्क्यांची मोठी सुनबाई म्हणून कशी वावरेल!”

—–

दोन दिवसांनी पाहुणेमंडळी बघायला येताहेत म्हणून निरोप आला. माझ्या छातीत उगा धडधडधडधड व्हायला लागलं.

काकूने आपली गुलबक्षी रंगाची साडी मला नेसवली. आत्याने सैलसर शेपटा बांधला. काकूच्या चिंगीने कुंदाची फुलं खुडून तासभर बसून माझ्यासाठी गजरा बनवला. थोडीसी पावडर, इवलुशी टिकली,ओठांना लिपस्टीक,गळ्यात तनमणी,वेणीत गजरा अशी छान नटून तिकडच्या लोकांची वाट पहात बसले.

काकूने कढीपत्त्याची,मिरचीची फोडणी देऊन कांदेपोहे बनवले होते. आजीने मसालादूध बनवलं.

चिंगीनेच मला ती मंडळी आल्याची खबर दिली. प्रसन्ना,चिंगी,दिगू(माझा धाकटा भाऊ दिगंबर)..माझ्या कानाशी येऊन बाहेरच्या मंडळींचं वर्णन करुन जात होते. माझी धडधड वाढलेली. इतक्यात काकूने माझ्या हातात ट्रे देऊन मला बाहेर पाठवलं. मी सगळ्यांना पोहे दिले. सांगितल्याप्रमाणे वाकून नमस्कार केला व तिथेच बसले.

अशोकचे आईवडील, दोघंही आमचं एवढं बडं प्रस्थ पाहून जरा बावरलेच पण माझ्या आजोबानी गप्पा अशा रंगवल्या..वातावरण अगदी शिथिल झालं. दोन दिवसांनी निर्णय कळवतो सांगून मंडळी निघाली.

तिकडच्या मंडळींचा होकार आला नि मी लाजून गोरीमोरी झाले. काकाकाकू..इतकंच काय आमची चिल्लर कंपनीही माझी थट्टा करु लागले.

मलाही त्यांनी माझी केलेली थट्टा हवीहवीशी वाटू लागली. आई, काकू कामाला हात लावू देईना. नंतर सासरी गेल्यावर करायचीच आहेत गो कामे,जा मुलांसोबत खेळ जा म्हणायच्या.

भावंडांत गेलं की ती सूर लावायची..गोड गोजिरी लाजलाजिरी ताई तू होणार नवरी..फुलाफुलांच्या बांधून माळा मंडप घाला हो दारी..मी त्यांच्यावर खोटंखोटं रागवायचे. मग माझी आत्या चांगलीच कावायची त्यांच्यावर.

आत्या माझे केस सोडवून छानसी बटवेणी घालायची. आत्याला एकच मुलगा होता. तिची लेकीची हौस अपुरी राहिलेली ,जी ती माझ्या माध्यमातून पुरी करत होती.

आत्या माझ्या केसांत कधी बकुळीचा सर माळायची तर कधी नुकतच उमललेलं सुवासिक अनंताचं फूल. ही दोनच झाडं होती आमच्याकडे. बाकी सगळीकडे फरशा बसवून ठेवल्या होत्या. आजोबांच मित्रमंडळ आलं की बाहेर सतरंज्या,खुर्च्या टाकून त्यांच्या गप्पा रंगायच्या. माझे वडील,ज्यांना आम्ही तात्या म्हणायचो ते दापोलीला क्रुषीअधिकारी होते. तिथेच रहायचे..सुट्टीला यायचे अलिबागेस.

—–

लग्नासाठी वाळवणं सुरु झाली. रुखवतात ठेवण्यासाठी नखुल्या,बोटवे,मालत्या,शेवया..आजीने निगुतीने बनवलं. माझ्या आवडीचं लिंबाचं आंबटगोड लोणचं,खारातल्या कैऱ्या,मोरावळा..किती न् काय काय परी..सुगरणी पदर खोचून कामाला लगल्या.

लग्न अगदी विधीवत व थाटामाटात झालं. नेहमी घरात हसतमुखाने वावरणारी आत्या लग्नात मात्र दूरदूरच होती.

साऱ्यांत राहूनही शेकडो योजने मनाने दूर गेली होती.

