त्या दोघी

“मिता,आज कसं येणं केलंस?” मितालीच्या आत्याने तिला विचारलं.
“आत्तु,अगं जोडून सुट्टी मिळाली. बरेच दिवस तुझीमाझी भेट होत नव्हती. म्हंटलं,जाऊन आत्तुची ख्यालीखुशाली घ्यावी.” मिताली आत्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली.
“कोण,मिताताई बरं झालं आलात. तुमच्या आत्याला जरा सोबत होईल.” आत्याचे यजमान तात्यासाहेब मिताची तोंडदेखली दखल घेत पेढीवर निघून गेले.
“बघ,इतक्या दिवसांनी आलीस पण बोलले का तुझ्याशी चार शब्द!” आत्या नाराजीच्या स्वरात म्हणाली.
“आत्या,अगं तू पण काय लहान मुलासारखं करतेस. दसरा,दिवाळी जवळ आली. पेढीवर किती राबता असेल! खरंतर तू पण गेलं पाहीजेस पेढीवर.”
“मला का हौस नाही! पुर्वी बऱ्याचदा हट्ट केला पेढीवर घेऊन चला म्हणून पण यांनीताकास तूर लागू दिला नाही. पाचसहा नोकर आहेत पेढीवर. तुम्ही घरातलच बघा, म्हणाले. दुसानेंच्या घरातल्या बायका पेढीवर जात नाहीत म्हणत सासूबाईंनी यांचीच री ओढली. चल हे चालायचंच. अर्धा जन्म गेला या रहाटगाडग्यात. आता चर्चा करुन काय उपयोग म्हणा. तू एवढा प्रवास करुन आलैस ती थकली असशील. जरा न्हाऊन घे बघू. तोवर तुझ्या आवडीची पानगी करते.”
” पानग्यांच नाव काढलंस नि पाणी सुटलं बघ माझ्या तोंडाला. आलेच मी फ्रेश होऊन.”
आत्याने पानगी करायला घेतली. स्वयंपाकघर पानग्यांच्या गंधाने दरवळलं. आत्याचं घर म्हणजे भला मोठा वाडाच होता. आत्याच्या सासुबाईंना देवाज्ञा झाल्यापासून वाड्यात आत्या न् तात्यासाहेब दोघेच..जोडीला दोन नोकरमाणसं, तीही संध्याकाळला आपापल्या घरी निघून जायची. आत्याचा मुलगा बेंगलोरला कंपनी सेक्रेटरी म्हणून एका बड्या कंपनीत कार्यरत होता. त्याच्याच प्रोफेशनमधल्या मुलीशी त्याचं सूत जुळलं होतं. लग्नाशिवाय गेली दोन वर्ष आत्याचा विनय आणि ती मुलगी सुब्बुलक्ष्मी एकत्र रहात होते.
आत्याला हे मुळीच पसंत नव्हतं पण विनयही तात्यासाहेबांच्याच पावलांवर पाऊल टाकून वागत होता. तात्यासाहेबांच्या लेखी पत्नीची किंमत शून्य होती. ते अगदी सहजपणे तिला बेक्कल,मुर्ख म्हणून जायचे.
विनय लहान असल्यापासनं आईविषयी तेच शब्द त्याच्या कानावर पडल्याने तोही आईच्या शब्दाला किंमत देत नव्हता. विनय म्हणेल ती मागणी तात्यासाहेब पुरी करायचे. आत्याने विरोध करायचा प्रयत्न केला की विनयच्या समोरच म्हणायचे,”कमवतोय कशाला..मुलासाठीच ना. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय आपचा विनय. तो जन्मल्यापासनं बरकत आलेय पेढीला. मुलाच्या मागण्या,त्याचे हट्ट पुरे करायचे नाहीत तर कुणाचे करायचे!” तात्यासाहेब विनयची बाजू घेऊन नेहमीच असं बोलायचे नि मग आत्या तोंडघशी पडायची.
विनयला हळूहळू आईची ओढ वाटेनाशी झाली. तो जसजसा मोठा होत गेला तसतशी आई त्याच्या खिजगणतीतही राहिली नाही. तात्यासाहेबांशी मात्र त्याची चांगलीच गट्टी होती. बापलेक तासन्तास बोलायचे पण विनय जसजसा कॉलेजच्या परीक्षा देऊ लागला तसतसा तात्यासाहेबांशीही मोजकंच बोलू लागला. तो,त्याचे मित्र,पार्टीज,क्लासेस..हेच त्याचं विश्व बनलं. त्याच्या नशिबाने तो एकपाठी होता. सगळ्या परीक्षा एकापाठोपाठ एक उत्तीर्ण झाला. केम्पसमधून मोठ्या पगाराची नोकरी लागली तसे तात्यासाहेब खूप खूष झाले.
