Skip to content Skip to sidebar Skip to footer

वचन दिले तू मला…

ॲड. अश्विनी सचिन जगताप

राघव आणि मानसी एकाच गल्लीत राहायचे,अगदी दोन-चार घरांच्या अंतरावर.दोघेही बालवाडीपासून एकत्रच शिकले… शाळा आणि कॉलेजही एकच.दोन कुटुंबांचा चांगला घरोबा होता. घरात काहीही नवीन बनलं की त्यांची देवाणघेवाण व्हायची. राघव आणि मानसी एकत्रच शाळेत जायचे. आता दोघेही मोठे होत होते.अगदी कळायला लागल्यापासून दोघेही एकमेकांना खूप आवडायचे पुढे जाऊन ते दोघे लग्नही करणार होते. पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. १६ वर्षांची होऊनही मानसीला अजून पीरियड्स आले नव्हते, म्हणून तिची आई तिला घेऊन डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या करून सांगितले की मानसीला गर्भाशयच नाही. हे ऐकताच मानसीवर आणि आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातला सगळा आनंद हरवून बसला. ती सतत उदास रहायची. माधवच्या नजरेतून हे सुटलं नाही.नक्कीच काहीतरी झालंय हे त्याला कळत होतं. राघवने ठरवले आता मानसीशी बोलायचं आणि काय ते समजून घ्यायचं. राघवने मानसीला विचारले काय झाले तू सतत नाराज का असतेस? यावर मानसीने बरेच आढेवेढे घेऊन उत्तर देणे टाळले. पण शेवटी राघवच्या हट्टापुढे तिने हात टेकले. तिने डॉक्टरांनी सांगितलेले सत्य राघवला सांगितले . हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पण तो लगेच सावरला आणि त्याने मानसीला वचन दिले काहीही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही मी तुझ्याशीच लग्न करेल. मानसीला आनंद झाला पण काही क्षणापुरताच.भानावर येताच मानसी राघवला म्हणाली असा हट्ट करु नकोस या गोष्टीला तुझ्या घरचे कधीही तयार होणार नाहीत, माझा विचार सोडून दे. पण ऐकेल तो राघव कसला. मानसीने त्याला मला एखाद्या सैनिकांशीच लग्न करायचे आहे आणि तू जर सैन्यात भरती झाला तरच मी तुझ्याशी लग्न करेन अशी अट घातली. राघव या गोष्टीला एका पायावर तयार झाला.
‌‌ राघवने घरी जाऊन लगेच सैन्यात भरती होण्याच्या तयारीला सुरुवात केली. सकाळी लवकर उठून ग्राउंड वर जाणे, पळणे, व्यायाम करणे या गोष्टी तो नेमाने करू लागला.पण त्याचं सैन्यात भरती होण्याचं हे खूळ त्याच्या आई-वडिलांना काही पटलं नाही. त्यांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला.त्यांचा विरोध पत्करून अतिशय कष्टाने आणि मेहनतीने राघव अखेर सैन्यात भरती झाला.
मानसी राघवच्या वाटेकडे रोज डोळे लावून बसायची. टीव्हीवरच्या बातम्या पहायची आणि तो सुखरूप यावा यासाठी प्रार्थना करायची.त्याच्या वडीलांचीही हीच अवस्था होती. रोज ते बातम्या बघायचे, अशाच एके दिवशी बातम्या बघत असताना राघवच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं, ही गोष्ट दोन दिवसांनी राघवला कळाली तीही मानसीकडूनच. त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करून आठ दिवसांची सुट्टी मागून घेतली आणि तो घरी आला. वडिलांना अशा अवस्थेत पाहून त्याला फार वाईट वाटले.