वैदेही


“अग वैदेही कुठे आहेस तू ?” आईचा आवाज वाड्यातून घुमत होता. पण वैदेही वाड्यात होतीच कुठे? उत्तर द्यायला.ती तर जवळच, नदीच्या किनारी असलेल्या रामाच्या देवळात गेली होती. तिचा राम ‘काळा राम’ व त्याच्या बाजूला जानकी व लक्ष्मण ,पायाशी वाकलेले हनुमान. पंचायतन मूर्ती.अतिशय कोरीव मूर्ती. पाहता क्षणी प्रेमात पडू अशा मूर्ती.तिथल्या गाभाऱ्यात मंद समई तेवत असे. तिथला तो फुलाचा सुगंध, भक्तीमय वातावरण यामध्ये वैदही भान हरपून तास न तास घालवत असे.
वैदहीच्या घरी पूर्ण धार्मिक वातावरण होते .गावाकडचा चौसोपी वाडा, घरी मोठं कुटुंब, त्यामुळे तिच्यावर बाळबोध संस्कार झालेले होते. त्यांच्या वाड्याजवळ नदी वाहायची. नितळ, खळाळणारे पाणी. नदीच्या किनारी रामाचे देऊळ होते. अति प्राचीन देवालय होते. गाभारा अंधारलेला असायचा. त्यात समई तेवत असायची. बहुतेक पूजेची तयारी वैदेहीच्या घरातून केली जायची. मूर्तीचा हार, चंदन ,कापूर ,आरती ,प्रसाद हे सगळं वैदेही ची आजी करायची. सकाळी लवकर उठून वैदेही आजीला मदत करायची व त्यानंतर शाळेत जायची. हार करण्याची कला ती आजी कडून शिकली होती. रामाच्या मूर्ती करता सुंदर हार रोज ती करायची.
तिला रामाचे खूप अप्रूप होते .तिला स्वप्नात सुद्धा ती मूर्ती दिसायची. एकही दिवस असा नव्हता की तिच्या रामाकडे ती गेली नाही .असं छान आयुष्य वैदेहीच होतं.दिवसेंदिवस ती तारूण्या कडे वाटचाल करत होती. रामाचे व तिचे वेगळेच नाते निर्माण झाले होते. मीरा व कृष्णाच्या गोष्टी लहानपणापासून ऐकत होती. रामाचे तिला वेड लागले होते . शाळा संपल्यानंतर तिला महाविद्यालयीन शिक्षणाकरता तालुक्याच्या गावी जावे लागले .पण तरीही रामाचा ओढा काही कमी झाला नव्हता. सुट्टीत आली की रामाच्या देवळाकडे पळायची. आईला सारखी देवळा बद्दल विचारायची.
कॉलेजचे शिक्षण संपत असताना घरच्यांनी तिच्या लग्नाची बोलणी चालू केली . तिच्या मनामनात रामच होता. घरचे गमतीने म्हणायचे की आपण तुझ्यासाठी रामच शोधू. हळूहळू स्थळ येऊ लागली .आई तिला म्हणायची” अग वैदेही जरा स्वतःकडे लक्ष दे “वैदेही म्हणायची “हो ग आई, माझा राम आहे ना माझ्याकडे लक्ष द्यायला” व खट्याळ हसायची. तिच्या आजोबांनी, त्यांच्या मित्राच्या नातवाचे स्थळ वैदेही साठी आणले. ‘राघव ‘त्याचे नाव.
शहरात भाषा विषयाचा प्राध्यापक होता. हसरे व्यक्तिमत्व, मनाचा सरळ, अभ्यासू वृत्तीचा, निष्पाप. आजकालच्या जगात विरळा माणूस. वैदहीच्या मनातला राम. राघव तिला बघायला आला. ती सुद्धा सुंदर दिसत होती. नाकी डोळी नीटस. टपोरे डोळे , लांब केस . ती पण या जगात विरळीच. दोघांनी एकमेकांकडे बघितले व त्यांची मने एक झाली.
‘हो’ म्हणणे केवळ औपचारिकता उरली. घरच्यांच्या परवानगीने ते दोघे नदीकाठी फिरायला गेले .वैदेही ने त्याला रामाच्या देवळात नेले. रामाच्या साक्षीने तिने राघवला सांगितले ,’हा माझा खरा राम.’ व लाजली. राघव ने तिला आश्वासन दिले की “माझ्याबरोबर तुला तुझ्या रामाबरोबर असल्यासारखेच वाटेल”. ती मनात खूप आनंदित झाली. व पुढच्या आयुष्याची स्वप्ने बघू लागली.
राघव निघून गेला. दोन महिन्यानंतर चा लग्नाचा मुहूर्त ठरला. तयारी सुरू झाली. वैदेही व राघव चे बोलणे सुरू असायचे. राघव तिला विचारायचा “तुझा राम काय म्हणतो?” ती सांगायची “माझा राम माझी खूप काळजी घेतो .त्याच्या पायाशी माझी खरी जागा आहे “त्यावर राघव खूप हसायचा.
हळूहळू दिवस पुढे जाऊ लागले. लग्नाच्या तयारीला वेग येऊ लागला. राघव व वैदहीचे एक होण्याचे दिवस जवळ येऊ लागले. वैदही दिवसभर गुणगुणायची “विसरू नको श्रीरामा मला….., रामा रघुनंदना…..”फक्त तिच्या रामासाठी.
भर पावसाळ्याचे दिवस होते ते . दोन-तीन दिवस सलग पाऊस पडत होता . नदीचे पात्र फुलत होते. पाणी वाढतच होते. वैदहीचा वाडा नदी जवळच होता. सगळ्यांना काळजी वाटत होती. तिसऱ्या दिवशी रात्रीची वेळ होती. सगळे झोपले होते. अचानक पाणी सगळीकडे पसरू लागले. वैदहीच्या वाड्यात पुराचे पाणी चढू लागले. सगळीकडे अंधार होता.
कोणालाच काही समजत नव्हते. सगळीकडे हाहाकार माजू लागला. कोणाला काहीही दिसेना. आरडाओरडा होऊ लागला. सगळे एकमेकांना शोधू लागले. वैदेहीचा कुठेच पत्ता नव्हता. रात्र वैऱ्याची होती. रात्र सरली. सकाळी उजेड झाल्यावर ,थोडे पाणी कमी झाल्यावर ,वैदेहीसाठी शोधकार्य सुरू झाले. सगळ्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तिचा निष्प्राण देह देवळातल्या रामाच्या पायावर होता. अक्षरशः तिचे डोके रामाच्या पायावर होते . “सखी काळ नागीणी सखे ग वैरीण झाली नदी “असे म्हणता, त्या नदीने वैदेहीला तिला तिच्या खऱ्या रामाकडे नेले होते. विदेही होऊन ती तिच्या रामाच्या रंगांमध्ये मिसळून गेली होती. राघव पासून दूर.
——वैशाली देव
=========================