वादळ कपातलं

©® गीता गजानन गरुड.
आज सकाळीच मेधाचा अजयशी वाद झाला. अजय, नवरा मेधाचा. त्रिकोणी कुटुंब. बाळराजा अनय चौथीत. अनयची पालकसभा होती. अनयच्या टिचरने कम्पलसरी आठ ते साडेआठ या वेळेत एक ते वीस रोल नंबरच्या मुलांनी त्यांच्या पालकांसह उपस्थित रहाण्यास सांगितलेलं. अनयचा रोल नंबर बारा होता.
मेधाने पहाटे उठून पोळीभाजी केली. डबा भरला. हे करेस्तोवर तिला साडेसात वाजले. अर्ध्यातासात अनयचं व तिचं आवरुन तिला रिक्षेने शाळेत पोहोचायचं होतं पण अजय ऐकेना. तो सांगू लागला की त्याची मिटिंग आहे. त्याला लवकर निघावं लागणार त्यामुळे तो आधी आंघोळ करणार.
मेधा म्हणाली,”तसं असेल तर शाळा ऑफिसच्या वाटेवर तर आहे. तू जा पालकसभेला. एखादवेळ मुलाला नाही नेलं तरी चालतं. तसा आपला अनयही मस्ती वगैरे करत नाही त्यामुळे त्याच्याविषयी फारशा तक्रारी नसतात.”
अजय भडकला,”तुला काय माझं ऑफिस म्हणजे धाबा वाटतो का. आओ जाओ घर अपना. मी आधी जाणार मग तुम्ही मायलेक काय ते करा तिकडे.” मेधापण भडकली. तिने त्याला प्रत्युत्तर केलं. शब्दाला शब्द वाढत गेला. हळूहळू शब्द थिजून गेले व अबोला सुरु झाला.
मेधाने कसंबसं आवरलं. अनयला अंघोळ न घालता थोडसं तोंड धुवून गणवेश घातला व इमारतीखाली आली. रस्त्यावर येताच तिने रिक्षा पकडली. मेधाचा गळा दाटून आला होता. मनात विचारांच काहूर माजलं होतं. ‘का वागतो अजय असा? माझा बाळ तसा त्याचाही बाळ आहेच नं. तरीही त्याचा होमवर्क,त्याचं ड्रॉईंग मीच घ्यायचं. का तर मी घरी असते. दुसरं काय काम असतं मला! परीक्षेच्या वेळात अनयची सगळी तयारी मीच करुन घ्यायची. अजय सात वाजेपर्यंत घरी येतो व टिव्ही लावून बसतो. अनयला खेळायला न्यायचं,त्याचे पाढे पाठ करून घ्यायचे,त्याला जेवण भरवायचं शिवाय दळण आणायचं,भाजी आणायची..खरंच माझ्या या कामांना काहीच मोल नाही? खरंतर मीही त्याच्यासारखीच शिकलेली पण नाही मला जमत अनयला परक्याच्या स्वाधीन करुन ऑफिसला जायला. ज्यांना जमतं त्या खरंच ग्रेट पण सगळ्याच नसतात नं ग्रेट.
मला आवडतं अजयच्या पगारात टुकीने संसार करायला. शाळेतून अनय येतो तेंव्हा त्याला कुशीत घेऊन त्याच्या शाळेत काय काय घडलं ते सारं त्याच्या बोबड्या बोलांनी ऐकायला. खरंच चुकतय का माझं घरात राहून अनयला सांभाळणं? घरात राहून मी माझा सेल्फ रिस्पेक्ट,माझं स्वत्व गमावतेय का? का मी चोवीस तास अव्हेलेबल आहे म्हणून अजयला माझा वीट आलाय. मला सारखंसारखं नजरेसमोर पाहून त्याची चीडचीड होतेय?’
अनेक प्रश्न मधमाशांनी डंख करावेत तसे तिच्या मनाला डसू लागले. डोळ्यातल्या आसवांनी काजळकाठ कधीचा ओलांडला होता व ते तिच्याही नकळत झरझर वहात होते.
अनय बाजूने जाणाऱ्या मोठमोठ्या गाड्या बघण्यात मग्न होता. रिक्षावाल्या दादाला मात्र आरशातून तिचे अश्रु दिसले तसा तोही बावरला. तिची व त्या दादाची नजरानजर होताच तिने स्वतःला सावरलं. ओढणीच्या टोकाने अश्रु पुसले व दूरवर पाहू लागली.
डोंगराच्या कुशीत शाळा असल्याकारणाने वाटेत दोन्हीबाजूंना हिरवीगार कुरणं व लांबवर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा दिसत होत्या. आभाळ भरुन आलं होतं. पांढरे बगळे कुरणात उभे होते. मध्येच घिरट्या घालून लांबवर जाऊन बसत होते. किती सुंदर पावसाळी वातावरण होतं पण मेधाच्या डोळ्यातही ढग दाटून आले होते. तिला तिच्या अजयचा जाम राग आला होता.