कदाचित आत्याला तिचं लग्न आठवलं असावं..याच मंडपात तिने सुशीलकाकांच्या गळ्यात वरमाला घातली होती.. मी तेव्हा अगदी लहान.होते.

पुसटसं आठवतं मला..तिचा कुसुंबी रंगाचा शालू..सुशीलकाकांची नावाजलेले वकील म्हणून ऐट..आत्याचं सासरी जाणं..घरातल्यांचे मुसमुसणारे चेहरे..आणि आता मी..माझी पाठवणी..सुशीलकाका अकाली गेले तसं..छे! मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते खोटं नव्हे.

निघताना काकूने मला मिठीत घेतलं नि इतका वेळ धरुन ठेवलेला बांध फुटला. आत्या तर सख्ख्या लेकीची पाठवणी होतेय अशी रडली.

जीजीने मला पाठीवर हात फिरवत मायेचा आधार दिला. तब्बल पाच तास लागले अलिबागहून सासरी वेंगुर्ल्यास पोहोचायला.

——

सासरचं घर तसं लहानच होतं..पण कसं..सुबक,मंगलोरी कौल़ाचं,आखीवरेखीव..मला बघताच क्षणी आवडलं.फाटकापाशी क्रुष्णकमळाचा वेल होता. विविध रंगांची गुलाबाची रोपटी दिमाखात उभी होती. या घरात दादा,जीजी(माझे सासूसासरे),नणंद रेशम रहायची.

यांची कंपनी औरंगाबादला..तिथेच कंपनीतर्फे रहाण्याजेवणाची सोय होती म्हणे.

दोन नंबर अनंतभावजी, पुण्यातील कॉलेजात इंजिनियरिंग शिकत होते. त्यांच्या परीक्षेमुळे त्यांना लग्नास येता आलं नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा होती. जीजीने मला गरम पाणी ओतून दिलं. एकेक तांब्या अंगावर ओतून घेत होते..नि त्यासोबत हे स्त्रीजीवनातलं किती मोठं स्थित्यंतर याचा विचार करत होते.

अलिबागेचं आमचं बाथरुम आठवलं. हेही छानच होतं पण तरीही तिथे माझं स्टुल होतं गुलाबी रंगाचं,गुलाबी रंगाची सोपकेस,..सगळं माझ्या आवडीचं नि हे इथलं निळी बादली,पिवळा टब,हिरवा मग, आकाशी स्टुल..वाईट नव्हतंच काही पण आपलेपणाचा दोरा तुटला होता.

माहेराचा पतंग मी आठवणींतून माझ्याकडे ओढत होते. डोळ्यांतल्या आसवांना खळती नव्हती.

जीजी कितीही सुस्वभावी असली तरी आई,काकू,आत्या ,काका,आजी,तात्या,आजोबा सगळे डोळ्यासमोर येत होते. काय बरं करत असतील या वेळेला! तात्यांनी गोळ्या घेतल्या असतील का? आणि ती बारकी पांढरी गोळी..रात्री आजीने खोकल्याचं औषध घेतलं असेल का?

माझ्याच हातून औषध लागायचं तिला आता चिंगी देईल तर चिंगीला माझ्यासोबत धेडी म्हणून पाठवलेलं. नळाच्या वाहत्या पाण्यानेच मी आसवं पुसली नि ओल्या केसांना टॉवेल बांधून बाहेर आले.

—–

चिंगी तिकडे रेशमच्या (माझी नणंद) खोलीत झोपली होती. मी पंख्याला केस वाळवले. हे त्यांचं आयकार्ड शोधण्यासाठी रुममधे आले. मी नेमकी साडी नेसत होते.

“ओ सॉरी. मी नंतर येतो.” हे म्हणाले.

मीही वेंधळी कशी! असं कडी वगैरे लावून कपडे थोडीच बदललेले कधी. माझी सेपरेट खोली होती दुसऱ्या मजल्यावर जिन्याला लागून. तिकडे कुणी फिरकत नसे.

हे भरकन गेले मग मी कशीबशी साडी नेसले कारण अलिबागला आत्या,काकू यातलं कुणीही साडी नेसवायचं. मी फक्त उभी असायचे.

हिरवी कांजीवरम,ओल्या केसांत मोगऱ्याचे गजरे माळून मी यांच्यासोबत पूजेला बसले.