तात्यासाहेबांच एक मन म्हणत होतं की विनयने आता घरच्या कारभारात लक्ष घालावं. पेढी सांभाळावी पण मग दुसरं मन म्हणालं, एवढी चांगली नोकरी आपणहून चालत आलेय. करुदेत त्याला मनासारखं पण विनयने कोणाचं मत विचारलंच नव्हतं. त्याने फक्त नोकरी मिळाल्याची वार्ता दिली नि एका महिन्यात जॉइनदेखील झाला. तात्यासाहेब इथला एक नोकर त्याच्यासोबत पाठवणार होते पण विनय म्हणाला..गाडी,नोकर,फ्लेट..सगळं काही कंपनी देणार आहे..मग तर पुढच्या बोलण्याचा प्रश्नच मिटला.
आत्याच्या मनात होतं..लेकाला चटण्या,लोणची बांधून द्यावी. डबाभर लाडू करून द्यावे . तिनं तसं विचारलंही पण तात्यासाहेब तिची खिल्ली उडवत म्हणाले,”आजकाल ऑनलाइन सगळं मिळतं. उगा काहीही त्याच्या गळ्यात बांधू नका.” यावर तात्यासाहेबांची री ओढत विनय म्हणाला होता,”खरंच आई,ऑनलाइन सगळं मिळतं..शिवाय कूक आहे. तुझी ती लोणची नि लाडू मला मुळीच आवडत नाहीत. तिकडे नेऊन तसेच पडून रहाणार त्यापेक्षा देऊच नकोस तू मला.”
विनय निघून गेल्याचं आत्याला मुळीच वाईट वाटलं नाही. त्यांच्यात तेवढे घनिष्ट संबंधच नव्हते. तात्यासाहेबांनी ते रुजूच दिले नव्हते. पहिली दोन वर्ष विनय सहा महिन्यातनं एकदा आठवड्याभरासाठी यायचा. त्या वेळातही तो मित्रांसोबतच असायचा. आत्याला त्यात गौण असं काहीच वाटायचं नाही. तिच्या मनाने तिचं एकटेपण मान्य केलं होतं. तात्यासाहेब तरी तिचे कुठे होते!
वाळवंटात म्रुगजळ दिसलं की पांथस्थ्याची अवस्था व्हावी तशी मिताली आली की चार दिवस आत्याचे मोहरल्यासारखे जायचे. तिची बडबड,तिच्या गप्पा आत्या तिच्याच वयाची होऊन ऐकायची. तिच्यासोबत खळखळून हसायची. कित्येक दिवसांच्या एकटेपणाची पुटं त्यांच्या संवादाने धुऊन निघायची.
मिताली मराठी माध्यामात शिकलेली तर विनय कॉन्व्हेंटमधे. शिवाय मिताली तशी बुद्धीने सर्वसामान्य त्यामुळे विनयशी तिचं तितकंस जमत नसायचं. मिताली दरवर्षी आत्यासाठी त्या वाड्यात हजेरी लावायची. तिची हजेरी तात्यासाहेब व विनयच्या खिजगणतीतही नव्हती तरीसुध्दा ती तिच्या आत्यासाठी यायची. मिताली प्रोफेसर म्हणून नुकतीच एका नामांकित महाविद्यालयात रुजू झाली होती. मानसशास्त्राचा अभ्यास करताना तिला आत्याची होणारी फरफट अधिक प्रकर्षाने जाणवली होती.
मितालीने मनसोक्त पानगी खाल्ली. आत्याने तिला आवडतो म्हणून खास खरवस बनवला होता. तोही तिने यथेच्छ खाल्रा. संध्याकाळी दोघी बागेत फिरुन आल्या. रात्री आत्याने मितालीसोबत आपली गादी घातली. मितालीने तिला कंबर दाबून दिली. मितालीच्या मऊसूत हातांच्या दाबाने आत्याला खूप बरं वाटलं. मितालीने काही सांगितलं नाही तरी आल्यापासनं मितालीची होणारी तगमग आत्याच्या नजरेतून सुटली नाही. आत्याने तिला जवळ घेतलं तशी ऊन टिपं तिच्या डोळ्यातनं सांडली.
“मितु काय झालंय?” आत्याने विचारलं.
मितू बोलू लागली,”आत्या,तू दरवर्षी वटपोर्णिमेचा उपवास करतेस..”
“त्याचं काय इथे?”
“का करतेस तू उपवास..सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी? असा नवरा जो तुला काडीचाही मान देत नाही त्याच्यासाठी..”
मिता असं काही बोलेल असं आत्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मिताने आत्याची दुखरी नस दाबली होती.
“खरंय तुझं म्हणणं मितु. तात्यासाहेबांनी मला सोन्याने मढवलं पण मी सोन्यानाण्याची भुकेली नव्हतेच कधी. मला कविता करायला आवडायच्या. मला नाटकं बघायला आवडायची. मला फिरायला आवडायचं पण लग्न झालं नि माझं वाटणंच घुसमटून गेलं. तात्यासाहेबांच्या लेखी माझ्या वाटण्याला काहीच किंमत नव्हती. माझी एकही कविता तात्यासाहेबांनी ऐकली नाही. नाटक,सिनेमा,भटकंती म्हणजे त्यांच्या मते भिकारधंदे, रिकामटेकड्यांची कामं. मितु,तुला काय वाटतं..मी तात्यासाहेबांसाठी व्रतवैकल्य करते..मुळीच नाही. मला आवडतं नटूनथटून चार बायकांसोबत वडाला जाणं,प्रदक्षिणा घालणं,पूजापाठ करणं म्हणून करते. मिळालं तुझ्या प्रश्नाचं उत्तर. पण तुझ्या मनात काय सलतय ते सांगितलच नाहीस.”
“आत्या,अगं मम्मी लग्न कर म्हणून पाठी लागलीय.माझ्या बरोबरच्यांची लग्न होऊन त्यांना मुलं झाली म्हणून तिला टेंशन आलंय माझ्या लग्नाचं. काल तर म्हणत होती ते विनूदादासारखं लिव्ह इन केलंस तरी चालेल, म्हणजे मला घरातून हाकलून घालायचा निर्धारच केलाय दोघांनी.”
“मग तुझं काय म्हणणं आहे? कधी करणारैस लग्न? अगं जितका उशीर होईल तितके मग मुलंबाळं होणं अवघड होतं.” आत्याने तिची समजूत घालत म्हंटलं.
“आत्या, पण मला लग्न करायचंच नसेल तर..तर का ह्यांची जबरदस्ती! आतासं त्या घरात रहाणं मुश्कील झालंय मला. अरे वयाची अठरा वर्ष होईस्तोवर माझ्यावर इतके प्रेम करायचे माझे मम्मीपप्पा न् मी वयात येताच त्यांना माझी अडचण होऊ लागलेय! मला जावसंच वाटत नाही तिथे.”
“मग काय करणारैस?” आत्याने कुतुहलाने विचारलं.
“आत्या,मी लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय..म्हणजे सध्यातरी..पुढेमागे माझ्या विचारांना समजून घेणारा एखादा भेटला तर करेनही मी कदाचित लग्न पण तिशीच्या आत मला क्लीक होईल असा कुणी भेटला नाही तर केवळ वय वाढतय म्हणून कुणा ऐऱ्यागेऱ्याच्या गळ्यात मी माळ घालणार नाही. आत्या, हे सारं मी मम्मीपप्पांना सांगितलं तर जाम भडकले माझ्यावर.
आत्या मितालीचा शब्द न् शब्द ऐकत होती. ती मनाशी म्हणाली,”खरंच किती निर्भिडपणे मांडतेय ही आपलं मत! लग्न हा एक संस्कार आहे,पुर्वापार चालत आलेला पण त्याची जबरदस्ती नसावीच. मनासारखा जोडीदार नाही मिळाला की मग होरपळ होते..व्यवहार करावा तसं मुलांना जन्म देणं होतं नि एकाच छताखाली लोकलज्जेस्तव दोन जीव मन मारुनमुटकून रहातात, त्यापेक्षा आधीच आपल्या जीवनाचे ठोकताळे मांडले तर काय वाईट.” आत्याला मितालीच्या निर्णयाचा अभिमान वाटला.
“मितु, मला नेशील तुझ्यासोबत तुझ्या घरी रहायला?” आत्याने विचारलं न् मितुचे डोळे लकाकले. तिने आत्तुला घट्ट मिठी मारली.
–©️®️सौ.गीता गजानन गरुड.
===========
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============