शाळा जवळ आली तसे मेधा व अनय रिक्षातून उतरले. शाळेत गेले. अनयची प्रगती नेहमीप्रमाणेच चांगली होती. टिचरने त्याला गुड बॉयही म्हंटल तसा तो खूष झाला.
टिचरला भेटून मेधा घरी जायला निघणार तेवढ्यात तिला सासूचा फोन आला. “मेधा मला जरा कसंतरीच होतय गं. येतेस का आज जमल्यास.”
“हो आई, मी दोन तासात पोहोचते. तुम्ही झोपून रहा.”
मेधा दोन अडीज तासात बसने अलिबागला पोहोचली. सासूच अंग बोटाने पाहिलं तर कढत लागलं. तिने ताबडतोब त्यांना डॉक्टरकडे नेऊन आणलं. बीपी,शुगर सगळं चेक करून घेतलं. सगळं नॉर्मल होतं. पावसाळी हवेमुळे फ्लू झाला होता. डॉक्टरांनी औषधगोळ्या लिहून दिल्या.
मेधाने मऊवरणभात केला. त्यावर थोडं तूप,मेतकूट पेरलं व सासूबाईंना वाढलं. अनयही आजीसोबत गप्पा मारत जेवला. अलिबागला मेधाची सासू अनाथ मुलांसाठी शाळा चालवत होती. त्यामुळे तिला अजयमेधासोबत जाऊन रहाणे शक्य नव्हते.
चार वाजेपर्यंत मेधाच्या सासूला छान तरतरी आली. नातवाच्या गप्पा ऐकून अंगातला शीण निघून गेला. आजीचा निरोप घेऊन मेधा व अनय निघाले. पण वाटेत तुफान पाऊस सुरु झाला. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते.ट्रेफीक जाम झाला होता. मुंगीच्या चालीने वाहनांची येजा चालू होती.
इकडे सात वाजता अजय घरी आला. नेहमीसारखा गरमागरम चहा,पोहे त्याच्या दिमतीला नव्हते. घर झोपेतून उठल्यासारखं अस्ताव्यस्त पसरलं होतं. त्यावर नेहमीसारखा मेधाचा मायेचा हात फिरला नव्हता.
बाथरुममध्ये आंघोळीचे कपडे तसेच बादलीत भिजत होते. सिंकमध्ये चहाची,सकाळच्या पोळीभाजीची भांडी आम्हाला कोणी स्वच्छ करतय का विचारत होती. त्या गोडसाणीला मुंग्यांची रांग लागली होती.
अजयच्या डोळ्यासमोर मेधाचा सकाळचा थरथरणारा अगतिक असा लालबुंद चेहरा आला. त्याने मेधाला फोन लावला पण नेमकी मेधाच्या फोनची बेटरी डाऊन झाली होती. कॉल लागलाच नाही.
अजयने ओटा स्वच्छ केला. भांडी स्वच्छ केली. घरातला केर काढला. दिवाबत्ती केली. पिठलंभात केला. त्याला वाटलं, अनयच्या एखाद्या मित्राचा वाढदिवस असेल तिथे गेली असेल. पण रात्रीचे दहा वाजले तसा त्याचा संयम सुटला.
नकोनको त्या विचारांनी मनात काहूर केले.
‘का रागावलो सकाळी एवढा मी? त्या टवळ्या बॉसमुळे माझं फेमिलीलाईफ का बरबाद करतोय मी?
ऑफिसातले इश्यूज ऑफिसातच ठेवायला का नाही जमत मला?
काय हरकत होती वर्षातली एक पालकसभा मी अटेंड करायला? पण काय आड येतय..इगो?..इगो कशाचा माझ्या नोकरीचा?..मेधा चूल आणि मूल सांभाळत बसलेय म्हणजे तिच्यातला स्वाभिमान गायब झाला का? का मी माझ्या पुरुषी अहंकाराचं सावज बनवतोय मेधाला? मेधा..मेधा व अनय नसेल तर काय होईल माझं? काय उपयोग आहे नुसत्या पैशाचा जर मला माझ्या माणसांची मनच जपता नाही आली तर! देव्हाऱ्यातल्या बालक्रुष्णाजवळ अजयने हात जोडले. त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.
मेधाने लेचकीने लेच उघडलं. घरात आली तर देव्हाऱ्यासमोर साश्रु नयनांनी तिची वाट पहात बसलेला तिचा अजय पाहून तिला गलबलून आलं. अनयने ‘बाबा’करुन लाडिक साद घालताच अजयने डोळे उघडले व आपले हात विस्तारले.
दुसऱ्या क्षणी अनय व मेधा दोघंही त्याच्या छातीला बिलगली होती. एव्हाना अजय व मेधाच्या डोळ्यांतलं आभाळ कोसळून निरभ्र झालं होतं. दोघांनीही परस्परांना माफ केलं होतं.
गरमागरम पिठलंभात व अनयच्या गप्पा घर मन लावून ऐकत होतं.
——-समाप्त
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============