वडील शुद्धीवर आले तेच राघव राघव म्हणत. वडिलांनी राघवला जवळ बोलावले, इकडच्या तिकडच्या चार गोष्टी बोलून त्यांनी राघवकडून एक वचन मागितले. माझ्या मित्राच्या मुलीशी म्हणजेच माधवीशी तु उद्याचं लग्न करायचे. राघवने त्याचा निर्णय वडिलांना सांगितला पण वडिलांपुढे त्याचे काहीच चालले नाही. दुसऱ्याच दिवशी राघव आणि माधवीचा लग्न समारंभ थोडक्यात पार पडला. लग्न झालं पूजा झाली आणि राघव पुन्हा त्याच्या ड्युटीवर हजर झाला.या सगळ्या गडबडीत त्याला मानसीशी बोलायलाच मिळाले नाही.
दोन महिन्यांनी तो पुन्हा सुट्टीवर आला.त्या काळात त्याने मानसीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण मानसी त्याच काहीही ऐकून न घेता निघून गेली. राघवणे विचार केला माझ्यामुळे मानसीचं आयुष्य उध्वस्त झालंच आहे पण किमान माधवीचं आयुष्य तरी मी नक्कीच सावरू शकतो. बघता बघता पंधरा दिवस संपून गेले ,आता राघव माधवीशी मनानेही जोडला गेला होता .माधवीला निरोप देऊन तो पुन्हा ड्युटीवर हजर झाला. थोड्याच दिवसात त्याला कळले तो बाबा होणार आहे .रोज माधवीशी फोनवर गप्पा मारणे, तिच्या तब्येतीची चौकशी करणे, बाळाच्या भविष्याविषयी बोलणे यात नऊ महिने कधी सरले कळलेच नाही. आता माधवीला 9 वा महिना लागला होता. माधवने पुन्हा सुट्टी साठी अर्ज केला आणि माधव घरी आला.दोनच दिवसात माधवीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. एका गोड गोंडस बाळाला तिने जन्म दिला. पण अचानक तिची तब्येत जास्तच बिघडली.अति रक्तस्त्रावामुळे डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत.राघवला तर काहीच कळेना मुलगी झाल्याचे सुख मानू, की बायको गेल्याचे दुःख. इकडे घरी माधवीच्या क्रियाकर्मांची तयारी झाली होती. शेवटी रचलेल्या चितेवर माधवीचा मृतदेह ठेवण्यात आला. राघवने दोन दिवसांच्या त्या मासांच्या गोळ्याला छातीशी कवटाळले आणि तो माधवीच्या मृतदेहाला अग्नी द्यायला निघाला. तोच मानसीने राघवच्या हाताला हात लावला.मानसीने बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला, इतका वेळ काळीज पिळवटून टाकणारे बाळाचे रडणे क्षणात थांबले.त्या चितेच्या अग्नीला साक्षी ठेवून मानसीने राघवला पती आणि त्या इवल्याशा जीवाला स्वतःचं बाळ मानलं. आता मात्र राघवच्या घरच्यांचा विरोध मावळला होता. चौदा दिवसात माधवीचे सगळे क्रियाकर्म आटोपले. माधवीची शेवटची आठवण म्हणून बाळाचे नाव मधू ठेवले. माधवीच्या आई-वडीलांनीच मानसी आणि राघवच्या लग्नाचा पुढाकार घेतला.त्यांनी लग्नाला हसतमुखाने परवानगी दिली आणि आमच्या दुसऱ्या मुलीचे कन्यादानही आम्हीच करणार अशी अट घातली. मानसीच्या आई-वडिलांनाही फार आनंद झाला. घरगुती पद्धतीने राघव आणि मानसीचे लग्न झाले. मानसीला दिलेलं वचन पाळता आलं आणि बाळाला आई मिळाली ह्या दुहेरी आनंदाने राघवला तर आकाश ठेंगणे झाले.
अखेर गर्भाशयच नसलेल्या मानसीने भरल्याओटीने माप ओलांडले…

-सुरेखकन्या.
ॲड. अश्विनी सचिन जगताप.

================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.