भटजी हाताला हात लावा सांगत होते. तो स्पर्श सुखद वाटत होता नि सकाळचं दुखरं मन कुठेतरी सुखावत होतं.

चींगी न्हाऊन छान खणाचा चुडीदार घालून पूजा ऐकायला बसली होती. मधुनच येऊन माझ्या अंगावरचा शालीचा पट्टा नीट करत होती. रेशमसोबत तिचं बरं सूत जुळलेलं.

दोघींच्या गप्पा भटजींच्या पूजेप्रमाणे अविरत चालू होत्या तरी दोघींत आठ नऊ वर्षांच अंतर होतं.

मांडवपरतणीला अलिबागला गेलो तेंव्हा काकू,आई,आजी साऱ्याच माझ्याकडे अपुर्वाईने बघत होत्या. किती किती बोलायचं होतं प्रत्येकीला! साडी नीट जमतेना गं नेसायला..काकू विचारत होती. पुजेला उखाणा कोणता घेतलास?–काकाचा प्रश्न. मी अगदी उत्सवमूर्ती झाले होते.

हे व दादा तात्यांसोबत आमचं शेत बघण्यास गेले होते. रेशमवन्सं माझ्यासोबत बसण्याऐवजी चिंगीसोबत चिंचेच्या झाडाखाली गेली होती.

मी साऱ्यांना,घराला,घरातल्या भिंतींना अगदी डोळे भरुन पहात होते. आताच्या वेळी अलिबागचं हे घर जिथे मी दुडूदुडू धावले,रडले,हसले,बागडले ते परकं का वाटत होतं! एवढी ताकद असते त्या सप्तपदींमधे की माहेरची गाठ सोडून सासरी नांदायची सुरुवात होते! साऱ्यांचा निरोप घेऊन परत वेंगुर्ल्यास जावयास निघालो.आता परत आपल्या माणसांत कधी येईन काहीच ठाऊक नव्हतं.

लग्नासाठी आलेली वर्हाडी मंडळी हळूहळू पांगली.

आम्ही देवदर्शन घेऊन आलो. यांच्या मामांकडे गेलो दोडामार्गला. हिरवीगर्द झाडी,तोंडभरलं बोलणं,साधी रहाणी..एकूणच शांत परिसर,मोकळीढाकळी माणसं मला फार भावली.

मामीने आमच्यासाठी आमरसपुरीचं जेवण बनवलं होतं. ताटाभोवती छान रांगोळी काढलेली. त्या कौलारु घरात अगदी थंडावा होता,शांतता होती.

मामीच्या स्नेहाचा स्वाद आमरसाच्या गोडीला द्विगुणीत करत होता. तरी पुढे साताठ दिवस मामामामींकडेच राहिलो. मामी दरदिवशी वेगवेगळे,रुचकर पदार्थ करून घालत होती. त्या कौलारु घरातल्या होवरीत आमची प्रीत फुलली. नातं बहरलं.

एकमेकांच्या विचारांची,इच्छाअपेक्षांची देवाणघेवाण होत होती. हे अतिशय विचारी,दुसऱ्याचं मन समजून घेणारे..वाचनही अफाट होते. महिना कसा गेला कळलंच नाही. हे पुन्हा नोकरीच्या ठिकाणी औरंगाबादेस जाणार होते..त्याच्या आदल्या रात्री आम्ही झोपलोच नाही. हे समजावत होते,दर सुट्टीला येत जाईन म्हणून.

हे नोकरीला जाऊ लागले नि माझं रुटीन सुरु झालं. माहेरी मला कामाची सवय नव्हती..नुसतं खेळणं,उलिसा अभ्यास,आजीच्या हातचे लाडू,चकल्या..खाणं..

इथे मात्र यांनी जाताना तंबी देऊन ठेवली होती..जीजीच्या हाताखाली सगळी कामं शिकून घे म्हणून. थोड्याच दिवसांत औरंगाबादेस बिर्हाड थाटायचा यांचा विचार होता.

—–

माहेरात लाडाकोडात वाढलेली वैजयंती जीजीच्या तालमीत आपल्या संसाराचा रहाटगाडा चालवायला शिकेल का? की नुकतीच उमललेली कळी जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने कोमेजून जाईल? तुम्हांलाही जाणून घ्यायचंय ना मग लवकरच भेटूयात पुढच्या भागात..

==========================

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/vaijayanti-part-2/

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: