उंदराची पिल्लं

©® गीता गजानन गरुड.
एका वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून उंदराने आपलं बीळ बनवलं होतं. त्याची बायको, तो व त्या दोघांची सात पिल्लं सगळे तिथंंच रहात होते.
बाबाउंदीर सकाळी उठताच दाणापाण्याची सोय करण्याकरिता बाहेर पडायचा ते संंध्याकाळी कधी दिवस मावळायला घरी यायचा.
मुलांचं खाणंपिणं, डब्बे, त्यांना शाळेसाठी तयार करणं, गणवेशांना इस्त्री..अशी ही सतरा कामं आईउंदीर न वैतागता करायची.
पिल्लं शाळेत गेली की बिळाची साफसफाई करायची. पिल्लं शाळेतून आली की त्यांना खाऊ काय द्यायचा याच्या तयारीला लागायची.
दिवस उजाडत होते मावळत होते. आई नि बाबाउंदरांच्या कामात क्वचित आजारपण वगळलं तर कधी व्यत्यय आला नव्हता. बाबाउंदीरही आपलं काम विनातक्रार करायचा.
आईउंदीर व बाबा उंदराची सात मुलं अनुक्रमे सोम,मंगळ,बुध,गुरु,शुक्र,शनि,रवी तशी स्वभावाने चांगली होती. बाहेरच्यांना तर अगदी सज्जन वाटायची. पण हीच सत्ते पे सत्ता गँग घरात आली की जाम धुडघूस घालायची.
संध्याकाळची आईउंदीर जरा गहू पाखडायला बसली की इकडे बुध अभ्यासाचा उठायचा नि शुक्राच्या पाठीत उगाच धपाटा घालायचा. शुक्र पाठ चोळत चोळत बुधला लाथा घालू लागायचा. ती लाथ लागायची रवीला.
रवी शुक्राला मारायला धावायचा नि मंगळाच्या अंगावर पडायचा मग सोम,गुरु, बुध सगळेच एकमेकांच्या अंगावर. हे तुंबळ युद्ध सुरु व्हायचं. आई उंदीर शांत रहा शांत रहा म्हणून दमून जायची. ओरडून ओरडून तिचा घसा दुखून जायचा.
सातही पिलांच्या वागण्यात काही फरक पडत नव्हता. एकदा काय झालं, शेजारच्या घरातले आईउंदीर ऩ बाबाउंदीर दोघेही रात्रीचे अन्नधान्याच्या शोधात कठल्याशा गोदामात गेले होते.
तिथल्या पहारेकऱ्याने उंदरांना पकडायचा सापळा ठेवला होता, त्यात ती जोडी अडकली. पहारेकऱ्याने त्यांना लांब झाडीत न्हेऊन टाकलं. त्यांची पिल्लं चांद व चांदनी दोघं बिचारी पोरकी झाली पण या सोम मंगळच्या आईने त्यांना आपल्या घरी आणलं, न्हाऊमाखू घातलं, खाऊपिऊ घातलं व म्हणाली,”आतापासून तुम्ही आमच्याकडे रहा. आता माझी नऊ मुलं समजेन हो मी.”
आपले आईबाबा कुठेतरी गेले तर आपण पोरके होऊ हे आईबाबाउंदरांच्या इतर सातही पिल्लांना उमगलं. पिल्लं आता दंगा घालायची कमी आली. उलट आईउंदीरला घरकामातही इवलीइवली मदत करू लागली. बिळातला केर काढू लागली. आपल्या वस्तू जागच्याजागी ठेवू लागली.
शाळेच्या ट्रीपला जाऊन आल्यानंतर त्यांनी विचार केला, आपल्या आईबाबांनाही असं फिरावसं वाटत असेल नं. आपण चार दिवस घर सांभाळलं तर ती दोघं जरा फिरून, ताजेतवाने होऊन येतील पण पायीपायी कुठवर जाणार!
सोम चाचाउंदीरच्या सायकल दुकानापाशी जाऊन घुटमळला. चाचा उंदराने विचारलं”सोम, काही हवंय का तुला?”
एवढ्यात मंगळही तिथे गेला. तो म्हणाला,”चाचा उंदीर चाचा उंदीर, एक काम होतं तुमच्याकडे.”
“अरे पोरांनो सांगा तर खरं.” चाचा उंदीर कंबरेवर हात घेऊन म्हणाला.
“आम्हांला पाचेक दिवसांसाठी सायकल भाड्याने पाहिजे.”
“सायकल चालवायला तुम्ही अजून लहान अहात.”
“अहो, बाबा उंदीर नि आई उंदीरला आम्हाला सहलीला पाठवायचंय त्यांच्यासाठी हवीय.”
हे ऐकून चाचा उंदीर खूष झाला व म्हणाला,” देईन की पण मला त्याबदल्यात भुईमुगाच्या शेंगा हव्यात. तुम्ही शाळेकडल्या शेतातल्या आणून साठवता हे ठाऊक आहे मला.”
सगळ्या पिल्लांनी आपल्या साठवणीतल्या चारचार शेंगा चाचा उंदराला दिल्या व सायकल घेऊन आले.
रात्री जेवताना बाबा उंदीर व आई उंदराला त्यांनी स़ागितलं,”आईबाबा, आम्हाला उद्यापासून आठ दिवस शाळेला सुट्टी पडणार आहे. आम्ही नऊजणं मिळून घर सांभाळू. तुम्हा दोघांना जरा विसाव्याची गरज आहे. तुमच्यासाठी आम्ही चाचा उंदीरकडून सायकलही आणलेय. तुम्ही उद्या सकाळी उठून फिरायला जायचंय. तुमची आवडती ठिकाणं बघून या. मोकळ्या हवेत श्वास घ्या.” रवी उंदीर म्हणाला.
“अरे पण बाळांनो, घरातल्या कामांचं, तुमच्या जेवणाखावणाचं कसं होईल! हे येऊदेत फिरून. मी रहाते बाई घरी.”
“नाही हं आई, जोडीने जायचं तुम्ही. आम्ही घर सांभाळू.” सगळी पिल्लं एका सुरात ओरडली.
भल्या पहाटे आईउंदीर व बाबाउंदीर सायकलवर बसून फिरायला निघाले. पिल्लांनी त्यांना हात उंचावून अच्छा, तुमची सहल सुखाची होवो अशा शुभेच्छा दिल्या.
समाप्त

==================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============